साधना, योग आणि रूपांतरण – ११६
तुम्ही सतत मनामध्ये कोणत्या तरी गोष्टींबाबत चिंता करत असता, विचार करत असता की, “हे बरोबर नाही, माझ्यातील किंवा माझ्या कामातील ही गोष्ट चुकीची आहे,” आणि परिणामतः “मी कुचकामी आहे, मी वाईट आहे, माझे काहीच होऊ शकणार नाही.” असा विचार तुम्ही सतत करत राहता आणि त्यातूनच, त्याचा परिणाम म्हणूनच तुम्हाला अडचणी येताना दिसतात. उदाहरणार्थ, तुम्ही करत असलेले भरतकाम, तयार करत असता त्या लँपशेड्स इ. गोष्टी खरोखरच नेहमी उत्तम असतात आणि तरीही तुम्ही सतत असाच विचार करत राहता की, “हे काम चांगले झाले नाहीये, ते चुकीचे झाले,” आणि असा विचार करत राहिल्यानेच तुम्ही गोंधळात पडता आणि सारेकाही बिघडते. साहजिकपणेच मग तुम्ही सतत चुका करत राहता; आणि तुम्ही जेव्हा साध्यासरळपणे व आत्मविश्वासाने काम करता तेव्हापेक्षा, जेव्हा तुम्ही काळजी करत असता तेव्हा अधिक चुका करता.
कर्म असो की साधना असो धीमेपणाने वाटचाल करत राहणे अधिक बरे! ‘शक्ती’ला कार्य करण्यासाठी वाव दिला पाहिजे आणि तिला तिचे कार्य योग्य रीतीने करता यावे म्हणून, स्वतःला त्रास करून न घेता किंवा पदोपदी सतत अस्वस्थपणे प्रत्येक टप्प्यावर प्रश्न उपस्थित न करता, तुम्ही तुमचे कर्म सर्वोत्तम रीतीने केले पाहिजे. तुम्ही जर ते दोष सतत उगाळत राहिला नाहीत तर, जे कोणते दोष असतील ते यथावकाश निघून जातील; कारण सातत्याने त्या दोषांचा विचार करत राहिल्यामुळे तुमचा स्वतःवरचा विश्वासच डळमळीत होत आहे. तसेच, वास्तविक जी कायमच तेथे समानत्वाने असते त्या ‘शक्ती’प्रत खुले होण्याच्या तुमच्या क्षमतेवरील तुमचा विश्वासही डळमळीत होत आहे. त्यामुळे तुम्ही स्वतःहूनच त्या ‘शक्ती’च्या कार्य करण्याच्या मार्गामध्ये अनावश्यक अडथळे निर्माण करत आहात.
– श्रीअरविंद (CWSA 29 : 284)