साधना, योग आणि रूपांतरण – १३७

एक संकल्पना अशी आहे की, अगदी सामान्य जीवनामध्ये, व्यक्ती जे जे काही करत असते त्याचे श्रेय तिचा अहंकार घेत असला तरी, (वास्तविक) व्यक्ती ही ‘वैश्विक ऊर्जे’च्या हातातील केवळ एक साधन असते.

योगामध्ये अशी संकल्पना आहे की, योग्य रीतीने (ग्रहणशील, उन्मुख स्थितीत) अक्रिय (passive) राहिल्यामुळे, व्यक्ती स्वतःच्या सीमित ‘स्व’पेक्षा अधिक महान अशा एखाद्या गोष्टीप्रत खुली होते आणि ती अवस्था साध्य करण्यासाठीच प्रयत्न उपयुक्त ठरतात.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 108)

साधना, योग आणि रूपांतरण – १३६

‘ईश्वरी शक्ती’ ग्रहण करण्याची क्षमता येण्यासाठी आणि त्या शक्तीला तुमच्या माध्यमाद्वारे बाह्य जीवनव्यवहारामध्ये कार्य करता यावे यासाठी तुमच्यामध्ये खालील तीन गोष्टी असणे आवश्यक असते.

०१) ‘अविचलता, समता’ – म्हणजे घडणाऱ्या कोणत्याही घटनेने विचलित न होणे, मन स्थिरचित्त व दृढ ठेवणे, घडणाऱ्या घटनांकडे हा विविध शक्तींचा खेळ आहे या दृष्टिकोनातून पाहूनसुद्धा स्वतः समचित्त राहणे.

०२) ‘निरतिशय श्रद्धा’ – म्हणजे जे घडेल ते चांगल्यासाठीच घडेल अशी श्रद्धा बाळगणे, पण त्याचबरोबर, व्यक्ती जर स्वतःला (ईश्वराचे) खरेखुरे साधन बनवू शकली तर, ‘कर्तव्यम् कर्म’ हे त्याचे आपल्याला मिळालेले फळ असेल अशी श्रद्धा त्या व्यक्तीने बाळगणे. ‘ईश्वरी प्रकाशा’चे मार्गदर्शन प्राप्त झालेल्या त्या व्यक्तीच्या इच्छेला, जे कर्म केले पाहिजे असे जाणवते ते कर्म म्हणजे ‘कर्तव्यम् कर्म.’

०३) ‘ग्रहणशीलता’ – ‘ईश्वरी शक्ती’चा स्वीकार करण्याची आणि त्यामध्ये त्या शक्तीची व श्रीमाताजींची उपस्थिती अनुभवण्याची ताकद व्यक्तीमध्ये असणे तसेच, व्यक्तीने स्वत:च्या दृष्टीला, इच्छेला व कृतीला मार्गदर्शन करण्याचे कार्य ‘ईश्वरी शक्ती’ला करू देणे म्हणजे ग्रहणशीलता.

व्यक्तीला जर या ‘शक्ती’ची आणि तिच्या उपस्थितीची जाणीव होऊ शकली आणि व्यक्तीने कर्मातील चेतनेला घडणसुलभतेचे (plasticity) वळण लावले तर, अंतिम परिणामाची खात्री असते. अर्थात ही घडणसुलभता केवळ ‘ईश्वरी शक्ती’बाबत असली पाहिजे, त्यामध्ये कोणत्याही परक्या तत्त्वाची भेसळ होऊ देता कामा नये.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 266)

साधना, योग आणि रूपांतरण – १३५

एखादी कृती योग्य आहे की अयोग्य याविषयी तुम्ही सजग होऊ इच्छित असाल आणि तशी आस बाळगत असाल तर, ती गोष्ट खालील मार्गांपैकी कोणत्या तरी एका मार्गाने घडून येते –

१) तुमच्या हालचालींकडे साक्षित्वाने पाहण्याची एक क्षमता तुमच्यामध्ये निर्माण होते किंवा तशी सवय तुम्हाला लागते, ज्यामुळे तुम्ही, तुम्हाला कृती करण्यास उद्युक्त करणाऱ्या आवेगाकडे आणि त्याच्या स्वरूपाकडेसुद्धा पाहू शकता.

