Tag Archive for: अंतरंगामध्ये राहणे

जीवन जगण्याचे शास्त्र – १६

तुम्ही जर ईश्वरी शक्तीप्रत आत्मदान करू शकत नसाल आणि तिच्या कार्यावर तुमचा विश्वास नसेल तर, तुम्हाला पूर्णयोग करता येणे शक्यच होणार नाही. तुम्ही जर केवळ मनामध्ये आणि मनाच्या शंकाकुशंका व कल्पना यांच्यामध्येच जीवन जगत असाल तर, तुमच्याबाबतीत पूर्णयोगाची शक्यताच निर्माण होत नाही. त्यासाठी मन शांत करण्याची क्षमता तसेच श्रीमाताजींची शक्ती म्हणजे महत्तर ईश्वरी शक्ती तुमच्यामध्ये कार्य करत आहे यावर विश्वास ठेवण्याची आणि त्याचा अनुभव घेण्याची क्षमता तुमच्याकडे असणे महत्त्वाचे असते. त्याचप्रमाणे तुमच्या प्रकृतीमध्ये त्या कार्याच्या आड येणारे जे जे काही असते त्यास नकार देत, त्या कार्याला साहाय्यभूत होण्याची क्षमता तुमच्याकडे असणे आवश्यक असते. या गोष्टी म्हणजे तुमच्यामध्ये पूर्णयोग करण्याची क्षमता आहे याची कसोटी असते.
*
तुम्हाला अस्वस्थ करणाऱ्या गोष्टींचा विचार करणे थांबविणे आणि शांती व शक्ती यांना स्वतःहून आविष्कृत होण्यास आणि तुमच्यामध्ये कार्य करू देण्यास वाव देणे याचा अर्थ ‘मन स्थिर-शांत करणे’ असा होतो. असे असेल तर ‘अंतरंगामध्ये राहणे’ (living inside) ही गोष्ट आपोआप घडून येईल. मग, त्याच्या बरोबरीने येणारी आंतरिक शांती आणि चेतना म्हणजेच तुम्ही स्वतः आहात असे तुम्हाला अधिकाधिक जाणवू लागेल आणि अन्य सर्व गोष्टी बाह्यवर्ती, वरवरच्या, उथळ असल्याचे देखील जाणवू लागेल.

– श्रीअरविंद (CWSA 31 : 27-28)