साधना, योग आणि रूपांतरण – २४६
मनाचे रूपांतरण
(आध्यात्मिक) अनुभव येत असतो तेव्हा त्याचा विचार करणे किंवा शंका घेणे, प्रश्न उपस्थित करणे हे चुकीचे असते. (कारण) त्यामुळे तो अनुभव थांबून जातो किंवा तो अनुभव क्षीण होतो. (तुम्ही वर्णन केलेत त्याप्रमाणे जर) ती ‘नवी प्राणशक्ती’ असेल किंवा शांती असेल किंवा ‘शक्ती’ असेल किंवा अन्य एखादी उपयुक्त गोष्ट असेल तर तो अनुभव पूर्णपणे येऊ दिला पाहिजे. एकदा का ती अनुभव-प्रक्रिया संपली की, मग तुम्ही त्याचा विचार करण्यास हरकत नाही, परंतु तो अनुभव येत असताना मात्र त्याचा विचार करता कामा नये. कारण अशा प्रकारचे अनुभव हे आध्यात्मिक असतात, ते मानसिक स्तरावरचे नसतात आणि म्हणून येथे मनाने कोणतीही लुडबूड न करता शांत, अविचल राहणेच आवश्यक असते.
*
मनाच्या अधीरतेवर थोडे नियंत्रण ठेवणे आवश्यक असते. ज्ञान हे प्रगमनशील असते. एकाएकी त्याने झेपावून शिखरावर जायचा प्रयत्न केला तर, त्याच्याकडून घाईघाईने काहीतरी अशा रचना होण्याची शक्यता असते की ज्या त्याला नंतर रद्दबादल कराव्या लागतात. ज्ञान व अनुभव हे टप्याटप्प्याने आणि कलेकलेनेच येणे आवश्यक असते.
*
सर्वोच्च ‘सत्य’ म्हणून जे मनासमोर सादर करण्यात आलेले असते ते चपळाईने पकडावे अशी एक विशिष्ट प्रकारची घाई मनामध्ये नेहमीच आढळून येते. ती टाळता येण्यासारखी नसते, परंतु व्यक्ती मनामध्ये जितकी अधिक स्थिरशांत झालेली असेल तेवढे त्या घाईमुळे गोष्टी बिघडण्याचे प्रमाण कमी होईल.
*
आलेल्या अनुभवावर अट्टहासाने ताबा मिळविण्याचा प्रयत्न करणे हा नेहमीच मनाच्या आणि प्राणाच्या अडथळ्यांपैकी एक मुख्य अडथळा असतो.
– श्रीअरविंद (CWSA 30 : 47-48), (CWSA 31 : 24,23,23)