Tag Archive for: चुका

 

व्यक्ती जेव्हा प्रामाणिक असते तेव्हा तिला स्वत:च्या चुका कळतात. स्वतःच्या चुकांची जाणीव नसणे, ही व्यक्तीमध्ये अजूनही कोठेतरी अप्रामाणिकपणा शिल्लक असल्याची खूण असते. सामान्यतः तो अप्रामाणिकपणा प्राणात (vital) लपून राहिलेला असतो. जेव्हा प्राण सहकार्य करण्यास संमती देतो (जे मुळातच खूप मोठे पाऊल उचलण्यासारखे आहे) म्हणजे जेव्हा तो ठरवितो की, तो सुद्धा सहकार्य करणार आहे, त्याचे सारे प्रयत्न आणि ऊर्जा, ते कार्य पूर्ण करण्यासाठी तो खर्च करणार आहे, तेव्हासुद्धा आतमध्ये कोठेतरी काहीतरी दडून राहिलेले असते. सर्व गोष्टी चांगल्या होतील आणि त्याचे परिणाम अनुकूल असतील; अशी एक अपेक्षा तिथे दडलेली असते. ही अपेक्षा अहंजन्य, वैयक्तिक अशी गोष्ट असते आणि तीच प्रामाणिकपणाला संपूर्णपणे झाकून टाकते. त्यामुळे व्यक्तीला स्वत:चे दोष, स्वत:च्या चुका दिसत नाहीत.

परंतु, व्यक्ती जर पूर्णपणे प्रामाणिक असेल तर, जेव्हा ती करता कामा नये अशी एखादी गोष्ट करू लागते त्याच क्षणी, अगदी त्याच क्षणी, अगदी स्पष्टपणे, म्हणजे जोरकसपणे नव्हे पण तरीही अगदी नेमकेपणाने तिला जाणवते की, ‘नाही, ही गोष्ट मी करता कामा नये.’ अशा वेळी, व्यक्ती जर अनासक्त असेल तर ती चुकीची गोष्ट करणे व्यक्ती लगेचच थांबविते, अगदी त्वरित थांबविते.

पण व्यक्तीमध्ये आसक्ती असते, अगदी निष्काम कर्माबाबतीतसुद्धा आसक्ती असते, हे तुम्ही जाणून घेतले पाहिजे. म्हणजे तुम्ही तुमचे जीवन जरी अगदी नि:स्वार्थ अशा एखाद्या कार्यासाठी वाहून घेतलेले असले, तरी तेथेही अहंकार शिल्लक असतोच. ते कार्य करण्याची तुमची स्वतःची अशी एक खास, वैयक्तिक पद्धत असते; तुमच्या मनात एक आशा असते की, याचा परिणाम अमुक असा होईल, तुम्हाला त्यातून अमुक अमुक मिळेल आणि मग ती गोष्ट अमुक प्रकारे पार पडेल इत्यादी इत्यादी. म्हणजे लक्षात घ्या की, ते कार्य तुम्ही तुमच्या स्वतःसाठी करत नसता; पण जेव्हा ते कार्य तुम्ही हाती घेता, तेव्हा ते कार्य यशस्वी होईल, त्यामध्ये तुम्हाला यश मिळेल, म्हणजे तुम्हाला व्यक्तिश: असे नव्हे, तर तुम्ही जे कार्य करत आहात ते कार्य यशस्वी होईल अशी अपेक्षा तुम्ही बाळगत असता. त्यामुळे कोणतीतरी एखादी अगदी छोटीशी गोष्ट, खोलवर, तळाशी दडून बसते पण तिची तुम्हाला जाणीव नसते… परंतु तशी अपेक्षासुद्धा जर तुम्ही बाळगली नसती तर, जे करणे आवश्यक होते ते करण्यात कुचराई करताक्षणीच, तुम्ही काहीतरी चूक करत आहात हे तुमच्या लक्षात आले असते. तुम्हाला अगदी नेमकेपणाने त्याची जाणीव झाली असती. एका मिलिमिटरचा एक हजारांश भाग असावा इतके ते स्पंदन सूक्ष्म असते. हो, ते तिथे असते, आणि तेवढे पुरेसे असते, तुम्हाला जाणवते की, ‘माझी चूक झाली आहे.’

काहीही झाले तरी चालेल पण तुमच्याकडून कोणताही प्रमाद घडता कामा नये असे वाटण्यासाठी, तुमच्याकडे परिपूर्ण प्रामाणिकपणा असावा लागतो. कोणत्यातरी भ्रमात जीवन जगण्यापेक्षा, असा परिपूर्ण प्रामाणिकपणा काहीही घडवून आणू शकतो, म्हणजे उदाहरणार्थ अगदी एखाद्या गोष्टीचा त्याग करण्यासही तो तयार असतो परंतु हे अतिशय अवघड असते; त्यासाठी वेळ लागतो, पुष्कळ परिश्रम करावे लागतात.

तुम्ही जेव्हा एखादी गोष्ट करत असता, तेव्हा नेहमीच मन आणि प्राण, तुम्ही जे जे काही करत असता त्यापासून काही ना काहीतरी लाभ मिळविण्याचा प्रयत्न करत असतात; मग तो वैयक्तिक समाधानाचा लाभ असेल किंवा एखाद्या आनंदाचा लाभ असेल, किंवा तुमच्या मनात स्वतःबद्दलची जी चांगली प्रतिमा असते तिच्या लाभासाठी असेल, हे मन किंवा प्राण तो लाभ उठविण्याचा प्रयत्न करत असतात. (आणि म्हणूनच) स्वतःला न फसविणे ही गोष्ट अतिशय अवघड असते.

