Tag Archive for: तत्त्वज्ञान

ईश्वर किंवा पुरुषोत्तम हा विश्वपुरुष देखील आहे; आणि ह्या विश्वाशी असलेली आपली सर्व नाती ही साधने असून, या साधनांद्वारे आपण या विश्वपुरुषाशी आपले नाते प्रस्थापित करण्याची तयारी करत असतो. विश्वाच्या आपल्यावर होणाऱ्या क्रियांना आपण ज्या भावनांनी प्रतिक्रिया देतो, त्या सर्व भावना वस्तुत: या विश्वपुरुषाला, ईश्वराला उद्देशूनच असतात.

आरंभी या गोष्टीचे आपल्याला ज्ञान नसते; मात्र आपले ज्ञान जसजसे वाढते तसतसे आपण जाणीवपुर:सर ईश्वरालाच आपल्या भावनांचा विषय करतो आणि अशा रीतीने ईश्वराशी आपले जिव्हाळ्याचे नाते प्रस्थापित होते. आपण ईश्वराशी एकता साधण्याच्या उद्देशाने जसजसे ईश्वराच्या अधिकाधिक निकट जातो तसतसे आपल्या भावनांतील मिथ्यत्वाचे व अज्ञानाचे दोष गळून पडतात.

आणि मग आपल्याला उमगते की, आपल्या सर्व भावनांना ईश्वरच प्रतिसाद देत असतो; आपण प्रगतीच्या ज्या टप्प्यावर जसे असू त्या त्या टप्प्यानुसार तो आपल्याला स्वीकारतो, जवळ घेतो आणि आपल्या भावनांनुसार प्रतिसाद देतो. जर ते तसे नसते, जर तो आपल्याला मदत करत नसता तर, आपल्याला त्याच्याशी अधिकाधिक निर्दोष संबंध प्रस्थापित करता आले नसते; हेही आपल्याला उमगते.

मानव ईश्वराकडे कोणत्याही भावनेने जावो, ईश्वर त्याचे स्वागत करतो व त्याच्या भक्तीला ईश्वरी प्रेमाने प्रतिसाद देतो. अस्तित्वाचे जे कोणते घटक, जे कोणते गुण व्यक्ती ईश्वराला समर्पित करतात, त्या त्या घटकांच्या आणि त्या त्या गुणांच्या माध्यामातून ईश्वर त्या व्यक्तींना विकसित करतो, त्यांना प्रोत्साहित करतो, त्यांच्या प्रगतीचे नियमन करतो. त्यांचा मार्ग सरळ असो वा वळणावळणाचा, तो ईश्वर त्यांना स्वत:कडेच घेऊन जातो.

– श्रीअरविंद
(CWSA

भक्ती आणि ज्ञान यांचे परस्परांविषयीचे गैरसमज हे अज्ञानमूलक आहेत; त्याचप्रमाणे कर्ममार्ग कमी दर्जाचा आहे ही या दोन्ही मार्गांची असणारी समजूतही तितकीच अज्ञानमूलक आहे. ज्ञानमार्गी व भक्तिमार्गी म्हणतात की, आध्यात्मिक संपत्ती ही कर्ममार्गापेक्षा श्रेष्ठ दर्जाची आहे; परंतु त्यांचे हे म्हणणेही अज्ञानमूलकच आहे.

अशी एक तीव्र भक्ती, असे एक तीव्र ज्ञान असते की ज्यांना ‘कर्म’ हे बहिर्मुख व विक्षेप उत्पन्न करणारे वाटते परंतु जोवर ईश्वराच्या जाणिवेशी आमची जाणीव एकत्व पावत नाही, ईश्वराच्या कर्मसंकल्प-शक्तीशी आमची कर्मसंकल्प-शक्ती एकत्व पावत नाही; तोवरच ‘कर्म’ हे बहिर्मुख व विक्षेप करणारे आहे असे वाटते. परंतु एकदा का हे एकत्व साधले की, कर्म हीच ज्ञानाची शक्ती बनते आणि कर्म हाच प्रेमाच्या अभिव्यक्तीचा मार्ग बनतो.

ईश्वराशी एकत्वाची अवस्था म्हणजे ज्ञान असेल आणि या एकत्वाचा आनंद म्हणजे भक्ती असेल तर, त्या एकत्वाचा प्रकाश व माधुर्य यांचे जिवंत सामर्थ्य म्हणजे दिव्य कर्म असे म्हणता येईल. कोणत्याही मानवी प्रेमामध्ये जी एक आस असते, ती तशीच आस व प्रेमाची तीच स्पंदने ईश्वराबद्दलच्या प्रेमातही असतात. प्रियकर आणि प्रेयसी दोघेही जगापासून आणि इतर सर्वांपासून दूर कोठेतरी, हृदयाच्या गुह्यतम कोपऱ्यामध्ये दडून, ऐक्याच्या निरपवाद आनंदामध्ये निमग्न राहू इच्छितात. तीच कदाचित भक्तिमार्गावरीलही एक अपरिहार्य अशी मनोवस्था असू शकते.

