साधना, योग आणि रूपांतरण – २५०
मानसिक रूपांतरण
शंकाकुशंकांना नकार देणे म्हणजे स्वतःच्या विचारांवर नियंत्रण मिळविणे, हे (तुमचे) म्हणणे निश्चितच योग्य आहे. योगसाधनेसाठी व्यक्तीने आपल्या शरीराच्या हालचालींवर किंवा स्वतःच्या प्राणिक इच्छावासनांवर, आवडीनिवडींवर नियंत्रण मिळविणे जितके आवश्यक असते, तेवढेच विचारांवर नियंत्रण मिळविणे आवश्यक असते. परंतु, हे नियंत्रण फक्त योगसाधनेसाठीच आवश्यक असते असे मात्र नाही. एखाद्याचे जर स्वतःच्या विचारांवर नियंत्रण नसेल, तो जर त्या विचारांचा साक्षी, अनुमन्ता, ईश्वर नसेल, तर तो मनुष्य पूर्णपणे विकसित झालेला मनोमय पुरुष आहे असे म्हणता येणार नाही.
इच्छावासना आणि आवेगांच्या वादळामधील सुकाणूविना होडी बनणे जसे योग्य नाही किंवा शरीराच्या जडत्वाचे किंवा आवेगांचे गुलाम बनणे जसे योग्य नाही तसेच व्यक्तीच्या मनोमय पुरुषाने बेलगाम आणि अनियंत्रित विचारांचा टेनिसचा चेंडू होणे हे सुद्धा योग्य नाही. मला हे माहीत आहे की, ही गोष्ट अधिक अवघड आहे कारण मनुष्य हा मूलतः मानसिक प्रकृतीचा प्राणी असल्याने तो मनाच्या गतिप्रवृत्तींशी स्वतःला एकरूप करतो आणि त्यामुळे तो स्वतःला एकाएकी त्या मनापासून अलिप्त करू शकत नाही आणि मनरूपी भोवऱ्याच्या गरगर फिरण्यापासून स्वतःला मुक्तही करू शकत नाही. शरीरावर किंवा शरीराच्या हालचालींच्या काही विशिष्ट भागावर नियंत्रण मिळविणे हे मनुष्याला तुलनेने सोपे असते. प्राणाच्या आवेगांवर आणि इच्छावासनांवर मनाद्वारे नियंत्रण मिळविणे हे काहीसे अवघड असले तरीही काहीशा संघर्षानंतर, ते शक्य असते. परंतु एखादा तांत्रिक योगी नदीच्या पाण्यावर (ध्यानस्थ) बसतो त्याप्रमाणे विचाररूपी भोवऱ्यावर आरुढ होणे हे काही तितकेसे सोपे नाही. असे असले तरीही ते करता येणे शक्य असते.
जी माणसं सर्वसामान्य माणसांच्या पुढे गेलेली असतात अशा सर्व विकसित मानसिक स्तरावरील माणसांना या ना त्या प्रकारे किंवा किमान काही विशिष्ट वेळी आणि काही विशिष्ट हेतुंसाठी मनाच्या दोन भागांना विलग करावे लागते; विचारांचा जणू कारखानाच असणारा असा मनाचा सक्रिय भाग आणि त्याच वेळी साक्षी असणारा, संकल्प करणारा, विचारांचे निरीक्षण करणारा, त्यांचे निर्णयन करणारा, त्यांना नकार देणारा, त्यांना वगळणारा, त्यांना स्वीकारणारा, त्यांच्यामध्ये सुधारणा आणि बदल घडवण्याची आज्ञा देणारा असा मनाचा एक (विचारांवर) प्रभुत्व बाळगणारा अविचल भाग असतो. तो मनाच्या निवासस्थानाचा स्वामी असतो, तो साम्राज्य उभारण्यासाठी सक्षम असतो.
