Tag Archive for: निद्रा

कोणत्याही परिस्थितीमध्ये, म्हणजे मूल काहीही करत असले तरी त्याला पुरेशी झोप मिळालीच पाहिजे. वयानुसार झोपेचे तास कमीअधिक होतील. बाळ पाळण्यात असताना, ते जितका वेळ जागे असते त्याच्यापेक्षा अधिक वेळ त्याने झोपले पाहिजे. जसजसे ते मूल मोठे होत जाईल तसतसे त्याच्या झोपेचे प्रमाण कमीकमी होत जाईल. परंतु मुलाची वाढ पूर्ण होत नाही तोपर्यंत त्याने किमान आठ तास तरी झोपलेच पाहिजे. जिथे शांतता आहे आणि जिथे खेळती हवा आहे अशा जागी त्याने झोपले पाहिजे.

लहान मुलांना विनाकारण उशिरापर्यंत जागे राहायला लावता कामा नये. मज्जातंतूंना विश्रांती मिळण्याच्या दृष्टीने मध्यरात्रीपूर्वीचे तास हे सर्वात उत्तम असतात. एवढेच काय पण ज्यांना मज्जागत संतुलन (nervous balance) कायम ठेवायचे आहे त्यांनी दिवसासुद्धा थोडी विश्रांती घेणे आवश्यक असते. मुलं लहान असतात तेव्हाच त्यांना स्नायूंना आणि मज्जातंतूंना आराम कसा द्यायचा याची कला शिकविली पाहिजे.

पण बरेच पालक असेही असतात की, जे मुलांना कोणती ना कोणती तरी कृती करण्यास भाग पाडत असतात. जेव्हा मूल शांत असते तेव्हा पालकांना असे वाटते की, जणू ते आजारी आहे. मुलांना आराम करू न देता किंवा त्यांना थोडीही विश्रांती घेऊ न देता, कामामध्ये गुंतवून ठेवण्याची वाईट खोडसुद्धा काही पालकांना असते. …आपल्या कुटुंबाला मदत करण्याचे जर मुलाने स्वतःहून ठरविले असेल आणि काम करण्याची त्याला आवड असेल तरच त्याला तशा प्रकारचे काम करू दिले पाहिजे. मात्र त्यामध्ये एक खबरदारी घेतली गेली पाहिजे. आणि ती अशी की, त्याच्या शरीराचे कार्य व्यवस्थितपपणे चालण्यासाठी आवश्यक असणाऱ्या विश्रांतीचे तास त्यामुळे कमी होता कामा नयेत.

* श्रीमाताजी (CWM 12 : 15-16)

प्रश्न : व्यक्ती जेव्हा झोपलेली असते तेव्हा तिची जाणीव ही जागेपणी असलेल्या जाणिवेपेक्षा कशा प्रकारे वेगळी असते?

श्रीमाताजी : ती भिन्न असल्याचे तुमच्या कधी लक्षात आले नाही का? तुमची शारीरिक जाणीव किंवा तुमची सूक्ष्म शारीरिक जाणीव, तुमची प्राणिक जाणीव किंवा तुमच्यामधील कनिष्ठ किंवा उच्चतर प्राणिक जाणीव, तुमची चैत्य जाणीव, तुमची मानसिक जाणीव, ह्या सगळ्या एकमेकींपासून पूर्णत: भिन्न आहेत. म्हणून जेव्हा तुम्ही झोपलेले असता तेव्हा एक जाणीव असते आणि जेव्हा तुम्ही जागे असता तेव्हा वेगळीच जाणीव असते.

तुम्ही जागे असता तेव्हा गोष्टी तुमच्या बाहेर प्रक्षेपित झालेल्या तुम्ही पाहता, तर निद्रावस्थेत त्याच गोष्टी तुम्ही अंतरंगात पाहता. म्हणजे जागे असताना, तुम्हाला जणू बाहेर धाडण्यात आलेले असते आणि तुम्ही त्याकडे समोरून पाहता आणि निद्रावस्थेत तुम्ही स्वत:कडेच आंतरिक आरशामध्ये पाहता. व्यक्तीने जाणिवांच्या स्थितीमध्ये फरक करावयास शिकले पाहिजे अन्यथा व्यक्ती कायमच गोंधळलेली राहील.

वास्तविक, ही योगमार्गावरील पहिली पायरी आहे, ही धाग्याची सुरुवात आहे. जर व्यक्तीने हा धागा शेवटपर्यंत पकडून ठेवला नाही तर, व्यक्ती वाट चुकण्याची शक्यता असते. तेव्हा तो धागा शेवटपर्यंत पकडून ठेवणे अत्यंत आवश्यक असते.

-श्रीमाताजी
(CWM 07 : 131)