एकत्व – ०३

संकल्प दृढ ठेवा. तुमच्यातील अडेलतट्टू घटकांना, आज्ञापालन न करणाऱ्या मुलांना ज्याप्रमाणे वागवतात त्याप्रमाणे, वागणूक द्या. त्यांच्यावर सातत्यपूर्वक, सहनशीलतेने कार्य करा. त्यांना त्यांच्या चुका समजावून सांगा.

तुमच्या जाणिवांच्या आत खोलवर चैत्य पुरुष असतो. हा चैत्य पुरुष म्हणजे तुमच्या अंतरंगामध्ये असणाऱ्या ईश्वराचे मंदिर असते. हे असे केंद्र असते की, ज्याच्या भोवती तुमच्यातील विभिन्न असणाऱ्या सर्व घटकांचे, तुमच्या अस्तित्वामधील सगळ्या परस्परविरोधी हालचालींचे एकीकरण झाले पाहिजे. एकदा का तुम्हाला त्या चैत्य पुरुषाची चेतना व त्याची अभीप्सा आत्मसात झाली की, सगळ्या शंका, अडचणी नाहीशा होऊ शकतात. त्याला कमी-अधिक वेळ लागेल, परंतु अंतत: तुम्ही यशस्वी होणार हे निश्चित ! एकदा जरी तुम्ही ईश्वरोन्मुख झाला असाल आणि म्हणाला असाल की, “मला तुझे होऊन रहावयाचे आहे. आणि त्याने ‘हो” असे म्हटले असेल, तर जगातील कोणतीच शक्ती तुम्हाला त्यापासून रोखू शकत नाही. जेव्हा जीवात्मा स्वत:चे समर्पण करतो, तेव्हा मुख्य अडचणच नाहीशी होते. बाह्य अस्तित्व हे केवळ एखाद्या कवचाप्रमाणे असते. सामान्य व्यक्तींमध्ये हे कवच इतके कठीण आणि जाड असते की, त्यामुळे ते त्यांच्या अंतरंगामध्ये असणाऱ्या ईश्वराबाबत यत्किंचितही जागरुक नसतात. एकदा, अगदी एका क्षणासाठी जरी, अंतरात्मा म्हणला असेल, ”मी इथे आहे आणि मी तुझाच आहे;” तर एक प्रकारचा सेतू निर्माण होतो आणि मग ते कवच हळूहळू पातळ पातळ होत जाते. जोपर्यंत आंतरिक अस्तित्व आणि बाह्य अस्तित्व हे दोन्ही भाग पूर्णपणे जोडले जाऊन, एकच होऊन जात नाहीत तोवर ही प्रक्रिया चालू राहते.

– श्रीमाताजी
(CWM 03 : 07)

एकत्व – ०२

 

आपण जर एखाद्या धार्मिक संघटनेचे उदाहरण घेतले – तर त्या संघाचे प्रतीक म्हणजे मठासारख्या वास्तुरचना, एकसमान पोषाख, एकसमान उपक्रम, एकसमान हालचालीसुद्धा असतात. मी अधिक स्पष्ट करून सांगते. प्रत्येकजण एकसारखाच गणवेश परिधान करेल, प्रत्येक जण सकाळी ठरावीक वेळीच उठेल, एकसारख्याच प्रकारचे अन्नग्रहण करेल, एकत्रितपणे येऊन समानच प्रार्थना करतील इ. ह्याला एक सर्वसाधारण अशी एकसमानता म्हणता येईल. आणि साहजिकपणेच, आंतरिकदृष्ट्या तेथे जाणिवांचा गोंधळ आढळून येतो, कारण प्रत्येक जण त्याच्या त्याच्या पद्धतीने वागत असतो. ही अशी एकरूपता जी विश्वास आणि विशिष्ट मतप्रणालीवर आधारित असते ती, सर्वस्वी ‘आभासी एकरूपता’ असते.

माणसांमध्ये ही अशी सामूहिकता नेहमी पाहावयास मिळते. समूहाने एकत्र यायचे, संबंधित राहायचे, एखाद्या समान आदर्शाभोवती, समान कृतीभोवती, समान साक्षात्काराभोवती एकसंघ राहावयाचे पण हे सारे काहीशा कृत्रिम पद्धतीने चालते. याउलट, श्रीअरविंद येथे खराखुरा समुदाय काय असतो ते सांगत आहेत – त्याला त्यांनी ‘विज्ञान वा अतिमानसिक समुदाय’ असे म्हटले आहे – असा हा समुदाय त्यातील प्रत्येक घटकाच्या आंतरिक साक्षात्काराच्या पायावरच उभा राहू शकतो. त्यातील प्रत्येक घटक हा त्या समुदायातील इतर घटकांबरोबरच्या खऱ्याखुऱ्या, मूर्त अशा एकात्मतेसाठी, एकरूपतेसाठी झटत असतो. म्हणजे असे की, समुदायातील इतर सर्व घटकांशी या ना त्या प्रकारे एखादा घटक जोडला गेलेला आहे, असे नव्हे; तर, त्यातील प्रत्येक घटक हा इतरांशी आंतरिकरित्या, सगळेजण म्हणजे जणू एकच आहेत ह्या पद्धतीने जोडलेला असतो. प्रत्येक व्यक्तीसाठी इतर घटक हे जणूकाही त्याच्या स्वतःच्या शरीराप्रमाणेच असतील, केवळ मानसिकरित्या, कृत्रिमपणाने नाही तर, एका आंतरिक साक्षात्काराद्वारा, चेतनेच्या वास्तविकतेच्या द्वारे देखील ते तसेच असतील.