पण ज्या विशाल अशा प्रेमाची परिपूर्ती ज्ञानामध्ये झालेली असते ते प्रेम हे, हृदयाच्या अंतरगृहातील आनंद आणि बाह्य जग यांच्यात कोणताही भेद किंवा विरोध आहे असे मानत नाही. तर उलट, बाह्य जग हे त्या प्रियकराचे, ईश्वराचे धाम आहे, सर्व प्राणिमात्र हे ईश्वराचेच अस्तित्व आहे असे ही व्यापक भक्ती मानते; आणि व्यापक भक्तीची ही जी दिव्य दृष्टी आहे त्या दिव्य दृष्टीत दिव्य कर्माचा आनंद आहे आणि दिव्य कर्माचे समर्थन आहे.

– श्रीअरविंद
(CWSA 24 : 551)

परिपूर्ण झालेले प्रेम ज्ञानाला वगळत नाही तर, उलट तेच प्रेम स्वत: ज्ञान मिळवून देते आणि ज्ञान जेवढ्या प्रमाणात पूर्ण असते तेवढ्या प्रमाणात प्रेमाची शक्यता अधिकाधिक समृद्ध होते…

भगवद्गीतेमध्ये भगवंत असे सांगतात की, ”भक्तीमुळे एखादा भक्त ‘मला’ माझ्या सर्व प्रमाणात आणि माझ्या महानतेनिशी जाणू शकतो आणि तो जर याप्रमाणे ‘मला’ माझ्या अस्तित्वाच्या तत्त्वानिशी जाणेल तर, तेव्हा तो माझ्यामध्ये सामावू शकेल.”

प्रेम हे जर ज्ञानविरहीत असेल तर, ते तीव्र व जोरदारही असू शकेल; पण ते आंधळे, ग्राम्य, आणि बव्हंशी वेळा भयंकरही असू शकेल. हे ज्ञानविरहीत प्रेम ही मोठी ताकद असू शकते, परंतु ते खूप मोठी धोंडसुद्धा ठरू शकते; प्रेम ज्ञानदृष्ट्या सीमित असेल तर उत्साहाच्या भरात, संकुचितपणाच्या जोशात ते स्वत:चीच अवहेलना करते, परंतु, पूर्ण ज्ञानाभिमुख झालेले प्रेम हे ईश्वराशी अमर्याद आणि संपूर्ण ऐक्य घडवून आणते.

असे प्रेम कर्माशी फारकत घेत नाही, उलट ते दिव्य कर्मामध्ये स्वत:ला आनंदाने झोकून देते. कारण ते ईश्वरावर प्रेम करीत असते आणि त्याच्या सर्व अस्तित्वाशी व त्यामुळे, सर्व जीवामात्रांमधील ईश्वराशी ते एकरूप झालेले असते; आणि त्यामुळे अशा प्रेमाला, जगाकरता काम करणे हा, विविधतेने नटलेल्या ईश्वरावर प्रेम करण्याचा आणि त्याची परिपूर्तता करण्याचा मार्ग वाटतो.

अशाप्रकारे भक्तीच्या, प्रेमाच्या मार्गाने आपण प्रवासाला आरंभ केला की, आपल्या त्रिविध शक्ती (प्रेमशक्ती, ज्ञानशक्ती व कर्म-संकल्पशक्ती) ईश्वराच्या ठिकाणी ऐक्य पावतात; ह्या मार्गाच्या देवदूताला, (All-Lover’s being) ‘सर्व-प्रेममया’च्या अस्तित्वाच्या दिव्य आनंदाचा परमानंद लाभणे ही आपली परिपूर्ती वाटते; त्याला ते त्याचे सुरक्षित धाम वाटते; त्याला ते शाश्वत स्थान वाटते आणि तेच वैश्विक किरणोत्सर्गाचे केंद्रस्थान वाटते.

– श्रीअरविंद
(CWSA 24 : 547)

मनोमय पुरुषाने, वासनात्मक मनाशी असलेले त्याचे सहसंबंध आणि त्याच्याबरोबर झालेले त्याचे तादात्म्य (self-identification) ह्यापासून स्वत:ला विलग करावेच लागते. त्याला असे म्हणावे लागते की, ”हे झगडणारे व यातना भोगणारे, कधी दुःखी तर कधी आनंदी असणारे; कधी प्रेम तर कधी द्वेष करणारे मन म्हणजे मी नव्हे; ते कधी आशावादी असते तर कधी गोंधळलेले असते; कधी रागावते व भिते तर कधी ते खुशीत असते; कधी निराश, नाउमेद असते; अशा प्राणिक वृत्तीप्रवृतीच्या हेलकाव्यांचे व भावनात्मक आवेगांचे बनलेले हे मन म्हणजे मी नव्हे. ह्या सर्व गोष्टी म्हणजे संवेदनात्मक आणि भावनात्मक मनामध्ये प्रकृतीचे जे कार्य चालते ते कार्य आहे, त्या सर्व तिच्या सवयी आहेत, अन्य काही नाही.” या प्रकारे मनोमय पुरुषाने संवेदनात्मक व भावनात्मक मनाशी असलेले आपले ऐक्याचे नाते तोडले, म्हणजे मनोमय पुरुष किंवा मन आपल्या भावनांपासून दूर होते आणि ज्याप्रमाणे ते शरीराच्या क्रिया व अनुभूती दूरून पाहते, त्याचप्रमाणे मनाच्या भावनांकडेही ते दूरून पाहते, ते या भावनांचे निरीक्षक किंवा साक्षी बनते. याप्रमाणे मनात दोन तट पडतात; एक मन भावनात्मक व दुसरे निरीक्षक बनते.

