‘क्रांतिकारक अरविंद घोष ते महायोगी श्रीअरविंद’
श्रीअरविंद १९३४ साली एकदा सांगत होते की, “अतिमानसिक शक्ती (Supramental) अवतरत आहे. पण तिने अजूनपर्यंत शरीराचा किंवा जडद्रव्याचा ताबा घेतलेला नाही – कारण तेथे तिला अजूनही बराच प्रतिरोध आहे. अतिमानसिकीकरण झालेल्या ‘अधिमानसिक’ (Overmind) शक्तीचा जडद्रव्याला स्पर्श झालेला आहे आणि अधिमानसिक शक्तीचे आता कोणत्याही क्षणी अतिमानसामध्ये परिवर्तन होईल किंवा अतिमानसाला त्याच्या स्वतःच्या शक्तीनिशी कार्य करू देण्यासाठी, ही अधिमानसिक शक्ती जागा उपलब्ध करून देईल.’
या काळामध्येच आश्रमाच्या बाह्य जीवनामध्ये आमूलाग्र बदल घडून येत होते. १९२७ सालापासून १९३३ सालापर्यंत साधकांची संख्या आता चोवीस वरून एकशे पन्नासपर्यंत वाढलेली होती, आणि अजूनही वाढतच चाललेली होती. आलेल्या सर्व नवागतांना आश्रमाच्या विस्तार पावत चाललेल्या सेवांपैकी एखाद्या कामामध्ये सामावून घेतले जात असे – डायनिंग रूममध्ये असो, किंवा एखादे वर्कशॉप असेल, इमारत विभाग असेल, फर्निचरची सेवा असेल किंवा एखाद्या गोदामामध्ये असेल, प्रत्येकाला कोणते ना कोणते काम सोपविले जात असे. कर्माच्या माध्यमातून, तसेच ध्यान व भक्तीच्या माध्यमातून, श्रीमाताजींच्या थेट देखरेखीखाली साधकांची अगदी उत्कट साधना चालत असे. श्रीमाताजींच्या पाठीशी श्रीअरविंदांचा शांत आधार असे.
साधकांना श्रीअरविंदांचे थेट साहाय्य मिळण्याचे दोन मार्ग होते : एक म्हणजे त्यांचे दर्शन आणि दुसरा मार्ग म्हणजे त्यांच्याशी होणारा पत्रव्यवहार. १९२० च्या दशकाच्या उत्तरार्धामध्ये श्रीअरविंद काही साधकांना थोडी पत्रं लिहीत असत; तरीही १९३० सालापर्यंत साधकांनी त्यांच्याशी पत्रव्यवहार करणे हा आश्रमाच्या साधनेचा एक नियमित भाग बनलेला नव्हता. “१९३३ सालापर्यंत श्रीअरविंद आणि श्रीमाताजी यांच्यापर्यंत साधकांच्या वह्या, पत्रं ढिगाने येऊन जमा होत असत आणि कित्येक रात्री महिन्यामागून महिने श्रीअरविंद साधक-साधिकांनी विचारलेल्या प्रश्नांना, मग ते प्रश्न अगदी उदात्त असू देत नाहीतर किरकोळ असू देत, उत्तरे देत असत. ही उत्तरे देण्यामध्ये त्यांचा दिवसाचा बराचसा वेळ आणि पूर्ण रात्र व्यतीत होत असे.
तात्काळ उत्तर न मिळाल्याने नाराज झालेल्या एका साधकाला उद्देशून श्रीअरविंद पत्र लिहीत आहेत, १९३३ साली लिहिलेल्या त्या पत्रामध्ये ते नमूद करतात की, ”सामान्य पत्रव्यवहार, असंख्य अहवाल या सगळ्यामध्ये मला बारा बारा तास खर्च करावे लागतात हे तुमच्या लक्षात येत नाही. दुपारी तीन तास आणि सकाळी ६ वाजेपर्यंत आख्खी रात्र मी यामध्ये गुंतलेला असतो.” साधकांबाबत आपल्याला जे कार्य करायचे आहे त्या कार्याचा एक महत्त्वाचा भाग या दृष्टिकोनातून श्रीअरविंद या पत्रव्यवहाराकडे पाहत असत.
श्रीअरविंद म्हणतात ‘माझा हा पत्रव्यवहार म्हणजे माझ्या मुख्य हेतूच्या दिशेने नेणारे एक प्रभावी साधन होते आणि म्हणूनच मी त्याला इतके महत्त्व देत असे. प्रत्येकावर या पत्रव्यवहाराचा काही ना काही सकारात्मक परिणाम होत असे, त्याविषयी सांगून झाल्यावर श्रीअरविंद म्हणतात, ”अर्थातच हा केवळ पत्रवव्यहाराचा परिणाम होता असे नाही तर त्या पत्रव्यवहाराच्या पाठीमागे, जडभौतिक प्रकृतीवर ‘शक्तीचा’ जो दाब वाढत चाललेला होता, ती शक्तीच हे सारे करू शकत होती, परंतु तरीही त्यास एक योग्य वळण देणे आवश्यक होते आणि त्या पत्रव्यवहारातून तो हेतू साध्य झाला.”
श्रीअरविंदांच्या प्रकाशित झालेल्या पत्रव्यवहाराची पृष्ठसंख्या पाहिली तर ती संख्या दोन हजार छापील पृष्ठसंख्येपेक्षा जास्त आहे. (क्रमश:)