Posts

आत्मशोधाच्या पाऊलवाटेवर… (२६)

(ईश्वरावर ‘निरपेक्ष प्रेम’ करता येते ही कल्पना न मानवणाऱ्या कोणा व्यक्तीस श्रीअरविंद येथे ती गोष्ट विविध उदाहरणानिशी समजावून सांगत आहेत.)

‘ईश्वरा’शी ऐक्य साधल्याने ‘आनंद’ प्राप्त होईल, हे आपल्याला माहीत असल्यामुळे, आपण त्या ‘आनंदा’च्या प्राप्तीकरताच ‘ईश्वरा’शी ऐक्य साधण्यासाठी प्रयत्नशील असले पाहिजे, हा तुमचा युक्तिवाद खरा नाही, त्यामध्ये काही अर्थ नाही.

एखाद्या पुरुषाचे राणीवर प्रेम असेल आणि त्याला तिचे प्रेम मिळाले तर त्याला त्या प्रेमाबरोबरच सत्ता, पद, वैभव या गोष्टीही प्राप्त होतील, हे त्याला माहीत असू शकते; पण म्हणून काही तो सत्ता, पद, वैभव यासाठी तिच्यावर प्रेम करतो, असे नाही. तो तिच्यावरील प्रेमापोटीच प्रेम करू शकतो; ती राणी नसती तरीही त्याने तिच्यावर तसेच प्रेम केले असते; त्याला तिच्याकडून कोणतीही अपेक्षा नसतानासुद्धा तो तिच्यावर प्रेम करू शकतो, तिची प्रणयाराधना करू शकतो, तिच्यासाठीच तो जगू शकतो किंवा मरूही शकतो कारण ती त्याची प्रेमिका असते, ती ‘ती आहे’ म्हणूनच त्याचे तिच्यावर प्रेम असते. कोणत्याही सुखाची वा फलाची आशा नसतानादेखील एखाद्या पुरुषाने एखाद्या स्त्रीवर प्रेम केले आहे, अशी उदाहरणे आहेत. तिला वार्धक्य आले आणि तिचे सौंदर्य नाहीसे झाले तरीही त्यांचे प्रेम तसेच टिकून राहिले, त्यातील उत्कटता तशीच टिकून राहिली अशी उदाहरणे आहेत.

देश जेव्हा समृद्ध, शक्तिशाली, महान असतो आणि जेव्हा देशाकडे देशभक्तांना देण्यासारखे खूप काही असते तेव्हाच ते देशावर प्रेम करतात असे नाही; तर जेव्हा त्यांचा देश निर्धन होता, तो उतरणीला लागलेला होता, तो दुःखसंकटामध्ये होता, देशाकडे त्यांना देण्यासारखे काहीही नव्हते, आणि असलेच तर त्यांच्या सेवेची परतफेड म्हणून फक्त नुकसान, जखमा, छळवणूक, तुरुंगवास, मृत्यू याच गोष्टी तो देऊ शकत होता तेव्हासुद्धा त्यांचे देशावरील प्रेम अतिशय तीव्र, उत्कट आणि निरपवाद असेच होते. देशाला स्वातंत्र्य मिळालेले आपल्याला कधीच पाहता येणार नाही हे माहीत असूनही ती माणसे या देशासाठी जगली, त्यांनी देशाची सेवा केली आणि देशासाठी प्राणार्पणही केले. आणि हे सारे त्यांनी केले ते देशासाठी केले होते, देश त्यांना काहीतरी देऊ शकेल या अपेक्षेने केले नव्हते. लोकांनी देशासाठीच ‘सत्या’वर प्रेम केले होते आणि त्यांना त्या सत्यामधून देशाबद्दल जे आढळेल किंवा गवसेल, त्यासाठीच प्रेम केले होते; त्यासाठी त्यांनी गरिबी, जाच आणि अगदी मृत्युदेखील स्वीकारला होता. ते सत्य त्यांना गवसले नाही तरी सत्याच्या शोधामध्येच ते नेहमी समाधानी होते, आणि तरीही त्यांनी आपला शोध कधीच थांबविला नव्हता. त्याचा अर्थ काय ?

