Tag Archive for: आसक्ती

 

व्यक्ती जेव्हा प्रामाणिक असते तेव्हा तिला स्वत:च्या चुका कळतात. स्वतःच्या चुकांची जाणीव नसणे, ही व्यक्तीमध्ये अजूनही कोठेतरी अप्रामाणिकपणा शिल्लक असल्याची खूण असते. सामान्यतः तो अप्रामाणिकपणा प्राणात (vital) लपून राहिलेला असतो. जेव्हा प्राण सहकार्य करण्यास संमती देतो (जे मुळातच खूप मोठे पाऊल उचलण्यासारखे आहे) म्हणजे जेव्हा तो ठरवितो की, तो सुद्धा सहकार्य करणार आहे, त्याचे सारे प्रयत्न आणि ऊर्जा, ते कार्य पूर्ण करण्यासाठी तो खर्च करणार आहे, तेव्हासुद्धा आतमध्ये कोठेतरी काहीतरी दडून राहिलेले असते. सर्व गोष्टी चांगल्या होतील आणि त्याचे परिणाम अनुकूल असतील; अशी एक अपेक्षा तिथे दडलेली असते. ही अपेक्षा अहंजन्य, वैयक्तिक अशी गोष्ट असते आणि तीच प्रामाणिकपणाला संपूर्णपणे झाकून टाकते. त्यामुळे व्यक्तीला स्वत:चे दोष, स्वत:च्या चुका दिसत नाहीत.

परंतु, व्यक्ती जर पूर्णपणे प्रामाणिक असेल तर, जेव्हा ती करता कामा नये अशी एखादी गोष्ट करू लागते त्याच क्षणी, अगदी त्याच क्षणी, अगदी स्पष्टपणे, म्हणजे जोरकसपणे नव्हे पण तरीही अगदी नेमकेपणाने तिला जाणवते की, ‘नाही, ही गोष्ट मी करता कामा नये.’ अशा वेळी, व्यक्ती जर अनासक्त असेल तर ती चुकीची गोष्ट करणे व्यक्ती लगेचच थांबविते, अगदी त्वरित थांबविते.

पण व्यक्तीमध्ये आसक्ती असते, अगदी निष्काम कर्माबाबतीतसुद्धा आसक्ती असते, हे तुम्ही जाणून घेतले पाहिजे. म्हणजे तुम्ही तुमचे जीवन जरी अगदी नि:स्वार्थ अशा एखाद्या कार्यासाठी वाहून घेतलेले असले, तरी तेथेही अहंकार शिल्लक असतोच. ते कार्य करण्याची तुमची स्वतःची अशी एक खास, वैयक्तिक पद्धत असते; तुमच्या मनात एक आशा असते की, याचा परिणाम अमुक असा होईल, तुम्हाला त्यातून अमुक अमुक मिळेल आणि मग ती गोष्ट अमुक प्रकारे पार पडेल इत्यादी इत्यादी. म्हणजे लक्षात घ्या की, ते कार्य तुम्ही तुमच्या स्वतःसाठी करत नसता; पण जेव्हा ते कार्य तुम्ही हाती घेता, तेव्हा ते कार्य यशस्वी होईल, त्यामध्ये तुम्हाला यश मिळेल, म्हणजे तुम्हाला व्यक्तिश: असे नव्हे, तर तुम्ही जे कार्य करत आहात ते कार्य यशस्वी होईल अशी अपेक्षा तुम्ही बाळगत असता. त्यामुळे कोणतीतरी एखादी अगदी छोटीशी गोष्ट, खोलवर, तळाशी दडून बसते पण तिची तुम्हाला जाणीव नसते… परंतु तशी अपेक्षासुद्धा जर तुम्ही बाळगली नसती तर, जे करणे आवश्यक होते ते करण्यात कुचराई करताक्षणीच, तुम्ही काहीतरी चूक करत आहात हे तुमच्या लक्षात आले असते. तुम्हाला अगदी नेमकेपणाने त्याची जाणीव झाली असती. एका मिलिमिटरचा एक हजारांश भाग असावा इतके ते स्पंदन सूक्ष्म असते. हो, ते तिथे असते, आणि तेवढे पुरेसे असते, तुम्हाला जाणवते की, ‘माझी चूक झाली आहे.’

