Posts

साधना, योग आणि रूपांतरण – ७७

[श्रीअरविंद येथे अवरोहण (descent) प्रक्रियेच्या संदर्भात काही सांगत आहेत.]

पूर्वीचे योग हे प्रामुख्याने अनुभवांच्या मनो-आध्यात्मिक अतींद्रिय श्रेणींपुरतेच मर्यादित असत. त्यामध्ये उच्चतर अनुभव हे स्थिर मनामध्ये किंवा एकाग्रचित्त हृदयामध्ये एक प्रकारे झिरपत येतात किंवा प्रतिबिंबित होतात. या अनुभवाचे क्षेत्र हे ब्रह्मरंध्रापासून खाली असते. साधक (ब्रह्मरंध्राच्या) वर फक्त समाधी अवस्थेमध्येच जात असत किंवा अचल मुक्तीच्या स्थितीमध्ये जात असत, पण त्यांना गतिशील अवरोहणाचा कोणताही अनुभव येत नसे. (मला) जे जे गतिशील अनुभव आले होते ते सर्व अनुभव, आध्यात्मिकीकरण झालेल्या मनाच्या आणि प्राणिक-शारीरिक (vital-physical) चेतनेच्या क्षेत्रामध्ये आले होते. (काही विशिष्ट मनो-आध्यात्मिक-अतींद्रिय अनुभवांद्वारे, साधकाच्या कनिष्ठ क्षेत्राची, प्रकृतीची पूर्वतयारी झाल्यानंतर), पूर्णयोगामध्ये चेतना ही ब्रह्मरंध्राच्या वर, मूलभूत आध्यात्मिक चेतनेशी संबंधित असणाऱ्या उच्चतर श्रेणींप्रत ऊर्ध्वाभिमुख केली जाते. आणि तेथून नुसते काही ग्रहण करण्याऐवजी, चेतनेने तिथे निवास करून, तेथून कनिष्ठ चेतना पूर्णपणे परिवर्तित करणे अपेक्षित असते. कारण आध्यात्मिक चेतनेला साजेशी गतिशीलता, क्रियाशक्ती (dynamism) तेथे असते. दिव्य ‘प्रकाश’, ‘ऊर्जा’, ‘आनंद’, ‘शांती’, ‘ज्ञान’ आणि अनंत ‘बृहत्व’ हे तिचे स्वरूप असते आणि त्यांचे समग्र अस्तित्वामध्ये अवरोहण झाले पाहिजे. आणि साधकाने या सर्व गोष्टी प्राप्त करून घेतल्या पाहिजेत. अन्यथा त्याला मुक्ती लाभू शकते (सापेक्ष मनो-आध्यात्मिक बदल घडू शकतो.) परंतु त्याला पूर्णत्व मिळत नाही किंवा त्याचे रूपांतरण होऊ शकत नाही.

परंतु मी जर तसे म्हटले तर, ‘प्राचीन संतमहात्म्यांना अवगत नसलेले ज्ञान माझ्यापाशी आहे,’ असा दावा मी करत आहे आणि मी संतमहात्म्यांच्या अतीत गेलो असल्याचे दाखवितो आहे, अशी लोकांची समजूत होईल आणि या अक्षम्य गृहितकाच्या विरोधात गदारोळ उठेल. या संदर्भात मी असे म्हणू शकतो की, उपनिषदांमध्ये (नेमकेपणाने सांगायचे तर तैत्तरिय उपनिषदामध्ये) या उच्चतर स्तरांचे व त्यांच्या स्वरूपाचे आणि समग्र चेतना एकवटण्याच्या व त्या स्तरांमध्ये आरोहण करण्याच्या शक्यतेचे काही संकेत मिळतात. परंतु कालांतराने हे ज्ञान विस्मृतीमध्ये गेले आणि बुद्धी हीच सर्वोच्च गोष्ट आहे, आणि तिच्या किंचित वर ‘पुरूष’ किंवा ‘आत्मा’ आहे असे लोकं म्हणू लागले. परंतु त्यांना या उच्चतर स्तरांची सुस्पष्ट कल्पना नव्हती. परिणामी, समाधी अवस्थेमध्ये संभवतः, अज्ञाताप्रति आणि अनिर्वचनीय स्वर्गीय प्रदेशांमध्ये आरोहण होण्याची शक्यता असे; पण अवरोहण शक्य होत नसे. आणि त्यामुळे तशी संसाधनेसुद्धा उपलब्ध नसत; त्यामुळेच येथे भौतिकामध्ये रूपांतरणाचीही कोणती शक्यताच नसे. केवळ या जीवनापासून सुटका आणि गोलोकामध्ये, ब्रह्मलोकामध्ये, शिवलोकामध्ये किंवा परब्रह्मामध्ये मुक्ती लाभत असे.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 378-379)