भावनात्मक मनात नानाविध वृत्ती व विकार येत राहतात, प्रकृतीच्या गुणांच्या सवयीनुसार हे घडत राहते; दुसरे निरीक्षक मन हे वृत्तीविकार पाहात राहते; त्यांचा तटस्थपणे अभ्यास करते आणि त्यांना जाणून घेते, परंतु त्यापासून ते अलिप्त असते. निरीक्षक मन भावनात्मक मनाच्या वृत्तीविकारांकडे पाहताना जणू काही मनाच्या रंगमंचावर, स्वत:पेक्षा वेगळ्या व्यक्ती खेळत आहेत अशा दृष्टीने त्यांजकडे पाहते.

प्रथम या वृत्तीविकारांत त्याला रस वाटतो आणि ते तादात्म्याकडे झुकते, जुन्या सवयींमुळे मधूनमधून ते त्यांच्याशी एकरूप होते; नंतर पूर्ण शांती राखून व अनासक्तपणे ते त्यांजकडे पाहू शकते; आणि शेवटी शांतीबरोबर आपल्या शांत अस्तित्वाचा शुद्ध आनंद त्याला लाभतो; आणि ते समोरच्या गोष्टी पाहून स्मित करू लागते. एखादे लहान मूल खेळत असावे आणि त्यात ते स्वत:च हारावे त्याप्रमाणे, भावनात्मक मनाची सुखदुःखे व इतर विकारवृत्ती मिथ्या आहेत हे त्याला पटते.

दुसरी गोष्ट अशी की, आपणच त्या साऱ्याला अनुमती देणारे किंवा नाकारणारे स्वामी आहोत, अनुमंता आहोत ही गोष्ट, निरीक्षक मनाच्या लक्षात येते. अर्थात आपली संमती काढून घेऊन हा खेळ आपण बंद पाडू शकतो हेही त्याला उमगते.

निरीक्षक मनाने संमती काढून घेतली की, एक महत्त्वाची गोष्ट घडते. भावनात्मक मन शांत होते व सामान्यत: शांत राहते; ते सामान्यत: शुद्ध राहते, विकाररूप प्रतिक्रियांपासून सामान्यत: अलिप्त राहते. या प्रतिक्रिया त्याच्या ठिकाणी पुन्हा येतात तेव्हा त्या आतून येत नाहीत, तर बाहेरून येतात – बाहेरून आलेल्या क्रियांना प्रतिक्रिया म्हणून त्या उत्पन्न होतात. ही प्रतिक्रिया देण्याची सवयसुद्धा कालांतराने नष्ट होते आणि भावनात्मक मन पूर्वी टाकून दिलेल्या विकारांपासून पूर्ण मुक्त होते.

आशा व निराशा, सुख व दुःख, आवड आणि निवड, आकर्षण आणि तिटकारा, समाधान व असमाधान, हर्ष आणि विषाद, भय आणि कंप, क्रोध, उद्वेग आणि लाज आणि प्रेमवद्वेष इत्यादी सर्व विकार हे मुक्त झालेल्या चैत्यपुरुषापासून गळून पडतात. सर्वसाधारणपणे जीवाला या अवस्थेतून जावे लागते; परंतु आम्ही मात्र या अवस्थेला अंतिम साध्य मानलेले नाही.

….पूर्णत्वासाठी ही गोष्ट आवश्यक आहे की, मनोमय पुरुषाने ‘प्रकृतीचा स्वामी’ ही स्वत:ची बैठक पुनरपि प्राप्त करून घ्यावी; मनाचा आंतरिक प्रवाह व बुद्धीचा युक्तिवाद थांबवून या पुरुषाचे भागत नाही, त्यांची जागा वरून प्रकाश मिळवणारा सत्य-ज्ञानयुक्त (Truth-Conscious) विचार घेईल अशी व्यवस्था, स्वत:ची इच्छाशक्ती कामी लावून त्याला करावी लागते.

– श्रीअरविंद
(CWSA 23 : 352-353)

आपल्याला असे आढळून येते की, जर आपण प्रयत्न केला तर, मनामध्ये शरीरापासून अलग होण्याची शक्ती आहे. मन शरीरापासून केवळ कल्पनेनेच नव्हे, तर कृतीनेही अलग होऊ शकते; शरीरापासून ते भौतिक दृष्टीने, किंबहुना प्राणिक दृष्टीनेही अलग होऊ शकते.