योगी याच्याही अजून पुढे जातो. तो फक्त तेथीलच स्वामी असतो असे नव्हे तर तो मनामध्ये असतानाही, एक प्रकारे, मनातून जणू बाहेर पडतो आणि तो त्या मनाच्या वर उभा ठाकतो किंवा त्याच्यापासून मागे हटतो आणि (अशा प्रकारे तो) त्या मनापासून मुक्त होतो. आणि मग अशा योग्याच्या बाबतीत विचारांचा कारखाना ही प्रतिमा पुरेशी योग्य ठरत नाही. कारण विचार बाहेरून, वैश्विक मनाकडून किंवा वैश्विक प्रकृतीकडून आत येत असताना तो पाहतो. कधी ते विचार आकार धारण करून येतात आणि सुस्पष्ट असतात, तर कधीकधी ते विचार आकारविहीन असतात आणि ते आपल्यामध्ये प्रविष्ट झाल्यानंतर मग त्यांना आकार देण्यात येतो. या विचारतरंगांना (त्याचबरोबर प्राणिक लाटांना, सूक्ष्म शारीरिक ऊर्जेच्या लाटांनासुद्धा) नकार देणे किंवा त्यांचा स्वीकार करणे या दोन्हीपैकी कोणतातरी एक प्रतिसाद देणे किंवा परिसरीय ‘प्रकृती’तील विचारद्रव्याला किंवा प्राणिक गतिविधींना वैयक्तिक-मानसिक रूपाकार देणे हा मनाचा मुख्य उद्योग असतो.
हे सारे मला श्री. विष्णू भास्कर लेले यांनी दाखवून दिले आणि म्हणून मी त्यांचा अतिशय ऋणी आहे. ते म्हणाले, “ध्यानाला बसा, परंतु विचार करू नका, नुसते मनाकडे पाहत राहा. तुम्हाला असे दिसेल की विचार आतमध्ये प्रवेश करत आहेत. त्यांनी आत प्रवेश करण्यापूर्वीच त्यांना हद्दपार करा. तुमचे मन पूर्णपणे निश्चल-नीरव होईपर्यंत हे असे करत राहा.” विचार असे बाहेरून दृश्यरूपात मनामध्ये प्रवेश करतात हे मी त्यापूर्वी कधी ऐकले नव्हते परंतु त्याच्या सत्यतेबद्दल किंवा त्याच्या शक्यतेबद्दल शंका घ्यावी असा विचारही माझ्या मनाला शिवला नाही, मी ध्यानाला बसलो आणि त्यांच्या सांगण्याबरहुकूम तसे केले. उंच गिरीशिखरांवर निर्वात हवा असावी त्याप्रमाणे माझे मन क्षणार्धात निश्चल-नीरव झाले. आणि तेव्हा मला असे दिसले की एका पाठोपाठ एक विचार बाहेरून मनात प्रवेश करण्याच्या प्रयत्नांत आहेत. मात्र त्यांनी आत प्रवेश करून, माझ्या मेंदूचा ताबा घेण्यापूर्वीच मी त्यांना बाहेरच्या बाहेरच घालवून देत होतो आणि अशा रीतीने मी तीन दिवसातच विचारमुक्त झालो.
आणि तत्त्वतः त्या क्षणापासून माझ्यामधील मनोमय पुरुष जणू मुक्त बुद्धीच झाला होता, तो म्हणजे जणू एक वैश्विक मनच झाले होते. तो आता विचारांच्या कारख्यानात काम करणाऱ्या कामगारासारखा स्वतःच्या संकुचित वर्तुळापुरताच मर्यादित राहिला नव्हता तर, आता तो व्यक्तित्वाच्या शेकडो प्रांतांमधून ज्ञान ग्रहण करणारा झाला होता. दृश्याच्या आणि विचाराच्या साम्राज्यामधून त्याला वाटेल त्याची निवड करण्यास आता तो मुक्त झाला होता. मनोमय पुरुषाच्या संभाव्यता या मर्यादित नसतात आणि तो स्वतःच्या घराचा स्वामी आणि मुक्त साक्षी होऊ शकतो, हे सुस्पष्टपणे सांगण्यासाठीच मी याचा उल्लेख केला आहे.
मी या निर्णायक गतिविधींबाबतीत जी त्वरा केली त्याच त्वरेने, आणि ज्या पद्धतीचा अवलंब केला त्याच मार्गाचा अवलंब सर्वजण करू शकतात, असे मला म्हणायचे नाही. (अर्थात, या नवीन बंधनमुक्त अशा मानसिक शक्तीचा संपूर्ण विकास होण्यासाठी मला काही वर्षे लागली.) ज्या व्यक्तीपाशी श्रद्धा असते आणि प्रयत्न करण्याची इच्छा असते, अशा व्यक्तीला मनावर स्वामित्व मिळविणे आणि प्रगमनशील स्वातंत्र्य मिळविणे या गोष्टी शक्य असतात.
– श्रीअरविंद (CWSA 24 : 1257-1258)