Tag Archive for: भगवद्गीता

(श्रीअरविंद येथे साधकांना सांगत आहेत की, एखादी गोष्ट कोणत्या वृत्तीने केली जाते, तिची उभारणी कोणत्या तत्त्वाच्या आधारावर केली जाते आणि तिचा उपयोग कोणत्या कारणासाठी केला जातो, यावर सारे काही अवलंबून असते.)

राजकारण हा काही नेहमीच चांगला स्वच्छ कारभार असतो असे नाही, किंबहुना बरेचदा तो तसा नसतोच. असे असूनही मी राजकारण केले आणि अगदी सर्वात जहाल असे क्रांतिकारी राजकारण, ज्याला ‘घोर कर्म’ म्हणता येईल असे राजकारण केले.

युद्धालादेखील आध्यात्मिक प्रकारचे कृत्य असे म्हणता येणार नाही तरीही मी युद्धाला साहाय्य केले आणि माणसांना युद्धावर पाठविले. ‘श्रीकृष्णा’ने ‘अर्जुना’ला अत्यंत भयानक प्रकारचे युद्ध करण्याचे आवाहन केले आणि त्याच्या उदाहरणाद्वारे, माणसांनी सर्व प्रकारची मानवी कर्मे, ‘सर्वकर्माणि’ करावीत म्हणून त्यांना प्रोत्साहन दिले आहे. आता, ‘श्रीकृष्ण हा आध्यात्मिक मनुष्य नव्हता किंवा त्याने अर्जुनाला दिलेला सल्ला चुकीचा होता किंवा तो तत्त्वतः गैरलागू होता’ असे म्हणून तुम्ही वाद घालत बसणार का? श्रीकृष्ण तर याही पुढे जात उद्घोषित करतो की, एखाद्या मनुष्यास त्याच्या मूलभूत प्रकृतिधर्मानुसार, त्याच्या स्वभावानुसार आणि त्याच्या क्षमतेनुसार जे कर्म करण्यास सांगण्यात आले आहे, ते कर्म जर त्याने त्याच्या आणि त्या कर्माच्या धर्मानुसार केले आणि योग्य प्रकारे आणि योग्य वृत्तीने केले तर, तसे कर्म केल्याने तो ‘ईश्वरा’प्रत जाऊ शकतो.

‘ब्राह्मण’, ‘क्षत्रिय’ यांच्याप्रमाणेच श्रीकृष्ण ‘वैश्य’ धर्माला आणि त्याच्या कर्मालाही मान्यता देतो. श्रीकृष्णाच्या भूमिकेतून पाहायचे झाले तर, एखाद्या व्यक्तीने व्यापारउदिम करणे, पैसे मिळविणे, नफा मिळविणे आणि तरीसुद्धा तो आध्यात्मिक असणे, त्याने ‘योगसाधना’ करणे, त्याला आंतरिक जीवन असणे शक्य आहे.

‘भगवद्गीता’ आध्यात्मिक मुक्तीचे साधन म्हणून सातत्याने कर्माचे समर्थन करते. ‘भक्ती’ आणि ‘ज्ञानमार्गा’प्रमाणेच ‘कर्ममार्गा’चे महत्त्वही प्रतिपादन करत आहे. श्रीकृष्ण कर्माला एक अधिक उच्चतर नियम (law) लावू पाहत आहे. कर्म निरपेक्षपणे केले पाहिजे, बक्षिसाच्या किंवा फलाच्या आसक्तीविना, निरहंकारी भूमिकेतून वा वृत्तीने, ‘ईश्वरा’प्रत केलेले अर्पण किंवा अर्पण केलेली समिधा या स्वरूपात कर्म केले गेले पाहिजे असे त्याचे सांगणे आहे.

– श्रीअरविंद [CWSA 29 : 249]

कर्म आराधना – २१

कर्म ज्या वृत्तीने केले जाते ती वृत्ती महत्त्वाची असते. ते कर्म गीतेमध्ये सांगितलेल्या वृत्तीने म्हणजे इच्छाविरहितपणे, निर्लिप्तपणे, कोणत्याही तिटकाऱ्याविना पण शक्य तितके अचूकपणे केले पाहिजे. ते कुटुंबीयांसाठी, पदोन्नतीसाठी किंवा वरिष्ठांची खुशामत करण्यासाठी करता कामा नये तर, ते तुमच्यावर सोपविण्यात आले आहे यासाठीच केले पाहिजे. आंतरिक प्रशिक्षणाचे क्षेत्र म्हणून त्याकडे पाहिले पाहिजे, यापेक्षा अधिक काही नाही. व्यक्तीने त्यातून समता, इच्छाविरहितता आणि निष्ठा या तीन गोष्टी शिकल्या पाहिजेत. कर्म ही कर्मासाठी करायची गोष्ट नसते तर, व्यक्तीने स्वतःची कर्मपरता आणि स्वतःची कर्मपद्धती ईश्वराला अर्पण करायची असते. अशा वृत्तीने कर्म केले तर, ते कर्म कोणते आहे यामुळे फारसा फरक पडत नाही. व्यक्तीने स्वतःला अशा प्रकारे आध्यात्मिक रीतीने घडविले तर, तिला एखाद्या दिवशी थेट ईश्वरासाठीचे काम जर सोपविण्यात आले (जसे आश्रमाचे काम) तर, ते योग्य रीतीने करण्यासाठी ती व्यक्ती सज्ज असेल.

– श्रीअरविंद
(CWSA 29 : 240-241)