शरीरविषयक गोष्टींसंबंधी एक प्रकारची अलिप्त वृत्ती धारण करून, मनाच्या या अलगपणाला आपण ही बळकटी दिली पाहिजे. शरीराचे झोपणे किंवा जागे राहणे या गोष्टींना अनाठायी महत्त्व दिल्यामुळे, त्याच्याबद्दल निष्कारण वाटणारी काळजी आपण सोडून दिली पाहिजे; शरीराचे हालणे-चालणे किंवा विसावा घेणे, शरीराचे सुख किंवा दुःख, त्याचे आरोग्य किंवा अनारोग्य, त्याचा जोर किंवा थकवा, त्याचा आराम किंवा अस्वस्थता यासंबंधाने काळजी करण्याचे आपण सोडून दिले पाहिजे; शरीर काय खातेपिते यासंबंधानेही काळजी करण्याचे आपण सोडून दिले पाहिजे. आपण आपले शरीर सुस्थितीत ठेवू नये असा ह्याचा अर्थ नव्हे; परंतु अतिरेकी संन्यासी व्रते आपण टाळली पाहिजेत; शरीराची जाणूनबुजून हेळसांड करणे हेसुद्धा आपण टाळले पाहिजे.

इत्यर्थ असा की, आपण भूक, तहान, अस्वस्थता, अनारोग्य या शरीराच्या अवस्थांमुळे आपल्या मनाचा क्षोभ होऊ देऊ नये; शारीरिक आणि प्राणिक प्रवृत्तीचा माणूस शरीरविषयक गोष्टींना जे महत्त्व देतो, ते आपण देऊ नये. द्यायचेच असेलच तर, त्याला दुय्यम स्थान द्यायला हरकत नाही आणि तेही, शरीराचा ‘साधन’ म्हणून उपयोग आहे हे लक्षात ठेऊनच ! शरीर एक साधन आहे म्हणून जे महत्त्व त्याला द्यावयाचे तेही मर्यादित ठेवावे, ते फुगवून त्याला निकडीच्या गोष्टींचे स्वरूप येईल असे करता कामा नये. उदाहरणार्थ, आपण काय खातोपितो यावर मनाची शुद्धता अवलंबून असते अशी वृथा कल्पना आपण करू नये. (एक मात्र खरे की, काही एका अवस्थेमध्ये खाण्यापिण्यासंबंधी नियंत्रणे आपल्या आंतरिक प्रगतीसाठी उपकारक ठरतात.) तसेच, आपले मन वा जीवन केवळ खाण्यापिण्यावरच अवलंबून असते, अशी वृथा कल्पनाही आपण बाळगता कामा नये.

खाणेपिणे ही फक्त एक सवय आहे, निसर्गाने लावलेली ती व्यवस्था आहे; प्रकृतीने मन किंवा प्राण व खाद्यपेय यांजमध्ये एक संबंध निर्माण करून, तो रूढ केला आहे इतकेच; त्यामुळे त्यापेक्षा त्याला अधिक काही मूल्य आहे असे समजण्याची गरज नाही.

वस्तुत: मानसिक व प्राणिक अस्तित्वाच्या उर्जेमध्ये, कोणत्याही प्रकारे घट न होऊ देता, नव्या पद्धतीने, सध्याच्या सवयीच्या उलट पद्धतीने, अन्नसेवनाचे प्रमाण आपण किमान पातळीवर आणू शकतो.

परंतु त्याहीपेक्षा, विवेकपूर्ण प्रशिक्षणाने, मन व प्राण यांना, शारीरिक पोषणाच्या किरकोळ मदतीवर विसंबून ठेवण्यापेक्षा, त्यांचा ज्यांच्याशी अधिक घनिष्ठ संबंध आहे अशा, मानसिक व प्राणिक शक्तीच्या गुप्त झऱ्यांवर विसंबून राहण्याचे प्रशिक्षण देऊन, त्यांना उर्जेच्या अधिक मोठ्या स्त्रोतांकडे वळविता येणे शक्य असते.

– श्रीअरविंद
(CWSA 23 : 343-344)

सामान्यत: त्याग ह्या संकल्पनेची जी लक्षणे मानली जातात त्याहून ‘त्याग’ ह्या संकल्पनेचा आमचा अर्थ वेगळा आहे.

सामान्यत: त्याग ह्या शब्दाचा अर्थ सुखविषयांचा-त्याग, सुखाचे दमन (inhibition of pleasure), स्वत:चा अव्हेर (Self-denial) असा होतो.

मानवी आत्म्याला त्यागाची ही साधना आवश्यक आहे, कारण अज्ञानामुळे त्याचे हृदय सुखोपभोगांना लगडून बसते. सुखोपभोगांचे दमन आवश्यक ठरते कारण इंद्रियजन्य संवेदना, ह्या इंद्रियोपभोगांच्या परिपूर्तीच्या मधु-कर्दमामध्ये (mud-honey) अडकतात, जणू रुतून बसतात. सुखोपभोगाच्या वस्तूंचा, सुखविषयांचा त्याग करणेही आवश्यक मानण्यात येते कारण, मन विषयाला चिकटते आणि ते एखाद्या विषयाला चिकटून बसले की, त्या विषयाला सोडून पलीकडे जाणे, आणि स्वत:च्या अंतरंगात जाणे त्याला जमत नाही.

