Tag Archive for: साधना

ईश्वरी कृपा – ३१

प्रकाश आणि सत्य या गोष्टी असतील अशा परिस्थितीतच परम ‘कृपा’ तिचे कार्य करेल; मिथ्यत्व आणि अज्ञान यांनी तिच्यावर लादलेल्या परिस्थितीत, त्यांच्या अटींनुसार ती कार्य करणार नाही. कारण मिथ्यत्वाच्या मागण्यांपुढे जर तिला नमते घ्यावे लागले तर, तिचा स्वतःचा हेतुच विफल झाल्यासारखे होईल.

…अस्तित्वाचा एखादा भाग समर्पित आहे पण दुसरा भाग स्वतःला समर्पणाविना तसाच राखू इच्छित असेल, स्वतःच्याच पद्धतीने चालत असेल किंवा स्वतःच्या अटी लादत असेल तर, असे जेव्हा जेव्हा घडते त्या त्या प्रत्येक वेळी, तुम्ही स्वतःच ‘ईश्वरी कृपे’ला तुमच्यापासून दूर लोटत असता.

तुम्ही जर तुमच्या इच्छा, अहंकारी मागण्या आणि प्राणिक आग्रह तुमच्या भक्तिच्या आणि समर्पणाच्या आड लपवून ठेवत असाल; खऱ्या अभीप्सेच्या जागी तुम्ही या गोष्टी ठेवत असाल किंवा त्या गोष्टी अभीप्सेमध्ये मिसळत असाल आणि त्या गोष्टी ‘दिव्य शक्ती’वर लादण्याचा प्रयत्न करत असाल तर, ‘ईश्वरी कृपे’ने तुमचे रूपांतरण घडवून आणावे म्हणून तिला आवाहन करणे व्यर्थ आहे.

तुम्ही सत्याप्रत एका बाजूने स्वतःला खुले करत असाल किंवा तुमच्यामधील एखादा घटक सत्याप्रत खुला करत असाल आणि दुसऱ्या बाजूने सातत्याने विरोधी शक्तींना दारे खुली करत असाल, तर ‘ईश्वरी कृपा’ तुमच्या सन्निध राहील, ही अपेक्षा करणे फोल आहे. तुम्हाला जर तुमच्या मंदिरामध्ये ईश्वराच्या जिवंत ‘अस्तित्वा’ची प्राणप्रतिष्ठा करायची असेल तर तुम्ही ते मंदिर स्वच्छ राखणेच पाहिजे.

जेव्हा जेव्हा ‘ईश्वरी शक्ती’ हस्तक्षेप करते आणि सत्य घेऊन येते, तेव्हा प्रत्येक वेळी तुम्ही जर त्या सत्याकडे पाठ फिरवलीत आणि ज्या मिथ्यत्वाला घालवून दिले होते त्याला पुन्हा आमंत्रित केलेत तर, तुम्हाला अंतर दिल्याबद्दल ईश्वरी कृपेला तुम्ही दोष देता कामा नये, तर तुम्ही तुमच्या स्वतःच्या इच्छेच्या खोटेपणाला आणि तुमच्या स्वतःच्या समर्पणाच्या अपूर्णतेला दोष दिला पाहिजे.

– श्रीअरविंद
(CWSA 32 : 03)

ईश्वरी कृपा – ३०

ईश्वराने स्वतःचे आविष्करण केलेच पाहिजे म्हणून त्याला आवाहन करण्याचा व्यक्तीला कोणताही अधिकार नाही; ते आविष्करण केवळ चेतनेच्या आध्यात्मिक किंवा आंतरात्मिक अवस्थेला प्रतिसाद म्हणून होऊ शकते किंवा योग्य प्रकारे केलेल्या दीर्घकालीन साधनेला दिलेला प्रतिसाद म्हणून होऊ शकते; किंवा जर ते आविष्करण त्यापूर्वी किंवा कोणत्याही दृश्य कारणाविना घडून येत असेल तर ती ‘ईश्वरी कृपा’ असते; परंतु व्यक्ती या ‘ईश्वरी कृपे’ची मागणी करू शकत नाही किंवा तिच्यावर सक्ती करू शकत नाही; ‘ईश्वरी कृपा’ ही व्यक्तीच्या अस्तित्वाचे एक मुक्त-पुष्प बनून, दिव्य चेतनेमधून उत्स्फूर्तपणे उसळून वर येते.

