Tag Archive for: साधना

ज्यांना स्वतःचे शुद्धीकरण करून घेण्याची इच्छा आहे त्यांच्यासाठी पाऊस असतो. तो तुमच्यातील सारे दोष, साऱ्या त्रुटी आणि साऱ्या अशुद्धता दूर करतो. पावसामध्ये पृथ्वीचे, पृथ्वीवर जीवन जगणाऱ्या माणसांचे आणि पृथ्वीवरील वातावरणाचे शुद्धीकरण करण्याची शक्ती असते.

परंतु त्यासाठी व्यक्तीने स्वतःला खुले ठेवले पाहिजे, तिच्या मनात किंचितही भीती असता उपयोगी नाही; ताप येईल किंवा आपण आजारी पडू अशी कोणतीही भीती असता कामा नये. आपल्या वर असणाऱ्या त्या ‘विशालते’प्रत आपण स्वतःला खुले ठेवले आणि पावसाला आपले शुद्धीकरण करू दिले, तर त्याचे ठोस परिणाम दिसून येतात.

– श्रीमाताजी
(Throb of Nature : 197)

प्रेमाची स्पंदने ही फक्त मनुष्यप्राण्यापुरतीच मर्यादित नसतात; मनुष्यप्राण्याच्या तुलनेत इतर जगतांमध्ये ही स्पंदने कमी दूषित असतात. झाडांकडे व फुलांकडे पाहा. जेव्हा सूर्य मावळतो आणि सारे काही शांत होते, अशावेळी थोडा वेळ शांत बसा आणि ‘निसर्गा’शी एकत्व पावण्याचा प्रयत्न करा. या पृथ्वीपासून, झाडांच्या अगदी मुळापासून, त्याच्या तंतूतंतूंमधून वरवर जाणारी, अगदी सर्वाधिक उंच अशा बाहू फैलावलेल्या शाखांपर्यंत पोहोचलेल्या उत्कट प्रेमाची, उत्कट इच्छेची अभीप्सा तुम्हाला संवेदित होईल. प्रकाश आणि आनंद घेऊन येणाऱ्या अशा कशाची तरी ती आस असते, कारण तेव्हा प्रकाश मावळलेला असतो आणि त्यांना तो पुन्हा हवा असतो. ही आस, ही उत्कंठा इतकी शुद्ध आणि तीव्र असते की, झाडांमधील ही स्पंदने जर तुम्हाला जाणवू शकली तर तुमच्यामध्ये देखील, येथे आजवर अभिव्यक्त न झालेल्या शांती, प्रकाश, प्रेम यांविषयीची उत्कट प्रार्थना उदयाला येत आहे आणि वर वर जात आहे असे तुम्हाला जाणवेल.

– श्रीमाताजी
(CWM 03 : 72)

विचार शलाका – २६

व्यक्तीला जेव्हा सर्वसामान्य वातावरणात राहून, दैनंदिन जीवन जगावे लागते तेव्हा आध्यात्मिक जीवनासाठी स्वत:ला तयार करण्याचा उत्तम मार्ग म्हणजे – सर्वांगीण समता व अलिप्तता, आणि या अज्ञानमय विश्वात सद्यस्थितीतदेखील ‘ईश्वर’ आहे आणि ‘ईश्वरी इच्छा’ सर्व गोष्टींमध्ये कार्यकारी आहे याविषयी सश्रद्ध राहून, ‘गीते’मध्ये सांगितल्यानुसार ‘समता’वृत्तीची जोपासना करणे – हा आहे. …व्यक्तीमध्ये तसेच प्रकृतीमध्ये, प्रकाश व आनंद यांच्या पदार्पणाचा आणि स्थापनेचा सर्वात उत्तम मार्ग म्हणजे आध्यात्मिक समतेमध्ये विकसित होणे, हा असतो. त्यामुळे असुखकर, असहमत वस्तुंविषयीची तुमची अडचणदेखील दूर होईल. सर्व प्रकारच्या असमाधानकारकतेचा सामना या ‘समते’च्या वृत्तीद्वारे केला पाहिजे.

