Tag Archive for: अर्पण

(पाँडिचेरी येथील श्रीअरविंद आश्रमात आबालवृद्ध, शाळेचे विद्यार्थी रोज नियमितपणे आश्रमाच्या मैदानावर जातात आणि शारीरिक शिक्षण घेतात. त्याचा संदर्भ येथे आहे.)

विद्यार्थी : मैदानावर रोज खेळण्यापूर्वी आणि त्यानंतर आम्ही एक मिनिटभर एकाग्र होऊन शांत बसतो. त्यावेळी आम्ही काय प्रयत्न केला पाहिजे?

श्रीमाताजी : तुम्ही जी कृती करणार आहात ती कृती प्रथम ईश्वरार्पण करा, म्हणजे तुम्ही जे काही कराल ते तुम्हाला आत्मनिवेदित भावाने (spirit of consecration) करता येईल. नंतर, “ईश्वराची सेवा करण्यासाठी आम्ही अधिकाधिक सुपात्र असे साधन व्हावे यासाठी, आमच्यामध्ये प्रगतीची इच्छा वाढीस लागू दे,” अशी प्रार्थना तुम्ही ईश्वराकडे करा. खेळण्यास सुरुवात करण्यापूर्वी, तुम्ही स्वतःला ईश्वराप्रत शांतपणे अर्पित करू शकता. आणि खेळून झाल्यावर निश्चल-नीरवपणे ईश्वराप्रत कृतज्ञतेने नतमस्तक व्हा. म्हणजे, मनामध्ये नुसते शब्दोच्चारण होत आहे पण त्यामध्ये भाव नाहीत अशी ती कृती असता कामा नये. ती कृती अगदी अंत:करणपूर्वक झाली पाहिजे.

– श्रीमाताजी (CWM 12 : 354-355)

समर्पण – १७

साधारण अर्पणाकडून तपशीलवार अर्पणाप्रत जाण्यासाठी तुम्हाला पुढील गोष्टी केल्या पाहिजेत. नेहमी ईश्वराच्या अस्तित्वामध्ये जीवन जगा, ते ईश्वरी अस्तित्वच तुमचे संचालन करत आहे आणि तुम्ही जे काही करत आहात ती प्रत्येक गोष्ट त्या ईश्वराकरवीच केली जात आहे याची जाणीव बाळगून जगा. तुमच्या सर्व हालचाली, गतिविधी म्हणजे केवळ मानसिक कृती नव्हे तर, प्रत्येक विचार, प्रत्येक भावना, इतकेच काय पण तुमच्या अगदी सामान्यातिसामान्य, खाण्यापिण्यासारख्या अगदी बाह्य गोष्टीसुद्धा त्या ईश्वरालाच समर्पित करा. उदा. जेव्हा तुम्ही जेवत असता तेव्हा, तुम्हाला असे जाणवले पाहिजे की, तो ईश्वरच तुमच्या माध्यमातून अन्नग्रहण करत आहे. जेव्हा अशा रीतीने तुम्ही तुमच्या सगळ्याच हालचाली ह्या एका अस्तित्वामध्ये एकत्रित कराल, तेव्हाच तुम्ही विभिन्नतेमध्ये जगण्याऐवजी एकात्मतेमध्ये जगू लागाल. तेव्हा मग तुमच्या प्रकृतीमधील एक भाग हा ईश्वराला देऊ केलेला आहे आणि इतर भाग मात्र तसेच सामान्य पद्धतीचे राहिले आहेत, सामान्य कृतींमध्ये निमग्न आहेत असे होणार नाही; तुमचे समग्र जीवनच हाती घेऊन, तुमच्यामध्ये समग्र रूपांतरणास हळूहळू सुरुवात झालेली असेल.

– श्रीमाताजी
(CWM 03 : 23-24)