माणसाचे मन जर असे अज्ञानी नसते, आसक्तीयुक्त नसते, असे चळवळे, अस्थिर व बंधनप्रिय नसते, वस्तूंच्या आकारांनी फसणारे नसते तर, त्यागाची आवश्यकता भासली नसती; जीवात्मा आनंदमार्गावर प्रवास करू शकला असता; लहान आनंदाकडून मोठ्या आनंदाकडे, दिव्य आनंदाकडून दिव्यतर आनंदाकडे तो प्रवास करू शकला असता. मात्र सध्याच्या स्थितीत असा प्रवास व्यवहार्य नाही.

मन ज्या ज्या गोष्टींना चिकटून बसलेले असते, त्यांच्या वास्तव रूपांची प्राप्ती व्हावयास हवी असेल तर, त्याने त्या प्रत्येक गोष्टीचा अंतरंगातूनच त्याग करावयास हवा. बाह्य त्याग हा अत्यावश्यक नाही, तथापि काही काळ तोही आवश्यक ठरतो; पुष्कळशा बाबतीत तो अपरिहार्य होतो; आणि कधीकधी तर सर्व बाबतीत त्याचा उपयोग असतो.

असे देखील म्हणता येईल की, पूर्ण बाह्य त्याग ही अशी एक अवस्था आहे की, तिच्यातून प्रत्येक जीवात्म्याला, त्याच्या विकासाच्या, प्रगतीच्या कोणत्यातरी कालखंडात असताना, जावेच लागते. मात्र अशा त्यागात केव्हाही अहंकारी आग्रही आत्मपीडनाचे व स्वत:च्या भयंकर छळाचे प्रकार नसावेत, कारण ते आपल्या अंतरंगात वसणाऱ्या ईश्वराला अपमानकारक असतात. परंतु शेवटी हा त्याग देखील साधनच असतो, आणि म्हणून त्याचा उपयोग केव्हातरी संपतोच.

जेव्हा एखादी वस्तू आपल्याला तिच्या जाळ्यात ओढू शकत नाही तेव्हा, त्या वस्तूचा त्याग करण्याची आवश्यकता उरत नाही. आता साधकाचा जीव त्या वस्तूचा वस्तू म्हणून उपभोग घेत नसतो तर त्यातून अभिव्यक्त होणाऱ्या ईश्वराचा आनंद तो घेत असतो. आता सुखाचा संकोच करणेही आवश्यक ठरत नाही; कारण साधक आता सुखासाठी धडपडत नाही तर, सर्व वस्तूंमध्ये समानत्वाने असणाऱ्या ईश्वरी प्रकाशाची त्याला प्राप्ती झालेली असते. त्यामुळे एखादी वस्तू स्वत:ची असली पाहिजे किंवा तिच्यावर आपला भौतिक ताबा असला पाहिजे अशी निकड त्याला भासत नाही. असा जीव आता कोणत्याच गोष्टीवर स्वत:चा हक्क सांगत नाही तर, उलट तो सर्व जीवांमध्ये निवास करून असणाऱ्या त्या एका ईश्वराची इच्छा जाणीवपूर्वकपणे पाळत असतो आणि म्हणून स्वत:चा अव्हेर करण्याची जागाही आता शिल्लक राहत नाही. आणि असे झाले म्हणजे तो प्रकृतीच्या बंधनातून मुक्त होतो आणि आत्म-स्वातंत्र्याप्रत खुला होतो.

– श्रीअरविंद
(CWSA 23 : 333)

त्याग हा आम्हाला साधन म्हणूनच मान्य होईल; साध्य म्हणून कदापि मान्य होणार नाही; मानवात ईश्वरी पूर्णता प्रकट करणे हे आमचे साध्य आहे व ते सकारात्मक आहे, त्यामुळे त्याग हे नकारात्मक साधन आमचे मुख्य किंवा एकमेव साधन होऊ शकत नाही.

ईश्वराच्या मानवातील आत्मपरिपूर्तीहून वेगळे आणि तिला विरोधी असे जे असेल त्याचा आपण पूर्ण त्याग केला पाहिजे. तसेच या आत्मपरिपूर्तीपेक्षा निम्नतर वा आंशिक अशी जी जी सिद्धी असेल तिचाही आपण क्रमशः त्याग केला पाहिजे.

विश्वातील जीवनावर आपली आसक्ती असता कामा नये. ती जर असेलच तर, तिचा आपण नि:शेष त्याग करावयास हवा. तसेच विश्वातून होणाऱ्या सुटकेविषयी, मुक्तीविषयी, महान आत्मनिर्वाणाविषयीचीही आसक्ती आपल्यामध्ये असता कामा नये. आणि ती असेलच तर, तिचादेखील आपण नि:शेष त्याग केला पाहिजे. हा पूर्ण त्याग आमच्या साध्याला धरून आहे. आम्हाला आसक्ती मुळीच नको आहे; मग ती संसाराविषयी असो वा मुक्तीविषयी असो.

