Tag Archive for: फसवणूक

 

(श्रीमाताजींनी बालकांना प्रामाणिकपणाचे महत्त्व कसे समजावून सांगितले, ते आपण कालच्या भागात समजावून घेतले.)

मुलांना एक गोष्ट अवश्य शिकवावी असे माझे पालकांना आणि शिक्षकांना सांगणे आहे. मुलांना असे सांगावे की, ‘’मुलांनी ते चांगले आहेत असे ‘दाखविणे‌’, जणू काही ते फार आज्ञाधारक आहेत असे ‘दाखविणे‌’ किंवा ते खूप उत्तम रितीने अभ्यास करत आहेत असे ‘दाखविणे‌’ हे अजिबात उपयोगाचे नाही.” (तशा प्रकारची कोणतीही गोष्ट मुळात नसताना केवळ ‘दाखविणे‌’ काहीच उपयोगाचे नसते, हे मुलांना शिकवावे.) पण बरेचदा आपली मुले अशी ‘दिसावीत’ यासाठी पालक आणि शिक्षकच मुलांना प्रोत्साहन देत असतात.

बरेचदा असेही घडते की, एखादे मूल अगदी सहजस्वाभाविकपणे, अगदी प्रांजळपणे त्याची चूक कबूल करण्यासाठी पालकांकडे किंवा शिक्षकांकडे जाते; पण तेव्हा त्याला ओरडा खावा लागतो. पालकांची ही सर्वात मोठी चूक असते. मुलाला कधीही रागवता कामा नये आणि त्यासाठी स्वतः पालकांकडे पुरेसा संयम असावा लागतो. अगदी त्या मुलाने कितीही किमती किंवा अतिशय मौल्यवान अशी वस्तू मोडलेली असेल तरीही त्याला रागावता कामा नये. त्याला फक्त असे विचारावे की, “हे असे कसे झाले? नक्की काय झाले?” असे केल्यामुळे, नक्की काय घडले व ते तसे का घडले हे मुलाला समजेल, म्हणजे मग पुढच्या वेळी तो अधिक काळजी घेऊ शकेल. बस इतकेच. तुम्ही असे वागलात तर, ते मूल तुम्हाला फसविण्याचा प्रयत्न करणार नाही, तर ते तुमच्यापाशी प्रांजळपणे चूक कबूल करेल. ढोंगीपणा ही स्वतःच्या व्यक्तित्वाच्या रूपांतरणातील सर्वात मोठी अडचण असते. तुम्ही तुमच्या मुलाबरोबर वागताना ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवलीत तर तुम्ही त्याचे खूप भले करू शकाल. अर्थात, तुम्ही त्याला उपदेशाचे डोस पाजत बसता कामा नये किंवा भाषणबाजीसुद्धा करता कामा नये.

व्यक्तीमध्ये एक प्रकारचा उदात्तपणा असतो, एक महान विशुद्धता असते, सौंदर्याविषयी निरतिशय प्रेम असते आणि या सगळ्या गोष्टी इतक्या शक्तिशाली असतात की, अगदी अत्यंत दुष्ट आणि गुन्हेगारी प्रवृत्तीचा मनुष्यसुद्धा अशा खऱ्याखुऱ्या सौंदर्यपूर्ण कृतीसमोर किंवा वीरवृत्तीच्या किंवा निःस्वार्थी कृतीसमोर नतमस्तक होतो. म्हणजे तो तसे वागण्यास प्रवृत्त होतो इतकी तो गोष्ट शक्तिशाली असते, ही गोष्ट मुलांना समजावून सांगितली पाहिजे.

कारण (सर्वच) मनुष्यमात्रांमध्ये एक ईश्वरी उपस्थिती असते, या पृथ्वीवरील ती सर्वात अद्भुत अशी उपस्थिती असते. ती उपस्थिती हृदयामध्ये सुप्त स्वरूपात असते. हृदयामध्ये म्हणजे शारीर-हृदयामध्ये नाही, तर सर्व मनुष्यमात्रांच्या चैत्य केंद्रामध्ये (psychic centre) ती उपस्थिती असते. आणि एखाद्या व्यक्तीमध्ये जेव्हा त्या ईश्वरी उपस्थितीचे वैभव पुरेशा विशुद्धपणे आविष्कृत होते तेव्हा, त्या उपस्थितीचा पडसाद हा सर्व जीवमात्रांमध्ये सुप्त असणाऱ्या त्या ईश्वरी उपस्थितीला जाग आणतो.

