Tag Archive for: निश्चल-निरवता

कोणत्याही बाह्य गोष्टींमुळे, हर्ष किंवा शोक यामुळे, किंवा सुख-दु:खामुळे विचलित न होणे, तसेच लोकं काय म्हणतात किंवा काय करतात यामुळे विचलित न होणे, याला योगमार्गामध्ये समतेची अवस्था म्हणतात किंवा व्यक्तीमध्ये सर्व गोष्टींबाबत समभाव आहे, असे म्हटले जाते. या अवस्थेपर्यंत येऊन पोहोचणे हे साधनेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असते. यामुळे मन तसेच प्राणामध्ये, अविचलता (quietude) आणि निश्चल-निरवता (silence) येण्यास मदत होते. याचा अर्थ असा की, आता खरोखरच प्राण व प्राणिक मन स्वयमेव अविचल आणि निश्चल-निरव होऊ लागले आहे. त्या पाठोपाठ बुद्धीदेखील अविचल आणि निश्चल-निरव होणार हे निश्चित.

– श्रीअरविंद (CWSA 31 : 335)

(कामात गुंतलेले असताना, शांती, स्थिरता टिकून राहत नाही याबाबतची खंत एका साधकाने श्रीअरविंद यांच्यापाशी व्यक्त केली आहे, असे दिसते. त्याला श्रीअरविंद यांनी दिलेले हे उत्तर…)

ज्ञान, सामर्थ्य आणि आनंद या गोष्टी येण्यासाठी स्थिरतेचे, शांतीचे आणि समर्पणाचे पोषक वातावरण आवश्य क असते. तुम्ही कामामध्ये गुंतलेले असताना ते वातावरण टिकून राहत नाही कारण तुमच्या मनाला ही निश्चल-निरवतेची (silence) देणगी अलीकडेच प्राप्त झाली आहे; आणि ती देणगी अजूनपर्यंत तरी फक्त मनापुरतीच सीमित आहे. (आत्ता तुमच्या प्राणाला त्या निश्चल-निरवतेचा फक्त स्पर्श झाला आहे किंवा तिचा प्रभाव जाणवू लागला आहे पण त्या निरवतेने प्राणाचा अजूनपर्यंत ताबा घेतलेला नाही.) जेव्हा नवीन चेतना पूर्णतः तयार झालेली असेल आणि ती जेव्हा तुमच्या प्राणिक प्रकृतीचा आणि शारीरिक अस्तित्वाचा संपूर्ण ताबा घेईल तेव्हा (तुम्ही म्हणत आहात) तो दोष निघून जाईल.

तुमच्या मनाला लाभलेली ही शांतीची अविचल चेतना केवळ स्थिर होणे पुरेसे नाही, तर ती व्यापकही झाली पाहिजे. तुम्हाला ती सर्वत्र जाणवली पाहिजे. म्हणजे, तुम्ही स्वतः आणि इतर सर्वकाही त्या चेतनेमध्येच आहे, असे तुम्हाला जाणवले पाहिजे. तुमच्या कर्मामध्ये स्थिरतेचा पाया निर्माण करण्यासाठीसुद्धा तुम्हाला त्या चेतनेची मदत होईल. तुमची चेतना जेवढी अधिक व्यापक होईल तेवढ्या अधिक प्रमाणात तुम्ही वरून येणाऱ्या गोष्टी (ज्ञान, प्रकाश, प्रेम इ.) ग्रहण करू शकाल. (आणि तसे झाल्यावर मग) दिव्य शक्ती तुमच्या अस्तित्वामध्ये अवतरू शकेल आणि ती त्यामध्ये सामर्थ्य, प्रकाश आणि शांती ओतू शकेल.