*

आपला त्याग हा आंतरिक त्याग असला पाहिजे हे उघड आहे; आसक्तीमय अशी इंद्रियांची वासना व हृदयाची वासना; विचार आणि आचार यांचा हट्टाग्रह; आणि जाणिवेच्या केंद्रातील अहंभाव या तीन गोष्टींचा आपण विशेषेकरून सर्वप्रथम त्याग करणे आवश्यक आहे. आपल्या निम्नतर प्रकृतीशी आपल्याला जखडून ठेवणारी अशी ही तीन बंधने आहेत. ह्या तीन बंधनांचा, आम्ही संपूर्ण त्याग केल्यावर, इतर कोणतेही बंधन आपल्याला बांधू शकत नाही. म्हणून आपण प्रथम आपल्या ठिकाणची आसक्ती आणि वासना पूर्णपणे फेकून दिली पाहिजे.

आसक्ती व वासनाविषयक त्याग :

आपण आसक्ती बाळगावी असे या जगात काहीही नाही; ना संपत्ती ना दारिद्रय, ना सुख ना दुःख, ना जीवन ना मरण, ना मोठेपणा ना लहानपणा, ना दुर्गुण ना सद्गुण; ना मित्र ना पत्नी, ना मुलेबाळे, ना देश, ना आपले कर्तव्य, ना सेवाकार्य, ना स्वर्ग, ना पृथ्वी, ना त्यांच्या आतले काही, ना त्यांच्या पलीकडचे काही. अगदी कशाविषयीही आपल्या ठिकाणी आसक्ती असता कामा नये.
मात्र याचा अर्थ असा नव्हे की, आपण कशावरच प्रेम करू नये, कोणताच आनंद उपभोगू नये; कारण आसक्ती म्हणजे प्रेमातील अहंभाव होय, प्रेम नव्हे. वासना म्हणजे विषयोपभोगाची जी भूक आहे त्यातील संकुचितता व असुरक्षितता आहे; तो वस्तुजातातील दिव्यानंदाचा शोध असत नाही.

आचारविचारांचा हट्टाग्रह :

आपल्या कनिष्ठ प्रकृतीशी आपल्याला बांधून ठेवणाऱ्या तीन बंधनांपैकी पहिल्या बंधनाचा, आसक्ती व वासनारूप बंधनाचा विचार झाला. आता दुसरे बंधन, विचार व आचार यांचा हट्टाग्रह. पूर्णत्व मिळविण्यासाठी ज्याप्रमाणे आपला अहंकारी आग्रह आपल्याला दिव्यकर्ममार्गात सर्वथा टाकून द्यावा लागतो त्याचप्रमाणे दिव्य ज्ञान परिपूर्ण व्हावयास हवे असेल तर तेथेही आपला अहंकारी आग्रह सोडावा लागतो.

जाणिवेच्या केंद्रातील अहंभाव :

उपरोक्त स्व-इच्छा म्हणजे मनातील अहंकारच असतो; की जो स्वत:च्या आवडीनिवडी, स्वत:च्या सवयी, स्वत: केलेल्या विचारांच्या, दृष्टिकोनांच्या, आणि इच्छेच्या भूतकाळातील वा भविष्यातील कल्पनांना घट्ट धरून राहतो. कारण त्या कल्पना वा रचना म्हणजेच तो स्वत: आहे किंवा त्या त्याच्या स्वत:च्या आहेत अशी त्याची धारणा असते. आणि मग त्यातून तो ‘मी’ आणि ‘माझे’ यांचे एक अतिशय नाजूक धाग्यांचे जाळे स्वत:भोवती विणत राहतो आणि एखादा कोळी ज्याप्रमाणे आपल्या जाळ्यात जीवन जगत राहतो तसाच हाही राहू लागतो.

कोळ्याला जसा त्याच्या जाळ्यावर केलेला आघात रुचत नाही, त्याचप्रमाणे कोणी धक्का दिलेला ह्या अहंकारी मनाला रुचत नाही, त्याचा ते द्वेष करते. कोळ्याला स्वत:च्या जाळ्याहून निराळ्या जाळ्यात राहावे लागल्यास परकेपणा वाटतो, त्याप्रमाणे अहंकारी मन नव्या दृष्टिकोनाकडे नव्या रचनांकडे, नव्या स्वप्नांकडे नेले गेले की, त्याला परकेपणा वाटतो, त्याला दु:ख होते. ही आसक्ती मनातून अजिबात काढून टाकली पाहिजे.