– श्रीमाताजी (CWM 15 : 298-299)

 

व्यक्ती जेव्हा प्रामाणिक असते तेव्हा तिला स्वत:च्या चुका कळतात. स्वतःच्या चुकांची जाणीव नसणे, ही व्यक्तीमध्ये अजूनही कोठेतरी अप्रामाणिकपणा शिल्लक असल्याची खूण असते. सामान्यतः तो अप्रामाणिकपणा प्राणात (vital) लपून राहिलेला असतो. जेव्हा प्राण सहकार्य करण्यास संमती देतो (जे मुळातच खूप मोठे पाऊल उचलण्यासारखे आहे) म्हणजे जेव्हा तो ठरवितो की, तो सुद्धा सहकार्य करणार आहे, त्याचे सारे प्रयत्न आणि ऊर्जा, ते कार्य पूर्ण करण्यासाठी तो खर्च करणार आहे, तेव्हासुद्धा आतमध्ये कोठेतरी काहीतरी दडून राहिलेले असते. सर्व गोष्टी चांगल्या होतील आणि त्याचे परिणाम अनुकूल असतील; अशी एक अपेक्षा तिथे दडलेली असते. ही अपेक्षा अहंजन्य, वैयक्तिक अशी गोष्ट असते आणि तीच प्रामाणिकपणाला संपूर्णपणे झाकून टाकते. त्यामुळे व्यक्तीला स्वत:चे दोष, स्वत:च्या चुका दिसत नाहीत.

परंतु, व्यक्ती जर पूर्णपणे प्रामाणिक असेल तर, जेव्हा ती करता कामा नये अशी एखादी गोष्ट करू लागते त्याच क्षणी, अगदी त्याच क्षणी, अगदी स्पष्टपणे, म्हणजे जोरकसपणे नव्हे पण तरीही अगदी नेमकेपणाने तिला जाणवते की, ‘नाही, ही गोष्ट मी करता कामा नये.’ अशा वेळी, व्यक्ती जर अनासक्त असेल तर ती चुकीची गोष्ट करणे व्यक्ती लगेचच थांबविते, अगदी त्वरित थांबविते.

पण व्यक्तीमध्ये आसक्ती असते, अगदी निष्काम कर्माबाबतीतसुद्धा आसक्ती असते, हे तुम्ही जाणून घेतले पाहिजे. म्हणजे तुम्ही तुमचे जीवन जरी अगदी नि:स्वार्थ अशा एखाद्या कार्यासाठी वाहून घेतलेले असले, तरी तेथेही अहंकार शिल्लक असतोच. ते कार्य करण्याची तुमची स्वतःची अशी एक खास, वैयक्तिक पद्धत असते; तुमच्या मनात एक आशा असते की, याचा परिणाम अमुक असा होईल, तुम्हाला त्यातून अमुक अमुक मिळेल आणि मग ती गोष्ट अमुक प्रकारे पार पडेल इत्यादी इत्यादी. म्हणजे लक्षात घ्या की, ते कार्य तुम्ही तुमच्या स्वतःसाठी करत नसता; पण जेव्हा ते कार्य तुम्ही हाती घेता, तेव्हा ते कार्य यशस्वी होईल, त्यामध्ये तुम्हाला यश मिळेल, म्हणजे तुम्हाला व्यक्तिश: असे नव्हे, तर तुम्ही जे कार्य करत आहात ते कार्य यशस्वी होईल अशी अपेक्षा तुम्ही बाळगत असता. त्यामुळे कोणतीतरी एखादी अगदी छोटीशी गोष्ट, खोलवर, तळाशी दडून बसते पण तिची तुम्हाला जाणीव नसते… परंतु तशी अपेक्षासुद्धा जर तुम्ही बाळगली नसती तर, जे करणे आवश्यक होते ते करण्यात कुचराई करताक्षणीच, तुम्ही काहीतरी चूक करत आहात हे तुमच्या लक्षात आले असते. तुम्हाला अगदी नेमकेपणाने त्याची जाणीव झाली असती. एका मिलिमिटरचा एक हजारांश भाग असावा इतके ते स्पंदन सूक्ष्म असते. हो, ते तिथे असते, आणि तेवढे पुरेसे असते, तुम्हाला जाणवते की, ‘माझी चूक झाली आहे.’

