साधना, योग आणि रूपांतरण – १४३
‘साधना, योग आणि रूपांतरण’ या मालिकेमध्ये आपण सध्या ‘साधना’ या मुद्द्याचा विचार करत आहोत. पूर्णयोगांतर्गत साधनेमध्ये ज्ञान, कर्म आणि भक्ती या त्रिमार्गाचा समन्वय अपेक्षित असतो. एवढेच नव्हे तर, पारंपरिक त्रिमार्गापेक्षाही अधिकचे असे काही त्यामध्ये समाविष्ट असते. पुन्हा त्यामध्येही म्हणजे, त्रिमार्गाच्या संदर्भातही, पारंपरिक ज्ञानमार्ग व पूर्णयोगांतर्गत ज्ञानमार्ग, पारंपरिक कर्ममार्ग व पूर्णयोगांतर्गत कर्ममार्ग यांमध्ये काहीशी भिन्नता आढळते. ‘साधना, योग आणि रूपांतरण’ या मालिकेमध्ये, आजवर आपण पूर्णयोगांतर्गत ज्ञानमार्ग व कर्ममार्ग यांचा विचार केला. आत्तापर्यंत ज्ञान आणि कर्ममार्गाचा आवश्यक तेवढा विचार झाल्यानंतर आपण उद्यापासून ‘भक्तिमार्गा’कडे वळणार आहोत.
महाराष्ट्रामध्ये या तिन्ही विचारधारांचा समन्वय एकप्रकारे संत वाङ्मयात झालेला आढळतो. त्यामध्ये भक्तीचा उत्कर्ष झालेला असतो. आणि त्यामुळेच महाराष्ट्राची भूमी संतांच्या अमृत मधुर सिंचनाने, भक्तीच्या ओलाव्याने मार्दवयुक्त झालेली पाहायला मिळते. पूर्णयोगांतर्गत भक्तीसाठी आवश्यक असणारी आधारभूमी महाराष्ट्रामध्ये आपल्या संतमंडळींनी तयार करून ठेवली आहे असे आपल्याला दिसते. आता आवश्यकता आहे ती त्या मार्गावरून वाटचाल करून पुढे जाण्याची!
श्री अरविंद आणि श्रीमाताजी यांच्या माध्यमातून आपण भक्ती म्हणजे काय, त्याचे स्वरूप कसे असते, भक्तिमार्गाची गुणवैशिष्ट्ये कोणती, भक्ताच्या आंतरिक जीवनाचे बारकावे या साऱ्याचा विचार येथून पुढे करणार आहोत. गतकाळाच्या आधारभूमीवर ठामपणे पावले रोवून, पण त्याचे कोणतेही ओझे मनावर न बाळगता, एका स्वच्छ भावनेने आपण या विषयाकडे वळू या आणि श्रीअरविंद व श्रीमाताजी या संदर्भात काय सांगतात ते जाणून घेऊ या.
वाचकांना ‘पूर्णयोगांतर्गत भक्ती’ हा भाग समजावून घेण्यामध्ये स्वारस्य वाटेल अशी आशा वाटते.
संपादक,
‘अभीप्सा’ मराठी मासिक