पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३९
(पूर्वार्ध)
श्रद्धा ही कोणत्या अनुभवावर (किंवा प्रचितीवर) अवलंबून नसते. ती अनुभवाच्या आधीपासूनच अस्तित्वात असते. सर्वसाधारणपणे असे आढळते की, व्यक्ती अनुभवाच्या बळावर नाही, तर श्रद्धेच्या बळावर योगसाधनेला सुरुवात करते. ही गोष्ट फक्त योगमार्ग आणि आध्यात्मिक जीवनाबाबतीतच लागू पडते असे नाही; तर ती सामान्य जीवनात सुद्धा लागू पडते. कार्यप्रवण व्यक्ती, संशोधक, नवज्ञान-शोधक (inventors), ज्ञाननिर्माते (त्यांच्या वाटचालीला) सुरुवात करतात ती श्रद्धेनेच. जोपर्यंत एखादी गोष्ट सिद्ध होत नाही किंवा घडून येत नाही तोपर्यंत अगदी निराशा जरी आली, अपयश आले, किंवा विरोधी पुरावा सापडला, नकार मिळाला तरीदेखील ते त्या गोष्टीचा पाठपुरावा करत राहतात; कारण त्यांच्यामधीलच कोणीतरी त्यांना सांगत असते की, (तुम्ही ज्याचा पाठपुरावा करत आहात) त्यामध्ये तथ्य आहे, त्याचा पाठपुरावा केलाच पाहिजे, ती गोष्ट साध्य केली पाहिजे.
अंधश्रद्धा चुकीची नाही का, असे रामकृष्ण परमहंस यांना विचारले असता, ते तर पुढे जाऊन असे म्हणाले की, श्रद्धा एकाच प्रकारची असू शकते आणि ती म्हणजे अंधश्रद्धा. कारण श्रद्धा ही एकतर अंधच असते अन्यथा ती श्रद्धाच नसते, मग ती इतर काहीतरी असते – मग ते तर्कशुद्ध अनुमान असेल, पुराव्याने सिद्ध केलेली प्रचिती असेल किंवा स्थापित झालेले ज्ञान असेल. (उत्तरार्ध उद्याच्या भागात)
– श्रीअरविंद (CWSA 29 : 92-93)






