(श्रीमाताजींनी माणसाच्या चिंताग्रस्ततेवरील जो उपाय सांगितला तो आपण कालच्या भागात विचारात घेतला. त्या विवेचनाचा हा पुढचा भाग…)
स्वतःवर अवलंबून राहण्याची जाणीव ही मनुष्याच्या जन्माबरोबर उदयास आली आहे; मात्र त्यासाठी आवश्यक असणारे ज्ञान त्याच्यापाशी नसल्यामुळे, कायमचेच क्लेश, त्रास त्याच्या वाट्याला आलेले आहेत. मनुष्य जर त्याच्या स्वतःच्या चेतनेपेक्षा अधिक उच्च असणाऱ्या चेतनेप्रत पूर्णपणे समर्पित होऊ शकला, म्हणजे त्याने स्वतःला जर त्या चेतनेच्या हाती सोपविले आणि त्याच्या काळज्या, चिंता त्या चेतनेच्या हाती सोपविल्या, तसेच स्वतःच्या जीवनाचे मार्गदर्शन करण्याची व सर्व गोष्टींची सुव्यवस्था लावण्याची जबाबदारी त्याने जर त्या चेतनेच्या हाती सोपविली तरच त्याचे सर्व क्लेश, त्रास संपुष्टात येऊ शकतील.
एखादा प्रश्न सोडविण्यासाठी आवश्यक असणारे ज्ञानच जर एखाद्या व्यक्तीकडे नसेल तर, ती व्यक्ती तो प्रश्न सोडवणार तरी कसा? आणि दुर्दैवाची गोष्ट अशी की, मनुष्याला वाटते की, त्याच्या जीवनाचे सर्व प्रश्न त्याने स्वतःच सोडविले पाहिजेत. मात्र तसे करण्यासाठी आवश्यक असणारे ज्ञान त्याच्यापाशी नसते. ‘मी काय केले पाहिजे?’ हा एक प्रश्न त्याला कायम भेडसावत असतो; त्याच्या पाठोपाठ त्याला जोडून येणारा दुसरा अधिकच गंभीर प्रश्न म्हणजे, ‘उद्या काय होईल कोण जाणे?’ मात्र या प्रश्नांचे उत्तर देण्याची क्षमता त्याच्यापाशी नसते. आणि इथेच सर्व अडचणींचे मूळ आहे. (क्रमश:)
– श्रीमाताजी (CWM 09 : 304)




