Tag Archive for: ईश्वरप्राप्ती

अंतःकरणाच्या शुद्धीसाठी संपूर्ण प्रामाणिकपणा ही सर्वात महत्त्वाची गोष्ट असते. स्वत:च स्वत:ची फसवणूक करता कामा नये. ईश्वरा‌पासून, स्वतःपासून किंवा सद्गुरू‌पासून काहीही लपवून ठेवता कामा नये, स्वतःच्या वृत्ती-प्रवृत्तींचे थेट निरीक्षण केले पाहिजे आणि त्यांना सुयोग्य बनविण्यासाठीची साधीसरळ इच्छा बाळगली पाहिजे. या गोष्टींना वेळ लागला तरी काही हरकत नाही; पण ईश्वर‌प्राप्ती करून घेणे हेच आपले जीवित-कार्य आहे, असे मानण्याची तयारी व्यक्तीने ठेवली पाहिजे.

अंतःकरणाची शुद्धी ही एक बऱ्यापैकी लक्षणीय उपलब्धी आहे आणि म्हणूनच, बदलायला हव्यात अशा अजून काही गोष्टी व्यक्तीला स्वतःमध्ये आढळल्या तर त्यामुळे तिने निराश होण्याचे, हताश होण्याचे काहीच कारण नाही. व्यक्तीने जर योग्य इच्छा व योग्य दृष्टिकोन बाळगला तर, अंतःसूचना व अंतर्ज्ञान या गोष्टी वाढीस लागतील; त्या अधिक स्पष्ट, अधिक नेमक्या व अचूक बनतील आणि त्यांचे अनुसरण करण्याची ताकदसुद्धा वाढत राहील. आणि मग, तुम्ही स्वतःबाबत समाधानी होण्याआधी ईश्वरच तुमच्याबाबत समाधानी होईल. मानवता ज्या सर्वोच्च गोष्टीची आस बाळगू शकते ती गोष्ट (म्हणजे ईश्वर). मात्र साधक अपरिपक्व असताना जर ती गोष्ट त्याच्या हाती लागली तर, ती त्याच्यासाठी धोकादायक ठरू शकते; परंतु असे होऊ नये यासाठी साधक व ईश्वर यांच्यामध्ये जो एक पडदा असतो की, ज्या पडद्याद्वारे ईश्वर स्वतःचे व साधकांचे संरक्षण करत असतो, तो पडदा ईश्वर स्वतःहून हळूहळू दूर करू लागतो.

– श्रीअरविंद (CWSA 30 : 43)

पूर्णयोगाचे अधिष्ठान – ४४

(श्रीअरविंद लिखित पत्रामधून…)

कोणतीही अडचण आली किंवा कितीही त्रास सहन करावा लागला, तरी न थकता, निराश न होता, नाउमेद न होता किंवा अधीर न होता प्रयत्न करत राहण्याची व्यक्तीच्या अंगी असलेली क्षमता म्हणजे तितिक्षा (endurance). थकवा, निराशा इत्यादी गोष्टी आल्या तरी व्यक्तीने आपले उद्दिष्ट किंवा आपला निर्धार ढासळू देता कामा नये किंवा प्रयत्न करणे सोडून देता कामा नये, हे देखील तितिक्षेमध्ये अभिप्रेत असते.

*

“मी पुन्हा प्रयत्न करीन”, असे नुसते म्हणणे पुरेसे नाही. आवश्यकता आहे ती सतत, अविचलपणे, निराश न होता प्रयत्न करत राहण्याची. गीतेमध्ये म्हटले आहे त्याप्रमाणे ‘अनिर्विण्णचेतसा‌’ प्रयत्न करत राहण्याची आवश्यकता आहे.

तुम्ही जे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवले आहे त्याच्यासाठी साडेपाच वर्षांचा कालावधी हा खूप मोठा कालावधी आहे, असे तुमचे म्हणणे आहे. पण तुम्ही म्हणताय तेवढ्या कालावधीत, जर एखाद्या योग्याला, स्वतःच्या प्रकृतीमध्ये पूर्णपणे परिवर्तन करता आले आणि त्याला ईश्वराचा अगदी निर्णायक सघन असा अनुभव आला तर, तो योगी आध्यात्मिक मार्गावर वेगाने घोडदौड करणारा आहे, असेच म्हटले पाहिजे. आध्यात्मिक परिवर्तन ही अगदी सोपी गोष्ट आहे, असे आत्तापर्यंत कोणीच कधीही म्हटलेले नाही. सर्व आध्यात्मिक साधक हेच सांगतील की, ती अतिशय अवघड गोष्ट असते पण ती खरोखरच प्रयत्न करण्याजोगी गोष्ट आहे.

ईश्वरप्राप्ती व्हावी अशी एकमेव आस जर एखाद्या व्यक्तीला लागली असेल तर ती व्यक्ती निश्चितच, कोणतीही काचकूच न करता किंवा त्यासाठी किती काळ लागतोय किंवा त्यामध्ये किती अडचणी येत आहेत किंवा त्यासाठी किती कष्ट उपसावे लागत आहेत, याची कोणतीही तक्रार न करता, स्वतःचे संपूर्ण आयुष्य त्यासाठी देऊ शकते.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 117) & (CWSA 30 : 18)