Tag Archive for: अपप्रवृत्ती

(श्रीअरविंदांनी एका साधकाला लिहिलेल्या पत्रामधून…)

तुमच्या अडचणींना हाताळण्यात आणि तुमच्यावर अपप्रवृत्तींचा जो हल्ला होत आहे त्यांना हाताळण्यात तुमची काहीतरी चूक होत आहे. त्या वृत्ती म्हणजे तुम्ही आहात किंवा त्या वृत्ती तुमच्या स्वत:च्या प्रकृतीचा एक (अविभाज्य) भाग आहेत असे समजण्याची चूक कदाचित तुम्ही करत आहात. खरेतर तुम्ही त्यांच्यापासून स्वतःला दूर केले पाहिजे, वेगळे केले पाहिजे आणि त्यांच्याशी असलेले संबंध तोडून टाकले पाहिजेत. (तुमचा ताबा घेऊ पाहणाऱ्या) या गोष्टी म्हणजे वैश्विक कनिष्ठ, अपूर्ण आणि अशुद्ध प्रकृतीच्या, शक्तींच्या गतिविधी आहेत आणि तुमच्यामध्ये प्रवेश करून, त्या त्यांच्या अभिव्यक्तीसाठी तुम्हाला त्यांच्या हातचे बाहुले बनवण्याचा प्रयत्न करत आहेत, या दृष्टीने तुम्ही त्यांच्याकडे पाहिले पाहिजे.

अशा रितीने तुम्ही स्वतःला त्यांच्यापासून वेगळे केल्यामुळे, त्यांच्याशी असलेला संबंध तोडून टाकल्यामुळे, तुम्हाला तुमच्यामधील एका घटकाचा, म्हणजे तुमच्या आंतरिक अस्तित्वाचा किंवा चैत्य पुरुषाचा (psychic being) शोध लागू शकेल आणि त्याच्या अधिकाधिक सान्निध्यात राहून जीवन जगणे तुम्हाला शक्य होईल. हा जो तुमच्यामधील घटक असतो त्याच्यावर अपप्रवृत्तींचा पगडा पडू शकत नाही किंवा त्याच्यावर त्यांचा हल्लादेखील होऊ शकत नाही. त्या बाहेरून आल्या आहेत असे त्याच्या लक्षात येते आणि त्यामुळे स्वाभाविकपणे त्यांना संमती देण्यास तो नकार देतो. हा चैत्य पुरुष नेहमीच ईश्वरी शक्तींच्या आणि उच्चतर चेतनेच्या प्रतलांच्या दिशेने वळलेला असतो किंवा त्यांच्या संपर्कात असतो. तुमच्या अस्तित्वामधील तो घटक शोधून काढा आणि त्यामध्ये राहून जीवन जगण्याचा प्रयत्न करा. तसे करता येणे हा योगाचा खरा पाया आहे.

अशा रितीने अंतरंगात राहिल्यामुळे, पृष्ठवर्ती संघर्षापासून मागे होऊन, तुम्हाला एक अविचल स्थिती लाभणे सोपे जाईल. हल्ला करणाऱ्या त्या वृत्तींपासून तुमची सुटका करावी म्हणून तुम्ही तेथून, आमच्या साहाय्यासाठी अधिक प्रभावी रितीने आवाहन करू शकाल.

ईश्वरी उपस्थिती, स्थिरता, शांती, विशुद्धता, शक्ती, प्रकाश, हर्ष, व्यापकता या सर्व गोष्टी ऊर्ध्वस्थित आहेत आणि त्या तुमच्यामध्ये अवतरित होण्यासाठी प्रतीक्षा करत आहेत. अंतरंगात असणारी ही अविचलता शोधून काढा. तसे केल्यास तुमचे मनदेखील अधिक अविचल, शांत होईल आणि अशा अविचल मनाच्या माध्यमातून तुम्ही प्रथम विशुद्धता व शांती आणि त्यानंतर ईश्वरी शक्तीला अवतरणासाठी आवाहन करू शकाल.

ही शांती व विशुद्धता तुमच्यामध्ये अवतरित होत आहे असे जर तुम्हाला जाणवले तर, या गोष्टी सुस्थिर होईपर्यंत तुम्ही त्यांना पुन्हा पुन्हा आवाहन करू शकता. त्यानंतर, तुमच्या वृत्तींमध्ये परिवर्तन घडविण्यासाठी आणि तुमच्या चेतनेचे रूपांतरण घडविण्यासाठी, ईश्वरी शक्ती तुमच्यामध्ये कार्यरत आहे याची जाणीव तुम्हाला होईल. या कार्यामध्ये तुम्हाला श्रीमाताजींच्या उपस्थितीची आणि त्यांच्या शक्तीची जाणीव होईल. एकदा का हे असे घडून आले की, उर्वरित सगळ्या गोष्टी या काळावर आणि तुमच्या खऱ्या व दिव्य प्रकृतीच्या तुमच्यामधील प्रगतिशील उत्क्रांतीवर अवलंबून असतात.

– श्रीअरविंद (CWSA 31 : 741)