– श्रीअरविंद
(CWSA 31 : 344)

विचार शलाका – २३

(आम्हाला आश्रमामध्ये येऊनच योगसाधना करायची आहे, असे म्हणणाऱ्या लोकांना श्रीअरविंद सांगत आहेत…)

एखादी व्यक्ती जर दूर अंतरावर राहून साहाय्य प्राप्त करून घेऊ शकली नाही तर ती व्यक्ती येथे (आश्रमात) योगसाधना करण्याची अपेक्षा कशी बाळगू शकते? (पूर्णयोग) ही अशी योगपद्धती आहे की जी तोंडी सूचना किंवा इतर कोणत्याही बाह्य गोष्टींवर अवलंबून नाही. तर स्वत:ला खुले (open) करण्याचे सामर्थ्य आणि अगदी संपूर्ण नि:स्तब्धतेमध्ये देखील ‘ती’ शक्ती व तिचा प्रभाव ग्रहण करण्याचे सामर्थ्य या गोष्टींवर ही योगपद्धती अवलंबलेली आहे. त्या शक्तीला जे दूर अंतरावरून ग्रहण करू शकत नाहीत ते इथेसुद्धा (आश्रमात) ती शक्ती ग्रहण करू शकणार नाहीत. स्वत:मध्ये स्थिरता, प्रामाणिकपणा, शांती, सहनशीलता आणि चिकाटी या गोष्टी प्रस्थापित केल्याशिवाय हा योग आचरता येणे शक्य नाही, कारण यामध्ये पुष्कळ अडचणींना, समस्यांना तोंड द्यावे लागते आणि त्यांच्यावर निश्चिततपणे व पूर्णत: मात करण्यासाठी वर्षानुवर्षे लागतात.

– श्रीअरविंद
(CWSA 35 : 597)

विचार शलाका – ११

आपण कोणीच नाही, आपण काहीच करू शकत नाही, आपले अस्तित्वच नाही, आपण काहीच नाही, दिव्य ‘चेतना’ आणि दिव्य ‘कृपा’ यांच्याविना कोणते अस्तित्वच नाही हे खोलवर कळण्यासाठी आयुष्यात कितीतरी टक्केटोणपे खावे लागतात. आणि ज्या क्षणी माणसाला हे उमगते, त्या क्षणीच सारे दुःखभोग संपून जातात, त्याचवेळी साऱ्या अडचणी दूर होतात. एखाद्याला जेव्हा हे पूर्णार्थाने कळते आणि विरोध करणारे काहीच शिल्लक रहात नाही… पण त्या क्षणापर्यंतच… तो क्षण यायलाच खूप वेळ लागतो. …हे न विसरण्याइतकी जर एखादी व्यक्ती भाग्यवान असेल तर ती या मार्गावर वेगाने पुढे जाऊ शकते.

– श्रीमाताजी
(CWM 06 : 323-324)

विचार शलाका – ०६

सच्च्या साधकभावाने जे जीवन व्यतीत करतात, जे ‘ईश्वरा’ठायीच त्यांची चेतना आणि एकाग्रता दृढ ठेवतात, फक्त ‘ईश्वर’ हेच ज्यांचे साध्य असते, जे दास्य भावाने ‘ईश्वरा’ची सेवा करतात, जे ‘ईश्वरा’शी संपूर्णतया एकनिष्ठ असतात, केवळ त्यांनाच ‘ईश्वर’ संरक्षण देऊ शकतो.

एखाद्याचा आवडीनिवडींचा, सुखसोयींचा आग्रह, दांभिकपणा, अप्रामाणिकपणा व मिथ्याचार यांच्या सर्व गतिविधी इत्यादी वासना या म्हणजे, ‘ईश्वरी’ संरक्षणाचा मार्ग अडवून उभे ठाकणारे प्रचंड अडथळे असतात. तुम्ही जर तुमची स्वत:ची इच्छा ‘ईश्वरा’वर लादू पहात असाल तर, ते म्हणजे एखादा बॉम्ब तुमच्यावर येऊन आदळावा म्हणून त्या बॉम्बलाच आमंत्रण देण्यासारखे आहे. गोष्टी अशा रीतीनेच घडतील, असे मी म्हणत नाही. पण लोक जर जागरूक व अतिशय सतर्क झाले नाहीत आणि सच्च्या साधकभावाने वागले नाहीत, तर गोष्टी अशा रीतीनेच घडण्याची दाट शक्यता असते.