त्याचा अर्थ असा की, अन्य कोणत्या गोष्टीसाठी नाही, तर माणसं देश, सत्य आणि तत्सम अन्य गोष्टी यांच्यावर त्या गोष्टींवरील प्रेमासाठीच प्रेम करू शकतात; म्हणजे कोणत्या परिस्थितीसाठी नाही किंवा आनुषंगिक गुणवत्तेसाठी किंवा परिणामस्वरूप मिळणाऱ्या मौजमजेसाठीदेखील नाही, तर त्यांच्यामध्ये असणाऱ्या किंवा त्यांच्या दृश्य रूपांमागे वा परिस्थितीच्या पाठीमागे असणाऱ्या अशा कोणत्यातरी निरपवाद गोष्टीसाठी (माणसं, देश, सत्य आणि तत्सम अन्य गोष्टींवर) प्रेम करता येऊ शकते.

‘ईश्वर’ हा एखादा पुरूष किंवा स्त्री, जमिनीचा तुकडा, एखादा वंश, मत, शोध किंवा तत्त्व यांच्यापेक्षा नक्कीच महान आहे. तो सर्वातीत असा ‘पुरुष’ आहे, सर्व आत्म्यांचे तो ‘निजधाम’ आणि ‘देश’ आहे. सर्व सत्यं म्हणजे ज्याची केवळ अपूर्ण रूपं असतात असे ‘दिव्य सत्य’ तो आहे. माणसांनी त्यांच्या निम्नतर अस्तित्वानिशी आणि प्रकृतीनिशी, वर उल्लेख केल्याप्रमाणे किंवा त्याहून अधिक कितीतरी गोष्टी केल्या आहेत. असे जर असेल तर मग, ‘ईश्वरा’वर त्याच्यावर असलेल्या ‘प्रेमासाठीच प्रेम’ केले जाऊ शकत नाही का? त्याच्या शोधासाठी धडपड केली जाऊ शकत नाही का?

जे परम आहे किंवा मनुष्यामधील जे काही पूर्णत्वाकडे झुकणारे आहे त्याचे, आणि त्याचप्रमाणे मनुष्याची ‘ईश्वर’ प्राप्तीसाठीची जी धडपड असते त्याचे स्पष्टीकरण मानसिक तर्कबुद्धीने किंवा प्राणिक प्रेरणेच्या माध्यमातून करता येत नाही; याकडे तुमच्या तर्कबुद्धीचे दुर्लक्ष होत आहे.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 11-12) (क्रमश:)

आत्मशोधाच्या पाऊलवाटेवर… (२५)

(भगवद्गीतेमध्ये आर्त, जिज्ञासू, अर्थार्थी आणि ज्ञानी या चार प्रकारच्या भक्तांचे उल्लेख आले आहेत. त्यातील ‘अर्थार्थी’ भक्ताच्या भक्तीविषयी एका साधकाने श्रीअरविंदांना काही प्रश्न विचारला असावा असे दिसते. त्याला श्रीअरविंद यांनी दिलेले उत्तर…)

‘ईश्वरा’कडून काहीतरी मिळावे म्हणूनच केवळ ईश्वर-प्राप्तीची धडपड करायची हा दृष्टिकोन उचित नाही, हे उघडच आहे; पण (अशा गोष्टी मिळवायच्या असतील तर ‘ईश्वरा’कडे वळूच नका असे सांगून) त्यांना पूर्ण मज्जाव केला तर जगातील बहुतांशी माणसं ‘ईश्वरा’कडे कधीच वळणार नाहीत. माणसांची ईश्वराभिमुख होण्यास किमान सुरूवात तरी व्हावी म्हणून या गोष्टींना मुभा देण्यात आलेली आहे असे मला वाटते – त्यांच्यामध्ये श्रद्धा असल्यास, त्यांनी जे मागितले आहे ते त्यांना मिळू शकेल आणि मग या मार्गाने पुढे जाणे बरे आहे, असे त्यांना वाटू लागेल परंतु पुढे कधीतरी अचानकपणे एके दिवशी, ‘हे असे करणे बरं नाही’, (काहीतरी मागण्यासाठीच ‘ईश्वरा’कडे वळायचे हे बरं नाही) या विचारापाशी ते येऊन पोहोचतील; ‘ईश्वरा’भिमुख होण्याचे अधिक चांगले मार्ग आहेत आणि अधिक चांगल्या वृत्तीने ‘ईश्वरा’कडे वळले पाहिजे, हे त्यांना कळेल.

