Tag Archive for: सहमती

पूर्णयोगाचे अधिष्ठान – २६

‘ईश्वरी कृपा’ आणि ‘ईश्वरी शक्ती’ (साधकाच्या बाबतीत) सर्व काही करू शकते, पण ते ती साधकाच्या पूर्ण सहमतीनेच (assent) करू शकते. अशी पूर्ण सहमती द्यायला शिकणे हाच साधनेचा समग्र अर्थ आहे. अशा सहमतीसाठी मनामधील कल्पना, प्राणामधील इच्छावासना किंवा शारीरिक चेतनेमधील जडत्वामुळे, तामसिकतेमुळे कदाचित वेळ लागेल परंतु, या गोष्टी दूर केल्याच पाहिजेत आणि ते शक्य असते. ईश्वरी शक्तीने कार्य करावे यासाठी तिला आवाहन केल्याने आणि ईश्वरी शक्तीच्या साहाय्याने त्या गोष्टी दूर करता येऊ शकतात.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 171)

पूर्णयोगाचे अधिष्ठान – २५

विश्वाची समस्त लीला व्यक्तीच्या विशिष्ट अशा सापेक्ष मुक्त इच्छेवर आधारलेली आहे. ती मुक्त इच्छा साधनेमध्येसुद्धा शिल्लक असते आणि (म्हणूनच) व्यक्तीची सहमती ही प्रत्येक पावलागणिक आवश्यक असते. ईश्वराला समर्पित झाल्यामुळे व्यक्ती अज्ञान, विभक्तपणा आणि अहंकारापासून मुक्त होते परंतु त्यासाठी ते समर्पण प्रत्येक पावलागणिक ‘मुक्त समर्पण’ असणे आवश्यक असते. (मुक्त समर्पण म्हणजे समर्पित व्हायचे की नाही याचे स्वातंत्र्य व्यक्तीला असते.)

– श्रीअरविंद (CWSA 29 : 68)