– श्रीअरविंद
(CWSA 29 : 473)

ईश्वरी कृपा – २९

(ईश्वराची अनुभूती आल्याशिवाय मी त्याची भक्ती करू शकत नाही, असा दृष्टिकोन स्वीकारलेल्या एका साधकाला श्रीअरविंदांनी लिहिलेल्या पत्रातील हा अंशभाग…)

…आणि मग तुम्ही पुन्हा असे म्हणाल की, “मी भक्ती करेन किंवा करणार नाही पण मला मात्र तो हवा आहे, मला तो नेहमीच हवाहवासा वाटतो आणि आता तर तो मला अधिकच हवाहवासा वाटू लागला आहे आणि तरी मला काहीच मिळत नाही.’ पण इच्छा असणे म्हणजेच सारे काही झाले असे नाही. आत्ता कुठे तुमच्या लक्षात येऊ लागले आहे की, त्यासाठी हृदयाची शुद्धी वगैरे सारख्या काही अटींची पूर्तता करावी लागते. तुमचा सिद्धान्त असा असतो की, “मला जेव्हा ‘देव’ हवा असेल, तेव्हा ‘देवा’ने माझ्यासाठी आविष्कृत झालेच पाहिजे, माझ्यापाशी यायलाच हवे, अगदीच काही नाही तरी किमान मला त्याने ओझरते दर्शन तरी दिले पाहिजे, किंवा एखादा खराखुरा सघन अनुभव द्यायला पाहिजे, मला कळणार नाहीत किंवा मी ज्याला किंमत देत नाही अशा संदिग्ध गोष्टी मला नकोत. ‘देवाच्या कृपे’ने माझ्या हाकेला उत्तर दिलेच पाहिजे, माझी पात्रता असो वा नसो, त्याने उत्तर दिलेच पाहिजे अन्यथा ‘कृपा’ वगैरे काही अस्तित्वातच नाही.” काही विशेष बाबींमध्ये ‘देवाची कृपा’ खरोखरच असे करेलदेखील, पण ‘केलेच पाहिजे, दिलेच पाहिजे’ ही अशी हक्काची भाषा कोठून आली ? आणि मग जर ‘देव’ तसेच करेल तर ती ‘देवाची कृपा’ असणार नाही, तर ते मग, ‘देवा’चे कर्तव्य, देवावरील बंधन किंवा करार किंवा तह होऊन बसेल. ईश्वर तुमच्या हृदयामध्ये डोकावतो आणि योग्य क्षण आला आहे असे जाणवले की त्या क्षणी, पडदा बाजूला करून टाकतो.

– श्रीअरविंद
(CWSA 29 : 468)

ईश्वरी कृपा – २६

‘ईश्वर’ आणि तुमच्यामध्ये तुम्ही इतर कोणाही व्यक्तिला, कोणत्याही कल्पनेला, कोणत्याही गोष्टीला का येऊ देता? तुम्ही जेव्हा पूर्ण अभीप्सायुक्त असता, आनंदात असता तेव्हा इतर कोणतीच गोष्ट महत्त्वाची नाही; ईश्वर आणि तुमची अभीप्सा या व्यतिरिक्त इतर कोणत्याही गोष्टीला महत्त्व देता कामा नये. एखाद्या व्यक्तिला जर ‘ईश्वर’ त्वरेने, संपूर्णतः, समग्रतेने मिळावा असे वाटत असेल, तर त्या व्यक्तीची मनोभूमिका संपूर्ण, सर्वसमावेशक असावयास हवी. तोच त्याचा एकमेव उद्दिष्टबिंदू असायला हवा आणि त्यामध्ये इतर कोणत्याही गोष्टीचा हस्तक्षेप असता कामा नये.

