Tag Archive for: योगशक्ती

 

‘योगशक्ती’ आपल्या आंतरिक अस्तित्वाच्या सर्व चक्रांमध्ये निद्रिस्त असते आणि ती तळाशी वेटोळे घालून बसलेली असते. या शक्तीस तंत्रशास्त्रामध्ये ‘कुंडलिनी’ शक्ती असे म्हणतात.

परंतु ती योगशक्ती आपल्या वरच्या बाजूसदेखील असते, आपल्या मस्तकाच्या वरच्या बाजूस ती ‘ईश्वरी शक्ती’ म्हणून स्थित असते. तेथे मात्र ती वेटोळे घालून बसलेली नसते, अंतर्हित, निद्रिस्त अशी देखील नसते तर ती जागृत, ज्ञानसंपन्न, ओजस्वी, विस्तृत आणि व्यापक असते. ती तेथे आविष्करणासाठी वाट पाहत असते. या ईश्वरी शक्तीप्रति म्हणजेच ‘श्रीमाताजीं’च्या शक्तीप्रति आपण स्वतःला खुले केले पाहिजे.

मनामध्ये ती योगशक्ती ‘दिव्य मनःशक्ती’ म्हणून किंवा ‘वैश्विक मनःशक्ती’ म्हणून आविष्कृत होते आणि वैयक्तिक मनाला जे करता येणे शक्य नसते ते सारेकाही ती करू शकते; तेव्हा ती ‘योगिक मनःशक्ती’ असते.

त्याचप्रमाणे जेव्हा ती योगशक्ती प्राण किंवा शरीर यांमध्ये आविष्कृत होते तेव्हा ती ‘योगिक प्राणशक्ती’ किंवा ‘योगिक शारीरिक-शक्ती’ म्हणून प्रकट होते. ती वरील सर्व रूपांमध्ये जागृत होऊ शकते.

– श्रीअरविंद (CWSA 30 : 422)