Tag Archive for: आत्महत्या

नैराश्यापासून सुटका – ०५

सत्कृत्य करणे; न्यायाने, सरळपणाने, प्रामाणिकपणाने वागणे हा शांत व समाधानी जीवन जगण्याचा आणि स्वत:च्या चिंता, काळज्या कमी करण्याचा उत्तम मार्ग आहे. अगदी पूर्ण स्वार्थी हेतुने पाहिले तरीसुद्धा ही गोष्ट खरी असल्याचे दिसते. याशिवाय खरोखरच, एखादी व्यक्ती जर नि:स्वार्थी, निरपेक्ष असेल आणि कोणत्याही वैयक्तिक आशाआकांक्षा वा अहंकारापासून मुक्त असेल तर, ती व्यक्ती खऱ्या अर्थाने सुखी होणे शक्य आहे.

तुमच्या कर्मांमुळे तयार झालेले वातावरण तुम्ही तुमच्याबरोबर, तुमच्या सभोवती आणि तुमच्यामध्ये वागवीत असता. तुम्ही केलेली कर्मे ही जर सत्कर्मे असतील, ती सुंदर, हितकर आणि सुसंवादी असतील, तर तुमच्या आजूबाजूचे वातावरणही तसेच सुंदर, हितकर व सुसंवादी राहील. पण या उलट तुमचे जीवन क्षुद्र आपमतलबीपणाने, अविचारी स्वार्थी भावनेने आणि घोर दुष्ट इच्छेने भरलेले असेल तर, तशाच वातावरणात तुम्हाला तुमचा प्रत्येक श्वास घ्यावा लागणार; म्हणजे सतत दु:ख, सततचा असंतोषच तुमच्या वाट्यास येणार; म्हणजे अंतिमत: तुमच्या पदरी नैराश्यच पडणार.

तुम्ही देह-त्याग केलात तर तुमची या वातावरणापासून सुटका होईल असे तुम्ही मानता कामा नये; उलट, देह हा एक प्रकारे अचेतनाचा (unconsciousness) पडदा असल्यासारखा असतो, जो दुःखभोगाची तीव्रता कमी करतो. जडभौतिक प्राणिक जीवनामध्ये (vital life) वावरत असताना जर तुम्ही देहाच्या संरक्षणाविना असाल तर, दुःखभोग हे अधिक तीव्र होतात आणि ज्यामध्ये बदल घडविणेच आवश्यक असते त्यामध्ये बदल घडविण्याची, ज्यामध्ये सुधारणा घडविणे आवश्यक असते त्यामध्ये सुधारणा घडविण्याची, आणि अधिक उच्चतर, अधिक आनंदी व अधिक प्रकाशमय जीवन व चेतना यांच्याप्रत स्वतःला खुले करण्याची संधीही (देह नसल्याने) आता तुमच्यापाशी नसते.

म्हणून तुम्ही तुमचे कार्य येथेच (या पृथ्वीवर असतानाच) करण्याची त्वरा केली पाहिजे; कारण तुम्ही तुमचे कार्य इथेच खऱ्या अर्थाने करू शकता. मृत्युकडून कोणतीही अपेक्षा बाळगू नका. जीवन हीच तुमची मुक्ती आहे. या जीवनात राहूनच तुम्ही स्वतःचे रूपांतरण केले पाहिजे. पृथ्वीवरच तुमची प्रगती होऊ शकते आणि पृथ्वीवरच तुम्हाला साक्षात्कार होऊ शकतो. या देहामध्ये असतानाच तुम्ही विजय संपादन करू शकता.

– श्रीमाताजी (CWM 03 : 197-198)

प्रश्न : एखाद्याने आत्महत्या केल्यामुळे त्याला दु:खयातना का भोगाव्या लागतात?

श्रीमाताजी : एखादा आत्महत्या का करतो ? कारण तो भ्याड असतो, भित्रा असतो… आणि भ्याड लोकांना नेहमीच दु:ख भोगावे लागते.

प्रश्न : पुढील जन्मात देखील त्याला परत दु:खयातना भोगाव्या लागतात का?

