Tag Archive for: विशुद्धता

ज्या क्षणी आविष्काराचा खटाटोप नाहीसा होतो तेव्हा, तो आविष्कार सहजस्वाभाविक होऊन जातो. एखादे फूल जसे सहजतेने उमलून, त्याचे सौंदर्य अभिव्यक्त करते; कोणताही गाजावाजा न करता किंवा कोणत्याही आवेशाविना अगदी सहजतेने आपला सुगंध पसरविते तसा तो आविष्कार असतो. या सहजतेमध्ये मोठी शक्ती सामावलेली असते, ती शक्ती निर्भेळ असते; त्यामुळे त्यातून कोणत्याही विघातक प्रतिक्रिया उद्भवत नाहीत; उद्भवल्याच तर त्या अगदीच अल्प असतात.

प्राणाच्या (vital) ताकदीवर फार विसंबून राहता कामा नये कारण ती ताकद ही कर्ममार्गावरील प्रलोभक (tempter) असते. तिच्या जाळ्यामध्ये फसण्याचा नेहमीच धोका असतो कारण तिच्यामुळे तुम्हाला तात्काळ परिणामांची चव चाखता येते. कर्म चांगले करण्याच्या आपल्या पहिल्या उत्साहाच्या आणि उत्सुकतेच्या भरात, त्या ताकदीचा उपयोग करण्याच्या नादात, आपण वाहवत जातो. मात्र त्यामुळे, योग्य दिशेने चाललेल्या आपल्या सर्व प्रयत्नामध्ये अचानकपणे बाधा निर्माण होते आणि आपण जे काही करत असतो त्यामध्ये भ्रांतीचे आणि विनाशाचे बीज पेरले जाते.

सहजता, सहजता! हे ईश्वरा, तुझ्या उपस्थितीची विशुद्धता किती मधुर आहे!

– श्रीमाताजी (CWM 01 : 17)

तुम्ही जर सरळ मार्गाचा अवलंब करू पाहात असाल, तुम्ही विनम्र असाल, तुम्ही विशुद्धतेसाठी प्रयत्नशील असाल, तुम्ही जर निरपेक्ष असाल, तुम्हाला एकांतवासाचे जीवन जगायचे असेल, तुम्हाला विवेकपूर्ण जीवन जगायचे असेल तर त्यामुळे तुमचा मार्ग सुकर होईल, गोष्टी सोप्या होतील या भ्रमात तुम्ही राहता कामा नये…

खरेतर परिस्थिती याच्या अगदी उलट असते. जेव्हा तुम्ही आंतरिक व बाह्य पूर्णत्वाच्या दिशेने वाटचाल करू लागता, त्यावेळी एकदम सर्व अडचणी यायला सुरुवात होते. मी अनेकदा लोकांना असे बोलताना ऐकले आहे की, “काय हे? मी आत्ता जरा कुठे चांगले वागायचा प्रयत्न करतो आहे तर, प्रत्येकजण माझ्याशी वाईटच वागतोय.” पण हे असे का घडते? तर, चांगले वागताना तुम्ही कोणताही अंतःस्थ हेतू ठेवू नये, ही शिकवण तुम्हाला देण्यासाठीच ते घडत असते. म्हणजे असे की, इतरांनी तुमच्याशी चांगले वागावे म्हणून केवळ तुम्ही त्यांच्याशी चांगले वागायचे, असे नाही तर, व्यक्तीने चांगल्यासाठीच चांगले वागले पाहिजे. नेहमीसाठी तोच धडा आहे.

व्यक्तीने जितके काही चांगले, उत्तम करता येईल तेवढे करावे, परंतु फळाची अपेक्षा बाळगू नये, परिणाम दिसावेत म्हणून काही करू नये. म्हणजे, कोणत्यातरी बक्षिसाची अपेक्षा बाळगून सत्कृत्य करायचे, जीवन सुखकर व्हावे म्हणून चांगले वागायचे, असे करू नये. कारण या अशा दृष्टिकोनामुळे सत्कार्याचे मोलच नाहीसे होऊन जाते. चांगुलपणाबद्दलच्या प्रेमापोटीच तुम्ही चांगले असले पाहिजे, न्यायाच्या प्रेमापोटीच तुम्ही न्यायी असले पाहिजे; पावित्र्याच्या, शुद्धतेच्या प्रेमापोटीच तुम्ही पवित्र व शुद्ध असले पाहिजे आणि निरपेक्षतेवर असणाऱ्या प्रेमापोटीच तुम्ही निरपेक्ष असले पाहिजे, तरच तुम्ही (योग)मार्गावर प्रगत होण्याची खात्री बाळगू शकता.

– श्रीमाताजी (CWM 03 : 264-265)