Tag Archive for: प्रतिकार

नैराश्यापासून सुटका – १७

 

प्राण सहसा परिवर्तनाच्या हाकेला प्रतिरोध करण्याचा प्रयत्न करतो, हाच बंडखोरी किंवा प्रतिकार याचा अर्थ आहे. आंतरिक इच्छेने आग्रह धरला आणि बंडखोरीला किंवा प्रतिकाराला प्रतिबंध केला तर, प्राणिक अनिच्छा बरेचदा नैराश्याचे आणि खिन्नतेचे रूप धारण करते. आणि जे शारीर-मन (physical mind) जुन्या कल्पना, सवयी, गतीविधी किंवा कृती यांच्या पुनरावृत्तीला आधार पुरवत असते त्याच शारीर-मनामधील प्रतिरोधाची साथ त्या अनिच्छेला मिळते. परिवर्तनाच्या हाकेला प्रतिसाद देण्याच्या भीतीमुळे किंवा आशंकेमुळे जेव्हा शारीर-चेतना (body consciousness) त्रस्त झालेली असते, तेव्हा ती त्या परिवर्तनाच्या हाकेपासून मागे सरकते किंवा मग तिच्यामध्ये एक प्रकारचा मंदपणा येतो, आणि ती त्या परिवर्तनाच्या हाकेचा स्वीकार करत नाही.

या गोष्टींपासून तुम्ही स्वतःची सुटका करून घेतलीच पाहिजे. पण त्यासाठी, दुःखी किंवा खिन्न मनोदशा ही योग्य परिस्थिती नव्हे. दुःख, वेदना आणि आशंका, काळजी या सर्व भावनांपासून तुम्ही अलिप्त झाला पाहिजे, त्यांना नकार दिला पाहिजे आणि होणाऱ्या प्रतिरोधाकडे शांतपणे पाहिले पाहिजे. त्याचवेळी, तुमच्यामध्ये असलेल्या परिवर्तनाच्या संकल्पाला नेहमी बळकटी देत राहिले पाहिजे. ईश्वरी साहाय्य लाभल्यामुळे, त्या ईश्वरी साहाय्याद्वारे आज ना उद्या परिवर्तन घडून येईलच आणि त्यामध्ये अपयश येणारच नाही यावर भर दिला पाहिजे. तेव्हा मग, साऱ्या अडचणींवर मात करू शकेल असे सामर्थ्य तुमच्यामध्ये येईल.

– श्रीअरविंद (CWSA 31 : 141)

साधना, योग आणि रूपांतरण – ३०४

अचेतनाचे रूपांतरण

(दि. ९ एप्रिल १९४७ रोजी श्रीअरविंद यांनी एका साधकाला लिहिलेल्या पत्रामधून…)

तुम्हाला या अडचणी इतक्या तीव्रतेने भेडसावत आहेत त्याचे कारण की योगसाधना आता ‘अचेतना’च्या आधारशिलेपर्यंत येऊन पोहोचली आहे. ही अचेतनता, आत्म्याच्या व ईश्वरी कार्याच्या विजयाला (ज्या विजयाकडे तिची वाटचाल चालली आहे त्या विजयाला) व्यक्तिगत स्तरावर व या जगामध्ये जो प्रतिकार होत असतो, त्या प्रतिकाराचा मूळ आधार आहे.

या अडचणी श्रीअरविंद-आश्रमामध्ये आणि बाहेरच्या जगामध्येसुद्धा आहेत. शंकाकुशंका, हतोत्साह, श्रद्धा कमी होणे किंवा नाहीशी होणे, आदर्शाबाबत असेलला प्राणिक जोम, उत्साह क्षीण होणे, मनाचा उडालेला गोंधळ आणि भवितव्याच्या आशेला बसलेला धक्का ही या अडचणींची सर्वसाधारण अशी लक्षणं आहेत.