श्रीमाताजी : या जगात येण्यामागे, चैत्य पुरुषाचा (Psychic being) एक विशिष्ट हेतू असतो. अनेक प्रकारचे अनुभव घेणे आणि त्यातून काही शिकणे व प्रगती करणे हा तो हेतू होय. त्याचे कार्य पूर्ण होण्याआधीच जर तुम्ही हे जग सोडलेत तर अपूर्ण राहिलेले कार्य पूर्ण करण्यासाठी त्याला अधिक अवघड अशा परिस्थितीमध्ये परत यावे लागते. ह्याचाच अर्थ, एका जन्मात तुम्ही जे जे काही टाळण्याचा प्रयत्न केलेला असतो ते पुढच्या जन्मी पुन्हा तुमच्या वाट्याला येते आणि ते आधीपेक्षा अधिकच अवघड असते. आणि अशाप्रकारे (जीवन) सोडून न जाताही, जर आयुष्यात तुम्हाला अडचणींवर मात करावयाची असेल तर ज्याला आपण सहसा ‘परीक्षा देणे’ असे म्हणतो, ती द्यावी लागते, तिच्यामध्ये यशस्वी व्हावयाचे असते, तुम्ही तिच्यात जर यशस्वी झाला नाहीत किंवा तिच्याकडे पाठ फिरविलीत, तिच्यात उत्तीर्ण होण्याऐवजी तुम्ही तिला टाळून तिच्यापासून दूर निघून गेलात तर पुन्हा कधी तरी ही परीक्षा देणे तुम्हाला भाग असते आणि मग ती पूर्वीपेक्षाही अधिक कठीण असते.

आता, तुम्हाला हे माहीतच आहे की, लोक अतिशय अज्ञानी असतात आणि त्यांना असे वाटत असते की, जीवन आहे आणि त्यानंतर मृत्यु आहे; जीवन म्हणजे हालअपेष्टांचा ढीग आणि त्यानंतर येणारा मृत्यू म्हणजे चिरंतन शांती. परंतु असे अजिबात नसते आणि बहुतकरून, एखादा माणूस जेव्हा पूर्णतया निरंकुश, बेताल पद्धतीने, अज्ञानी आणि अंध:कारयुक्त भावावेगापोटी, जीवन संपवून टाकतो, तेव्हा तो थेट वासनांविकारांनी व सर्व प्रकारच्या अज्ञानाने बनलेल्या प्राणिक जगतामध्ये (Vital world) पोहोचतो. आणि मग जे त्रास व हालअपेष्टा त्याला टाळावयाच्या होत्या त्याच परत त्याच्यासमोर उभ्या ठाकतात आणि आता तर शरीररूपी रक्षणकवचही राहिलेले नसते. जर तुम्ही कधी दुःस्वप्न पाहिले असेल, म्हणजेच, तुम्ही अविचारीपणे प्राणिक जगतात फेरफटका मारला असेल तर तो भयानक अनुभव, ते दुःस्वप्न संपविण्याचा उत्तम उपाय म्हणजे स्वत:ला जागे करणे, म्हणजेच वेगळ्या शब्दांत सांगायचे तर, वेगाने आपल्या शरीरात परतून येणे हा असतो. परंतु तुम्ही जेव्हा शरीरालाच नष्ट करून टाकता तेव्हा तुमचे रक्षण करण्यासाठी ते शरीरच राहिलेले नसते. आणि मग ही दुःस्वप्नामुळे भयभीत होण्याची अवस्था तुमच्या कायमचीच वाट्याला येते, आणि हे नक्कीच फारसे सुखावह नसते. दुःस्वप्नातील भयाला टाळावयाचे असेल तर तुम्ही चैत्य चेतनेमध्ये (Psychic Consciousness) असणे गरजेचे आहे आणि ज्यावेळी तुम्ही चैत्य चेतनेमध्ये असता त्यावेळी या गोष्टी तुमचे काहीही बिघडवू शकत नाहीत, याची तुम्हाला खात्री असते. खरोखरीच, ही सगळी अज्ञानयुक्त अंध:काराची आंदोलने असतात आणि मी म्हटले त्याप्रमाणे, असे करणे म्हणजे निरंतर प्रयत्न करण्याऐवजी भ्याडपणाने, घाबरून मोठी माघार घेणे असते.

– श्रीमाताजी
(CWM 07 : 23-24)