तुम्हाला कोंडल्यासारखे, मर्यादित असे जे काही जाणवत आहे ते तुमचे शारीरिक मन (physical mind) आहे; उपरोक्त व्यापक चेतना आणि हा प्रकाश खाली अवतरला आणि त्याने तुमच्या प्रकृतीचा ताबा घेतला तरच, हे मन व्यापक होऊ शकते. तुमच्या देहप्रणालीमध्ये जेव्हा वरून सामर्थ्य अवतरेल तेव्हाच, तुम्हाला ज्याचा त्रास होत आहे ते शारीरिक जडत्व कमी होऊन नाहीसे होण्याची शक्यता आहे.

अविचल राहा, स्वतःला खुले करा आणि स्थिरता व शांती दृढ करण्यासाठी, चेतना व्यापक करण्यासाठी दिव्य शक्तीला आवाहन करा. सद्यस्थितीत जेवढे ग्रहण करण्याची तसेच आत्मसात करण्याची क्षमता तुमच्यामध्ये आहे तेवढा प्रकाश व तेवढी शक्ती लाभावी यासाठी दिव्य शक्तीला आवाहन करा. तुम्ही उतावीळ होणार नाही याची काळजी घ्या, कारण त्यामुळे, तुमच्या प्राणिक प्रकृतीमध्ये अगोदरच प्रस्थापित झालेल्या अविचलता आणि समतोल या गोष्टींना पुन्हा धक्का लागण्याची शक्यता आहे. अंतिम परिणामाबाबत विश्वातस बाळगा आणि त्या दिव्य शक्तीला तिचे कार्य करू देण्यास पुरेसा अवधी द्या.

श्रीअरविंद (CWSA 29 : 124-125)

अविचलता (quietude) कायम ठेवा आणि ती काही काळासाठी रिक्त असली तरी काळजी करू नका. चेतना ही बरेचदा एखाद्या पात्रासारखी असते, त्यामधील मिश्रित आणि अनिष्ट गोष्टी काढून ते पात्र रिकामे करावे लागते; योग्य आणि विशुद्ध गोष्टींनी ते पात्र भरले जाईपर्यंत, काही काळासाठी ते पात्र तसेच रिकामे ठेवावे लागते. ते पात्र जुन्याच गढूळ गोष्टींमुळे पुन्हा भरले जाणार नाही याची काळजी घेतली पाहिजे.

त्या दरम्यानच्या कालावधीत थोडे थांबा, वाट पाहा, ऊर्ध्व दिशेस स्वतःला खुले करा. शांती (peace) ही निश्चल-निरवतेमध्ये (silence) परिणत व्हावी म्हणून, अतिशय अविचलपणे आणि स्थिरपणे आवाहन करा, त्यामध्ये अस्वस्थ आतुरता असता कामा नये. आणि शांती निश्चल-निरवतेमध्ये परिणत झाली की मग, आनंद आणि ईश्वरी उपस्थितीसाठी आवाहन करा.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 145)

पूर्णयोगाचे अधिष्ठान – ६२

उत्स्फूर्त निश्चल-निरव (silent) स्थिती ही (साधनेच्या सुरुवातीच्या काळात) नेहमी एकदमच टिकून राहणे शक्य नसते, पण आंतरिक निश्चल-निरवता नित्य स्वरूपात टिकून राहीपर्यंत ही स्थिती वृद्धिंगत झाली पाहिजे. ही अशी निरवता असते की जी कोणत्याही बाह्य कृतीने विचलित होऊ शकत नाही. इतकेच नव्हे तर, (कोणत्याही अनिष्ट वृत्तींनी किंवा शक्तींनी) गडबड-गोंधळ करण्याचा किंवा हल्ला करण्याचा प्रयत्न केला तरीदेखील ती विचलित होऊ शकत नाही… सरतेशेवटी हीच स्थिती, सर्व आध्यात्मिक अनुभूतींचा आणि कृतींचा आधार म्हणून स्थिर करण्याची आवश्यकता असते. या निश्चल-निरवतेच्या पाठीमागे अंतरंगामध्ये काय चालू आहे हे व्यक्तीला ज्ञात झाले नाही तरी त्यामुळे फारसे काही बिघडत नाही.