– श्रीमाताजी
(CWM 13 : 121)

विचार शलाका – ०४

दुःखभोगामध्ये रमणारी आणि त्याची इच्छा बाळगणारी अशी तुमच्यामध्ये जी गोष्ट असते ती मानवी प्राणाचाच (vital) एक भाग असते. या गोष्टींचेच वर्णन आम्ही प्राणाचा अप्रामाणिकपणा व त्याचा विकृत पीळ असे करतो; प्राणाचा तो भाग दुःख व संकटे यांच्याविरुद्ध गळा काढतो आणि ‘ईश्वर’, जीवन व इतर सारे त्याला छळत असल्याचा त्यांच्यावर आरोप करतो. पण बव्हंशी दुःख-संकटे येतात आणि स्थिरावतात याचे कारण, प्राणातील त्या विकृत भागालाच ती हवी असतात! प्राणातील त्या घटकापासून पूर्णपणे सुटका करून घ्यायलाच हवी.

– श्रीअरविंद
(CWSA 31 : 178)

सद्भावना – २६

(प्राणामध्ये (Vital) दोन प्रवृत्ती आढळतात – एक म्हणजे निराशेची आणि दुसरी अतिउत्साहाची. या दोन प्रवृत्तींना कसे हाताळावे, याविषयी चर्चा सुरू असताना, श्रीमाताजी पुढे सांगत आहेत…)

अगदी काळजीपूर्वक टाळलाच पाहिजे असा हा एक मोठा अडथळा आहे. असमाधानाचे किंवा चिडचिडेपणाचे अगदी बारीकसे लक्षण जरी आढळले तरी, लगेचच आपण आपल्या प्राणाला असे सांगितले पाहिजे की, ”माझ्या मित्रा, तू शांत राहणार आहेस, तुला जे करायला सांगितले आहे तेवढेच तू करणार आहेस, अन्यथा माझ्याशी गाठ आहे.” आणि दुसरीकडे, “आत्ताच्या आत्ता सारे काही झालेच पाहिजे,’’ असे म्हणणारा, जो अतिउत्साही (प्राण) असतो त्याला असे समजावून सांगितले पाहिजे की, “थोडा शांत हो, तुझी उत्साहशक्ती चांगलीच आहे पण ती अशी पाच मिनिटांतच वाया घालविता कामा नये. आपल्याला ती पुढेही दीर्घकाळ लागणार आहे, तिचे काळजीपूर्वक जतन कर, आणि मला जेव्हा तिची आवश्यकता भासेल तेव्हा मी स्वतःहून तुझ्या सद्भावनेला हाक देईन. तेव्हा तू सद्भावनेने परिपूर्ण आहेस हे दाखवून देशील, तू आज्ञा पाळशील, तू कुरकूर करणार नाहीस, तू विरोध करणार नाहीस, तू बंड करणार नाहीस, तू म्हणशील, ‘हो, हो. मी करीन.” तुला जेव्हा विचारण्यात येईल तेव्हा तू किंचितसा त्याग करशील आणि म्हणशील, “हो, मी अगदी मनापासून करीन.” (प्राणाच्या अतिउत्साहाला तुम्ही अशा प्रकारे आवर घातला पाहिजे.)

– श्रीमाताजी
(CWM 04 : 249)

सद्भावना – २५

व्यक्ती ज्यावेळी अतिशय सतर्क आणि अतिशय प्रामाणिक असते तेव्हा, तिने हाती घेतलेल्या कामाचे किंवा ती करत असलेल्या कृतीचे मूल्य किती आहे किंवा काय आहे यासंबंधी, तिला एखादी आंतरिक पण सुस्पष्ट सूचना मिळू शकते. खरोखर, जिच्यापाशी पुरेपूर सद्भावना आहे अशी एखादी व्यक्ती असेल म्हणजे जी व्यक्ती अत्यंत प्रामाणिकपणाने, तिच्या अस्तित्वाच्या समग्र जाणिवयुक्त भागानिशी, योग्य कृती, योग्य प्रकारे करण्याची इच्छा बाळगत असेल तर नेहमीच अशा प्रकारची अंतःसूचना मिळते. कोणत्याही कारणाने का असेना पण जर का तिने कमीअधिक घातक अशी एखादी कृती करायला सुरुवात केली तर, तिला अशा प्रत्येक वेळी आज्ञा-चक्रापाशी (solar plexus) एक प्रकारच्या अस्वस्थतेची जाणीव होते. ही अस्वस्थता आक्रमक नसते, नाट्यमयरित्या काहीतरी करून आपल्या अस्तित्वाची जाणीव करून देण्यासाठी ती बळाचा वापर करत नाही, परंतु तरीही सतर्क व्यक्तीसाठी ती अस्वस्थता अगदी सुस्पष्ट असते; ती काहीशी पश्चात्तापासारखी किंवा असहमतीसारखी असते. कधीकधी असहकार पुकारण्या इतपतदेखील या अस्वस्थतेची मजल जाऊ शकते. पण मला येथे एक गोष्ट स्पष्ट केली पाहिजे की, त्या अस्वस्थतेमध्ये कोणतीही आक्रमकता नसते, तिच्यामध्ये कोणताही क्रूर असा स्वाग्रह (self-assertion) नसतो. म्हणजे असे की, ती अस्वस्थता कोणताही गोंगाट करत नाही, इजा पोहोचवीत नाही, काहीशी बेचैनी असते इतकेच.