२) तुमच्यामध्ये एखादा चुकीचा विचार किंवा तुम्हाला कृती करण्यास उद्युक्त करणारा एखादा चुकीचा आवेग किंवा भावना निर्माण झाली की, लगेचच, जिला बेचैनी, अस्वस्थता जाणवते अशा प्रकारची एक चेतना तुमच्यामध्ये उदयास येऊ शकते.

३) जेव्हा तुम्ही एखादी चुकीची कृती करण्यास उद्युक्त होणार असता तेव्हा, तत्क्षणी तुमच्या अंतरंगातील कोणीतरी तुम्हाला सावध करते आणि ती कृती करण्यापासून तुम्हाला परावृत्त करते.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 260-261)

साधना, योग आणि रूपांतरण – १३४

(कर्म करत असताना कधी एकदम उल्हसित, उत्साही वाटते तर कधी शांत वाटते, हे असे का होत असावे असे एका साधकाने विचारले आहे, असे दिसते. त्यावर श्रीअरविंद यांनी दिलेले हे उत्तर…)

कर्म करत असताना, तुमच्या ज्या मनोवस्था असतात त्या दोन मनोवस्थांच्या (moods) परिणामांमध्ये फरक दिसून येतो; याचे कारण असे की, पहिली मनोवस्था ही प्राणिक हर्षोल्हासाची (vital joy) आहे, तर दुसरी मनोवस्था ही आंतरात्मिक शांतीची (psychic quiet) आहे. प्राणिक हर्षोल्हास हा सामान्य मानवी जीवनात जरी अतिशय साहाय्यकारी असला तरी तो काहीसा उत्तेजित, अधीर असतो आणि अस्थिर पायावर उभा असल्यामुळे चंचल असतो. आणि म्हणूनच तो लवकर थकून जातो आणि पुढे टिकून राहू शकत नाही.

प्राणिक हर्षोल्हासाची जागा निश्चल, स्थिर अशा आंतरात्मिक आनंदाने घेतली गेली पाहिजे आणि त्याचवेळी मन व प्राण हे अतिशय निर्मळ आणि अत्यंत शांतिपूर्ण असले पाहिजेत. जेव्हा व्यक्ती या आधारावर कर्म करते तेव्हा ती, श्रीमाताजींच्या शक्तीच्या संपर्कात येते आणि त्यामुळे सर्वकाही आनंदमय आणि सुकर होते; आणि मग थकवा येत नाही किंवा नैराश्यही येत नाही.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 252)

साधना, योग आणि रूपांतरण – १३३

तुम्ही कर्म करत असतानाच फक्त तुमच्या कर्माचा विचार करा, त्याचा विचार आधीही करू नका किंवा ते कर्म पूर्ण झाल्यानंतरही करू नका. जे कर्म पूर्ण झाले आहे त्याकडे तुमच्या मनाला परत फिरू देऊ नका. कारण ते कर्म भूतकाळाचा भाग झालेले असते आणि त्याचा पुनःपुन्हा विचार करणे हा शक्तीचा अपव्यय असतो. जे कर्म करायचे आहे त्यासंबंधी अटकळ बांधण्यामध्ये तुमच्या मनाला उगाच आधीपासूनच शीणवू नका. मनाच्या या दोन सवयी त्याच्या गतकालीन कार्यप्रणालीचा भाग असतात, या सवयी टाकण्यासाठी रूपांतरकारी ‘शक्ती’ दबाव टाकत असते; परंतु शारीर-मनाने त्या सवयींना चिकटून राहणे हे तुमच्या ताणतणावाचे आणि थकव्याचे कारण असते. तुमच्यामध्ये कार्यरत असणारी ‘शक्ती’ त्या कर्माच्या वेळी त्याकडे लक्ष पुरवेल. मनाच्या कार्याची आवश्यकता असेल तेव्हाच तुमच्या मनाला त्याची कृती करू द्यायची हे जर तुम्ही लक्षात ठेवू शकलात तर तुमचा ताण हलका होईल आणि (कालांतराने) निघून जाईल. खरंतर, अतिमानसिक क्रियेने (तुमच्या) शारीर-मनाचा ताबा घेऊन, त्यामध्ये दिव्य ‘प्रकाशा’ची उत्स्फूर्त कृती करण्यापूर्वीची ही संक्रमणशील अवस्था असते.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 287)

