साधना, योग आणि रूपांतरण – ३०३
अचेतनाचे रूपांतरण
सद्यस्थितीत साधकांना भेडसावणारी गोष्ट म्हणजे परिवर्तनाची सार्वत्रिक अक्षमता! त्याचे कारण असे आहे की, साधना ही आता एक सार्वत्रिक तथ्य या दृष्टीने अचेतनापर्यंत (Inconscient) आलेली आहे. प्रकृतीचा जो भाग अचेतनावर थेटपणे अवलंबून असतो अशा भागामध्ये परिवर्तन करण्याचा आता दबाव आहे, आणि तशी हाक आलेली आहे. म्हणजे दृढमूल झालेल्या सवयी, आपोआप घडणाऱ्या हालचाली, प्रकृतीची यांत्रिक पुनरावृत्ती, जीवनाला दिलेल्या अनैच्छिक, प्रतिक्षिप्त प्रतिक्रिया, या साऱ्या गोष्टी मनुष्याच्या व्यक्तिमत्त्वाचा एक स्थायी, अपरिवर्तनीय भाग असल्यासारख्या दिसतात. समग्र आध्यात्मिक परिवर्तनाची शक्यता निर्माण होण्यापूर्वी या गोष्टींमध्ये परिवर्तन होण्याची आवश्यकता आहे. आणि ही गोष्ट शक्य व्हावी म्हणून ‘दिव्य शक्ती’ (व्यक्तिगत स्तरावर नव्हे तर, सार्वत्रिक स्तरावर) कार्यरत आहे. आणि हा दबाव त्याचसाठी आहे. कारण इतर स्तरांवर, हे परिवर्तन यापूर्वीच शक्य झालेले आहे. (आणि हे लक्षात ठेवा की या परिवर्तनाचे आश्वासन प्रत्येकाला देण्यात आलेले नाही.)
परंतु अचेतनास प्रकाशाप्रत खुले करणे हे भगीरथ-कार्य आहे; त्या मानाने इतर स्तरांवरील परिवर्तन हे अधिक सोपे होते. आणि अचेतनावरील हे कार्य आत्ताआत्ता कुठे सुरू झाले आहे आणि त्यामुळे वस्तुमात्रांमध्ये किंवा माणसांमध्ये कोणतेही कोणताही बदल दिसून येत नाहीये यात आश्चर्य वाटण्यासारखे काहीच नाही. हा बदल घाईने नाही, पण योग्य वेळी (निश्चितपणे) घडून येईल.
अनुभवादी गोष्टी ठीक आहेत पण मूळ प्रश्न असा की, अनुभवादींमुळे केवळ चेतना समृद्ध होते, त्यामुळे प्रकृतीमध्ये परिवर्तन होताना दिसत नाही. मनाच्या स्तरावर, जरी अगदी ब्रह्माचा साक्षात्कार झाला तरी तो अनुभवसुद्धा, काही अपवाद वगळता प्रकृतीस, ती जवळजवळ जिथे जशी आहे तशीच सोडून देतो. आणि म्हणूनच पहिली आवश्यकता म्हणून आम्ही चैत्य किंवा आंतरात्मिक रूपांतरणावर (psychic transformation) भर देत असतो. कारण त्यामुळे प्रकृतीमध्ये परिवर्तन घडते आणि त्याचे मुख्य साधन भक्ती, समर्पण इत्यादी असते.
– श्रीअरविंद (CWSA 31 : 617)