‘ईश्वर’ कसा असावा, त्याने कसे वागावे, त्याने कसे वागता कामा नये, या संबंधीच्या मानसिक कल्पनांना काहीही किंमत नाही, उलट त्या मानसिक कल्पना म्हणजे मार्गातील धोंडच ठरतात. एक ‘ईश्वर’च केवळ महत्त्वाचा आहे. जेव्हा तुमची चेतना ‘ईश्वरा’ला कवळून घेते, तेव्हाच खऱ्या अर्थाने ‘ईश्वर’ काय आहे हे तुम्हाला समजते, त्या आधी नाही. कृष्ण हा कृष्ण आहे, त्यामुळे त्याने काय केले, काय केले नाही याला मग अशी व्यक्ती महत्त्व देत नाही तर ती व्यक्ती ‘त्याला’ पाहते, ‘त्याला’ भेटते; त्याचा ‘प्रकाश’, त्याची ‘उपस्थिती’, त्याचे ‘प्रेम’, त्याचा ‘आनंद’ हाच काय तो तिच्यासाठी महत्त्वाचा ठरतो. आध्यात्मिक अभीप्सेबाबतीत नेहमी हे असेच असते – हा आध्यात्मिक जीवनाचा नियम आहे.

कोणत्याही मानसिक कल्पना किंवा प्राणिक चढउतार यांच्यावर वेळ वाया घालवू नका – ते ढग पळवून लावा. जी एकमेव आवश्यक गोष्ट आहे त्यावरच तुमचे लक्ष केंद्रित करा.

– श्रीअरविंद
(CWSA 29 : 56)

ईश्वरी कृपा – २४

‘ईश्वरी कृपा’ सदोदित तुमच्यासोबत असते; शांत मनाने तुम्ही तुमच्या हृदयात लक्ष एकाग्र करा, म्हणजे मग तुम्हाला खात्रीपूर्वक, तुम्ही ज्याची आस बाळगून आहात ते साहाय्य आणि इतकेच नव्हे तर, मार्गदर्शनसुद्धा मिळेल.

*

‘ईश्वरी कृपा’ ही सदोदित असतेच, ती शाश्वतपणे अस्तित्वात असते, सक्रिय असते पण श्रीअरविंद म्हणतात की, ‘ईश्वरी कृपा’ स्वीकारण्यासाठी आपण ग्रहणशील स्थितिमध्ये असणे, तिला सांभाळून ठेवणे आणि आपल्याला जे काही प्रदान करण्यात आले आहे त्याचा उपयोग करणे, हे आपल्यालाच अवघड जाते… ‘ईश्वरी कृपा’ ग्रहण करण्यासाठी व्यक्तिपाशी नुसती उत्कट अभीप्सा असणेच पुरेसे नाही तर, तिच्याकडे प्रामाणिक विनम्रता आणि परिपूर्ण विश्वासदेखील असला पाहिजे.

– श्रीमाताजी
(CWM 14 : 87), (CWM 16 : 250)

ईश्वरी कृपा – २०

एखाद्या व्यक्तीने जेव्हा ‘ईश्वर’प्राप्तीच्या साधनेसाठी आपले जीवन समर्पित करण्याचा निर्णय घेतलेला असतो आणि त्याबाबतीत ती व्यक्ती प्रामाणिक असते; म्हणजे असे की, तिचा संकल्प तळमळीचा, प्रामाणिक असून, तो प्रांजळपणे प्रत्यक्षात उतरविला जातो, तेव्हा त्या व्यक्तीने कशाचेच भय बाळगण्याचे कारण नाही; कारण तिच्याबाबतीत जे सारे घडते किंवा जे घडणार आहे ते तिला ईश्वराच्या साक्षात्काराप्रत सर्वात जवळच्या मार्गाने घेऊन जाईल.

