Posts

साधना, योग आणि रूपांतरण – ७५

निश्चल – नीरवतेचे (silence) ‘अवरोहण’ ही गोष्ट मी इतर योग-प्रणालींमध्ये ऐकलेली नाही; इतर योगांमध्ये मन निश्चल-नीरवतेमध्ये ‘प्रविष्ट होणे’ हा भाग आढळून येतो. पण तरीदेखील मी जेव्हापासून आरोहण (ascent) आणि अवरोहण (descend) यांविषयी लिहीत आहे तेव्हापासूनच मला अनेक ठिकाणाहून असे सांगितले जात आहे की, (मी सांगत आहे त्या) या योगामध्ये नवीन असे काहीच नाही. आणि म्हणून मला नवल वाटते की, आरोहण आणि अवरोहण म्हणजे काय, हे माहीत नसताना त्यांना त्याचा अनुभव येत होता की काय? किंवा असे होते काय की, त्यांचे त्या प्रक्रियेकडे लक्ष गेले नव्हते?

या योगामध्ये मला आणि इतरांना जो अनुभव आलेला आहे तो असा आहे की, चेतना मस्तकाच्या वर आरोहण करते आणि तेथे वास्तव्य करते. मी जेव्हा प्रथम याविषयी बोललो होतो तेव्हा लोकं माझ्याकडे बघायला लागले आणि मी काहीतरी निरर्थक बोलत आहे असा विचार करू लागले. पूर्वीच्या योगमार्गाचा अवलंब करणाऱ्या व्यक्तींना व्यापकतेची जाणीव नक्कीच झालेली असली पाहिजे कारण अन्यथा स्वतःमध्ये विश्व सामावले असल्याचा अनुभव त्यांना आला नसता किंवा शारीर-चेतनेपासून स्वतंत्र झाल्याचा किंवा ‘अनंतम् ब्रह्मा’शी एकत्व पावल्याचा अनुभव त्यांना आला नसता.

सर्वसाधारणपणे, उदाहरणार्थ तंत्रयोगामध्ये, मस्तकाच्या शिखरावर, ब्रह्मरंध्रापर्यंत आरोहण करणाऱ्या चेतनेचा अनुभव हा सर्वोच्च असल्याचे सांगितले जाते. राजयोगामध्येसुद्धा सर्वोच्च अनुभव घेण्याचे साधन म्हणून ‘समाधी’वर भर दिलेला आढळतो. परंतु हे स्पष्टच आहे की, व्यक्ती जर जाग्रतावस्थेमध्ये ‘ब्राह्मी स्थिती’ मध्ये नसेल तर त्या साक्षात्काराला पूर्णता प्राप्त होऊ शकत नाही. भगवद्गीता अगदी सुस्पष्टपणे ‘समाहित’ असण्यासंबंधी सांगते. (ही अवस्था समाधीमध्ये असणाऱ्या अवस्थेशी समांतर असते.) तसेच ब्राह्मी स्थितीसंबंधीही भगवद्गीतेमध्ये सुस्पष्टपणे उल्लेख येतो. ही अशी एक स्थिती असते की, ज्यामध्ये व्यक्ती जाग्रतावस्थेमध्ये (समाधी-अवस्थेत असल्याप्रमाणे) जीवन व्यतीत करते आणि सर्व क्रियाकलाप करते.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 377)