काहीही झाले तरी चालेल पण तुमच्याकडून कोणताही प्रमाद घडता कामा नये असे वाटण्यासाठी, तुमच्याकडे परिपूर्ण प्रामाणिकपणा असावा लागतो. कोणत्यातरी भ्रमात जीवन जगण्यापेक्षा, असा परिपूर्ण प्रामाणिकपणा काहीही घडवून आणू शकतो, म्हणजे उदाहरणार्थ अगदी एखाद्या गोष्टीचा त्याग करण्यासही तो तयार असतो परंतु हे अतिशय अवघड असते; त्यासाठी वेळ लागतो, पुष्कळ परिश्रम करावे लागतात.

तुम्ही जेव्हा एखादी गोष्ट करत असता, तेव्हा नेहमीच मन आणि प्राण, तुम्ही जे जे काही करत असता त्यापासून काही ना काहीतरी लाभ मिळविण्याचा प्रयत्न करत असतात; मग तो वैयक्तिक समाधानाचा लाभ असेल किंवा एखाद्या आनंदाचा लाभ असेल, किंवा तुमच्या मनात स्वतःबद्दलची जी चांगली प्रतिमा असते तिच्या लाभासाठी असेल, हे मन किंवा प्राण तो लाभ उठविण्याचा प्रयत्न करत असतात. (आणि म्हणूनच) स्वतःला न फसविणे ही गोष्ट अतिशय अवघड असते.

– श्रीमाताजी (CWM 05 : 54-55)

 

आपण ईश्वराला फसवू शकत नाही हे व्यक्तीला कळत असते, माहीत असते. अत्यंत हुशार असा असुरसुद्धा ईश्वराला फसवू शकत नाही. पण हे सारे समजत असूनदेखील, आपण पाहतो की, बरेचदा दिवसाच्या धावपळीत व्यक्ती स्वत:लाच फसवत असते आणि तिला त्याची जाणीवसुद्धा नसते. अगदी सहजपणे, अगदी अभावितपणे व्यक्ती अशी फसवणूक करत असते. ती नेहमीच स्वत:च्या शब्दांचे आणि कृतींचे समर्थन करत असते. सुरुवाती-सुरुवातीला नेहमी हेच घडत असते. ”चूक दुसऱ्याचीच आहे,” असे भांडणामध्ये व्यक्ती म्हणत असते, पण यांसारख्या अगदी उघड गोष्टींविषयी मी सांगत नाहीये, तर मी दैनंदिन जीवनातील लहान-सहान गोष्टींविषयी सांगत आहे.

मी एकदा असा एक छोटा मुलगा पाहिला होता की जो खेळता-खेळता अनवधानामुळे एका दारावर धडकला पण (स्वत:च्या चुकीकडे लक्ष देण्याऐवजी तो त्या दारावरच चिडला आणि) त्याने दारालाच जोरात लाथ मारली. ही गोष्टही अशीच आहे. नेहमी दुसरी व्यक्तीच चुकीची असते, तीच चूक करत राहते, असे व्यक्तीला वाटत असते. बाल्यावस्था पार केल्यावर पुरेशी समज आल्यानंतरसुद्धा तुम्ही स्वत:चे समर्थन करताना अगदी असाच मूर्खपणा करत असता आणि म्हणता, “त्याने जर तसे केले नसते तर मी पण मग असा वागलो नसतो.’’ वास्तविक, हे याच्या अगदी उलट असले पाहिजे.

समजा तुमच्या सोबत कोणीतरी आहे; तुमच्या सोबतची ती व्यक्ती भलेही प्रामाणिकपणे वागो किंवा न वागो, पण तुम्ही जर प्रामाणिक असाल, तर तुमची सहज-स्वाभाविक प्रतिक्रिया जे योग्य आहे तेच करण्याची असेल तर, त्यालाच मी ‘प्रामाणिक असणे’ असे म्हणते.