जगासंबंधाने व जीवनासंबंधाने असलेली आपली सामान्य वृत्ती आपण टाकून दिली पाहिजे; जागृत न झालेले मन या सामान्य वृत्तीला स्वभावधर्म असे समजून चिकटून राहते; परंतु आपण येथेच थांबता उपयोगी नाही; आपण निर्माण केलेल्या कोणत्याही मानसिक रचनेला, बुद्धिप्रधान विचारपंथाला, धार्मिक मतवादाला किंवा तार्किक सिद्धांताला आपण बांधलेले राहता कामा नये; मनाचे व इंद्रियांचे जाळे आपण तोडूनच टाकले पाहिजे. पण तेथेही आपण थांबता कामा नये; विचारकाचे जाळे, धर्मवाद्यांचे जाळे, धर्मसंस्थापकांचे जाळे थोडक्यात ‘शब्दांचे’ व ‘कल्पनांचे’ जाळे यापासून आपण स्वत:ला दूर केले पाहिजे.

– श्रीअरविंद
(CWSA 23 : 329)

पारंपरिक ज्ञानमार्ग व पूर्णज्ञानाचा मार्ग :

जीवात्म्याने शांत परमात्म्यात, परमशून्यात किंवा अनिर्वचनीय केवलांत विलीन व्हावे म्हणून पारंपरिक ज्ञानमार्ग नकाराचा, दूरीकरणाचा पाढा वाचीत जातो. ‘हे शरीर म्हणजे मी नव्हे’, ‘हा प्राण म्हणजे मी नव्हे’, ‘ही इंद्रिये म्हणजे मी नव्हे’, ‘हे हृदय म्हणजे मी नव्हे’ आणि ‘हे विचार म्हणजे देखील मी नव्हे’ असे म्हणत तो क्रमाक्रमाने ह्या साऱ्यांना दूर सारतो. मात्र पूर्णज्ञानाचा मार्ग असे मानतो की, आपण जीवात्म्यांनी संपूर्ण आत्मपरिपूर्ती गाठावी अशी ईश्वरी योजना आहे. आणि म्हणून, आपण एकच गोष्ट दूर करावयाची आहे : ती म्हणजे, आपली स्वत:ची नेणीव (unconsciousness), आपले अज्ञान आणि आपल्या अज्ञानाचे परिणाम.

अस्तित्वाचा खोटेपणा : आमच्या अस्तित्वाचे ‘मी’ म्हणून वावरणारे खोटे रूप आम्ही दूर करावे, म्हणजे आमच्या ठिकाणी आमच्या खऱ्या अस्तित्वाला अभिव्यक्त होता येईल;

प्राणाचा खोटेपणा : केवळ वासनेची धाव या रूपात व्यक्त होणारा प्राणाचा खोटेपणा आणि आमच्या भौतिक अस्तित्वाने यंत्रवत त्याच त्या फेऱ्यात फिरत राहणे हे आम्ही दूर करावे. हे खोटे रूप दूर केले म्हणजे, ईश्वरीय शक्तीत वसणारा आमचा खरा प्राण व्यक्त होईल, अनंताचा आनंद व्यक्त होईल.

इंद्रियांचा खोटेपणा : भौतिक दिखाऊपणा आणि संवेदनांची द्वंद्वे यांच्या आधीन झाल्यामुळे आलेला इंद्रियांचा खोटेपणा दूर केला तर, आपल्यातच दडलेली अधिक महान इंद्रियशक्ती, वस्तुमात्रांमध्ये असलेल्या दिव्यत्वाप्रत खुली होऊ शकते आणि त्यांना तसाच दिव्य प्रतिसाद देऊ शकते.

हृदयाचा खोटेपणा : वासना-विकारांनी व द्वंद्वात्मक भावभावनांनी कलुषित झालेल्या आमच्या हृदयाचा खोटेपणा दूर केला की, अधिक खोलवर असणारे हृदय अखिल जीवमात्रांविषयीच्या अपार दिव्य प्रेमानिशी खुले होते; अनंत ईश्वराने आपल्याला प्रतिसाद द्यावा अशी अपरिमित तळमळ त्याला वाटू लागते.

विचारांचा खोटेपणा : अपूर्ण सदोष मानसिक रचना, अरेरावीचे होकार-नकार, संकुचित आणि एकांगी केंद्रीकरणे ही आमच्या विचाराची खोटी संपदा असते, ही दूर केली म्हणजे तिच्या मागे असलेली थोर ज्ञानशक्ती; ईश्वराच्या खऱ्याखुऱ्या स्वरूपास, जीवात्म्याच्या, प्रकृतीच्या, विश्वाच्या खऱ्याखुऱ्या रूपास उन्मुख होते.

– श्रीअरविंद
(CWSA 23 : 291-292)

व्यक्तिगत मोक्षाच्या इछेचे स्वरूप कितीही उदात्त असले तरी, ती एक प्रकारची वासनाच असते आणि ती अहंभावातून निर्माण झालेली असते. आपल्या व्यक्तित्वाची कल्पना प्रामुख्याने आपल्या समोर असते; आपल्याला व्यक्ती म्हणून वैयक्तिक हिताची, वैयक्तिक कल्याणाची इच्छा असते; दुःखापासून सुटका व्हावी अशी एक व्यक्ती म्हणून आपली तळमळ असते; जन्म-मृत्युच्या फेऱ्यातून सुटका व्हावी अशी आपल्या मनात तीव्र इच्छा उत्पन्न होते; आणि यातूनच मोक्षाची कल्पना निर्माण होते; अर्थात ही कल्पना हे अहंभावाचे अपत्य आहे.

