Posts

‘योगा’चे दोन मार्ग आहेत, एक मार्ग तपस्येचा आणि दुसरा मार्ग समर्पणाचा. तपस्येचा मार्ग खडतर असतो. तेथे तुम्ही पूर्णत: स्वत:वर अवलंबून असता, तुम्ही तुमच्या स्वतःच्या ताकदीनिशी सुरुवात करता. तेथे तुम्ही जे उन्नत होता, जे काही साध्य करून घेता, ते सारे तुमच्या शक्तीच्या प्रमाणात असते. पण तेथे नेहमीच पतन होण्याचा धोका असतो. आणि एकदा का तुमचे पतन झाले तर, तुम्ही खोलवर दरीतच फेकले जाता, तुमच्या चिंधड्या होतात आणि मग त्यावर कोणताच उपाय नसतो.

दुसरा मार्ग ‘समर्पणाचा’, हा सुरक्षित आणि खात्रीचा मार्ग आहे. पण या मार्गाबाबत पाश्चात्त्य लोकांना अडचण जाणवते. त्यांच्या व्यक्तिगत स्वातंत्र्याला बाधा येईल अशा कोणत्याही गोष्टीला घाबरायला आणि त्या टाळायला त्यांना शिकविण्यात आलेले असते. जणू त्यांच्या आईच्या दुधातूनच त्यांना व्यक्तिस्वातंत्र्याची जाणीव पाजण्यात आलेली असते. आणि समर्पणात तर हे सर्व काही सोडून देणे अभिप्रेत असते.

दुसऱ्या शब्दांत सांगायचे तर, रामकृष्ण (परमहंस) म्हणतात त्याप्रमाणे, तुम्ही एकतर ‘माकडाच्या पिल्लाचा’, अन्यथा, ‘मांजराच्या पिल्लाचा’ मार्ग अवलंबू शकता. माकडिणीचे पिल्लू आईने आपल्याला बरोबर घेऊन जावे यासाठी तिला पकडून ठेवते, त्याने तिला घट्ट पकडलेच पाहिजे; नाहीतर त्याची पकड ढिली होऊन ते खाली पडेल. दुसऱ्या बाजूला, मांजराचे पिल्लू! ते त्याच्या आईला धरून ठेवत नाही, तर त्याच्या आईनेच त्याला पकडलेले असते; त्यामुळे त्याला कसलेच भय नसते किंवा त्याच्यावर कोणतीच जबाबदारी नसते; त्याला स्वत:ला काहीच करावे लागत नाही. आईने त्याला धरून ठेवावे म्हणून त्याने फक्त ‘मा’ ‘मा’ असा आकांत करायचा असतो.

तुम्ही जर हा समर्पणाचा मार्ग पूर्णतया आणि प्रामाणिकपणे आचरणात आणलात तर मग कोणताही धोका किंवा कोणतीही गंभीर समस्या निर्माण होणार नाही. प्रश्न असतो फक्त प्रामाणिकपणाचा! तुम्ही जर प्रामाणिक नसाल तर ‘योगसाधने’ला प्रारंभच करू नका. मानवी व्यवहार करत असताना तुम्ही फसवणूक केलीत तर त्यात यशस्वी होण्याची थोडीफार शक्यता असू शकते पण ‘ईश्वरा’सोबत वागत असताना मात्र फसवणुकीला यत्किंचितही थारा असू शकत नाही.

तुम्ही विनम्र असाल आणि तुमचा गाभा खुला असेल आणि जर तुमचे साध्य ‘ईश्वरा’चा साक्षात्कार आणि त्याची प्राप्ती हेच असेल आणि तोच तुमचा ‘चालविता धनी’ व्हावा हे जर तुमचे साध्य असेल तर तुम्ही या मार्गावरून सुरक्षितपणे वाटचाल करू शकता.

– श्रीमाताजी [CWM 03 : 04-05]