कारण योगामध्ये दोन स्थिती असतात. एक स्थिती अशी असते की, जिच्यामध्ये सारे काही निश्चल-निरव असते आणि व्यक्ती बाह्यतः इतरांप्रमाणेच वावरताना दिसत असली, कृती करताना दिसत असली तरी, तिच्यामध्ये कोणताही विचार, भावना, गतीविधी नसते. आणि दुसऱ्या स्थितीमध्ये एक नवीनच चेतना (consciousness) सक्रिय झालेली असते. ती स्वतःसोबत ज्ञान, मोद, प्रेम आणि तत्सम इतर आध्यात्मिक भावना आणि आंतरिक कृती घेऊन येते, परंतु असे असून देखील, त्याचवेळी तेथे एक मूलभूत निश्चल-निरवता (silence) किंवा अविचलता (quietude) असते.

आंतरिक अस्तित्वाच्या विकसनासाठी या दोन्हींची आवश्यकता असते. परिपूर्ण निश्चल-निरवतेची म्हणजे तरलता, रिक्तता आणि मुक्ती यांची जी स्थिती असते, ती दुसऱ्या स्थितीची तयारी करून देत असते आणि जेव्हा दुसरी स्थिती येते तेव्हा निश्चल-निरवतेची स्थिती तिला आधार पुरवीत असते.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 162-163)

जेव्हा मन निश्चल-निरव (silent) असते तेव्हा तेथे शांती असते आणि ज्या ज्या गोष्टी दिव्य असतात त्या शांतीमध्ये अवतरू शकतात. जेथे मनाचे मनपण शिल्लक उरत नाही तेव्हा, तेथे मनाहून महत्तर असणारा आत्मा असतो.

*

मन निश्चल-निरव होणे, निर्विचार होणे, अचल होणे (still) ही काही अनिष्ट गोष्ट नाही, कारण बरेचदा जेव्हा मन अशा रितीने निरव होते तेव्हा, ऊर्ध्वस्थित व्यापक शांतीचे पूर्ण अवतरण घडून येते आणि त्या तशा व्यापक अचलतेमध्ये मनाच्या वर असणाऱ्या शांत ‘आत्म्या’चा साक्षात्कार त्याच्या विशालतेसह सर्वत्र पसरतो.

एवढेच की, शांती आणि मानसिक निश्चल-निरवता जेव्हा तेथे असते तेव्हा प्राणिक मन (vital mind) घाईने आत शिरून, ती जागा व्यापून टाकण्याची धडपड करते किंवा मग त्याच उद्देशाने, यांत्रिक मन (mechanical mind) स्वतःच्या क्षुल्लक सवयींचे विचार-चक्र पुन्हा एकदा वर काढण्याचा प्रयत्न करते.

अशा वेळी साधकाने काय केले पाहिजे? तर, या बाहेरच्यांना नकार देण्याबाबत आणि त्यांना गप्प करण्याबाबत साधकाने सतर्क असले पाहिजे, म्हणजे मग निदान ध्यानाच्या वेळी तरी मन व प्राणाची शांती आणि अविचलता टिकून राहील. तुम्ही जर एक दृढ आणि शांत संकल्प बाळगू शकलात तर हे उत्तम रितीने करता येऊ शकते.