एक अगदी साधेसे उदाहरण घेऊ या. समजा एखाद्याला तुमचा राग आला आहे. अशा वेळी, उलटून परत त्याला दुखावणाऱ्या, बोचणाऱ्या गोष्टी न बोलता, तुम्ही काहीच न बोलता, शांत राहिलात तर तुम्हाला त्याच्या रागाचा संसर्ग होत नाही. अशा वेळी तुम्ही स्वतःचेच निरीक्षण करून पाहिलेत तर, तुमच्या लक्षात येईल की, असे करणे किती अवघड आहे. खरंतर, ही गोष्ट तशी अगदी प्राथमिक स्वरूपाची आहे. आपण प्रामाणिक आहोत किंवा नाही हे जाणण्यासाठीची ही एक छोटीशी सुरुवात आहे. तुम्ही सर्वसाधारणपणे कितीही प्रामाणिक राहण्याचा प्रयत्न केलात तरीसुद्धा, तुम्ही भेदक नजरेने स्वतःचे निरीक्षण केलेत तर, शेकडो वेळा तरी तुम्हाला स्वतःमधील अप्रामाणिकपणा आढळून येईल. आणि मग प्रामाणिकपणे वागणे किती अवघड असते, हे तुमच्या लक्षात येईल.

– श्रीमाताजी (CWM 05 : 06)

 

स्वतःशी पूर्ण प्रामाणिक राहा – स्वतःची फसवणूक करू नका.
ईश्वराप्रति प्रामाणिक राहा – समर्पणात सौदेबाजी करू नका; कोणत्याही मोबदल्याची अपेक्षा ठेवू नका.
मनुष्यमात्रांशी साधेसरळपणे वागा – त्यामध्ये कोणताही ढोंगीपणा किंवा दिखावा असता कामा नये.

-श्रीमाताजी (CWM 14 : 70)

‘पूर्णयोगा’ची योगसूत्रे – ०८

पौर्वात्य लोकांपेक्षा पाश्चिमात्त्य लोकांसाठी योगसाधना अधिक धोकादायक असते असे काही नाही. तुम्ही योगाकडे कोणत्या भावनेतून वळता यावर सारे काही अवलंबून असते. जर योगसाधना तुम्हाला तुमच्या स्वतःसाठी हवी असेल, स्वतःच्या वैयक्तिक हेतुंच्या पूर्ततेसाठी हवी असेल तर ती धोकादायक बनते. परंतु ईश्वराचा शोध घेणे हे उद्दिष्ट सतत लक्षात ठेवून, एका पवित्र भावनेने तुम्ही जर योगसाधनेकडे वळलात तर, ती धोकादायक तर ठरत नाहीच, उलट ती स्वतःच तुमची एक सुरक्षा, सुरक्षितता बनते.

जेव्हा माणसं ईश्वरासाठी नव्हे तर, शक्ती संपादन करून, योगाच्या पडद्याआडून स्वतःच्या आकांक्षा भागवू इच्छितात तेव्हा योगसाधनेमध्ये अडचणी आणि धोके निर्माण होतात. जर तुम्ही महत्त्वाकांक्षेपासून स्वतःची सुटका करून घेऊ शकत नसाल तर योगसाधनेला स्पर्शदेखील करू नका. मग ती आग आहे, ती सारे काही भस्मसात करून टाकेल.

… तुम्ही जर समर्पणाचा मार्ग पूर्णतया आणि प्रामाणिकपणे आचरणात आणलात तर मग कोणताही धोका किंवा कोणतीही गंभीर समस्या निर्माण होणार नाही. प्रश्न असतो फक्त प्रामाणिकपणाचा! जर तुम्ही प्रामाणिक नसाल तर योगसाधनेला सुरुवातच करू नका. मानवी व्यवहार करत असताना तुम्ही फसवणूक केलीत तर त्यात यशस्वी होण्याची थोडीफार तरी शक्यता असू शकते पण ईश्वरासोबत मात्र फसवणुकीला यत्किंचितही थारा असू शकत नाही. जर तुम्ही विनम्र असाल आणि तुमचा गाभा खुला असेल आणि जर तुमचे साध्य ईश्वराचा साक्षात्कार आणि त्याची प्राप्ती हेच असेल आणि तोच आपला ‘चालविता धनी’ व्हावा हे जर तुमचे साध्य असेल तर तुम्ही या मार्गावरून सुरक्षितपणे जाऊ शकता.

– श्रीमाताजी
(CWM 03 : 04-05)