अध्यात्म-साधनेसाठी प्रामाणिकपणा अगदी अत्यावश्यक असतो आणि कुटिलता ही कायमस्वरूपी अडथळा असते. सात्त्विक प्रवृत्ती ही आजवर नेहमीच आध्यात्मिक जीवनासाठी अतिशय सुयोग्य मानण्यात आली आहे. तसेच सात्त्विकतेमुळे आध्यात्मिक जीवनाची पूर्वतयारी होते, असेही मानले जाते. तर राजसिक प्रकृती इच्छाआकांक्षाच्या आणि आवेगांच्या भाराखाली दबून गेलेली असते.
त्याच बरोबर हेही खरे आहे की, आध्यात्मिकता ही द्वंद्वातीत असते आणि त्यासाठी ऊर्ध्वमुख असणाऱ्या अभीप्सेची सर्वाधिक आवश्यकता असते. आणि ही अभीप्सा सात्त्विक प्रवृत्तीच्या व्यक्तीइतकीच राजसिक प्रवृत्तीच्या व्यक्तीमध्येही निर्माण होऊ शकते. एखादी सात्त्विक प्रवृत्तीची व्यक्ती जशी तिच्या सद्गुणांच्या अतीत जाऊ शकते तशीच, राजसिक प्रवृत्तीची व्यक्तीही तिच्या अवगुणांच्या, इच्छाआकांक्षांच्या अतीत होऊन, दिव्य शुद्धता, दिव्य प्रकाश आणि दिव्य प्रेमाकडे वळू शकते.
अर्थात, अशी राजसिक प्रवृत्तीची व्यक्ती जेव्हा स्वतःच्या कनिष्ठ प्रकृतीवर विजय मिळवेल आणि स्वतःमधून ती कनिष्ठ वृत्ती काढून टाकेल तेव्हाच ही गोष्ट घडून येईल. कारण अशी व्यक्ती जर पुन्हा एकदा त्याच कनिष्ठ प्रकृतीमध्ये जाऊन पडली, तर ती मार्गभ्रष्ट होण्याची शक्यता असते किंवा अगदीच काही नाही तर, जोपर्यंत ती व्यक्ती त्या कनिष्ठ प्रकृतीमध्ये रमलेली असते तोपर्यंत तरी तिची आंतरिक प्रगती खुंटते.
परंतु धार्मिक आणि आध्यात्मिक इतिहास पाहिला तर त्यामध्ये, मोठमोठ्या गुन्हेगारांचे महान संतांमध्ये किंवा अवगुणी किंवा कमी गुणवान व्यक्तींचे आध्यात्मिक साधकांमध्ये आणि भक्तांमध्ये रूपांतर झाल्याची उदाहरणे वारंवार आढळून आली आहेत. उदाहरणार्थ युरोपमध्ये सेंट ऑगस्टिन, भारतामध्ये (चैतन्य महाप्रभुंचे अनुयायी झालेले) जगाई आणि मधाई, बिल्वमंगल यासारखी अनेक उदाहरणे आहेत.
भलेही एखाद्या माणसाच्या हातून गतकाळात अनेक चुका झालेल्या असतील किंवा त्याला अनेक ठोकरा बसल्या असतील, पण त्यानेसुद्धा जर ईश्वराच्या निवासाचे दरवाजे अगदी प्रामाणिकपणे ठोठावले तर, ते त्याच्यासाठी कधीच बंद नसतात. (किंबहुना) जो जो कोणी ईश्वराच्या निवासाचे दरवाजे अगदी प्रामाणिकपणे ठोठावतो, त्याच्यासाठी ते कधीच बंद नसतात.
मानवी गुण आणि मानवी दोष म्हणजे अंतरंगात असणाऱ्या ईश्वरी तत्त्वावरील अनुक्रमे तेजस्वी व अंधकारमय आवरणे असतात. पण आत्म्याच्या उंचीप्रत जाताना, जेव्हा ती दोन्ही आवरणे भेदली जातात तेव्हा, ती जळून जाऊ शकतात. (म्हणजेच द्वंद्वातीत असणाऱ्या आत्मतत्त्वाच्या दिशेने चाललेल्या प्रवासात साधकाचे गुण व दोष दोन्ही गळून पडतात.)
– श्रीअरविंद (CWSA 29 : 42)







