Tag Archive for: सहजता

जीवन जगण्याचे शास्त्र – ०२

ज्या क्षणी आविष्काराचा खटाटोप नाहीसा होतो तेव्हा, तो आविष्कार सहजस्वाभाविक होऊन जातो. एखादे फूल जसे सहजतेने उमलते, त्याचे सौंदर्य अभिव्यक्त करते; कोणताही गाजावाजा न करता किंवा कोणत्याही आवेशाविना अगदी सहजतेने आपला सुगंध पसरविते तसा तो आविष्कार असतो. या सहजतेमध्ये मोठी शक्ती सामावलेली असते, ती शक्ती निर्भेळ असते; त्यामुळे त्यातून कोणत्याही विघातक प्रतिक्रिया उद्भवत नाहीत; उद्भवल्याच तर त्या अगदीच अल्प असतात.

प्राणाच्या (vital) शक्तीवर फार विसंबून राहता कामा नये कारण ती कर्ममार्गावरील प्रलोभक (tempter) असते. तिच्यामुळे तुम्हाला त्वरित परिणाम अनुभवता येतात त्यामुळे तिच्या जाळ्यामध्ये फसण्याचा नेहमीच धोका असतो. कर्म चांगले करण्याच्या आपल्या अतिउत्साहामुळे, त्या शक्तीचा उपयोग करण्याच्या नादात, आपण वाहवत जातो. मात्र असे केल्यामुळे, योग्य दिशेने चाललेल्या आपल्या सर्व प्रयत्नामध्ये अचानकपणे बाधा निर्माण होते आणि आपण जे काही करत असतो त्यामध्ये भ्रांतीचे आणि विनाशाचे बीज पेरले जाते.

सहजता, सहजता! हे ईश्वेरा, तुझ्या उपस्थितीची विशुद्धता किती मधुर आहे!

– श्रीमाताजी (CWM 01 : 17)

मानसिक परिपूर्णत्व – २२

 

आपण खूपच जटिलतेने भरलेल्या वातावरणात राहत असतो, पण अशी एक जागा नेहमीच असते की, जिथे सारे काही खुले, साधे, सरळ असते – हे अनुभवलेले सत्य मी सांगत आहे. तुम्ही गोल गोल फिरत राहता, धडपड करत राहता, त्यावर काम करत राहाता आणि मग कुठेतरी कुंठित झाल्यासारखे होते; आणि अशा वेळी तुमच्या आंतरिक दृष्टिकोनातून तुम्हाला एखादा मार्ग गवसतो आणि सारे काही मोकळे होते – अगदी सहजतेने हे होते.

मला असा अनुभव बऱ्याच वेळेला आलेला आहे.

….श्रीअरविंद नेहमी म्हणत असत, ‘साधे राहा, साधे असा. जे तुम्हाला भावते तसेच साधेपणाने बोला. साधे असा, साधे असा.’ त्यांचा त्यावर खूप भर असे. पहिल्यांदा जेव्हा हे शब्द त्यांनी उच्चारले, तेव्हा एक प्रकाशपथच माझ्यासमोर खुला होताना मला दिसला आणि सारे काही खूप साधे-सोपे होऊन गेले. ‘एक पाऊल, मग दुसरे पाऊल, हेच केवळ आपल्याला करावयाचे आहे,’ असे मला जाणवून गेले.

श्रीमाताजी स्वतःच्या कपाळाकडे निर्देश करत म्हणतात, सारी जटिलता इथे आहे, खूप जटिल, त्याच्याशी मिळतेजुळते घेणे खूप अवघड आहे. जेव्हा श्रीअरविंद ‘साधेसरळ असा’, असे म्हणाले, तेव्हा काय आश्चर्य – तेव्हा जणू काही त्यांच्या डोळ्यांमधून प्रकाश बाहेर पडत होता आणि अचानकपणे व्यक्ती जणू प्रकाशाच्या बागेतच उदयाला यावी तसे काहीसे झाले.

जणू काही ती बाग प्रकाशात न्हाऊन निघाली होती.

साध्या गोष्टीवर केवढा मोठा भर दिला होता त्यांनी! तुम्हाला जे दिसते, तुम्हाला जे माहीत आहे तेच साधेपणाने बोला, अगदी साधे, सहज. अगदी साधेपणा.

…साधेसरळ असणे असे ते ज्याला म्हणत आहेत, ती म्हणजे अगदी आनंददायी उत्स्फूर्तता, सहजता आहे. कृतीमध्ये, अभिव्यक्तीमध्ये, प्रत्येक हालचालीमध्ये, जीवनामध्ये साधे असा, साधे असा, सरळ असा. एक आनंदी अशी सहजता. ते ज्याला ‘दैवी स्थिती’ असे म्हणतात ती उत्क्रांतीमधील सहजस्वाभाविक व आनंदी अवस्था आपण पुनर्प्राप्त करून घ्यावी, अशी श्रीअरविंदांची आपल्याकडून अपेक्षा आहे.

आणि मी जेव्हा हे ऐकले, मी जेव्हा हे पाहिले, तेव्हा सुवर्ण प्रकाशाचा जणू एक झराच वाहत होता, जणू एक सुगंधित बाग असावी असे काहीसे ते होते. सारे, सारे, सारे काही मोकळे होते.

– श्रीमाताजी
(Conversations with a disciple : September 16, 1961)