Tag Archive for: दुरिच्छा

 

उत्तमरितीने प्रशिक्षित असा रणक्षेत्रातील हत्ती, बाणांच्या भडिमाराने इतस्तत: पळायला सुरुवात करत नाही. तो वेदना सहन करतो. झुंजारपणे प्रतिकार करणाऱ्या वीराच्या वृत्तीने तो पुढे पुढे चालतच राहतो. ज्याला सन्मार्गाचे अनुसरण करायचे असते, त्याला स्वाभाविकपणे सर्व प्रकारच्या दुरिच्छांच्या हल्ल्यांना सामोरे जावे लागण्याची शक्यता असते. कारण इतर जण त्याला समजून घेऊ शकत नाहीत आणि एवढेच नव्हे तर, त्यांना जे समजत नाही त्याचा ते द्वेष करू लागतात.

सामान्य लोक तुमच्याविषयी जे द्वेषपूर्ण उद्गार काढतात त्यामुळे, जर तुम्ही चिंताग्रस्त, दुःखीकष्टी किंवा नाउमेद झालात तर तुम्ही योगमार्गावर फार प्रगत होऊ शकणार नाही. दुरिच्छादी गोष्टी तुमच्या वाट्याला येतात याचे कारण तुम्ही दुर्दैवी आहात किंवा तुमच्या नशीबातच सुख नाही हे नसते तर, उलट (प्रगतिपथावर वाटचाल करण्याचा) तुमचा संकल्प दिव्य चेतनेने व दिव्य कृपेने गांभीर्याने घेतला आहे आणि तुमचा हा संकल्प, हा निश्चय कितपत प्रामाणिक आहे; मार्गातील अडचणींना सामोरे जाण्यासाठी तुम्ही कितपत खंबीर आहात हे पाहण्यासाठी, (सोन्याचा) कस पाहणाऱ्या दगडाप्रमाणे, कसोटीचा दगड म्हणून आजूबाजूच्या परिस्थितीचा दिव्य चेतनेने उपयोग केलेला असतो. (हे त्याचे खरे कारण असते.)

त्यामुळे कोणी जर तुमचा उपहास केला किंवा कोणी तुमच्याविषयी अपशब्द काढले तर पहिली गोष्ट तुम्ही केली पाहिजे ती अशी की, अंतर्मुख होऊन, आपल्यातील कोणत्या दुर्बलतेमुळे वा कोणत्या अपूर्णतेमुळे असे घडले ते पाहिले पाहिजे. तसेच, तुमची खरी किंमत काय आहे त्याची लोकांना काही कदरच नाहीये असे समजून तुम्ही उदास, संतप्त किंवा उद्विग्न होता कामा नये. त्यापेक्षा तुमचा कोणता दोष, कोणती दुर्बलता वा कोणती विकृती दुरुस्त केली पाहिजे हे दाखवून दिल्याबद्दल, तुम्ही दिव्य कृपेचे ऋणी असले पाहिजे. म्हणून दुःखीकष्टी होण्याऐवजी उलट, तुम्ही समाधानी झाले पाहिजे आणि तुमच्या विरोधात, तुमचे अहित व्हावे म्हणून जो घाट घातला गेला होता त्याचा तुम्ही पुरेपूर उपयोग करून घेतला पाहिजे.

तुम्हाला जर खरोखरच या मार्गाचे (पूर्णयोगाचे) अनुसरण करायचे असेल आणि योगसाधना करायची असेल, तर तुम्ही ती कोणाकडून कौतुक मिळावे किंवा सन्मान मिळावा यासाठी करता कामा नये; तर तुम्ही साधनेव्यतिरिक्त अन्य कोणत्या मार्गाने आनंदी होऊच शकणार नाही आणि त्यामुळे तुम्हाला ती केलीच पाहिजे, अशी आणि इतकी ती तुमच्या जिवाची अनिवार्य निकड असली पाहिजे. लोकांनी तुमची प्रशंसा केली काय किंवा नाही, ती गोष्ट अजिबात महत्त्वाची नाही. तुम्ही आधीच स्वत:ला हे समजावले पाहिजे की, तुम्ही सामान्य माणसांपेक्षा जेवढे अधिक प्रगत व्हाल आणि तुम्ही जसजसे त्यांच्या सामान्य जीवन-पद्धतीपासून दूर जाल, तेवढे लोकं तुमची प्रशंसा कमी करू लागतील; कारण हे उघड आहे की, ते तुम्हाला नीट समजून घेऊ शकणार नाहीत. आणि मी पुन्हा एकदा सांगते की, ते अजिबात महत्त्वाचे नाही.

तुम्ही प्रगती केल्याशिवाय राहूच शकत नाही म्हणून, मार्गावर प्रगत होत राहण्यामध्येच ‘खरा प्रामाणिकपणा’ सामावलेला आहे. तुम्ही दिव्य जीवनासाठी स्वत:ला समर्पित करता कारण त्याशिवाय तुम्ही राहूच शकत नाही; तुम्ही स्वत:चे रूपांतरण करण्यासाठी धडपडता, प्रकाशाला उन्मुख होता कारण त्याविना तुम्ही राहूच शकत नाही, कारण तेच तुमच्या जीवनाचे प्रयोजन असते. जेव्हा हे असे असते तेव्हा खात्री बाळगा की, तुम्ही योग्य मार्गावर आहात.