हा संकल्प, मनाच्या पाठीमागे असणाऱ्या ‘पुरुषा‌’चा संकल्प असतो. मन जेव्हा शांतिपूर्ण अवस्थेत असते, ते जेव्हा निश्चल-निरव असते तेव्हा व्यक्तीला या (सक्रिय) ‘पुरुषा‌’ची, तसेच प्रकृतीच्या कार्यापासून अलग असलेल्या अक्रिय ‘पुरुषा’चीसुद्धा जाणीव होऊ शकते.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 162 & 160)

अचंचल, अविचल मन (quiet mind) ही पहिली पायरी होय, त्यानंतरची खूप पुढची पायरी म्हणजे निश्चल-निरवता (silence). परंतु त्यासाठी (व्यक्तीमध्ये) आधी अविचलता असलीच पाहिजे. ‘अविचल मन’ असे म्हणत असताना, मला अशी एक मानसिक चेतना अभिप्रेत आहे की, ज्या चेतनेमध्ये विचार आत प्रविष्ट होताना दिसतील आणि तेथे ते इतस्ततः वावरताना दिसतील; परंतु आपण स्वतः विचार करत आहोत असे व्यक्तीला वाटणार नाही किंवा ते विचार आपले स्वतःचे आहेत किंवा ते विचार म्हणजेच आपण आहोत असेही त्या व्यक्तीला वाटणार नाही.

एखाद्या शांत प्रदेशामध्ये वाटसरू यावेत, काही काळ तेथे राहून नंतर तेथून निघून जावेत त्याप्रमाणे, मनामध्ये विचारतरंग येतील आणि निघून जातील. अविचल मन त्यांचे निरीक्षण करेल किंवा करणारही नाही, परंतु दोन्ही परिस्थितीमध्ये ते सक्रिय होणार नाही किंवा ते स्वतःची अविचलता देखील गमावणार नाही.

निश्चल-निरवतेमध्ये अविचलतेपेक्षा अधिक असे काही असते; आंतरिक मनामधून विचारांना पूर्णपणे हद्दपार करत, त्याला नि:शब्द करून किंवा विचारांना सीमेच्या बाहेरच ठेवून, ही अवस्था प्राप्त करून घेता येऊ शकते. परंतु वरून होणाऱ्या अवतरणाद्वारे (descent) ही अवस्था अधिक सुलभतेने प्रस्थापित करता येते. ही निश्चल-निरवता वरून खाली अवतरत आहे, आपल्या वैयक्तिक चेतनेमध्ये प्रवेश करून, ती तिला व्यापून टाकत आहे किंवा तिला ती कवळून घेत आहे अशी व्यक्तीला जाणीव होते, आणि मग ती चेतना स्वतःला विशाल अशा अवैयक्तिक (impersonal) निश्चल-निरवतेमध्ये विलीन करू पाहते.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 141-142)

अचंचलता किंवा अविचलता, स्थिरता, शांती आणि निश्चल-निरवता या प्रत्येक शब्दांना अर्थांच्या त्यांच्यात्यांच्या अशा खास छटा आहेत आणि त्यांची व्याख्या करणे तितकेसे सोपे नाही.

Quiet म्हणजे अचंचलता, अविचलता – ही अशी एक अवस्था असते की, जेथे कोणतीही अस्वस्थता किंवा चलबिचल नसते.

Calm म्हणजे स्थिरता – ही एक अक्षुब्ध, अचल अशी अवस्था असते की, जिच्यावर कोणत्याही क्षोभाचा परिणाम होऊ शकत नाही. अविचलतेच्या तुलनेत स्थिरता ही अधिक सकारात्मक अवस्था असते.

Peace म्हणजे शांती – ही त्याहूनही अधिक सकारात्मक अवस्था असते; शांतीसोबतच एक सुस्थिर व सुसंवादी विश्रामाची आणि मुक्ततेची भावनासुद्धा येते.

Silence म्हणजे निश्चल-निरवता – (ही शांतीहूनही अधिक सकारात्मक अवस्था असते.) ही अशी एक अवस्था असते की, जेथे प्राणाचे किंवा मनाचे कोणतेही तरंग उमटत नाहीत. किंवा तसे नसेल तर, मग तेथे एक प्रगाढ अविचलता असते आणि त्या अविचलतेला कोणतीही पृष्ठवर्ती हालचाल भेदू शकत नाही किंवा त्यात बदल घडवू शकत नाही.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 137)