बाहेरच्या जगामध्ये तर त्याची यापेक्षाही अधिक वाईट लक्षणं दिसून येत आहेत. उदाहरणार्थ, नैराश्यवादामध्ये झालेली वाढ, कोणत्याच गोष्टीवर विश्वास न ठेवणे, सचोटीमध्ये घट, प्रचंड प्रमाणात होणारा भष्ट्राचार, उच्चतर गोष्टी वगळून, अन्न, पैसा, सुखसोयी, मौजमजा यांमध्येच गुंतून पडणे आणि या जगामध्ये काहीतरी वाईट घडून येणार आहे याबद्दल असलेली एक सार्वत्रिक अपेक्षा, (अशा गोष्टी जगामध्ये दिसून येत आहेत.)

या गोष्टी कितीही भयंकर असल्या तरीही त्या तात्पुरत्या आहेत. आणि या जगामधील उर्जेची कार्यप्रणाली आणि आत्म्याची कार्यप्रणाली ज्यांना ज्ञात आहे अशा व्यक्तींची यासाठी तयारी करून घेण्यात आलेली आहे. हे असे निकृष्टतम घडून येणार हे मला आधी ज्ञात झाले होते, परंतु या गोष्टी म्हणजे उषःकालापूर्वीची रात्र आहे, त्यामुळे मी नाउमेद झालेलो नाही. या अंधकारापाठीमागे कशाची तयारी चालू आहे हे मला माहीत आहे, आणि त्याच्या आगमनाच्या प्रारंभिक काही खुणा मला दिसू लागल्या आहेत, मला त्या जाणवत आहेत. जे ईश्वराचा शोध घेण्यासाठी प्रयत्नशील आहेत त्यांनी त्यांच्या शोधकार्यामध्ये चिकाटी बाळगली पाहिजे, त्यावर दृढ राहिले पाहिजे. कालांतराने हा अंधकार भेदला जाईल, नाहीसा होईल आणि ‘दिव्य प्रकाश’ उदयास येईल.

– श्रीअरविंद (CWSA 31 : 619)

साधना, योग आणि रूपांतरण – २७४

शरीराचे रूपांतरण

व्यक्तिगत अडचणीप्रमाणेच जडभौतिक पृथ्वी-प्रकृतीमध्येही (physical earth-nature) एक सर्वसाधारण अडचण असते. जडभौतिक प्रकृती ही संथ, सुस्त आणि परिवर्तनासाठी अनिच्छुक असते. ढिम्म राहणे आणि अल्पशा प्रगतीसाठी दीर्घ काळ लावणे ही तिची प्रवृत्ती असते. अतिशय दृढ मानसिक किंवा प्राणिक किंवा आंतरात्मिक संकल्पालासुद्धा या जडतेवर मात करणे अतिशय अवघड जाते. वरून सातत्याने चेतना, शक्ती आणि प्रकाश खाली उतरवीत राहिल्यानेच या जडतेवर मात करता येणे शक्य असते. त्यासाठी आणि परिवर्तन करण्यासाठी व्यक्तीकडे सातत्यपूर्ण संकल्प व आस असणे आवश्यक असते. आणि शारीर-प्रकृतीने अतीव प्रतिकार केला तरी त्या प्रतिकारामुळे थकून जाणार नाही असा स्थिर आणि चिवट संकल्प असणे आवश्यक असते.

*

गहनतर शांती इत्यादीचा अभाव हे जडभौतिक नकाराचे मूळ स्वरूपच आहे आणि हा जडभौतिक नकारच जगामध्ये असणाऱ्या ‘ईश्वरा’चे अस्तित्व नाकारण्याचा समग्र पाया असतो. जडभौतिकामध्ये ज्या ज्या गोष्टींचा अंतर्भाव होतो त्या सर्व गोष्टी चिवट, हटवादी असतात आणि त्यांच्यामध्ये जडत्व आणि नकाराची प्रचंड ताकद असते. त्या गोष्टी जर तशा नसत्या तर साधना अतिशय लवकर पूर्ण झाली असती. शारीर-प्रतिकाराच्या या स्वभावधर्माला तुम्हाला सामोरे जावेच लागते आणि तो प्रतिकार कितीही वेळा उफाळून आला तरी त्याच्यावर पुन्हा पुन्हा मात करावीच लागते. पृथ्वी-चेतनच्या रूपांतरणासाठी ही किंमत मोजावी लागते.

– श्रीअरविंद (CWSA 31 : 359, 360)