काहीही झाले तरी चालेल पण तुमच्याकडून कोणताही प्रमाद घडता कामा नये असे वाटण्यासाठी, तुमच्याकडे परिपूर्ण प्रामाणिकपणा असावा लागतो. कोणत्यातरी भ्रमात जीवन जगण्यापेक्षा, असा परिपूर्ण प्रामाणिकपणा काहीही घडवून आणू शकतो, म्हणजे उदाहरणार्थ अगदी एखाद्या गोष्टीचा त्याग करण्यासही तो तयार असतो परंतु हे अतिशय अवघड असते; त्यासाठी वेळ लागतो, पुष्कळ परिश्रम करावे लागतात.

तुम्ही जेव्हा एखादी गोष्ट करत असता, तेव्हा नेहमीच मन आणि प्राण, तुम्ही जे जे काही करत असता त्यापासून काही ना काहीतरी लाभ मिळविण्याचा प्रयत्न करत असतात; मग तो वैयक्तिक समाधानाचा लाभ असेल किंवा एखाद्या आनंदाचा लाभ असेल, किंवा तुमच्या मनात स्वतःबद्दलची जी चांगली प्रतिमा असते तिच्या लाभासाठी असेल, हे मन किंवा प्राण तो लाभ उठविण्याचा प्रयत्न करत असतात. (आणि म्हणूनच) स्वतःला न फसविणे ही गोष्ट अतिशय अवघड असते.

– श्रीमाताजी (CWM 05 : 54-55)

विचारशलाका १४

असे पाहा की, जगाच्या सध्याच्या अवस्थेमध्ये परिस्थिती नेहमीच कठीण असते. संपूर्ण जग संघर्ष व कलहाच्या स्थितीत आहे; प्रकट होऊ पाहणाऱ्या सत्य व प्रकाश यांच्या शक्ती आणि (दुसरीकडे) त्यांना विरोध करणाऱ्या अशा सर्व शक्ती की, ज्या बदलू इच्छित नाही, ज्या हटवादी झालेल्या आणि जाण्यास नकार देणाऱ्या भूतकाळातील भागाचे प्रतिनिधित्व करतात, यांच्यामध्ये संघर्ष सुरू आहे. स्वाभाविकपणेच, प्रत्येक व्यक्तीला तशाच प्रकारच्या अडथळ्यांना सामोरे जावे लागते आणि तिला स्वत:ला स्वत:च्या अडचणी जाणवत असतात.

तुमच्याकरता केवळ एकच मार्ग आहे. तो म्हणजे समग्र, संपूर्ण विनाशर्त समर्पण. म्हणजे तुमच्या कृती, तुमची कर्मे, तुमच्या आशा-आकांक्षा यांचे समर्पण तर करायचेच, पण त्याचबरोबर तुमच्या भावभावनांचेसुद्धा समर्पण करायचे, म्हणजे तुम्ही जे काही करता, तुम्ही जे काही आहात ते ते सारे केवळ ‘ईश्वरा’साठीच असले पाहिजे, असे मला म्हणायचे आहे. आणि असे केल्यामुळे, तुमच्या सभोवती असणाऱ्या मानवी प्रतिक्रियांच्या तुम्ही अतीत झाला असल्याचे तुम्हाला जाणवते – केवळ अतीत झाल्याचेच जाणवते असे नव्हे तर, ‘ईश्वरी कृपे’च्या तटबंदीमुळे त्या मानवी प्रतिक्रियांपासून तुमचे संरक्षण होत असल्याचेही तुम्हाला जाणवते.

एकदा का तुमच्यामधील इच्छा नाहीशा झाल्या, आसक्ती उरली नाही, मनुष्यमात्रांकडून – मग ते कोणीही असोत – कोणत्याही प्रकारचे बक्षीस मिळावे ही अपेक्षा तुम्ही सोडून दिलीत आणि ‘ईश्वरा’कडून मिळणारी व कधीही व्यर्थ न जाणारी बक्षिसी हीच एकमेव मिळविण्यासारखी गोष्ट आहे हे तुम्हाला समजले – एकदा का तुम्ही सर्व बाह्य व्यक्ती व वस्तू यांविषयीची आसक्ती सोडून दिलीत की मग ‘ईश्वरा’ची ‘उपस्थिती’, त्याची ‘शक्ती’, तुमच्या सोबत सदैव असणारी त्याची ‘कृपा’ तुम्हाला तुमच्या हृदयात लगेचच जाणवू लागते.