• श्रीमाताजी [CWM 03 : 281-283]

साधना, योग आणि रूपांतरण – ०४

सन्मार्गाचे अनुसरण करण्याची ज्यांना इच्छा असते त्यांच्यावर सर्व प्रकारच्या दुरिच्छांचे हल्ले होण्याची शक्यता असते; (कारण) त्यांना ते समजत नाही आणि एवढेच नाही तर, त्यांना जे समजत नाही त्याचा ते बहुधा तिरस्कारच करतात.

लोक तुमच्याविषयी जे द्वेषपूर्ण उद्गार काढतात, तुम्हाला मूर्खात काढतात त्यामुळे तुम्ही जर चिंताग्रस्त झालात, दुःखी झालात किंवा नाउमेद झालात तर तुम्ही (योग)मार्गावर फार प्रगत होऊ शकणार नाही. आणि अशा गोष्टी तुमच्यापर्यंत येतात याचे कारण तुम्ही दुर्दैवी आहात किंवा तुमच्या नशीबातच सुख नाही असे मुळीच नाही, तर उलट दिव्य ‘चेतने’ने व दिव्य ‘कृपे’ने तुमचा संकल्प गांभीर्याने घेतला आहे असा त्याचा अर्थ होतो. आणि तुमचा निश्चय किती प्रामाणिक आहे, मार्गातील अडचणींना सामोरे जाण्यासाठी तुम्ही किती खंबीर आहात, याची पारख करण्यासाठी, तुमच्या आजूबाजूच्या परिस्थितीचा कसोटीच्या दगडाप्रमाणे (सोन्याची पारख करण्याचा सोनाराकडे असणारा कसोटीचा दगड) दिव्य ‘चेतने’कडून व दिव्य ‘कृपे’कडून वापर केला जात आहे, हे त्यामागचे कारण असते.

म्हणून कोणी तुमचा उपहास केला किंवा कोणी तुमच्याविषयी निंदाजनक शब्द उच्चारले तर अशावेळी पहिली गोष्ट तुम्ही केली पाहिजे ती अशी की, अंतर्मुख होऊन, आपल्यातील कोणत्या दुर्बलतेमुळे वा कोणत्या अपूर्णतेमुळे असे घडले ते पाहिले पाहिजे; आणि तुमच्या खऱ्या गुणांची लोकांना कदरच नाही असे वाटून तुम्ही उदास, संतप्त किंवा उद्विग्न होता कामा नये. उलट तुमच्यातील कोणता दोष, कोणती दुर्बलता वा कोणती विकृती तुम्ही दुरुस्त केली पाहिजे हे दाखवून दिल्याबद्दल, तुम्ही दिव्य ‘कृपे’चे कृतज्ञ असले पाहिजे. दुःखीकष्टी होण्याऐवजी, तुम्ही पूर्णपणे समाधानी व्हायला पाहिजे आणि तुमच्या विरोधात, तुमचे अहित व्हावे म्हणून जो घाट घालण्यात आला होता, त्याचा तुम्ही पुरेपूर लाभ करून घेतला पाहिजे.

– श्रीमाताजी (CWM 03 : 282)

सद्भावना – ०६

प्रश्न : एखाद्या व्यक्तीच्या सद्भावनेपेक्षा दुसऱ्या व्यक्तीच्या दुरिच्छेची ताकद अधिक मोठी असेल तर ?

श्रीमाताजी : हो, खरे आहे, असे घडू शकते. मूलतः म्हणूनच आपण पुन्हा त्याच गोष्टीपाशी येऊन पोहोचतो – व्यक्तीने स्वतःला शक्य असेल तितके सारे काही, शक्य तितक्या चांगल्या पद्धतीने केले पाहिजे आणि ते सारे ‘ईश्वरा’ला अर्पण या भावनेने करायचे आणि मग, जेव्हा ते स्थिरस्थावर आणि सुव्यवस्थित झालेले असेल तेव्हा आणि त्या व्यक्तीमध्ये जर खरोखरच अभीप्सा असेल आणि ती व्यक्ती जर प्रकाशमय अस्तित्व असेल तर, ती व्यक्ती सारे वाईट प्रभाव निष्प्रभ करू शकते. पण एकदा का व्यक्तीने या जगात पाऊल टाकले की, सारे काही अगदी शुद्ध आणि वाईट प्रभावांपासून मुक्त असेल, अशी फारशी आशा बाळगता येत नाही. प्रत्येक वेळी व्यक्ती जेव्हा अन्नग्रहण करते, तेव्हा त्या प्रत्येक घासाबरोबर ते प्रभाव ती ग्रहण करत असते; प्रत्येक श्वासागणिक ते प्रभाव आत शोषून घेत असते. आणि त्यामुळेच, कोणती गोष्ट आवश्यक असेल तर ती म्हणजे, होता होईल तेवढे, हळूहळू, एकेक करून, शुद्धिकरणाचे काम करत राहायचे.

– श्रीमाताजी
(CWM 05 : 413)