त्यांना जे हवे होते ते त्यांना मिळाले नाही आणि तरीसुद्धा जर ते ‘ईश्वरा’भिमुख झाले आणि त्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला तर, आता त्यांची (ईश्वराभिमुख होण्याची) तयारी होत आहे हे दिसून येते. ज्यांची अजूनपर्यंत तयारी झालेली नाही अशा लोकांसाठीची ती (अर्थार्थी दृष्टिकोन ही) बालवाडी आहे, असे समजून आपण त्याकडे पाहूया. पण अर्थातच हे काही आध्यात्मिक जीवन नव्हे, हा केवळ एक अगदी प्राथमिक धार्मिक दृष्टिकोन झाला.

काहीतरी देणे आणि (त्या मोबदल्यात) कशाचीही मागणी न करणे हा आध्यात्मिक जीवनाचा नियम आहे. तथापि साधक, त्याचे आरोग्य उत्तम राहावे किंवा त्याच्या तब्येतीमध्ये सुधारणा व्हावी यासाठी, त्याच्या साधनेचा एक भाग म्हणून, ‘ईश्वरी शक्ती’ची मागणी करू शकतो; जेणेकरून आध्यात्मिक जीवन जगण्यासाठी त्याचे शरीर सक्षम होईल, सुयोग्य होईल आणि तो ‘ईश्वरी कार्या’साठी एक सक्षम साधन बनू शकेल.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 08-09)

आत्मशोधाच्या पाऊलवाटेवर… (२४)

माझ्या योगामध्ये (पूर्णयोगामध्ये) खरोखर, इतर जगतांचा – ‘परम आत्म्या’च्या स्तराचा, भौतिक जगताचा आणि दरम्यानच्या सर्व स्तरांचा – तसेच त्यांचा आपल्या जीवनावर व भौतिक जगतावर होणाऱ्या संभाव्य परिणामांचा आणि त्यांच्या पूर्ण अनुभवांचादेखील समावेश होऊ शकतो. पण हेदेखील शक्य आहे की, आधी केवळ ‘परमपुरुषा’च्या साक्षात्कारावर भर द्यायचा अन्यथा, ‘ईश्वरा’च्या अगदी एखाद्या पैलूवर म्हणजे जगदाधिपती आणि आपला व आपल्या कर्मांचा स्वामी असलेल्या ‘कृष्ण’, ‘शिव’ यांच्या साक्षात्कारावर भर द्यायचा; अन्यथा, विश्वात्मक ‘सच्चिदानंदा’वर भर द्यायचा आणि या ‘योगा’साठी (पूर्णयोगासाठी) आवश्यक असणारे पायाभूत परिणाम साध्य करून घ्यायचे; आणि नंतर त्या परिणामांपासून प्रगत होत, समग्र परिणामांकडे वळायचे. (म्हणजे) जर एखाद्याने ‘दिव्य जीवना’कडे वाटचाल करणे आणि भौतिक जीवनावर आत्म्याचे आधिपत्य निर्माण करणे’ हे ध्येय स्वीकारलेले असेल तर पूर्णयोगाचे पायाभूत परिणाम साध्य करून घेतल्यानंतर, मग त्याच्या समग्र परिणामांकडे वळायचे, हे शक्य आहे.

‘ईश्वरा’चा, ‘परमेश्वरा’चा साक्षात्कार ही निश्चितच आवश्यक गोष्ट आहे. पण प्रेम, श्रद्धा, भक्ती यांसहित त्याच्याकडे वळणे, स्वतःच्या कर्मांद्वारे त्याची सेवा करणे आणि त्याला जाणणे – त्याला ‘बौद्धिक आकलना’द्वारेच जाणले पाहिजे असे नाही तर ‘आध्यात्मिक अनुभूती’च्या माध्यमातून त्याला जाणणे – यादेखील ‘पूर्णयोगा’च्या मार्गावरील आवश्यक गोष्टी आहेत.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 375)

आत्मशोधाच्या पाऊलवाटेवर… (२३)