अहंभावाचा पाया पूर्णपणे नष्ट करण्यासाठी, व्यक्तिगत मोक्षाच्या इच्छेच्या वर उठणे आवश्यक असते. आपण जर ईश्वर-प्राप्तीसाठी धडपडत असू, तर ती धडपड केवळ ईश्वरासाठीच असली पाहिजे, अन्य कोणत्याही कारणासाठी नव्हे; कारण आपल्या जीवाला आलेली ती परमोच्च हाक असते, आपल्या चैतन्याचे ते सर्वात गहन असे सत्य असते.

*

वैयक्तिक आत्म्याने सर्व जगताच्या अतीत जाऊन, विश्वात्मक ईश्वराचा साक्षात्कार करून घेणे एवढ्यापुरताच ‘पूर्णयोग’ मर्यादित नाही; तर तो ‘सर्व आत्म्यांची एकत्रित बेरीज’, म्हणजे विश्वात्मक साक्षात्कार देखील आपल्या कवेत घेतो; असा हा ‘पूर्णयोग’ व्यक्तिगत मोक्ष किंवा सुटका एवढ्यापुरता मर्यादित राहूच शकत नाही. पूर्णयोगाचा साधक विश्वात्मक मर्यादांच्या अतीत झालेला असूनही, तो सर्वात्मक ईश्वराशी देखील एकात्म असतो. या विश्वातील त्याचे दिव्य कर्म अजूनही शिल्लक असते.

– श्रीअरविंद
(CWSA 23 : 269-70)

पूर्णयोगाचा मार्ग फार दीर्घ आहे; आपल्यातील आणि जगातील ईश्वराला आपली सर्व कर्मे त्यागबुद्धीने, यज्ञबुद्धीने समर्पित करणे हे या मार्गावरील पहिले पाऊल आहे; हा मनाचा आणि हृदयाचा दृष्टिकोन आहे, त्याचा आरंभ करणे हे फारसे अवघड नाही, परंतु तो दृष्टिकोन पूर्ण मन:पूर्वकतेने अंगीकारणे आणि तो सर्वसमावेशक करणे फार अवघड आहे.

या मार्गावरील दुसरे पाऊल म्हणजे, कर्मफळावर असणारी आपली आसक्ती सोडून देणे हे आहे. त्यागाचे खरे, अटळ, अतिशय इष्ट असे फळ, एकमेव आवश्यक असे फळ म्हणजे ईश्वराने आमच्यामध्ये प्रकट व्हावे आणि आम्हामध्ये दिव्य जाणीव व दिव्य शक्ती यावी हे आहे; हे फळ मिळाले म्हणजे बाकीच्या सर्व गोष्टी आपल्याला मिळतीलच मिळतील. हे दुसरे पाऊल म्हणजे आपल्या प्राणिक अस्तित्वातील, आपल्या वासनात्म्यातील, वासनामय प्रकृतीतील अहंभावप्रधान इच्छेचे रूपांतर हे होय; कर्मसमर्पण-वृत्तीहूनही रूपांतराची ही गोष्ट फारच अवघड आहे.

या मार्गावरील तिसरे पाऊल, केंद्रस्थ अहंभावाचे उच्चाटन आणि एवढेच नव्हे तर, ईश्वरी साधन झाल्याच्या अहं संवेदनेचे देखील उच्चाटन हे आहे. हेच रूपांतर सर्वात अधिक अवघड असते; आणि जोपर्यंत पहिली दोन पावले उचलली जात नाहीत तोपर्यंत हे रुपांतर पूर्णपणे होऊ शकत नाही. आणि जोपर्यंत अहंभाव नष्ट करून, वासनेचे मूळच उखडून फेकले जात नाही तोपर्यंत, म्हणजेच ह्या तिसऱ्या कळसरूपी पावलाची जोड मिळत नाही तोपर्यंत, आधीच्या दोन पावलांचे कार्यसुद्धा पूर्ण होत नाही.

जेव्हा हा क्षुद्र अहंभाव प्रकृतीतून मुळापासून दूर केला जातो तेव्हाच साधकाला स्वत:च्या वर असणाऱ्या त्याच्या खऱ्या अस्तित्वाची जाणीव होऊ शकते; ईश्वराचे सामर्थ्य आणि ईश्वराचा एक अंशभाग असे त्याचे स्वरूप असते. साधकाला ह्या खऱ्या अस्तित्वाची ओळख होते तेव्हाच तो ईश्वरी-शक्तीच्या इच्छेव्यतिरिक्त असणाऱ्या इतर सर्व प्रेरक-शक्तींचा व प्रेरणांचा त्याग करतो.

– श्रीअरविंद
(CWSA 23 : 247)