Posts

साधना, योग आणि रूपांतरण – १८१

पूर्णयोगाची साधना दुहेरी असते. चेतनेने अधिक उच्च स्तरांवर आरोहण करणे ही या साधनेची एक बाजू आहे आणि अज्ञान व अंधकार यांच्या ‘शक्तीं’चा निरास करता यावा व प्रकृतीचे रूपांतरण करता यावे यासाठी, उच्चतर स्तरांवरील शक्तीचे पृथ्वी-चेतनेमध्ये अवतरण घडविणे ही या साधनेची दुसरी बाजू आहे.

*

पूर्णयोगाच्या साधनेचे सूत्र म्हणून एकमेव मंत्र उपयोगात आणला जातो, तो म्हणजे एकतर ‘श्रीमाताजीं’चे नाम किंवा ‘श्रीअरविंदां’चे व ‘श्रीमाताजीं’चे नाम! हृदयकेंद्रामध्ये एकाग्रता आणि मस्तिष्कामध्ये एकाग्रता या दोन्ही पद्धती पूर्णयोगामध्ये उपयोगात आणल्या जाऊ शकतात; त्या प्रत्येक पद्धतीचे स्वतःचे असे परिणाम असतात.

हृदयकेंद्रावर एकाग्रता केली असता, चैत्य पुरुष (psychic being) खुला होतो तसेच त्यामुळे भक्ती, प्रेम उदित होते. हृदयकेंद्रावरील एकाग्रतेमुळे हृदयामध्ये श्रीमाताजींच्या उपस्थितीची जाणीव होते आणि त्यांच्याशी एकत्व घडून येते; तसेच प्रकृतीमध्ये त्यांच्या ‘शक्ती’चे कार्य घडून येते.

मस्तिष्ककेंद्रावर एकाग्रता साधली असता, मनाच्या ऊर्ध्वस्थित असणाऱ्या चेतनेप्रत आणि आत्म-साक्षात्काराप्रत मन खुले होते; तसेच ते देहाच्या बाहेर असणाऱ्या चेतनेच्या आरोहणाप्रत आणि उच्चतर चेतनेच्या देहामधील अवतरणाप्रत खुले होते.

– श्रीअरविंद (CWSA 30 : 416) (CWSA 29 : 326)