भारतात परतल्यापासूनच, लौकिक किंवा पारलौकिक असा कोणताही भेद मी माझ्या जीवनामध्ये किंवा माझ्या ‘योगा’मध्ये कधीही केला नाही. मला वाटते, माणसांना ज्या गोष्टींमध्ये रस असतो, त्या सर्व गोष्टी बहुधा ऐहिक असतात आणि त्यातील बहुतांशी सर्वच गोष्टींचा माझ्या मानसिक क्षेत्रात प्रवेश झाला होता. उदाहरणार्थ, राजकारण. त्याचा तर माझ्या जीवनातच प्रवेश झाला होता. पण त्याच वेळी, मी मुंबईतील अपोलो बंदरावर, या भारतभूमीवर जेव्हा पहिले पाऊल ठेवले तेव्हा मला आध्यात्मिक अनुभव यायला सुरुवात झाली; पण त्या अनुभवांची या जगापासून कधीच फारकत झालेली नव्हती तर त्यांचा या जगाशी आंतरिक आणि जवळचा संबंध होता. भौतिक क्षेत्राला ‘अनंत’ व्यापून आहे आणि भौतिक वस्तुंमध्ये, देहांमध्ये तो ‘अंतर्यामी’ वास्तव्य करतो, असे मला जाणवत असे. अगदी त्याच वेळी, पारलौकिक जगतांमध्ये आणि स्तरांमध्ये माझा प्रवेश होत आहे आणि त्यांचा प्रभाव व परिणाम या भौतिक जगतावर घडत आहे असे मला दिसत असे. त्यामुळे ज्याला मी ‘अस्तित्वाची दोन टोकं’ (जडभौतिक आणि सच्चिदानंद) असे संबोधतो ती टोकं आणि त्या दोहोंच्या दरम्यान येणारे सर्वकाही यांमध्ये मी कधीच कट्टर विरोध वा फारकत करू शकलो नाही. माझ्यासाठी सर्व काही ‘ब्रह्म’च आहे आणि मला सर्वत्र ‘ईश्वरर’च दिसतो. पण लौकिकाचा त्याग करून, फक्त पारलौकिकाची निवड करण्याचा अधिकार प्रत्येकालाच आहे आणि एखाद्या व्यक्तीला त्या निवडीमुळे जर शांती लाभत असेल तर त्याने तसे खुशाल करावे. शांती लाभावी म्हणून असे करणे मला स्वत:ला तरी आवश्यसक वाटले नाही.

माझ्या कार्यक्षेत्रामध्ये मी भौतिक आणि आध्यात्मिक अशा दोन्ही जगतांचा समावेश करावा आणि केवळ स्वत:च्या मुक्तीसाठी नव्हे तर येथील दिव्य जीवनासाठी, दिव्य ‘चेतना’ आणि दिव्य ‘शक्ती’ लोकांच्या हृदयात व या पार्थिव जीवनात स्थापित करण्याचा प्रयत्न करावा, या दिशेने मी माझ्या योगाकडे वळलो, असे मला आढळून आले. हे ध्येय, इतर ध्येयांसारखेच एक ‘आध्यात्मिक’ ध्येय आहे असे मला वाटते आणि या जीवनाने लौकिक, पार्थिव गोष्टींचा, गतिविधींचा मागोवा घेतल्यामुळे आणि त्यांचा आपल्या परिघात समावेश केल्यामुळे, आध्यात्मिकतेला कलंक लागेल किंवा त्याच्या भारतीयत्वाला काही बाधा येईल असे मला वाटत नाही. वास्तव (reality) आणि या विश्वाचे, वस्तुंचे, ‘ईश्वरा’चे स्वरूप, याविषयीचा माझा तरी हा अनुभव व दृष्टिकोन राहिलेला आहे. हे त्यांबाबतचे जवळजवळ संपूर्ण सत्य असल्यासारखे मला वाटते आणि म्हणूनच त्याचे अनुसरण करणे याला मी ’पूर्णयोग’ म्हणतो.