– श्रीमाताजी (CWM 05 : 54-55)

धम्मपद : रस्त्याच्या कडेलासुद्धा एखादे सुंदर सुवासिक फूल उमललेले आढळते, त्याचप्रमाणे स्वयंप्रकाशित बुद्धांचे शिष्यदेखील, त्यांच्या बुद्धिप्रकाशाच्या योगे, अंध व अज्ञानी जनसमूहात, चारचौघांमध्ये उठून दिसतात.

श्रीमाताजी : येथे काही चांगल्या सूचना करण्यात आल्या आहेत, उदाहरणार्थ, इतर जणं काय करतात किंवा ते कोणत्या चुका करतात याच्याशी तुमचा संबंध असता कामा नये, तर स्वत:चे दोष, निष्काळजीपणा यांकडेच तुम्ही लक्ष पुरविले पाहिजे आणि ते दुरुस्त करण्याचा प्रयत्न केला पाहिजे.

दुसरी एक सुजाण सूचना अशी की, अशा कोणत्याही गोष्टी, ज्या प्रत्यक्ष कृतीमध्ये कार्यान्वित होत नाहीत, अशा गोष्टींचे वर्णन करताना आपले शब्दपांडित्य खर्च करू नये. कमी बोलावे आणि उत्तम कृती करावी. पोकळ शब्द हे सुगंध नसलेल्या फुलाप्रमाणे असतात.

तुम्ही तुमच्या स्वत:च्या दोषांनी, त्रुटींनी नाउमेद होऊ नका. रस्त्याच्या कडेला असलेल्या कचऱ्याच्या ढिगामध्येसुद्धा अतिशय निर्मळ फूल उमललेले आढळून येते. मथितार्थ असा की, ज्यामधून विशुद्ध अशा साक्षात्काराचा जन्मच होणार नाही इतके त्याज्य काहीच नसते.

व्यक्तीचा भूतकाळ कसा का असेना, हातून कोणत्याही चुका का घडलेल्या असेना, माणूस किती का घोर अज्ञानात जगलेला असेना, तरीही प्रत्येकाच्या अंत:करणात खोलवर एक परमोच्च असे पावित्र्य, शुद्धता दडलेली असते की ज्याचे सुंदर अशा साक्षात्कारामध्ये रूपांतर होऊ शकते. केवळ त्याचाच विचार करा, त्यावरच लक्ष केंद्रित करा, इतर सर्व अडचणी, अडथळे, संकटे यांची चिंता करू नका.

तुम्ही जे बनू इच्छिता केवळ त्यावरच लक्ष केंद्रित करा, तुम्ही जे बनू इच्छित नाही ते संपूर्णपणे, शक्य तितके नि:शेषतया विसरण्याचा प्रयत्न करा.

– श्रीमाताजी
(CWM 03 : 215)

ईश्वरी कृपा – १४

“खरोखरच, ईश्वरच साऱ्या करुणेचा मूळस्रोत असतो, जर एखाद्याने पुन्हा पुन्हा त्याच त्याच चुका केल्या नाहीत तर त्याच्या सर्व चुका नाहीशा करण्याचे सामर्थ्य त्याच्यापाशीच असते; खऱ्या साक्षात्काराकडे घेऊन जाणारा मार्ग खुला करणारा ईश्वरच असतो.”
— श्रीमाताजी

(आपल्या ह्या विधानावर भाष्य करताना श्रीमाताजी एके ठिकाणी म्हणतात की,)

“व्यक्ती जोवर त्याच त्याच चुका पुन्हा पुन्हा करत राहते तोपर्यंत त्या चुका नाहीशा होऊ शकत नाहीत, कारण व्यक्ती प्रत्येक क्षणाला त्या चुका नव्याने करत असते. एखादी व्यक्ती जेव्हा चूक करते, मग ती गंभीर असो किंवा नसो, त्या चुकीचा तिच्या जीवनात काही ना काही परिणाम होत असतोच, ते कर्म संपुष्टात आणावेच लागते, पण व्यक्ती जर त्या ‘ईश्वरी कृपे’कडे वळेल तर त्या ‘कृपे’मध्ये, ते परिणाम नष्ट करण्याची ताकद असते; पण यासाठी व्यक्तिने त्याच दोषाची पुनरावृत्ती करता कामा नये. व्यक्ती त्याच त्याच मूर्खपणाच्या गोष्टी अनिश्चित काळपर्यंत करत राहील आणि ईश्वरी ‘कृपा’देखील त्याच्या परिणामांचा निरास अनिश्चित काळपर्यंत करत राहील, असे व्यक्तिने कदापिही समजता कामा नये, कारण हे असे घडत नाही. भूतकाळाचा भविष्यावर कोणताही परिणाम होणार नाही, इतका भूतकाळ पुसला जाऊ शकतो, शुद्ध केला जाऊ शकतो. मात्र एक अट आहे – व्यक्तीने तो भूतकाळ पुन्हा कायमस्वरूपी वर्तमानात ओढून आणता कामा नये, या एकाच अटीवर तो विशुद्ध केला जाऊ शकतो. तुम्ही स्वतःहूनच तुमच्यातील वाईट स्पंदनांना थांबविले पाहिजे, तुम्ही तेच ते स्पंदन पुन्हा पुन्हा अनिश्चित काळपर्यंत निर्माण करत राहता कामा नये.”

– श्रीमाताजी
(CWM 09 : 58)