साधना, योग आणि रूपांतरण – १३२

तुम्हाला न आवडणारे काम तुम्ही केलेच पाहिजे असे नाही, मात्र तुम्ही आवड-निवडच सोडून दिली पाहिजे. तुम्हाला आवडते तेवढेच काम करणे म्हणजे प्राणाचे चोचले पुरविण्यासारखे आणि त्याचे तुमच्या प्रकृतीवर वर्चस्व चालवू देण्यासारखे आहे. कारण जीवनव्यवहारांवर आवडी-निवडीचे प्राबल्य असणे हेच तर अरूपांतरित प्रकृतीचे लक्षण असते.

कोणतीही गोष्ट समत्वाने करता येणे हे कर्मयोगाचे तत्त्व आहे आणि ते कर्म श्रीमाताजींसाठी करायचे असल्याने, ते आनंदाने करणे ही पूर्णयोगाची खरी प्राणिक आणि आंतरात्मिक अवस्था असते.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 248)

साधना, योग आणि रूपांतरण – १३१

कर्म हे ‘पूर्णयोगा’चे एक आवश्यक अंग आहे. तुम्ही जर कर्म केले नाहीत आणि सगळा वेळ जर ‘ध्याना’मध्येच व्यतीत केलात तर तुमची साधना व तुम्ही तुमची वास्तवावरील पकड गमावून बसाल; (तुमची जीवनव्यवहाराशी फारकत होईल.) आणि तुम्ही स्वतःच्याच, व्यक्तिनिष्ठ अशा कोणत्यातरी अनियंत्रित कल्पनांमध्ये वाहवत जाऊन, स्वतःला हरवून बसाल…

भौतिक वास्तवाच्या (जीवनव्यवहारातील) सर्व संबंधांना दूर लोटून आणि (तुमच्या वस्तुनिष्ठ अस्तित्वाकडे लक्ष न पुरवता) केवळ एकाच म्हणजे व्यक्तिनिष्ठ अस्तित्वामध्येच (आंतरिक जीवनामध्ये) निवृत्त होऊन, तुम्ही चुकीच्या मार्गाला जात आहात आणि तुमची साधना तुम्ही धोक्यात आणत आहात, हे मी तुम्हाला निक्षून सांगतो…

सर्व प्रकारची आसक्ती आणि आत्म-रती या गोष्टी घातक असतात. वस्तुनिष्ठ जीवनातील ‘सत्य’ बाजूला ठेवणे आणि आसक्ती बाळगणे तसेच व्यक्तिनिष्ठ अनुभव व दूरस्थ ‘ध्यानादी’ गोष्टींमध्ये आत्म-रत होणे, या गोष्टी इतर कोणत्याही गोष्टींइतक्याच धोकादायक असतात. अशा चुका करू नका आणि साधनेचा खरा समतोल पुन्हा संपादन करून घ्या. तुम्हाला भौतिक जीवनामध्ये जर अंतरात्मा प्राप्त व्हावा असे वाटत असेल तर, केवळ ध्यानाला बसून आणि अमूर्त अनुभव घेऊन तो प्राप्त होणार नाही. भौतिक जीवन व त्यातील कर्मं यामध्ये त्याचा शोध घेतल्यानेच आणि प्रत्यक्षात इथे उपस्थित असलेल्या श्रीमाताजींचे आज्ञापालन केल्याने व कर्म-समर्पण केल्याने, तसेच श्रीमाताजींचे कार्य केल्याने तो तुम्हाला प्राप्त होईल.