अर्थातच, एखाद्याला पूर्णत्वाची ही संकल्पना मान्य नसेल आणि तो ती नाकारू इच्छित असेल किंवा या लौकिक जीवनाचा पूर्णपणे त्याग करून, समग्रतया पारलौकिक जीवनावर भर देणाऱ्या आध्यात्मिक आवश्यकतेवर तो विश्वा स ठेवत असेल तर तसे करण्यास तो मोकळा आहे पण तसे असेल तर माझा ’योग’ करणे त्याला अशक्य होईल.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 374-375)

आत्मशोधाच्या पाऊलवाटेवर… (२२)

(श्रीअरविंदाश्रमामध्ये ज्याप्रकारचे लघुउद्योग, उद्योगव्यवसाय चालविले जातात ते पाहून, एका व्यक्तीने श्रीअरविंदांना कदाचित संन्यासमार्गाची महती सांगण्याचा प्रयत्न केला असावा असे दिसते. तेव्हा संन्यासमार्ग, दैनंदिन जीवन – व्यवहार, सर्व कर्म, गीतोक्त मार्ग, आध्यात्मिक प्रगती या साऱ्यांविषयीच श्री अरविंदांनी काही टिप्पणी केली आहे. त्यामधील हा अंशभाग…)

..एक संन्यासवादी ध्येयसुद्धा असते की जे काही जणांसाठी आवश्यक असते आणि आध्यात्मिक व्यवस्थेमध्ये त्यालाही स्थान असते. मी स्वतः असे म्हणेन की, एखाद्या व्यक्तीला जर तपस्व्याप्रमाणे जीवन जगता आले नाही किंवा एखाद्या विरक्त व्यक्तीप्रमाणे अगदी किमान गरजांमध्ये जीवन जगता आले नाही तर ती व्यक्ती आध्यात्मिकदृष्ट्या परिपूर्ण होऊ शकणार नाही. व्यक्तीच्या प्रकृतीमधून हावरटपणा किंवा इतर कोणताही हव्यास नाहीसा होणेच जितके आवश्यक असते; तितक्याच संपत्तीचा लोभ आणि नफेखोरी या गोष्टीदेखील तिच्या प्रकृतीमधून नाहीशा होणे आवश्यक असते, हे उघड आहे. आणि या गोष्टींबद्दलची सर्व प्रकारची आसक्ती आणि अन्य कोणताही हव्यास या गोष्टी व्यक्तीने स्वतःच्या चेतनेमधून काढून टाकणेच आवश्यक असते. परंतु आध्यात्मिक पूर्णतेसाठी संन्यासमार्ग हा जगण्याचा अगदी अनिवार्य मार्ग आहे किंवा संन्यासी वृत्तीने जीवन जगणे म्हणजेच आध्यात्मिक पूर्णता असे मात्र मी मानत नाही.

आणखी एक मार्गदेखील आहे. आणि तो मार्ग म्हणजे एखादी व्यक्ती एखाद्या कर्मामध्ये किंवा कोणत्याही कार्यामध्ये गुंतलेली असतानाही, किंवा ‘ईश्वरा’ला त्या व्यक्तीकडून ज्या सर्व प्रकारच्या कार्याची अपेक्षा आहे त्या सर्व प्रकारच्या कार्यामध्ये निमग्न असतानासुद्धा ती अहंकार आणि कर्मफलाच्या इच्छेचा त्याग करून, ‘ईश्वरा’प्रति समर्पित होऊ शकते, आध्यात्मिक आत्मदान करू शकते आणि आध्यात्मिक आत्म-प्रभुत्व मिळवू शकते.

– श्रीअरविंद (CWSA 35 : 770-771)

आत्मशोधाच्या पाऊलवाटेवर… (२१)

…तुम्हाला योगाची हाक आलेली असू शकते आणि तुम्ही योगासाठी पात्रदेखील असू शकता, परंतु योगाचे विविध मार्ग आहेत आणि प्रत्येक मार्गाचे ध्येय व उद्दिष्ट भिन्न भिन्न असते. इच्छा-वासनांवर विजय मिळविणे आणि जीवनातील सामान्य नातेसंबंध बाजूला सारणे तसेच अनिश्चिततेकडून चिरस्थायी निश्चिततेप्रत वाटचाल करण्याचा प्रयत्न करणे या गोष्टी सर्व योगांमध्ये समानच असतात. व्यक्ती स्वप्न व निद्रा, तहान व भूक इत्यादी गोष्टींवर विजय मिळविण्याचाही प्रयत्न करू शकते. परंतु जीवनाविषयी किंवा जगाबद्दल कोणतेही कर्तव्य न बाळगणे किंवा संवेदना मारून टाकणे किंवा त्यांच्या कृतींना पूर्णपणे प्रतिबंध करणे या गोष्टी श्रीअरविंदांच्या योगाचा (पूर्णयोगाचा) भाग असू शकत नाहीत.

