Tag Archive for: प्राणी

(माणसाची चिंताग्रस्तता आणि त्यावरील उपाय याविषयी श्रीमाताजी मार्गदर्शन करत आहेत. त्यातील हा पुढचा भाग…)

आता यापुढे, मनुष्याचे पतन होऊन तो पुन्हा प्राण्याच्या पातळीवर खाली घसरेल आणि त्याने संपादन केलेली चेतना तो गमावून बसेल हे शक्य नाही. आणि म्हणून, त्याच्यापाशी एकच उपाय शिल्लक राहतो. तो ज्या दयनीय परिस्थितीत जीवन जगत आहे त्या परिस्थितीतून बाहेर पडण्याचा आणि जेथे चिंतेची जागा विश्वासपूर्ण समर्पणाने घेतलेली असते व जेथे प्रकाशमान परिणतीची खात्री असते अशा एका उच्चतर स्थितीमध्ये उन्नत होण्याचा एकच मार्ग त्याच्यापाशी उरतो. चेतनेमध्ये (consciousness) परिवर्तन घडवून आणणे हाच तो मार्ग आहे.

खरे सांगायचे तर, ज्याची किल्लीच आपल्यापाशी नाही अशा गोष्टीसाठी आपण जबाबदार असणे, यासारखी दुसरी दयनीय अवस्था नाही. (तशी मनुष्याची अवस्था झाली आहे कारण चिंताग्रस्ततेचा) हा प्रश्न सोडवण्यासाठी आवश्यक असणारे असे एखादे मार्गदर्शक सूत्र मनुष्याच्या हाती नाही. प्राण्यांना कोणतेही प्रश्न पडत नाहीत, ते नुसते जगत असतात. ते उपजत प्रेरणेनुसार जीवन जगत असतात. ते त्यांच्या सामूहिक चेतनेवर विसंबून असतात, या चेतनेकडे उपजत ज्ञान असते. आणि ही सामूहिक चेतना प्राण्यांच्या व्यक्तिगत चेतनेपेक्षा अधिक उन्नत असते. पण ती स्वयंचलित, सहजस्वाभाविक असते. प्राण्याला कोणता एखादा संकल्प करण्याची किंवा तो प्रत्यक्षात आणण्यासाठी प्रयत्न करण्याची आवश्यकता नसते. प्राणी सहजस्वाभाविकपणे वागत असतात आणि ते कोणतीही काळजी करत बसत नाहीत. (क्रमश:)

– श्रीमाताजी (CWM 09 : 304)