– श्रीअरविंद (CWSA 32 : 248-250)

साधना, योग आणि रूपांतरण – १२९

एक क्षण असा येईल की, जेव्हा तुम्ही कर्ते नसून फक्त एक साधन आहात, हे तुम्हाला अधिकाधिक जाणवू लागेल. सुरुवातीला तुमच्या भक्तीच्या शक्तीने ‘दिव्य माते’बरोबर असलेला तुमचा संपर्क इतका प्रगाढ होईल की, तिचे मार्गदर्शन मिळावे, तिची थेट आज्ञा किंवा प्रेरणा मिळावी, नेमकी कोणती गोष्ट केली पाहिजे याबाबत खात्रीशीर संकेत मिळावा, ती गोष्ट करण्याचा मार्ग सापडावा आणि त्याचा परिणाम दिसून यावा, म्हणून तुम्ही सदा सर्वकाळ फक्त एकाग्रता करणे आणि सारे काही तिच्या हाती सोपविणे पुरेसे ठरेल. आणि मग कालांतराने तुमच्या हे लक्षात येईल की, दिव्य ‘शक्ती’ आपल्याला केवळ प्रेरणा देते किंवा मार्गदर्शनच करते असे नाही तर ती आपल्या कर्माचा आरंभही करते आणि तीच ते कर्म घडवते देखील! तेव्हा तुम्हाला तुमच्या साऱ्या गतिविधी, हालचाली, कृती या तिच्यापासूनच उगम पावत आहेत, तुमच्या साऱ्या शक्ती या तिच्याच आहेत; तुमचे मन, प्राण, शरीर यांना तिच्या कार्याचे सचेत आणि आनंदी साधन बनले असल्याची, तिच्या लीलेचे माध्यम बनले असल्याची जाणीव होईल; या जडभौतिक विश्वामध्ये आपण तिच्या आविष्करणाचे साचे बनलो आहोत अशी जाणीव तुम्हाला होईल. एकत्वाच्या आणि अवलंबित्वाच्या अवस्थेएवढी दुसरी कोणतीही आनंदी अवस्था असू शकत नाही; कारण ही पायरी तुम्हाला तुमच्या अज्ञानजन्य दुःखपूर्ण व तणावपूर्ण जीवनाच्या सीमारेषेच्या पलीकडे, तुमच्या आध्यात्मिक अस्तित्वाच्या सत्यामध्ये, सखोल शांतीमध्ये आणि त्याच्या उत्कट आनंदामध्ये घेऊन जाते.

हे रूपांतरण होत असताना, अहंकारात्मक विकृतीच्या सर्व कलंकापासून तुम्ही स्वतःला अ-बाधित ठेवण्याची नेहमीपेक्षाही अधिक आवश्यकता असते. तसेच आत्म-दानाच्या आणि त्यागाच्या शुद्धतेला कलंक लागेल अशी कोणतीही मागणी वा कोणताही आग्रहदेखील तुम्ही धरता कामा नये. कर्म किंवा त्याचे फळ यासंबंधी कोणतीही आसक्ती तुमच्यामध्ये असता कामा नये, तुम्ही कोणत्याही अटी त्या दिव्य शक्तीवर लादता कामा नयेत. मी त्या दिव्य शक्तीचे साधन बनलो आहे असा कोणताही ताठा, घमेंड किंवा अहंकार तुम्हाला असता कामा नये. त्या दिव्य शक्तींचा वापर तुमच्या मनाच्या, प्राणाच्या किंवा शरीराच्या वैयक्तिक समाधानासाठी किंवा वापरासाठी करून, तुमच्या माध्यमाद्वारे कार्यरत असणाऱ्या त्या शक्तींची महानता तुम्ही विकृत करता कामा नये. तुमची श्रद्धा, तुमचा प्रामाणिकपणा, तुमच्या अभीप्सेची शुद्धता तुमच्या अस्तित्वाच्या साऱ्या स्तरांना, साऱ्या प्रतलांना व्यापणारी असली पाहिजे, ती निरपेक्ष असली पाहिजे; तेव्हा मग अस्वस्थ करणारा प्रत्येक घटक, विकृत करणारा प्रत्येक प्रभाव तुमच्या प्रकृतीमधून एकेक करून निघून जाईल. (क्रमश:)

– श्रीअरविंद (CWSA 32 : 12-13)

