Posts

साधना, योग आणि रूपांतरण – २१५

स्थितप्रज्ञ असणे याचा अर्थ व्यक्तीचे केवळ विचारी मन (thinking mind) आत्म-साक्षात्कारामधील आध्यात्मिक चेतनेमध्ये सुस्थिर असणे असा होतो. त्यामुळे प्रकृतीच्या अन्य घटकांचे ‘रूपांतरण’ होईलच असे काही आवश्यक नाही. उच्चतर चेतनेचा ‘प्रकाश’ आणि तिची ‘शक्ती’ खाली उतरविणे; चैत्य अस्तित्व (psychic) आणि मन, प्राण व शरीराची केंद्र खुली होणे; आंतरात्मिक आणि उच्चतर चेतनेच्या कार्याला प्रकृतीने संमती देणे आणि तिच्याप्रत स्वीकारशील रीतीने खुले होणे; आणि सरतेशेवटी प्रकृतीने अतिमानसाप्रत खुले होणे, या साऱ्या ‘रूपांतरणा’साठी आवश्यक असणाऱ्या अटी असतात.

उच्चतर चेतना (higher consciousness) ही अशी एक गोष्ट असते की जी मनुष्याच्या मन, प्राण आणि शरीर यांच्या ऊर्ध्वस्थित असते. ती संपूर्णपणे आध्यात्मिक स्वरूपाची असते. ती प्राप्त करून घेणे याचा अर्थ एवढाच की, व्यक्ती तेथे इच्छेनुसार जाण्यास सक्षम असते किंवा व्यक्ती तिच्या चेतनेच्या कोणत्यातरी एखाद्या घटकानिशी तेथे निवास करू शकते आणि त्या दरम्यान तिचे इतर घटक मात्र जुन्या पद्धतीनेच कार्यरत असतात. समग्र अस्तित्व जेव्हा अंतरात्म्याच्या साच्यामध्ये ओतले जाते (remoulded) तेव्हा ‘आंतरात्मिक रूपांतरण’ (psychic transformation) घडून येते. समग्र अस्तित्वाचे जेव्हा आध्यात्मिकीकरण केले जाते तेव्हा ‘आध्यात्मिक रूपांतरण’ (spiritual transformation) घडून येते. आणि समग्र अस्तित्वाचे जेव्हा अतिमानसिकीकरण केले जाते तेव्हा ‘अतिमानसिक रूपांतरण’ (supramental transformation) घडून येते. व्यक्ती केवळ उच्चतर चेतनेविषयी जागरूक झाली किंवा सामान्य मर्यादित अर्थाने व्यक्तीने ती उच्चतर चेतना प्राप्त करून घेतली म्हणून या सर्व गोष्टी, आपोआप घडून येतात, असे होत नाही.

अर्थात शरीर हे त्याचे अधिष्ठान असते. शरीर, प्राण आणि मन व त्याच्या उच्चतर पातळ्या या सर्वांचा समावेश कनिष्ठ गोलार्धामध्ये होतो. आत्म-सुसूत्रीकरणाचे (self-formulation) साधन असणारे ‘अतिमानस’ (Supermind) आणि ‘दिव्य’ सत्-चित्-आनंद यांचा समावेश ऊर्ध्व गोलार्धामध्ये होतो. कनिष्ठ आणि ऊर्ध्व या दोन गोलार्धाच्या मधोमध ‘अधिमानस’ (Overmind) असते. ‘अधिमानस’ हे कनिष्ठ गोलार्धाच्या शिखरस्थानी असते. अधिमानस हा या दोन्ही गोलार्धातील मध्यावधी किंवा संक्रमणकारी स्तर असतो. (क्रमश:)

– श्रीअरविंद (CWSA 30 : 331-332)

साधना, योग आणि रूपांतरण – २१४

आध्यात्मिकीकरण (Spiritualisation) म्हणजे उच्चतर शांती, शक्ती, प्रकाश, ज्ञान, विशुद्धता, आनंद इत्यादीचे अवतरण. या गोष्टी ‘उच्च मना’पासून ‘अधिमानसा’पर्यंतच्या (Higher Mind to Overmind) कोणत्याही उच्च स्तराशी संबंधित असू शकतात. कारण त्यांपैकी कोणत्याही स्तरावर ‘आत्म्या’चा साक्षात्कार होऊ शकतो.

