साधना, योग आणि रूपांतरण – १२४
(उत्तरार्ध)
आध्यात्मिक मुक्तीचे साधन म्हणून भगवद्गीता सातत्याने कर्माचे समर्थन करत आहे. भक्ती आणि ज्ञानमार्गाप्रमाणेच कर्ममार्गाचे महत्त्वही प्रतिपादन करत आहे. कृष्ण कर्माचा एक अधिक उच्चतर अर्थ लावू पाहत आहे. कर्म निरपेक्षपणे केले पाहिजे, बक्षिसाच्या किंवा कर्मफलाच्या आसक्तीविना, निरहंकारी भूमिकेतून वा वृत्तीने, ‘ईश्वरा’प्रत केलेले अर्पण किंवा अर्पण केलेली समिधा या स्वरूपात कर्म केले गेले पाहिजे, असे त्याचे सांगणे आहे. धर्माला अनुसरून आणि योग्य प्रकारे कर्म केल्यास, कोणत्याही प्रकारचे कर्म करण्यास हरकत नाही, अशा कर्माने ‘ईश्वरा’कडे जाण्याच्या मार्गात कोणतीही बाधा येत नाही किंवा आध्यात्मिक ज्ञानाचा आणि आध्यात्मिक जीवनाचा मार्गही त्याने अवरूद्ध (prevent) होत नाही. या गोष्टींकडे पाहण्याचा भारताचा हा दृष्टिकोन पूर्वापार चालत आलेला आहे.
अर्थातच एक संन्यासवादी ध्येयसुद्धा काही जणांसाठी आवश्यक असते आणि आध्यात्मिक व्यवस्थेमध्ये त्यालाही स्थान आहे. मी स्वतःसुद्धा असे म्हणतो की, व्यक्तीला जर एखाद्या तपस्व्याप्रमाणे जीवन जगता आले नाही किंवा एखाद्या एकान्तवासामध्ये राहणाऱ्या व्यक्तीप्रमाणे अगदी किमान गरजांमध्ये जीवन जगता आले नाही तर ती व्यक्ती आध्यात्मिकदृष्ट्या परिपूर्ण होऊ शकत नाही. हे उघडच आहे की, हावरटपणा, किंवा इतर कोणताही लोभ, किंवा अशा प्रकारची कोणतीही आसक्ती ही गोष्ट व्यक्तीच्या चेतनेमधून त्यागणे जितके आवश्यक असते त्याचप्रकारे संपत्तीची हाव आणि नफेखोरी या गोष्टीदेखील त्याच्या प्रकृतीमधून नाहीशा झाल्या पाहिजेत.
परंतु आध्यात्मिक पूर्णतेसाठी संन्यासमार्ग हा अगदी अनिवार्य आहे किंवा संन्यासमार्ग म्हणजेच आध्यात्मिक मार्ग, असे मी मानत नाही. एखाद्या कार्यामध्ये किंवा कोणत्याही कर्मामध्ये, किंवा ‘ईश्वरा’ला आपल्याकडून ज्या कर्माची अपेक्षा आहे त्या सर्व प्रकारच्या कर्मांमध्येसुद्धा अहंकार आणि कर्मफलाच्या इच्छेचा त्याग करून, ‘ईश्वरा’प्रत समर्पण करण्याचा, आध्यात्मिक आत्मदान करण्याचा आणि आध्यात्मिक आत्म-प्रभुत्वाचा आणखी एक मार्गदेखील आहे. तसे नसते तर, भारतामध्ये जनक किंवा विदुरासारख्या थोर आध्यात्मिक व्यक्ती आढळल्या नसत्या; इतकेच काय कृष्णदेखील आढळला नसता; किंवा अगदी असताच तर तो कृष्ण वृंदावन, मथुरा, द्वारका यांचा अधिपती झाला नसता; तो राजपुत्र आणि योद्धा किंवा कुरूक्षेत्रातील सारथी झाला नसता; तर तो फक्त एक थोर तपस्वीच बनून राहिला असता. महाभारतामध्ये किंवा अन्यत्र, भारतीय धर्मशास्त्रामध्ये आणि भारतीय परंपरेमध्ये, जीवनाच्या परित्यागावर आधारित आध्यात्मिकतेला आणि कर्मप्रधान आध्यात्मिक जीवनाला समान स्थान देण्यात आलेले आहे. जीवनाच्या परित्यागावर भर देणारा संन्यासमार्ग हाच तेवढा भारतीय परंपरेतून आलेला आहे, आणि ‘सर्वकर्माणि’, सर्वप्रकारच्या कर्मांचा आणि जीवनाचा स्वीकार हा मार्ग युरोपियन किंवा पाश्चात्त्य आहे, तो आध्यात्मिक नाही, किंवा तो भारतीय नाही असे म्हणता येत नाही.
– श्रीअरविंद (CWSA 29 : 249-250)