Tag Archive for: दिव्य माता

 

तुमची श्रद्धा, तुमचा प्रामाणिकपणा आणि तुमचे समर्पण हे जेवढे अधिक परिपूर्ण असेल तेवढ्या अधिक प्रमाणात कृपा व संरक्षण तुमच्यासोबत असेल. आणि ‘दिव्य माते’चे संरक्षण आणि ‘तिची कृपा’ तुमच्यासोबत असताना, तुमच्या वाटेला जाण्याची हिंमत कोण करू धजावेल किंवा तुम्हाला कोणाची भीती बाळगण्याची गरजच काय? तिच्या कृपेचा आणि संरक्षणाचा थोडासा अंशदेखील तुम्हाला सर्व अडीअडचणी, अडथळे आणि धोके यांमधून पार करू शकतो; तर मग, तिने जर पूर्णतयाच तुम्हाला कवळून घेतले तर, कोणतीही असत्‌‍-शक्ती, मग ती कितीही बलवान का असेना, ती या जगातील असो किंवा इतर अदृश्य जगतांमधील असो, तिची बाधा न पोहोचता, सर्व संकटांपासून मुक्त होऊन, तुम्ही तुमच्या मार्गावरून पूर्ण सुरक्षितपणे वाटचाल करू शकता; कारण तो मार्ग ‘दिव्य माते’चा असतो.

– श्रीअरविंद (CWSA 32 : 08)

 

साधना करत असताना सुरुवातीला एक गोष्ट आवश्यक असते ती म्हणजे, शक्य तितके श्रीमाताजींचे स्मरण ठेवावे. दररोज काही वेळ हृदयामध्ये श्रीमाताजींवर लक्ष एकाग्र करावे. शक्य तितका, त्या ‘दिव्य माता’ आहेत या भूमिकेतून त्यांचा विचार करावा. त्या तुमच्या अंतरंगामध्येच आहेत ही जाणीव तुम्हाला व्हावी अशी अभीप्सा बाळगावी, तुमचे सारे कर्म त्यांना अर्पण करावे आणि त्यांनी तुम्हाला अंतरंगातून मार्गदर्शन करावे व तुमचा सांभाळ करावा, अशी त्यांच्यापाशी प्रार्थना करावी. हा प्राथमिक टप्पा आहे पण बहुतेक वेळा हा टप्पा ओलांडण्यासाठीच बराच वेळ लागतो.

परंतु एखाद्या व्यक्तीने जर प्रामाणिकपणे आणि चिकाटीने हा टप्पा ओलांडला तर मग हळू हळू मानसिकता बदलू लागते आणि साधकामध्ये अशी एक नवीन चेतना उमलू लागते की, ज्यामुळे साधकाला अंतरंगामधून श्रीमाताजींच्या उपस्थितीची अधिकाधिक जाणीव होऊ लागते. प्रकृतीमधील आणि जीवनातील त्यांच्या कार्याची जाणीव होऊ लागते किंवा मग अशा व्यक्तीला अन्य काही आध्यात्मिक अनुभव येऊ लागतात आणि त्यामधून साक्षात्काराच्या दिशेने द्वारं खुली होऊ लागतात.

*

तुम्ही तुमचे कर्म ईश्वराच्या चरणी पूर्ण प्रामाणिकपणे अर्पण केलेत तर ध्यानामधून जेवढे तुमचे कल्याण होईल तेवढेच कर्मामधूनही होऊ शकेल.

– श्रीअरविंद आणि श्रीमाताजी (CWSA 32 : 186), (CWM 16 : 178)

जीवन जगण्याचे शास्त्र – ३१

सर्वसाधारणपणे माणसं ज्याला प्रेम असे संबोधतात, ते प्रेम प्राणिक भावना असणारे प्रेम असते; ते प्रेम हे (खरंतर) प्रेमच नसते; तर ती केवळ एक प्राणिक वासना असते, एक प्रकारच्या अभिलाषेची ती उपजत प्रेरणा असते, तो मालकी भावनेचा आणि एकाधिकाराचा भावावेग असतो. योगमार्गामध्ये त्याच्या अंशभागाचीदेखील भेसळ होऊ देता कामा नये. ईश्वराभिमुख झालेले प्रेम हे असे प्रेम असता कामा नये. (कारण) ते दिव्य प्रेम नसते.

ईश्वराबद्दल वाटणाऱ्या प्रेमामध्ये आत्मदान (self-giving) असते, त्यामध्ये कोणतीही मागणी नसते. ते शरणभावाने आणि समर्पणाने परिपूर्ण असते. ते कोणतेही हक्क गाजवत नाही; ते कोणत्याही अटी लादत नाही; ते कोणताही सौदा करत नाही. मत्सर, अभिमान वा राग अशा प्रक्षोभक भावना त्याच्या ठिकाणी आढळत नाहीत, कारण या गोष्टी त्याच्या घडणीतच नसतात.

ईश्वराभिमुख झालेल्या प्रेमाला प्रतिसाद म्हणून ‘दिव्य माता’ खुद्द स्वत:लाच देऊ करते, अगदी मुक्तपणे! आणि आंतरिक वरदानामध्ये ती गोष्ट प्रतिबिंबित झालेली दिसते. दिव्य मातेचे अस्तित्व तुमच्या मनामध्ये, तुमच्या प्राणामध्ये, तुमच्या शारीरिक चेतनेमध्ये प्रतिबिंबित झालेले दिसते. तिची शक्ती तुमच्या अस्तित्वाच्या सर्व गतिविधी हाती घेऊन, त्यांना परिपूर्णत्व (perfection) आणि परिपूर्तीच्या (fulfillment) दिशेने घेऊन जात, दिव्य प्रकृतीमध्ये तुमची पुनर्घडण करते. तिच्या प्रेमाने तुम्हाला कवळून घेतले आहे आणि ती स्वतः तुम्हाला तिच्या कवेमध्ये घेऊन, ईश्वराकडे घेऊन जात आहे असे तुम्हाला जाणवते. तुम्हाला याची जाणीव व्हावी आणि तिने तुमच्या अगदी जडभौतिक अंगापर्यंत तुमचा ताबा घ्यावा, अशी अभीप्सा तुम्ही बाळगली पाहिजे. येथे मात्र कोणतीही मर्यादा असत नाही, ना काळाची ना समग्रतेची!

व्यक्तीने जर खरोखर अशी अभीप्सा बाळगली आणि ती जर तिला साध्य झाली तर, इतर कोणत्याही मागण्यांना किंवा अपूर्ण राहिलेल्या इच्छावासनांना जागाच असणार नाही. आणि व्यक्तीने जर खरोखरच अशी अभीप्सा बाळगली तर, ती जसजशी अधिकाधिक शुद्ध होत जाईल, तसतशी निश्चितपणे तिला ती गोष्ट अधिकाधिक साध्य होईलच. आणि आवश्यक असणारा बदल तिच्या प्रकृतीमध्ये घडून येईलच. कोणतेही स्वार्थी हक्क आणि इच्छा-वासना यांपासून मुक्त असे तुमचे प्रेम असू द्या; मग प्रेम ग्रहण करण्याची, धारण करण्याची तुमची जेवढी क्षमता आहे, तेवढे सर्व प्रेम प्रतिसादरूपाने तुम्हाला मिळत आहे, असे तुम्हाला आढळेल.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 338-339)