दिव्य ‘सत्या’चा ‘प्रकाश’, ‘शक्ती’, ‘परमानंद’ आणि त्याची गतिशील निश्चितता खाली उतरवून, त्यायोगे जीवन रूपांतरित करणे हे श्रीअरविंदांच्या ‘योगा’चे उद्दिष्ट आहे. हा ऐहिकाचा त्याग करणारा संन्यासवादी ‘योग’ नसून, हा दिव्य ‘जीवना’चा ‘योग’ आहे.

– श्रीअरविंद (CWSA 35 : 541-542)

आत्मशोधाच्या पाऊलवाटेवर… (२०)

जीवनाचा सिद्धान्त म्हणून जो सिद्धान्त मी स्थापित करू इच्छितो, तो आध्यात्मिक आहे. नैतिकतेचा प्रश्न हा मानवी मनाचा व प्राणाचा प्रश्न आहे. आणि नैतिकता ही चेतनेच्या कनिष्ठ स्तराशी संबंधित असते. त्यामुळे नैतिक पायावर आध्यात्मिक जीवनाची उभारणी करता येत नाही. ही उभारणी आध्यात्मिक अधिष्ठानावरच करणे आवश्यक असते. आध्यात्मिक मनुष्य हा अनैतिक असला पाहिजे असा याचा अर्थ नाही, मात्र नैतिक नियमापेक्षा आचरणाचे अन्य कोणते नियमच नसतात असेही नाही. आध्यात्मिक चेतनेच्या कृतीचे नियम नैतिकतेहून कनिष्ठ स्तरावरील नसतात; तर ते अधिक उच्च स्तरावरील असतात. ते नियम ‘ईश्वराशी असलेल्या ऐक्यावर आधारित असतात, त्यांचा अधिवास ‘दिव्य चेतने’मध्ये असतो आणि त्यांची कृती ही ‘ईश्वरी इच्छे’च्या आज्ञापालनावर आधारित असते.

– श्रीअरविंद (CWSA 28 : 422-423)

आत्मशोधाच्या पाऊलवाटेवर… (१९)

‘अध्यात्म-जीवन’, ‘धर्म-जीवन’ आणि ज्याचा नैतिकता हा एक अंशभाग असतो ते ‘सामान्य मानवी जीवन’ या तीन भिन्नभिन्न गोष्टी आहेत आणि आपल्याला यांपैकी नक्की कोणते जीवन हवे आहे हे व्यक्तीला माहीत असलेच पाहिजे, आणि तिने वरील तीन गोष्टींमध्ये गल्लत करता कामा नये.

सामान्य मानवी जीवन हे सर्वसामान्य मानवी चेतनेचे असे जीवन असते की जे, स्वत:च्या खऱ्या ‘जीवात्म्या’पासून तसेच ‘ईश्वरा’पासून विभक्त झालेले असते. आणि या जीवनाचे संचालन मन, प्राण, शरीर यांच्या सामान्य सवयींद्वारे, म्हणजेच अज्ञानाच्या कायद्यांद्वारे केले जात असते.

धार्मिक जीवन हीदेखील त्याच अज्ञानी मानवी चेतनेची एक अशी वाटचाल असते की जी, या पृथ्वीकडे पाठ फिरवून किंवा तसा प्रयत्न करून, ‘ईश्वरा’कडे वळू पाहत असते. या पृथ्वीचेतनेच्या बंधनातून मुक्त झाल्याने, त्या पलीकडचे सौंदर्यमय असे काही गवसले आहे असा दावा जो पंथ वा संप्रदाय करीत असतो, अशा एखाद्या पंथ वा संप्रदायाच्या सिद्धान्ताच्या किंवा नियमांच्या आधारे धार्मिक जीवनाची वाटचाल चालू असते, पण तरीही ती ज्ञानविरहितच असते. धार्मिक जीवन हा आध्यात्मिक जीवनाकडे वळण्याचा पहिलावहिला प्रयत्न असू शकतो, पण बहुधा तो कर्मकांड, सणसमारंभ, विधीविधाने, काही ठरीव संकल्पना आणि रूपे यांच्या चक्रामध्येच गोलगोल फिरत राहतो.