आणि दुसरा काहीच उपाय नाही. प्रत्येकासाठी अगदी निरपवादपणे हाच एकमेव उपाय आहे. जे जे कोणी दु:ख भोगतात त्यांना एकच गोष्ट सांगितली पाहिजे की, दु:ख असणे हे ‘समर्पण’ परिपूर्ण नसल्याचे चिन्ह आहे. त्यानंतर पुढे जेव्हा कधी तुम्हाला तुमच्यामध्ये एखादा ‘आघात’ जाणवतो तेव्हा त्यावेळी मग “छे! किती वाईट आहे हे” किंवा परिस्थिती किती कठीण आहे” असे तुम्ही म्हणत नाही. तर आता तुम्ही म्हणता, “माझेच समर्पण अजून परिपूर्ण झालेले नसेल.” आणि मग तुम्हाला ती ‘ईश्वरी कृपा’ जाणवते, जी तुम्हाला मदत करते, मार्गदर्शन करते आणि तुम्ही प्रगत होऊ लागता. आणि एक दिवस तुम्ही अशा शांतीमध्ये प्रवेश करता जी कशानेही क्षुब्ध होऊ शकणार नाही. सर्व विरोधी शक्तींना, विरोधी क्रियांना, आक्रमणांना, गैरसमजुतींना, दुर्वासनांना तुम्ही अशा स्मितहास्याने उत्तर देता जे ‘ईश्वरी कृपे’वरील पूर्ण विश्वासाने येत असते आणि तोच एक बाहेर पडण्याचा मार्ग आहे, दुसरा मार्गच नाही.

हे जग संघर्ष, दु:खभोग, अडचणी, ताणतणाव यांनी बनलेले आहे. ते अजूनही बदललेले नाही, ते बदलण्यासाठी काही काळ लागेल. पण प्रत्येकामध्ये या सगळ्यातून बाहेर पडण्याची क्षमता असते. तुम्ही जर ‘परमोच्च कृपे’च्या अस्तित्वावर विसंबून राहिलात, तर तोच केवळ एकमेव मार्ग आहे.

– श्रीमाताजी [CWM 15 : 398-399]

कर्म आराधना – ४१

ईश्वरी आज्ञेचे अनुसरण करण्यास जर तुम्ही तयार असाल तर, तुम्हाला देण्यात आलेले कोणतेही कर्म, मग ते कर्म कितीही विलक्षण असले तरी, ते स्वीकारण्यासाठी तुम्ही सक्षम असले पाहिजे, आणि ज्या शांतचित्ताने तुम्ही ते कर्म स्वीकारले होते त्याच शांतचित्ताने तुम्हाला अगदी दुसऱ्याच दिवशी ते सोडूनही देता आले पाहिजे. (ते कार्य) ही फक्त तुमचीच जबाबदारी आहे, असे तुम्हाला वाटता कामा नये.

कोणत्याच गोष्टीविषयी वा जीवनशैलीविषयी, कोणतीही ‘आसक्ती’ असता कामा नये. तुम्ही पूर्णपणे मुक्त असले पाहिजे. तुम्हाला खराखुरा योगिक दृष्टिकोन हवा असेल तर, ‘ईश्वरा’कडून येणाऱ्या सर्व गोष्टींचा स्वीकार तुम्हाला करता आला पाहिजे आणि तेवढ्याच सहजतेने आणि कोणत्याही पश्चात्तापाविना त्या गोष्टी सोडूनही देता आल्या पाहिजेत. ”मला काहीही नको,” असे म्हणणाऱ्या एखाद्या संन्याशाचा दृष्टिकोन आणि ”मला अमुक एक गोष्ट हवी आहे,’ असे म्हणणाऱ्या प्रापंचिक माणसाचा दृष्टिकोन, हे दोन्ही दृष्टिकोन एकसारखेच असतात. प्रापंचिक जीवन जगणारा माणूस जेवढा त्याच्या मालकीच्या गोष्टींबाबत आसक्त असतो, तेवढाच एखादा संन्यासीसुद्धा त्याच्या परित्यागाविषयी आसक्त असू शकतो.

– श्रीमाताजी
[CWM 03 : 09]