Tag Archive for: भावविवशता

नैराश्यापासून सुटका – १३

 

(एका साधकाला लिहिलेल्या पत्रामधून…)

तुम्ही इतके अस्वस्थ व्हावे एवढे काही ते कारण मोठे नव्हते. खरंतर, ते कारण अगदीच किरकोळ होते. अर्ध्याकच्च्या आणि अवाजवी भावविवशतेची हीच मोठी अडचण असते. अगदी क्षुल्लक कारणामुळे, तुमच्यामधील ही भावविवशता उफाळून वर आली. साधकांमध्ये आढळून येणाऱ्या चिवट अशा अडथळ्यांपैकी ‘भावविवशता’ (sensitiveness) हा एक सर्वात मोठा अडथळा आहे.

त्यावर दोन उपाय आहेत. पहिला उपाय हा की, ‘श्रीमाताजीं‌’बद्दल आंतरात्मिक विश्वा स असला पाहिजे आणि त्याच्या जोडीला समर्पण असले पाहिजे; म्हणजे, “श्रीमाताजींची जी इच्छा असेल ती माझ्यासाठी सर्वेात्तमच असेल,” असा समर्पणाचा भाव असला पाहिजे.

आणि दुसरा उपाय म्हणजे, आत्ता तुमच्या अनुभवास येत असलेली विशालता! ही विशालता (wideness) खऱ्या आत्म्याची असते, तसेच ती खऱ्या मानसिक, प्राणिक आणि शारीरिक अस्तित्वाचीसुद्धा असते. त्यांपासून (भावविवशता, अस्वस्थता) या गोष्टी एखाद्या धुळीकणाप्रमाणे खाली पडतात. कारण या गोष्टींना त्यांच्या लेखी काही महत्त्वच नसते. तुम्ही एक गोष्ट केली पाहिजे आणि ती म्हणजे, या विशालतेमध्ये, शांतीमध्ये आणि निश्चल-निरवतेमध्ये नित्य वास्तव्य केले पाहिजे आणि त्यामध्ये तुमचा अहंकार विरघळून गेला पाहिजे आणि आसक्ती नाहीशी झाली पाहिजे.

– श्रीअरविंद (CWSA 31 : 211)

नैराश्यापासून सुटका – १२

 

दुःख किंवा आनंद किंवा इतर कोणतीही भावना असण्या-नसण्याचा हा प्रश्न नाही. ज्याने कोणी सामान्य ‘प्रकृती‌’वर मात केलेली नाही अशा प्रत्येकामध्ये या भावना असतातच. या गोष्टी असणे म्हणजे ‘भावविवशता‌’ नाही, तर या गोष्टी असणे म्हणजे ‘भावनिक‌’ असणे होय.

जेव्हा तुम्हाला या भावभावनांमध्ये रममाण होण्यात किंवा भावनांचे प्रदर्शन करण्यात मजा वाटते तेव्हा त्यातून किंवा कोणतेही कारण नसताना किंवा पुरेसे कारण नसतानासुद्धा जेव्हा तुम्ही भावनांमध्ये गुंतून पडता तेव्हा त्यातून ‘भावविवशता’ (sentimentalism) येते.

*

प्राणिक प्रकृतीमधील (vital nature) भावुकतेच्या अधीन असलेल्या घटकामुळे व्यक्ती इतर लोकांबरोबर भांडणे करण्यास प्रवृत्त होते आणि त्यांच्याशी अबोला धरते. व्यक्तीच्या ज्या भावस्थितीला (mood), इतरांशी गप्पागोष्टी करण्याचे सुख आणि नातेसंबंधांमधून मिळणारे सुख हवेहवेसे वाटत असते त्या भावस्थितीद्वारेच दिलेली ही प्रतिक्रिया असते. यांपैकी कोणतीही एक प्रवृत्ती जोपर्यंत अस्तित्वात आहे तोपर्यंत दुसरी प्रवृत्तीही तेथे असण्याची शक्यता असते. या भावुकतेपासून जेव्हा तुम्ही स्वतःची सुटका करून घेता आणि तुमच्या सर्व शुद्ध झालेल्या भावना ईश्वराकडे वळविता, तेव्हा हे भावनांचे चढउतार नाहीसे होतात आणि त्यांची जागा सर्वांविषयीची एक स्थिर सद्भावना घेते.

– श्रीअरविंद (CWSA 31 : 210)