आध्यात्मिकीकरणाद्वारे व्यक्तिनिष्ठ रूपांतरण घडून येते. यामध्ये साधनभूत प्रकृतीचे इतपतच रूपांतरण घडते की जेणेकरून त्या प्रकृतीकडून, ‘विश्वात्म्या’ला जे कार्य करून घ्यायचे असते त्याचे ती (सुयोग्य) साधन होऊ शकेल. हे होत असताना अंतरंगातील आत्मा स्थिर, मुक्त आणि ‘ईश्वरा’शी एकत्व पावलेला असा राहतो.

परंतु हे व्यक्तिगत रूपांतरण अपूर्ण असते. जेव्हा ‘अतिमानसिक’ परिवर्तन (Supramental change) घडून येते तेव्हाच साधनभूत ‘प्रकृती’चे संपूर्ण रूपांतरण होऊ शकते. तोपर्यंत प्रकृती अनेक अपूर्णतांनी भरलेली असते. परंतु उच्चतर स्तरावरील आत्म्याला त्याने काही फरक पडत नाही कारण तो या सर्वापासून मुक्त असतो, त्याच्यावर या गोष्टींचा कोणताही परिणाम होत नाही. आंतरिक पुरुष देखील अगदी आंतरिक शरीरापर्यंत मुक्त आणि अप्रभावित राहू शकतो. ‘अधिमानस’ हे परिणामकारक ‘दिव्य ज्ञाना’च्या कार्याच्या मर्यादांच्या, ‘दिव्य शक्ती’च्या कार्याच्या मर्यादांच्या अधीन असते. ते आंशिक आणि मर्यादित ‘दिव्य सत्या’दी गोष्टींच्या अधीन असते. केवळ ‘अतिमानसा’मध्येच संपूर्ण ‘सत्-चेतना’ (Truth consciousness) व्यक्तीमध्ये अवतरित होऊ शकते.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 404)

साधना, योग आणि रूपांतरण – २१२

आंतरात्मिकीकरण (psychisation) आणि आध्यात्मिकीकरण (spiritualisation) या दोन्हींमध्ये फरक आहे. आध्यात्मिकीकरणामध्ये होणारे परिवर्तन हे वरून अवतरित होते, तर आंतरात्मिकीकरणामध्ये होणारे परिवर्तन हे अंतरंगामधून घडून येते. आंतरात्मिकीकरणामध्ये मन, प्राण आणि शरीर यांच्यावर अंतरात्म्याचे वर्चस्व निर्माण होते आणि त्यातून हे परिवर्तन घडून येते.

*

तुम्ही पत्रामध्ये वर्णन केलेल्या दोन्ही भावना योग्य आहेत. त्यातून साधनेमधील दोन आवश्यकतांचे सूचन होते.

त्यातील एक आवश्यकता म्हणजे अंतरंगात प्रवेश करायचा आणि चैत्य पुरुष (psychic being) व बाह्यवर्ती प्रकृती यांच्यामधील अनुबंध पूर्णत: खुला करायचा.

दुसरी आवश्यकता म्हणजे ऊर्ध्वस्थित असणाऱ्या ‘दिव्य शांती, शक्ती, प्रकाश, आनंद’ यांच्याप्रत उन्मुख व्हायचे आणि त्यांच्यामध्ये आरोहण करायचे आणि प्रकृतीमध्ये व शरीरामध्ये त्यांचे अवतरण घडवून आणायचे.

वरील दोन्ही प्रक्रियांपैकी, म्हणजे आंतरात्मिक किंवा आध्यात्मिक प्रक्रियांपैकी कोणतीच प्रक्रिया एकमेकींशिवाय परिपूर्ण होऊ शकत नाही. आध्यात्मिक आरोहण आणि अवतरण घडून आले नाही तर प्रकृतीचे आध्यात्मिक रूपांतरण होऊ शकणार नाही. आणि संपूर्ण आंतरात्मिक खुलेपण आले नाही आणि चैत्य पुरुष व बाह्यवर्ती प्रकृती यांच्यामध्ये अनुबंध निर्माण करण्यात आला नाही तर ‘रूपांतरण’ परिपूर्ण होऊ शकणार नाही.

या दोन प्रक्रियांमध्ये विसंगती नाही. काही जण आंतरात्मिक (चैत्य) रूपांतरणापासून सुरुवात करतात तर काहीजण आध्यात्मिक रूपांतरणापासून सुरुवात करतात. तर काही जण दोन्ही रूपांतरणास एकत्रितपणे सुरुवात करतात. दोन्हीसाठी आस बाळगायची आणि गरजेनुसार आणि प्रकृतीच्या कलानुसार श्रीमाताजींच्या शक्तीला कार्य करू द्यायचे हा सर्वोत्तम मार्ग आहे.

– श्रीअरविंद (CWSA 30 : 380, 383)