हाच असतो ‘ईश्वरी कृपे’चा प्रतिसाद! जीवनातील प्रत्येक गोष्ट अगदी सहज, सुरळीत होणे म्हणजे ‘ईश्वरी कृपा’ असा लोकांचा समज असतो, पण हे खरे नाही.

‘ईश्वरी कृपा’ तुमच्या अभीप्सेची पूर्तता व्हावी यासाठी कार्य करते. आणि तुमच्या अभीप्सेची त्वरेने व वेगाने परिपूर्ती व्हावी म्हणून त्याला अनुरूप अशी प्रत्येक गोष्ट तिच्याकडून घडविली जाते. असे असल्यामुळे घाबरण्यासारखे काहीच नाही.

– श्रीमाताजी
(CWM 15 : 180-181)

ईश्वरी कृपा – १८

(व्यक्तीचे शारीरिक आरोग्य, शरीराची स्वास्थ्यकारक वृत्ती, त्याची जडणघडण यावर विवेचन केल्यानंतर श्रीमाताजी ‘ईश्वरी कृपे’बद्दल म्हणाल्या…)

व्यक्तीच्या अंतरंगात जर ‘ईश्वरी कृपे’विषयी अशी श्रद्धा असेल की, ‘ईश्वरी कृपा’ माझ्याकडे लक्ष ठेवून आहे आणि काहीही झाले तरी ‘ईश्वरी कृपा’ आहेच, आणि ती माझ्यावर दृष्टी ठेवून आहे तर, (व्यक्ती अशी श्रद्धा नेहमीच, व आयुष्यभर बाळगू शकते) तिच्या साहाय्याने व्यक्ती कोणत्याही संकटामधून पार होऊ शकते, या श्रद्धेच्या साहाय्याने सर्व अडचणींना सामोरे जाऊ शकते, अशा व्यक्तीला काहीच विचलित करू शकत नाही कारण तिच्यापाशी श्रद्धा असते आणि ‘ईश्वरी कृपा’देखील तिच्यासोबत असते. ती अनंतपटीने शक्तिशाली, अधिक सचेत, अधिक चिरकाळ टिकणारी अशी शक्ती आहे; तुमची शारीरिक ठेवण कशी आहे, तिची अवस्था काय आहे यावर ती शक्ती अवलंबून नसते; ती ‘ईश्वरी कृपे’खेरीज अन्य कोणत्याही गोष्टीवर अवलंबून नसते आणि म्हणून ती ‘सत्या’वरच विसंबून असते आणि मग तिला कोणतीही गोष्ट विचलित करू शकत नाही.

– श्रीमाताजी
(CWM 05 : 297)

ईश्वरी कृपा – १३

अज्ञानमूलक चुकांची दुरुस्ती करणे म्हणजे अंधकार नाहीसा करण्यासारखे आहे, जणू तुम्ही दिवा लावता आणि अंधार नाहीसा होतो, पण एखादी गोष्ट चुकीची आहे असे माहीत असूनदेखील, तीच चूक पुन्हा करणे म्हणजे जणू कोणीतरी दिवा लावलेला असावा आणि तुम्ही तो हेतुपुरस्सर विझवून टाकावा… असे करणे म्हणजे, अंधाराला हेतुत: परत बोलावण्यासारखेच आहे.

…ज्यांनी स्वतःला सुधारण्याचा निश्चय केलेला असतो त्यांना साहाय्य करण्यासाठी ईश्वरी ‘कृपा’ नेहमीच उपस्थित असते आणि त्यामुळे, “स्वतःला सुधारण्यासाठी आम्ही खूप कमकुवत आहोत,’ असे ते म्हणू शकत नाहीत. ते फार फार तर असे म्हणू शकतात की, त्यांनी स्वतःला सुधारण्याचा संकल्पच अजून केलेला नाही, म्हणजे त्यांच्या अस्तित्वामध्ये कोठेतरी असे काहीतरी असते की, ज्याने तो संकल्प केलेला नसतो, आणि हे मात्र अधिक गंभीर असते.

