Tag Archive for: अडथळे

 

‘शांतीचे अवतरण’ हा बरेचदा साधनेमधील काही महत्त्वाच्या पहिल्या सकारात्मक अनुभवांपैकी एक अनुभव असतो. शांतीच्या या स्थितीमध्ये असताना, सामान्यतः जिला ‘बुद्धी’ असे म्हटले जाते ती बुद्धी शांत होते किंवा तिचे बरेचसे मनोव्यापार विराम पावतात, हे योग्यच असते. त्यावेळी व्यक्ती सतर्क नसेल तर, तिथे बऱ्याच वेळा एकतर प्राणिक मन (vital mind) शिरकाव करते; अन्यथा एक प्रकारे यांत्रिक शारीर-मनातील (mechanical physical mind) किंवा अवचेतन मनातील (subconscient mind) काही गोष्टी कशाही रितीने पृष्ठभागावर येऊन, कृती करण्याची शक्यता असते. निश्चल-नीरवतेमध्ये (silence) अडथळे आणणारे हे मुख्य घटक असतात. अन्यथा, कनिष्ठ प्राणिक मन अडथळा आणण्याचा प्रयत्न करू शकते. आणि त्यामुळे अहंकार व भावावेग उफाळून येतो आणि त्यांचा खेळ सुरू होतो.

साधकाने ज्या घटकांपासून स्वतःची सुटका करून घेतली पाहिजे, त्या घटकांच्या या सगळ्या खुणा आहेत. कारण जर या गोष्टी तशाच शिल्लक राहिल्या आणि त्याच वेळी जर दिव्य ऊर्जा, दिव्य शक्ती, दिव्य ज्ञान, दिव्य प्रेम किंवा दिव्य आनंद यांसारख्या उच्चतर शक्ती अवतरित होऊ लागल्या तर, उपरोक्त कनिष्ठ गोष्टी त्यांच्या आड येऊ शकतात. आणि त्याचा परिणाम म्हणून एकतर उच्चतर चेतना त्यातून मागे सरते किंवा मग तिचे अवतरण झाकोळले जाते किंवा त्यातून मिळालेल्या चालनेचा कनिष्ठ प्रकृतीच्या हेतुंसाठी गैरवापर केला जाऊ शकतो.

मोठमोठे आध्यात्मिक अनुभव येऊन गेल्यानंतरही बरेचसे साधक पुष्ट झालेला अहंकार, भावभावनांची खळबळ, महत्त्वाकांक्षा, अतिरेकी कामवासना किंवा त्यासारख्या इतर प्राणिक आवेगांच्या किंवा विकारांच्या कचाट्यात सापडलेले दिसतात, त्याचे हेच कारण असते. आणि म्हणूनच किमान ज्यांच्यामध्ये प्राण अतिशय सक्रिय असतो अशा प्रकृतीच्या व्यक्तींनी तरी, सकारात्मक अनुभवाच्या गतीशी प्राणाची गती मिळतीजुळती ठेवली पाहिजे किंवा आधी स्वतःच्या प्राणाचे संपूर्ण शुद्धीकरण केले पाहिजे.

– श्रीअरविंद (CWSA 28 : 180-181)

साधना, योग आणि रूपांतरण – ११६

तुम्ही सतत मनामध्ये कोणत्या तरी गोष्टींबाबत चिंता करत असता, विचार करत असता की, “हे बरोबर नाही, माझ्यातील किंवा माझ्या कामातील ही गोष्ट चुकीची आहे,” आणि परिणामतः “मी कुचकामी आहे, मी वाईट आहे, माझे काहीच होऊ शकणार नाही.” असा विचार तुम्ही सतत करत राहता आणि त्यातूनच, त्याचा परिणाम म्हणूनच तुम्हाला अडचणी येताना दिसतात. उदाहरणार्थ, तुम्ही करत असलेले भरतकाम, तयार करत असता त्या लँपशेड्स इ. गोष्टी खरोखरच नेहमी उत्तम असतात आणि तरीही तुम्ही सतत असाच विचार करत राहता की, “हे काम चांगले झाले नाहीये, ते चुकीचे झाले,” आणि असा विचार करत राहिल्यानेच तुम्ही गोंधळात पडता आणि सारेकाही बिघडते. साहजिकपणेच मग तुम्ही सतत चुका करत राहता; आणि तुम्ही जेव्हा साध्यासरळपणे व आत्मविश्वासाने काम करता तेव्हापेक्षा, जेव्हा तुम्ही काळजी करत असता तेव्हा अधिक चुका करता.

कर्म असो की साधना असो धीमेपणाने वाटचाल करत राहणे अधिक बरे! ‘शक्ती’ला कार्य करण्यासाठी वाव दिला पाहिजे आणि तिला तिचे कार्य योग्य रीतीने करता यावे म्हणून, स्वतःला त्रास करून न घेता किंवा पदोपदी सतत अस्वस्थपणे प्रत्येक टप्प्यावर प्रश्न उपस्थित न करता, तुम्ही तुमचे कर्म सर्वोत्तम रीतीने केले पाहिजे. तुम्ही जर ते दोष सतत उगाळत राहिला नाहीत तर, जे कोणते दोष असतील ते यथावकाश निघून जातील; कारण सातत्याने त्या दोषांचा विचार करत राहिल्यामुळे तुमचा स्वतःवरचा विश्वासच डळमळीत होत आहे. तसेच, वास्तविक जी कायमच तेथे समानत्वाने असते त्या ‘शक्ती’प्रत खुले होण्याच्या तुमच्या क्षमतेवरील तुमचा विश्वासही डळमळीत होत आहे. त्यामुळे तुम्ही स्वतःहूनच त्या ‘शक्ती’च्या कार्य करण्याच्या मार्गामध्ये अनावश्यक अडथळे निर्माण करत आहात.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 284)