व्यवहारात वागत असताना, तुमच्या उद्दिष्टाची तुम्हाला सुस्पष्ट कल्पना हवी. तुम्ही कुठे जात आहात, तुमचे गंतव्य काय आहे ह्याचे स्पष्ट ज्ञान तुम्हाला असले पाहिजे. ह्या दृष्टिकोनातून धनाचे उदाहरण घ्या. काळाच्या दृष्टीने पाहता, कित्येक शतके पुढचा असा एक आदर्श पाहा : धन ही अशी एक शक्ती असावी की, जिच्यावर कोणाचीच मालकी नसावी व ती त्या काळी उपलब्ध असणाऱ्या सर्वाधिक व्यापक वैश्विक प्रज्ञेने नियंत्रित केली जावी. अशा एखाद्या व्यक्तीची कल्पना करा की, जी समग्र पृथ्वीच्या गरजा जाणून घेण्याएवढी व्यापक दृष्टीची असेल व धनाचा विनियोग कोठे केला जावा हे सांगण्यासाठी लागणारी अचूकता बाळगणारी असेल, कळतेय तुम्हाला? आपण या ध्येयापासून कितीतरी दूर आहोत, नाही का? सध्याच्या घटकेला कोणी एखादा असे म्हणतो की, “हे माझे आहे,” अन् जेव्हा तो उदार बनतो तेव्हा तो म्हणतो की, ”हे मी तुला देतो.” खरेतर असे काही नसते.
परंतु आपण आज जे काही आहोत आणि आपण जे असलो पाहिजे यांच्यातील तफावत फार मोठी आहे. आणि त्याकरिता आपण लवचीक असायला हवे, आपले उद्दिष्ट कधीही नजरेआड होता कामा नये. त्यासाठी आपला मार्ग आपण स्वत:च शोधणे आवश्यक आहे आणि एका जन्मातच हे उद्दिष्ट साध्य होईल असे नाही, हे ही आपण ओळखून असले पाहिजे. हं, ते नक्कीच खूप कठीण आहे. आंतरिक शोध घेण्यापेक्षा देखील हे अधिक कठीण आहे. खरे सांगावयाचे झाले तर, हे शोधकार्य येथे ऑरोविलमध्ये येण्यापूर्वीच झालेले असावे.
त्यासाठी एक आरंभबिंदू आहे : जेव्हा तुम्हाला तुमच्या अंतर्यामी अविचल प्रकाश दिसलेला असतो, तुम्हाला खात्रीपूर्वकतेने मार्गदर्शन करणारे एक अस्तित्व गवसलेले असते, तेव्हा तुम्हाला अशी जाणीव होते की, सातत्याने, घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीत शिकण्यासारखे काहीतरी असते आणि असेही जाणवते की, जडभौतिकाच्या विद्यमान स्थितीमध्ये प्रगतीला नेहमीच वाव असतो. दर क्षणाला काय प्रगती करायची ते शोधण्याच्या उत्सुकतेने व्यक्तीने येथे यावे, जे जीवन विकसित होऊन, स्वत:ला परिपूर्ण बनवण्याची आस बाळगते, असे जीवन प्राप्त करून घ्यावे. म्हणजेच ”असे जीवन जे वृद्धिंगत होऊन स्वत:ला परिपूर्ण बनविण्याची आस बाळगते” हे ऑरोविलचे सामूहिक उद्दिष्ट असावे. आणि त्याउपर प्रत्येक व्यक्ती एकाच पद्धतीने ते साध्य करेल असे नव्हे – तर प्रत्येकाचा स्वत:चा असा एक मार्ग असेल.
– श्रीमाताजी
(CWM 13 : 311-312)