या उलट, आध्यात्मिक जीवन चेतनेच्या परिवर्तनाद्वारे थेटपणे वाटचाल करत असते. स्वत:च्या खऱ्या जीवात्म्यापासून आणि ‘ईश्वरा’पासून विभक्त झालेल्या, अज्ञानी अशा सामान्य चेतनेकडून एका महान चेतनेकडे ही वाटचाल होत असते. या महान चेतनेमध्ये व्यक्तीला स्वत:चे खरे अस्तित्व सापडते आणि व्यक्ती प्रथमतः ‘ईश्वरा’च्या थेट व चैतन्यमय संपर्कात येते आणि नंतर ती त्या ‘ईश्वरा’बरोबर एकत्व पावते. आध्यात्मिक साधकाच्या दृष्टीने हे चेतनेचे परिवर्तन हीच एकमेव गोष्ट असते की जी मिळविण्यासाठी तो धडपडत असतो, अन्य कोणत्याच गोष्टीची त्याला मातब्बरी वाटत नाही.

नैतिकता हा सामान्य जीवनाचा एक भाग असतो. विशिष्ट मानसिक नियमांद्वारे व्यक्तीच्या बाह्य जीवनाचे नियमन करण्याचा हा एक प्रयास असतो, प्रयत्न असतो किंवा मानसिक नियमांद्वारे विशिष्ट मानसिक आदर्शानुसार चारित्र्य घडविण्याचा तो एक प्रयास असतो. आध्यात्मिक जीवन मनाच्या पलीकडे जाते; ते सखोल अशा ‘आत्म्या’च्या चेतनेमध्ये प्रवेश करते आणि ‘आत्म्या’च्या सत्यामधून कृती करते.

– श्रीअरविंद (CWSA 28 : 419-420)

आत्मशोधाच्या पाऊलवाटेवर… (१८)

मनुष्याला ज्या आदर्शांचे अनुसरण करणे शक्य आहे असे दोन आंतरिक आदर्श आहेत. पहिला आहे सामान्य मानवी जीवनाचा सर्वोच्च आदर्श आणि दुसरा आहे ‘योगमार्गा’चा दिव्य आदर्श.

..आपल्या समग्र अस्तित्वावर सुस्पष्ट, सशक्त व तर्कशुद्ध मनाचे आणि योग्य व तर्कशुद्ध इच्छाशक्तीचे नियंत्रण प्रस्थापित करणे; आपल्या भावनिक, प्राणिक आणि शारीरिक अस्तित्वावर प्रभुत्व संपादन करणे; आपल्या समग्र व्यक्तित्वामध्ये सुसंवाद निर्माण करणे आणि आपल्यामध्ये असलेल्या क्षमता, मग त्या कोणत्याही असोत, त्या विकसित करणे आणि जीवनामध्ये त्यांची परिपूर्ती करणे, हा मानवी जीवनाचा आदर्श आहे. विशुद्ध आणि ‘सात्त्विक बुद्धी’चे राज्य प्रस्थापित करणे, स्वतःच्या ‘स्वधर्मा’ची परिपूर्ती करत, ‘धर्मा’चे पालन करणे आणि स्वतःच्या क्षमतांनुसार सुयोग्य असे कर्म करणे आणि ‘बुद्धी’ व ‘धर्मा’च्या नियंत्रणाखाली ‘अर्थ’प्राप्ती आणि ‘काम’ पूर्ती करणे, हा हिंदू विचारप्रणालीनुसार, मानवी जीवनाचा आदर्श आहे.

तर दुसऱ्या बाजूला, स्वतःच्या सर्वोच्च ‘जीवात्म्या’चा किंवा ‘ईश्वरा’चा साक्षात्कार करून घेणे आणि आपले समग्र अस्तित्व त्या सर्वोच्च जीवात्म्याच्या सत्याशी किंवा दिव्य प्रकृतीच्या कायद्याशी सुसंवादी करणे; स्वतःमधील लहान-मोठ्या दिव्य क्षमतांचा शोध घेणे आणि जीवनामध्ये त्या क्षमतांची सर्वोच्च असलेल्या जीवात्म्याप्रति ‘यज्ञ’ म्हणून किंवा दिव्य ‘शक्ती’चे खरेखुरे साधन म्हणून परिपूर्ती करणे हे ‘दिव्य जीवना’चे उद्दिष्ट असते.