कमकुवत असल्याचा युक्तिवाद हे एक निमित्त असते. ज्यांनी संकल्प केलेला असतो त्यांना परमोच्च सामर्थ्य देण्यासाठी ईश्वरी ‘कृपा’ असतेच.

याचा अर्थ असा की, कमकुवतपणाचा युक्तिवाद हा युक्तिवाद नसतो तर तो अप्रामाणिकपणा असतो. आणि अप्रामाणिकपणा म्हणजे शत्रुसाठी नेहमीच मुक्तद्वार असते; म्हणजे तेथे विपरित गोष्टींबाबतची एक सुप्त सहानुभूती असते आणि ती गोष्ट अधिक गंभीर असते.

– श्रीमाताजी
(CWM 09 : 306-307)

ईश्वरी कृपा – ०८

एक अशी ‘सत्ता’ आहे, जिच्यावर कोणताही सत्ताधीश हुकमत गाजवू शकणार नाही; असा एक ‘आनंद’ आहे की, जो कोणत्याही लौकिक यशातून प्राप्त होणार नाही; असा एक ‘प्रकाश’ आहे, जो कोणत्याही प्रज्ञेच्या ताब्यात असणार नाही; असे एक ‘ज्ञान’ आहे की, ज्यावर कोणतेही तत्त्वज्ञान किंवा कोणतेही विज्ञान प्रभुत्व मिळवू शकणार नाही; एक असा ‘परमानंद’ आहे की, कोणत्याही इच्छापूर्तीच्या समाधानातून तसा आनंद मिळू शकणार नाही; अशी एक ‘प्रेमा’ची तृष्णा आहे, जिची तृप्ती कोणत्याही मानवी नातेसंबंधातून होऊ शकत नाही; अशी एक ‘शांती’ आहे, जी व्यक्तिला कोठेच प्राप्त होत नाही, अगदी मृत्युमध्येसुद्धा प्राप्त होत नाही. ही ‘सत्ता’, हा ‘आनंद’, हा ‘प्रकाश’, हे ‘ज्ञान’, हा ‘परमानंद’, हे ‘प्रेम’, ही ‘शांती’ ‘ईश्वरी कृपे’पासूनच प्रवाहित होते.

– श्रीमाताजी
(CWM 01 : 380)

ईश्वरी कृपा – ०५

ईश्वरासाठी जो अभीप्सा बाळगत असतो, त्याच्यासमोर नेहमी जी कोणती अडचण उभी राहते तीच स्वयमेव त्याच्यासाठी एक प्रवेशद्वार ठरते; त्या माध्यमातून तो स्वतःच्या व्यक्तिगत पद्धतीने ईश्वराची प्राप्ती करून घेणार असतो; त्याला ईश्वराच्या साक्षात्काराप्रत घेऊन जाणारा त्याचा तो विशिष्ट मार्ग असतो.

अशी देखील वस्तुस्थिती असते की, जर एखाद्याला शेकडो अडचणी आल्या तर, त्याला होणारा साक्षात्कारही विलक्षण असतो – अर्थात, हे उघड आहे की, त्याच्यामध्ये जर धीर आणि चिकाटी असेल, आणि ज्या दोषांमुळे अडचणी निर्माण झाल्या, त्या दोषांविरुद्ध अभीप्सेच्या अग्निची ज्वाला जर तो कायम तेवती ठेवेल, तरच त्याला तो तसा साक्षात्कार होईल.

आणि लक्षात ठेवा की : सर्वसाधारणपणे ईश्वराची कृपादेखील तुमच्या अडचणींच्या प्रमाणातच असते.

– श्रीमाताजी
(CWM 03 :143)