परंतु जर का तुम्ही तिच्याकडे दुर्लक्ष केलेत, तिच्याकडे लक्ष दिले नाहीत, तिला काही महत्त्व दिले नाहीत तर, कालांतराने ती पूर्णपणे निघून जाते आणि मग पुढे पुढे तर, अशी अस्वस्थता जाणवणेच बंद होते.

असे दुर्लक्ष झाले तर वाढत्या चुकांच्या प्रमाणात अस्वस्थता वाढण्याऐवजी, उलट, ती अस्वस्थता जाणवेनाशी होते आणि चेतना झाकोळून जाते.

पण म्हणून, हेच याचे निश्चित लक्षण आहे असे व्यक्ती म्हणू शकत नाही; कारण जर का तुम्ही ही अशा प्रकारशी लहानशी अंतःसूचना अनेक वेळा डावलली असेल, तर, कालांतराने ती सूचना येईनाशी होते. परंतु मी तुम्हाला सांगते की, अगदी प्रामाणिकपणे तुम्ही तिच्याकडे लक्ष दिलेत तर, ती अंतःसूचना एक अत्यंत खात्रीलायक आणि मोलाची मार्गदर्शक ठरते.

– श्रीमाताजी
(CWM 09 : 31-32)

सद्भावना – २४

प्रश्न : आजारपण येणे म्हणजे योगमार्गातील परीक्षा असते का?

श्रीमाताजी : परीक्षा? अजिबातच नाही. प्रगती करावी म्हणून व्यक्तीला हेतुपुरस्सर आजारपण देण्यात येते का? नाही, नक्कीच ते तसे नाही. वास्तविक, तुम्ही हीच गोष्ट दुसऱ्या बाजूने विचारात घेतली पाहिजे आणि मग तुम्ही असे म्हणू शकता की, काही माणसं अशीही असतात की, ज्यांची अभीप्सा इतकी सातत्यपूर्ण असते आणि त्यांची सद्भावना इतकी समग्र असते की त्यांच्याबाबतीत जे जे काही घडते त्या साऱ्या गोष्टींकडे ते प्रगती करण्यास उद्युक्त करणारी अशी मार्गावरील कसोटी म्हणून पाहतात. मला अशी काही माणसं माहीत आहेत की जी आजारी पडतात तेव्हा, आजारपण म्हणजे प्रगती करण्यासाठी साहाय्य करणाऱ्या ‘ईश्वरी कृपे’चा पुरावा आहे, असे मानत असत. ती स्वतःला असे सांगत असत की, ही चांगली खूण आहे, आता मी माझ्या आजारपणाचे कारण शोधीन आणि मग आवश्यक ती प्रगती मी करून घेईन. मला अशा प्रकारची जी काही मोजकी माणसं माहीत आहेत, ती अगदी वेगाने प्रगती करतात. आणि काही जण याउलट असतात. ते या गोष्टीचा प्रगतीसाठी उपयोग करून घेण्याऐवजी, कोलमडून पडतात. हे त्यांच्यासाठी अतिशय वाईट असते. पण व्यक्ती आजारी पडली तर, तिने योग्य दृष्टिकोन बाळगला पाहिजे तो असा की, ”असे काहीतरी आहे की जे बरोबर चाललेले नाही, ते काय आहे त्याचा मी शोध घेईन.” ‘ईश्वरा’ने तुमच्यावर मुद्दामहून आजारपण धाडले आहे, असा विचार तुम्ही कधीच करता कामा नये….

– श्रीमाताजी
(CWM 05 : 168-169)