Tag Archive for: खोटे

“बालकाने नेहमी काय लक्षात ठेवले पाहिजे? त्याने निरपवाद प्रामाणिकपणाची आवश्यकता मनावर ठसवली पाहिजे. सत्याच्या अंतिम विजयाबद्दल खात्री बाळगली पाहिजे. त्याने ध्येय संपादन करण्याची इच्छा बाळगली पाहिजे आणि सातत्यपूर्ण प्रगतीची शक्यता आहे, हे नेहमी लक्षात ठेवले पाहिजे.”

मी निरपवाद प्रामाणिकपणावर एवढा भर का देत असते? ते तुम्हाला सांगते. तुम्ही आता मोठे झाला आहात. पण तुम्ही लहान होतात त्या वेळी तुम्हाला काय शिकवण्यात आले होते ते कदाचित तुम्हाला आठवत असेल. बहुधा सर्वच पालक त्यांच्या मुलांना सांगत असतात की, ”तुम्ही खोटे बोलता कामा नये, खोटे बोलणे अतिशय वाईट असते.” परंतु दुर्दैवाची गोष्ट अशी की, ते स्वतःच बरेचदा तुमच्यासमोर खोटं बोलत असतात. आणि मग जी गोष्ट ते स्वतःच करत नाहीयेत, ती गोष्ट ते तुम्हाला का करायला सांगत आहेत? असा प्रश्न तुम्हाला पडतो. आणि असे असूनसुद्धा, प्रामाणिक असणे हे अत्यंत आवश्यक आहे, हे अगदी लहान वयातच मुलांना सांगितले गेले पाहिजे.

दुसऱ्यांपेक्षा चलाख (smart) कसे व्हावे किंवा दुसऱ्यांच्या नजरेत आपण चांगले दिसावे यासाठी लपवाछपवी कशी करावी, हे बरेचदा मुलांना शिकविले जाते. काही पालक भीती दाखवून मुलांना ताब्यात ठेवण्याचा प्रयत्न करतात; पण शिक्षणाच्या सर्व पद्धतींपैकी ही सर्वांत वाईट पद्धत आहे; कारण त्यामुळे खोटे बोलणे, फसविणे, ढोंग करणे आणि तत्सम अन्य गोष्टींना प्रोत्साहन दिले जाते. पण पालकांनी जर मुलांना वारंवार असे समजावून सांगितले की, “तुम्ही जर पूर्ण प्रामाणिक नसाल, म्हणजे केवळ दुसऱ्याशीच असे नव्हे, तर स्वत:शीसुद्धा पूर्णपणे प्रामाणिक राहिला नाहीत आणि स्वत:तील अपूर्णता व कमतरता झाकण्याचा प्रयत्न केलात, तर तुम्ही कधीच कोणतीही प्रगती करू शकणार नाही; कोणतीही प्रगती कधीच न करता, तुम्ही जसे आज आहात तसेच कायम राहाल. तेव्हा तुम्हाला अगदी नुसत्या प्राथमिक अजाण अवस्थेतून जरी बाहेर पडायचे असेल आणि विकसित होत जाणाऱ्या चेतनेत उन्नत व्हायचे असेल, तर त्यासाठीसुद्धा सर्वात महत्त्वाची, एकमेव महत्त्वाची गोष्ट आहे आणि ती म्हणजे प्रामाणिकपणा.

करू नये अशी एखादी गोष्ट जर तुम्ही केली असेल, तर ती गोष्ट तुम्ही तुमच्या स्वतःच्या मनाशी कबूल केली पाहिजे. तुमच्यामध्ये एखादी अयोग्य अशी ऊर्मी उठली असेल, तर तिच्या नजरेला नजर भिडवून तुम्ही स्वत:ला सांगितले पाहिजे की, ‘ते चांगले नाही‌’ किंवा ‘ते घृणास्पद आहे’, एवढेच नव्हे तर, ‘ते दुष्टपणाचे आहे.” (क्रमशः)

• श्रीमाताजी (CWM 15 : 297-298)

विचारशलाका १८

 

एकदा का तुम्ही आंतरिक रूपांतरणाच्या दृष्टीने चांगला प्रारंभ केला आणि जर तुम्ही जिवाच्या मुळाशी अवचेतनेपर्यंत (subconscient) प्रवास केलात तर – जे तुमच्यामध्ये तुमच्या पालकांकडून, अनुवंशिकतेतून आलेले असते – ते तुम्हाला दिसू लागते. बहुतांशी या सर्वच अडचणी तेथे आधीपासूनच असतात, जन्मानंतरच्या पहिल्या काही वर्षांमध्ये ज्यांची भर पडते अशा गोष्टी फारच थोड्या असतात.

 

आणि अशा गोष्टी कोणत्याही आकस्मिक क्षणीदेखील घडू शकतात; जर तुम्ही वाईट संगतीमध्ये राहिलात, वाईट पुस्तके वाचलीत, तर ते विष तुमच्यामध्ये शिरेल; अशावेळी या गोष्टींचे अवचेतनामध्ये खोलवर उमटलेले ठसे आणि तुमच्या वाईट सवयी यांच्या विरुद्ध तुम्हाला झगडावे लागते.

