Tag Archive for: खुलेपण

पूर्णयोगाचे अधिष्ठान – ११

व्यक्ती ईश्वरी प्रभावाप्रत स्वतःला खुली करू शकते की नाही यावरच पूर्णयोगामध्ये सर्व काही अवलंबून असते. अभीप्सेमध्ये जर प्रामाणिकता असेल आणि उच्चतर चेतनेप्रत पोहोचण्याचा धीरयुक्त संकल्प असेल तर, कितीही अडथळे आले तरी, कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये खुलेपण (opening) हे निश्चित येते. यासाठी कमी वेळ लागेल की जास्त हे मन, हृदय आणि शरीराच्या कमी-अधिक तयारीवर अवलंबून असते. आणि म्हणून व्यक्तीकडे आवश्यक तेवढा धीर नसेल तर, आरंभ करताना येणाऱ्या अडचणीमुळेच ती व्यक्ती ते प्रयत्न सोडून देईल, अशी शक्यता असते.

आपले (समग्र) अस्तित्व श्रीमाताजींनी हाती घ्यावे म्हणून त्यांच्या उपस्थितीला आणि त्यांच्या शक्तीला, शक्यतो हृदयामध्ये लक्ष एकाग्र करून आवाहन करणे आणि त्यांच्या शक्तिकार्याद्वारे चेतनेचे रूपांतरण होणे याखेरीज पूर्णयोगामध्ये अन्य कोणतीही पद्धत नाही. तुम्ही मस्तकामध्ये किंवा भ्रूमध्यामध्ये देखील चित्त एकाग्र करू शकता परंतु बऱ्याच जणांना अशा प्रकारे उन्मुख, खुले होणे फारच कठीण जाते.

जेव्हा मन अविचल होते आणि एकाग्रता दृढ होते, जेव्हा अभीप्सा तीव्र होते, तेव्हा अनुभव येऊ लागतात. जितकी श्रद्धा अधिक तितकेच परिणाम लवकर प्राप्त होण्याची शक्यता असते. इतर साऱ्या गोष्टींसाठी व्यक्तीने फक्त स्वतःच्या प्रयत्नांवर विसंबून राहता कामा नये तर, ईश्वराशी संपर्क प्रस्थापित करण्यामध्ये आणि श्रीमाताजींची शक्ती व उपस्थिती ग्रहण करण्यामध्ये यश संपादन करण्याचा प्रयत्न केला पाहिजे.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 107)

आत्मसाक्षात्कार – २१

खालील चार गोष्टींवर साक्षात्कार आधारित केला गेला पाहिजे.

१) मनाच्या वर असणाऱ्या केंद्रामध्ये उन्नत होणे
२) वैश्विक चेतनेप्रत खुले होणे
३) चैत्य खुलेपण
४) उच्चतर चेतनेचे तिच्या शांती, प्रकाश, शक्ती, ज्ञान, आनंद इत्यादीसहित अस्तित्वाच्या अगदी भौतिक स्तरापर्यंतच्या सर्व स्तरांमध्ये अवतरण होणे.

श्रीमाताजींच्या शक्ती-कार्याला तुमच्या अभीप्सेची, श्रद्धेची आणि समर्पणाची जोड देऊन, उपरोक्त साऱ्या गोष्टी तुम्ही केल्या पाहिजेत. हाच मार्ग आहे. बाकी साऱ्या गोष्टी म्हणजे या गोष्टी प्रत्यक्षात आणण्यासाठीचे प्रयत्न आहेत, आणि त्यासाठी श्रीमाताजी तुमच्यामध्ये जे कार्य करत आहेत त्यावर श्रद्धा असणे आवश्यक आहे.

– श्रीअरविंद (CWSA 30 : 319)

‘अतिमानसिक साक्षात्कार’ (supramental realization) हे आपले उद्दिष्ट आहे आणि त्यासाठी जे करणे आवश्यक आहे ते आपण केले पाहिजे किंवा प्रत्येक टप्प्यावर प्रत्येक परिस्थितीत, त्या साक्षात्काराकडे घेऊन जाणारे जे काही आहे ते आपण केले पाहिजे. शारीरिक चेतनेची तयारी करणे ही सद्यकालीन आवश्यकता आहे; आणि त्यासाठी संपूर्ण समता व शांती आणि वैयक्तिक मागण्या किंवा इच्छा यांपासून मुक्त असणारे शारीरिक व कनिष्ठ प्राणिक भागांमधील संपूर्ण समर्पण या गोष्टी प्रस्थापित करण्याची आवश्यकता आहे. इतर सर्व गोष्टी त्यांच्या योग्य वेळी येऊ शकतील. शारीरिक समीपता ही त्या इतर गोष्टींपैकीच एक गोष्ट आहे, आत्ता त्याचा अट्टहास करण्याची खरंतर गरज नाही, मात्र शारीरिक चेतनेमध्ये आंतरात्मिक खुलेपण (psychic opening) आणि तेथे श्रीमाताजींची उपस्थिती व त्यांचे मार्गदर्शन यांची सध्या खरी आवश्यकता आहे.

– श्रीअरविंद (CWSA 32 : 491-492)

साधना, योग आणि रूपांतरण – २३३

फक्त ध्यानामुळेच प्रकृतीमध्ये परिवर्तन होऊ शकते असा आमचा अनुभव नाही किंवा दैनंदिन कर्मव्यवहार आणि बाह्य व्यापार यांच्यापासून निवृत्त होऊन जे परिवर्तन घडवून आणू पाहत आहेत त्यांनाही त्यापासून फार लाभ झाला आहे असे नाही. किंबहुना अनेक उदाहरणांमध्ये तर ते घातकच ठरले आहे.

काही विशिष्ट प्रमाणात ध्यान-एकाग्रता, हृदयामध्ये आंतरिक अभीप्सा आणि श्रीमाताजींच्या उपस्थितीप्रत चेतनेचे खुलेपण आणि ऊर्ध्वस्थित शक्तीकडून होणारे अवतरण या गोष्टी आवश्यक असतात. परंतु कर्माविना, कोणतेही कार्य न करता प्रकृतीचे खऱ्या अर्थाने परिवर्तन होऊ शकत नाही. परिवर्तन झाले आणि त्यानंतर जर व्यक्ती लोकांच्या संपर्कामध्ये आली तरच त्या व्यक्तीच्या प्रकृतीमध्ये परिवर्तन झाले आहे की नाही याची खरी कसोटी लागते.

व्यक्ती कोणत्याही प्रकारचे काम करत असली तर, त्यामध्ये श्रेष्ठ-कनिष्ठ असे काहीही नसते. सर्व कर्मं जी श्रीमाताजींना अर्पण केली जातात आणि जी त्यांच्यासाठी आणि त्यांच्या शक्तिनिशी केली जातात ती सर्व कर्मं एकसमान असतात.

– श्रीअरविंद (CWSA 32 : 252)