Tag Archive for: अतिचेतन

साधना, योग आणि रूपांतरण – १७८

‘पूर्णयोग’ हा संपूर्ण ‘ईश्वर’-साक्षात्काराचा, संपूर्ण ‘आत्म’साक्षात्काराचा, आपल्या अस्तित्वाच्या आणि चेतनेच्या संपूर्ण परिपूर्तीचा, आपल्या प्रकृतीच्या संपूर्ण रूपांतरणाचा मार्ग आहे. आणि त्यामध्ये अन्यत्र कोठेतरी असणाऱ्या शाश्वत परिपूर्णतेकडे परत जाणे नव्हे; तर येथील जीवनाचेच संपूर्ण परिपूर्णत्व अभिप्रेत आहे. हे उद्दिष्ट आहे आणि त्याच्या कार्यपद्धतीमध्येसुद्धा तीच परिपूर्णता आहे. कारण कार्यपद्धती परिपूर्ण असल्याशिवाय उद्दिष्टाची समग्रता साध्य होऊ शकत नाही. या पद्धतीमध्ये आपण ज्याचा साक्षात्कार करून घेऊ इच्छितो त्या ईश्वराप्रत आपल्या अस्तित्वाने, प्रकृतीने तिच्या सर्व घटकांसहित, मार्गांसहित, गतिविधींसहित पूर्णत्वाने वळणे, उन्मुख असणे आणि आत्म-दान करणे अंतर्भूत असते.

अशा प्रकारे आपले मन, इच्छा, हृदय, प्राण, शरीर, आपले बाह्य, आंतरिक आणि आंतरतम अस्तित्व, आपल्या सचेतन घटकांप्रमाणेच आपले अतिचेतन (superconscious) आणि अवचेतन (subconscious) घटकदेखील अर्पण केले पाहिजेत. हे सारे घटक साक्षात्काराचे आणि रूपांतराचे क्षेत्र झाले पाहिजेत, हे सारे घटक म्हणजे माध्यमं झाली पाहिजेत, त्यांनी प्रदीपनामध्ये (illumination) आणि मानवाच्या दिव्य चेतनेमधील व प्रकृतीमधील परिवर्तनामध्येही सहभागी झालेच पाहिजे. हे पूर्णयोगाचे स्वरूप आहे.

– श्रीअरविंद (CWSA 12 : 358)

‘पूर्णयोगा’ची योगसूत्रे – २७

सर्वसाधारणपणे आजवरचा योग हा आध्यात्मिक मनाच्या पलीकडे जात नाही – अनेकांना मस्तकाच्या शिखरावर ब्रह्माशी ऐक्य जाणवते, पण त्यांना मस्तकाच्याही वर असलेल्या चेतनेची जाणीव नसते. त्याच प्रमाणे सामान्य योगामध्ये व्यक्तीला ब्रह्मरंध्राप्रत होणार्याह जागृत आंतरिक चेतनेच्या (कुंडलिनी) आरोहणाची संवेदना असते; (या ब्रह्मरंधामध्ये प्रकृती ब्रह्म- चेतनेशी युक्त होते.) मात्र त्यांना ‘अवतरणा’चा (descent) अनुभव येत नाही. काही जणांना अशा गोष्टी अनुभवासही आल्या असतील पण, त्यांचे स्वरूप, त्यांचे तत्त्व किंवा समग्र साधनेमधील त्यांचे स्थान त्यांना उमगले होते की नाही, हे मला माहीत नाही. मला स्वतःला जोपर्यंत असा अनुभव आला नव्हता तोपर्यंत, मी तरी हे इतर कोणाकडून कधी ऐकले नव्हते. याचे कारण पूर्वीचे योगी जेव्हा आध्यात्मिक मनाच्या अतीत जात असत, तेव्हा ते समाधीमध्ये निघून जात असत; याचा अर्थ असा की, (आध्यात्मिक मनाच्या वर, ब्रह्मरंध्राच्या वर असणार्याा) या उच्चतर पातळ्यांविषयी सजग राहण्याचा त्यांनी प्रयत्न केला नव्हता – अतिचेतनेमध्ये (Superconscient) ‘निघून जाणे’ हे त्यांचे उद्दिष्ट असे, जागृत चेतनेमध्ये अतिचेतन ‘उतरविणे’ हे त्यांचे उद्दिष्ट नसे, परंतु हे माझ्या योगाचे उद्दिष्ट आहे.

*

’चित्’ (Chit) म्हणजे विशुद्ध चेतना – सत् चित् आनंद यामध्ये असते तशी. तर ’चित्त’ (Chitta) म्हणजे मानसिक-प्राणिक-शारीरिक चेतना यांचे संमिश्रण असलेले द्रव्य आहे; त्यातून विचार, भावना, संवेदना, आवेग इ. वृत्ती निर्माण होतात. पातंजल योगानुसार, या वृत्तीच पूर्णतः शांत करायच्या असतात, ज्यामुळे चेतना निश्चल होऊन, समाधीमध्ये प्रविष्ट होऊ शकेल. ‘चित्तवृत्तीनिरोधा’चे या (पूर्ण)योगात मात्र निराळे कार्य आहे. सामान्य चेतनेच्या वृत्ती येथे निश्चल करायच्या असतात आणि त्या निश्चलतेमध्ये उच्चतर चेतना आणि तिच्या शक्ती खाली उतरवायच्या असतात; जेणेकरून ही चेतना आणि तिच्या शक्ती प्रकृतीमध्ये रूपांतर घडवतील.

– श्रीअरविंद
(CWSA 29 : 377-378 and 438)

*