 

उदाहरणार्थ, असे काही लोक असतात की ज्यांना खोटे बोलल्याशिवाय तोंडच उघडता येत नाही; ते नेहमीच तसे जाणीवपूर्वक करतात असेही नाही (तसे असेल तर ते जास्तच घातक असते.) किंवा असे काही लोक असतात की, जे इतरांच्या संपर्कात आल्यावर भांडल्याशिवाय राहूच शकत नाहीत, अशा गोष्टी त्यांच्या अवचेतनेमध्ये खोलवर रुजलेल्या असतात.

 

तुम्ही जेव्हा सदिच्छा बाळगता, तेव्हा तुम्ही बाह्यत: या सर्व गोष्टी टाळण्याचा, शक्य असेल तर त्या दुरुस्त करण्याचा हरप्रकारे प्रयत्न करता, त्यावर तुम्ही काम करता, त्यांच्याशी मुकाबला करता; आणि मग तुम्हाला अशी जाणीव होते की, या गोष्टी वारंवार वर येत आहेत, जो भाग तुमच्या नियंत्रणावाचून सुटलेला आहे अशा भागातून त्या वर येत आहेत.

 

पण जर का तुम्ही तुमच्या अवचेतनेमध्ये प्रवेश केलात, तुमच्या चेतनेला त्यामध्ये प्रवेश करू दिलात आणि काळजीपूर्वक पाहू लागलात तर मग तुम्हाला हळूहळू तुमच्या अडचणींचे मूळ, उगम कोठे आहे त्याचा शोध लागतो; तुमचे आईवडील, आजी आजोबा कसे होते हे आता तुम्हाला कळू लागते आणि जेव्हा एखाद्या विशिष्ट क्षणी तुम्ही स्वत:वर नियंत्रण ठेवू शकत नाही, तेव्हा तुम्हाला कळते, ”मी असा आहे कारण ते तसे होते.”

 

तुमच्याकडे लक्ष ठेवून असणारा, तुमची मार्गावर तयारी करून घेणारा असा पुरेसा जागृत चैत्य पुरुष (psychic being) जर तुमच्यामध्ये असेल तर तो तुमच्याकडे तुम्हाला साहाय्यक ठरतील अशा गोष्टी, माणसे, पुस्तके, परिस्थिती खेचून आणू शकतो. कोणा परोपकारी, कृपाळू इच्छेमुळेच जणू घडले असावेत असे छोटे छोटे योगायोग घडून येतात आणि तुम्हाला निर्णय घेण्यासाठी आणि तुम्हाला योग्य दिशेला वळविण्यासाठी एखादा संकेत, कोणती तरी मदत, एखादा आधार पुरविण्यात येतो.

 

पण एकदा का तुम्ही निर्णय घेतला, तुमच्या जिवाचे सत्य शोधून काढायचे एकदा का तुम्ही ठरविलेत, तुम्ही त्या मार्गावरून प्रामाणिकपणे वाटचाल करायला सुरुवात केलीत तर, तुमच्या प्रगतीसाठी मदत व्हावी म्हणून जणू (अज्ञातात) कोणीतरी, सगळेमिळून सर्वकाही घडवत आहेत असे तुम्हाला वाटू लागते. आणि तुम्ही जर काळजीपूर्वक निरीक्षण केलेत तर हळूहळू तुमच्या अडचणींचे मूळदेखील तुम्हाला दिसू लागते : “अरे! हा दोष माझ्या वडिलांमध्ये होता तर’’, “अरेच्चा, ही तर माझ्या आईची सवय आहे’’; “खरंच, माझी आजी अशी होती’’, “माझे आजोबाही असे होते;” असे तुम्हाला जाणवू लागते. किंवा मग तुम्ही लहान असताना जिने तुमची काळजी घेतली होती अशी कोणी तुमची आया असेल, किंवा तुम्ही ज्यांच्याबरोबर खेळलात, बागडलात ती तुमची बहीणभावंडे असतील, तुमचे मित्रमैत्रिणी असतील, यांच्यात किंवा त्यांच्यात काहीतरी असलेले तुम्हाला तुमच्यामध्ये सापडेल.

 

तुम्ही जर प्रामाणिक राहिलात तर या सगळ्या गोष्टी तुम्ही शांतपणे पार करू शकता, असे तुम्हाला आढळून येईल. आणि कालांतराने ज्या बंधांनिशी तुम्ही जन्माला आला होतात ते सारे बंध, त्या बेड्या तुम्ही तोडून टाकाल आणि तुमच्या मार्गावरून तुम्ही अगदी मुक्तपणे पुढे जाल. तुम्हाला जर तुमचे व्यक्तिमत्त्व बदलायचे असेल तर तुम्ही हे केलेच पाहिजे.

 

– श्रीमाताजी [CWM 04 : 261-262]