– श्रीअरविंद (CWSA 36 : 303-304)

आत्मशोधाच्या पाऊलवाटेवर… (१६)

चेतनेच्या दोन अवस्था असतात; त्यांपैकी कोणत्याही एका अवस्थेमध्ये व्यक्ती जीवन जगू शकते. एक अवस्था असते ती म्हणजे जीवनलीलेच्या वर राहून तिला नियंत्रित करणारी ‘उच्चतर चेतना’. तिला ‘जीवात्मा’, ‘आत्मा’, ‘ईश्वर’ अशा विविध नावांनी संबोधण्यात येते. दुसरी अवस्था असते ती म्हणजे, माणसं ज्या चेतनेमध्ये जगत असतात ती ‘सामान्य चेतना.’ ही चेतना काहीशी वरवरची असते आणि ती जीवनलीलेसाठी ‘आत्म्या’ चे एक साधन म्हणून उपयोगात आणली जाते.

सामान्य चेतनेमध्ये राहून कृती करणारी, जीवन जगणारी माणसं मनाच्या सामान्य आंदोलनांनी संपूर्णपणे संचालित केली जातात आणि ती साहजिकच दुःख, सुख व काळजी, इच्छावासना आणि तत्सम सर्व गोष्टींच्या, म्हणजे ज्या गोष्टींनी हे सर्वसामान्य जीवन बनलेले असते, त्या गोष्टींच्या आधीन असतात. त्यांना मानसिक शांती आणि आनंद मिळू शकतो, पण ती शांती आणि तो आनंद कधीच चिरस्थायी किंवा सुरक्षित असू शकत नाही.

प्रकाश, शांती, शक्ती आणि परमानंद या सर्व गोष्टी म्हणजे ‘आध्यात्मिक चेतना.’ एखादी व्यक्ती जर संपूर्णपणे अशा चेतनेमध्येच राहू शकली तर काही प्रश्नच नाही; स्वाभाविकपणे आणि सुरक्षितपणे या सर्व गोष्टी तिला लाभतात. पण एखादी व्यक्ती अंशत: जरी त्यामध्ये राहू शकली किंवा व्यक्तीने स्वतःला सातत्यपूर्वक त्या चेतनेप्रत खुले ठेवले, तर जीवनातील धक्क्यांमधून सुरक्षितरित्या बाहेर पडण्यासाठी पुरेशा प्रमाणात आध्यात्मिक प्रकाश, शांती, सामर्थ्य आणि आनंद या गोष्टी तिला प्राप्त होतात. या आध्यात्मिक चेतनेला खुले झाल्याचा परिणाम म्हणून त्या व्यक्तीला काय प्राप्त होणार आहे हे ती व्यक्ती कशाचा शोध घेत आहे, यावर अवलंबून असते; व्यक्ती जर शांतीच्या शोधात असेल तर तिला शांती लाभते; व्यक्तीला जर प्रकाश वा ज्ञान हवे असेल तर ती महान प्रकाशामध्ये जीवन जगू लागते आणि सामान्य माणसाचे मन मिळवू शकेल त्यापेक्षा कितीतरी अधिक सखोल व अधिक सत्य असे ज्ञान तिला प्राप्त होते. व्यक्ती जर शक्ती वा सामर्थ्य मिळवू इच्छित असेल तर व्यक्तीला आंतरिक जीवनासाठी आध्यात्मिक सामर्थ्य किंवा बाह्य कार्य व कृती यांचे नियमन करणारी ‘योगिक’ शक्ती प्राप्त होते; अशा व्यक्तीला जर आनंद हवा असेल तर, सामान्य मानवी जीवन देऊ शकते अशा हर्ष व आनंदापेक्षा कितीतरी अधिक महान अशा परमानंदामध्ये ती व्यक्ती प्रविष्ट होते.

– श्रीअरविंद (CWSA 36 : 440-441)