साधना, योग आणि रूपांतरण – १२८

तुम्हाला जर ईश्वरी कार्य करणारा सच्चा कार्यकर्ता व्हायचे असेल तर, सर्व इच्छा- वासनांपासून आणि स्व-केंद्रित अहंकारापासून पूर्णतः मुक्त असणे हे तुमचे पहिले उद्दिष्ट असले पाहिजे. तुमचे संपूर्ण जीवन म्हणजे ‘परमेश्वरा’प्रत केलेले एक अर्पण असले पाहिजे, एक यज्ञ असला पाहिजे. कर्म करण्यामागचे तुमचे एकमेव उद्दिष्ट (ईश्वराची) सेवा करणे, (दिव्य शक्ती) ग्रहण करणे, परिपूर्ण होणे आणि ‘दिव्य शक्ती’च्या कार्यामध्ये तिचे आविष्करण करणारे एक साधन बनणे हेच असले पाहिजे. तुम्ही दिव्य चेतनेमध्ये अशा रीतीने वृद्धिंगत होत राहिले पाहिजे की, एक दिवस तुमची इच्छा आणि तिचा संकल्प यामध्ये कोणताही भेद शिल्लक राहणार नाही. तिच्या ऊर्मीखेरीज अन्य कोणतीही प्रेरणा तुमच्यामध्ये असता कामा नये, तुमच्यामध्ये आणि तुमच्या माध्यमातून घडणाऱ्या तिच्या सचेत कार्याशिवाय अन्य कोणतेही कर्म (तुमच्यामध्ये शिल्लक) असता कामा नये. अशा प्रकारचे गतिमान एकत्व साधण्याची क्षमता जोवर तुमच्यामध्ये येत नाही तोपर्यंत, आपण स्वतः म्हणजे दिव्य शक्तीच्या सेवेसाठी तयार करण्यात आलेला, सारी कर्मे तिच्यासाठीच करणारा एक देह आणि आत्मा आहोत, असे तुम्ही स्वतःला समजले पाहिजे.

स्वतंत्र कर्तेपणाची भावना तुमच्यामध्ये अजूनही खूप प्रभावी असली आणि कर्म करणारा मीच आहे, अशी तुमची भावना असली तरीसुद्धा तुम्ही ते कर्म त्या दिव्य शक्तीसाठीच केले पाहिजे. अहंकारी निवडीवरील भर व त्याचा सर्व ताणतणाव, वैयक्तिक लाभासाठीची सर्व लालसा, स्वार्थी इच्छांच्या सर्व अटी या (तुमच्या) प्रकृतीमधून तुम्ही काढून टाकल्या पाहिजेत. तेथे फळाची कोणतीही मागणी असता कामा नये, तसेच काहीतरी बक्षीस मिळावे म्हणून धडपड असता कामा नये. ‘दिव्य माते’चा संतोष आणि तिच्या कार्याची परिपूर्ती हेच तुमचे एकमेव फळ आणि दिव्य चेतनेमध्ये सातत्यपूर्ण प्रगती आणि स्थिरता, सामर्थ्य, आणि आनंद हेच तुमचे पारितोषिक! सेवेचा आनंद आणि कर्मामधून मिळणारा आंतरिक विकासाचा आनंद हा निःस्वार्थी कार्यकर्त्यासाठी पुरेसा मोबदला असतो. (क्रमश:)

– श्रीअरविंद (CWSA 32 : 12)

साधना, योग आणि रूपांतरण – १२७

कर्मासाठी केलेले कर्म किंवा परतफेडीची, पारितोषिकाची किंवा कोणत्याही वैयक्तिक फळाची वा मोबदल्याची अपेक्षा न करता, इतरांसाठी केलेले कर्म असा सर्वसाधारणपणे, निरपेक्ष कर्माचा अर्थ होतो. परंतु ‘योगा’मध्ये मात्र ‘ईश्वरा’साठी केलेले इच्छाविरहित कर्म, हे कोणत्याही अटीविना वा मागणीविना एक अर्पण म्हणून केले जाते; केवळ ‘ईश्वरेच्छा’ म्हणूनच केले जाते अथवा ‘ईश्वरा’च्या प्रेमापोटी ते केले जाते, असा त्याचा अर्थ होतो.

*

स्वतःची आंतरिक प्रगती आणि परिपूर्णता यासाठी योगसाधना करणे हेच केवळ तुमचे उद्दिष्ट असता कामा नये तर, ‘ईश्वरा’साठी कार्य करायचे हेदेखील तुमचे उद्दिष्ट असले पाहिजे.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 231)