नैराश्यापासून सुटका – २०
साधक : मनामध्ये (स्वत:शीच) चालू असणारी अखंड बडबड कशी थांबवावी?
श्रीमाताजी : यासाठी पहिली आवश्यक गोष्ट म्हणजे शक्य तितके कमी बोला. दुसरी अट अशी की, तुम्ही ज्या क्षणी जी गोष्ट करत असता त्या क्षणी फक्त त्याच गोष्टीचा विचार करा. तुम्ही पूर्वी काय केले आहे किंवा यापुढे काय करायचे आहे याचा विचार करत बसू नका. जे होऊन गेले आहे त्याचा खेद करू नका किंवा भविष्यात काय घडेल याची चिंता करत बसू नका. तुमच्यातील निराशाजनक विचारांना आळा घालण्याचा शक्य होईल तेवढा प्रयत्न करा आणि जाणीवपूर्वक आशावादी बना.
– श्रीमाताजी (CWM 12 : 141)
*
निराशाजनक विचारांना तुम्ही थारा देऊ नका. तसे विचार मनात आलेच तर, ते विचार ‘तुमचे’ नाहीत तर, त्या बाहेरून आलेल्या सूचना आहेत, या दृष्टीने त्यांच्याकडे पाहा. शक्य तेवढे अविचल (quiet) राहा आणि ‘श्रीमाताजींच्या शक्ती’ला तुमच्यामध्ये कार्य करू द्या.
– श्रीअरविंद (CWSA 31 : 186)




