Posts

समत्व

समत्व म्हणजे केवळ शांती नव्हे आणि तटस्थताही नव्हे किंवा अनुभवांपासून मागे हटणेही नव्हे, तर आपल्या मनाच्या व प्राणाच्या ज्या वर्तमान प्रतिक्रिया असतात, त्या प्रतिक्रियांच्या पलीकडे, अतीत जाणे म्हणजे समत्व. समत्व म्हणजे जीवनाला आध्यात्मिक रीतीने सामोरे जाणे, प्रतिसाद देणे. किंबहुना आध्यात्मिक रीतीने जीवनाला कवळणे आणि आपल्या जीवनाला स्वतःच्या व आपल्या आत्म्याच्या कृतीचे परिपूर्ण रूप बनण्यास प्रवृत्त करणे म्हणजे समत्व. आत्म्याची आपल्या अस्तित्वावर सत्ता प्रस्थापित झाल्याचे हे पहिले मर्म आहे. हे समत्व आपल्याला पूर्णतेने साध्य झाले की मग, दिव्य आध्यात्मिक प्रकृतीच्या मूळ भूमिमध्येच आपला प्रवेश होतो.

– श्रीअरविंद
(CWSA 24 : 721)

समर्पण – २४

सर्व प्रकारच्या पसंती-नापसंतीपासून मुक्त असणे आणि ईश्वरी इच्छेकडून जे काही प्राप्त होईल त्याचा आनंदाने स्वीकार करणे ही गोष्ट कोणत्याही माणसाला अगदी सुरुवातीलाच शक्य होत नाही. त्यासाठी व्यक्तीकडे प्रथमतः काय असावयास हवे? तर, ईश्वरी इच्छा जे करेल ते भल्यासाठीच असते अशी नित्य धारणा! आणि जरी हे असे कसे हे मनाला कळले नाही तरीही, ही धारणा असली पाहिजे. तसेच जी गोष्ट अजूनपर्यंत आनंदाने स्वीकारता येत नव्हती ती गोष्ट संन्यस्त वृत्तीने स्वीकारली पाहिजे. आणि अशा रीतीने एका स्थिर समत्वाकडे जाऊन पोहोचले पाहिजे. पृष्ठभागावर, बाह्य घटनांबद्दलच्या तात्कालिक प्रतिक्रियांच्या काही तात्पुरत्या हालचाली कदाचित असू शकतील परंतु तेव्हाही या स्थिर समत्वापासून विचलित होता कामा नये. आणि एकदा का हे समत्व दृढपणे प्रस्थापित झाले की मग इतर सर्व गोष्टी येऊ शकतील.

– श्रीअरविंद
(CWSA 29 : 134)

*

अहंभावात्मक इच्छेचा निरास करण्यापूर्वी, – कारण यासाठी बराच काळ लागतो – व्यक्तीने जेव्हा जेव्हा संधी मिळेल तेव्हा तेव्हा प्रत्येक वेळी अहंभावात्मक इच्छा ईश्वरी संकल्पाप्रत समर्पित करण्यापासून सुरूवात केली पाहिजे आणि अखेरतः हे सातत्यपूर्ण रीतीने केले पाहिजे. आणि यासाठीचे पहिले पाऊल म्हणजे, आपल्यापेक्षा ईश्वराला अधिक चांगले समजते, हे जाणणे होय. केवळ आपल्या आध्यात्मिक प्रगतीसाठीच नव्हे तर, आपल्या भौतिक स्वास्थ्यासाठी, आपल्या शरीराच्या आरोग्यासाठी आणि आपल्या जीवाच्या सर्व क्रिया-प्रक्रिया योग्य रीतीने कार्यरत राहाव्यात म्हणून आपल्यासाठी काय चांगले आहे, काय खरोखर आवश्यक आहे, हे आपल्याला समजते त्यापेक्षा ईश्वराला ते अधिक चांगले समजते; हे जाणणे हे पहिले पाऊल आहे.

– श्रीमाताजी
(CWM 16 : 224)