म्हणजे, ही अतिमानसिक सामुदायिकता प्रत्यक्षात उतरविण्याची आशा बाळगण्यापूर्वी, आधी प्रत्येक व्यक्तीने विज्ञानमय अस्तित्व बनावयास हवे किंवा किमान ते बनण्याकडे वाटचाल तरी केली पाहिजे. हे तर उघडच आहे की, व्यक्तिगत कार्य हे आधी पुढे गेले पाहिजे आणि सामुदायिक कार्याने त्याचे अनुसरण केले पाहिजे. परंतु प्रत्यक्षात असे होते की, कोणत्याही अमुक एखाद्या इच्छेच्या हस्तक्षेपाविनाही, सहजगत्या, व्यक्तिगत प्रगती ही समुहाच्या अवस्थेमुळे नियंत्रित केली जाते, रोखली जाते. व्यक्ती आणि समाज ह्यांच्यामध्ये परस्परावलंबित्व असते आणि व्यक्तीने कितीही प्रयत्न केला तरीही, व्यक्ती त्यापासून स्वतःला मुक्त करू शकत नाही. आणि अगदी एखाद्या व्यक्तीने, ह्या पूर्णयोगात जरी स्वतःला पार्थिव आणि मानवी जाणिवेच्या स्थितीच्या अतीत होऊन, मुक्त होण्याचा प्रयत्न केला तरीही, किमान अवचेतनेमध्ये तरी, ती व्यक्ती समूहाच्या स्थितीमुळे बांधली जाते, समूहाची स्थिती एखाद्या रोधकाप्रमाणे काम करते आणि खरंतर ती मागे खेचते. व्यक्तीने कितीही वेगाने जाण्याचा प्रयत्न केला तरी, सर्व आसक्ती आणि जबाबदाऱ्यांचे ओझे टाकून देण्याचा प्रयत्न केला तरी, अगदी काहीही असले तरीसुद्धा, अगदी एखादी व्यक्ती शिखरस्थानी असली तरीसुद्धा आणि उत्क्रांतीच्या वाटचालीमध्ये ती सर्वात पुढे असली तरीसुद्धा, सर्वांच्या साक्षात्कारावर, या पृथ्वीनिवासी समुदायाच्या स्थितीवर त्याचा साक्षात्कार अवलंबून असतो. आणि यामुळे खरोखरच व्यक्ती मागे खेचली जाते. इतकी मागे खेचली जाते की, जे घडवून आणायचे आहे ते प्रत्यक्षात येण्यासाठी, या पृथ्वीची तयारी होण्यासाठी, कधीकधी व्यक्तीला शतकानुशतके देखील थांबावे लागते.

म्हणूनच श्रीअरविंद असे म्हणतात, दुहेरी प्रक्रिया आवश्यक आहे. व्यक्तीच्या प्रगतीचे आणि साक्षात्काराचे प्रयत्न हे समग्र समुहाच्या उत्थानाच्या प्रयत्नांच्या हातात हात घालून चालले पाहिजेत, कारण व्यक्तीच्या महत्तर प्रगतीसाठी ते आवश्यक आहे. त्याला सामुहिक प्रगती असे म्हणता येईल, ह्या प्रगतीमुळे व्यक्तीला अजून एक पाऊल पुढे टाकणे शक्य होईल.

– श्रीमाताजी
(CWM 09 : 141-42)

एकत्व ०१

आत्ताच्या घडीला करायलाच हवे असे सर्वांत उपयुक्त कार्य कोणते? ‘क्रमवार विकसित होणाऱ्या वैश्विक सुसंवादित्वाचे आगमन’ ही गोष्ट साध्य करणे, हे सर्वसाधारण ध्येय असले पाहिजे.

पृथ्वीच्या संदर्भात, हे साध्य प्राप्त करून घेण्याचे साधन म्हणजे जे ‘एकम्’ आहे अशा आंतरिक दिव्यत्वाचे, सर्वांकडून आविष्करण आणि त्या ‘एकम्’ विषयीच्या जागृतीद्वारे, मानवी एकतेचे प्रत्यक्षीकरण हे होय.

आपल्या अंतरंगामध्ये असलेल्या ईश्वराचे साम्राज्य स्थापन करून, त्याद्वारे ऐक्य निर्माण करणे, हा ह्याचा अर्थ आहे.

त्यासाठी अतिशय उपयुक्त असणारे पुढील कार्य करावयास हवे –

१) व्यक्तिगत कार्य : व्यक्तीने आपल्या अंतरंगात असणाऱ्या ईश्वरी अस्तित्वाविषयी जागृत होणे आणि त्याच्याशी ऐक्य संपादन करणे.

२) मानवामधील आत्तापर्यंत जागृत नसलेल्या अस्तित्वातील अवस्थांचे व्यक्तिकरण (individualise) करणे आणि त्याद्वारे पृथ्वीपासून आजवर कुलूपबंद असलेल्या, एक किंवा अधिक वैश्विक शक्तींच्या उगमांशी, पृथ्वीचा संबंध जुळवून आणणे.

३) सद्यकालीन मानसिकतेशी मिळत्याजुळत्या अशा एका नवीनच रूपामध्ये शाश्वत वचन जगासमोर पुन्हा मांडणे. आजवरच्या सर्व मानवी ज्ञानाचा तो समन्वय असेल.

४) सामूहिक कार्य : एका शुभंकर अशा स्थानी, नव्याने फुलून येणाऱ्या नूतन वंशाची, ईश्वरपुत्रांच्या वंशाची एक आदर्श समाजव्यवस्था प्रस्थापित करणे.

– श्रीमाताजी
(CWM 02 : 49)

जो सर्व अडथळ्यांवर मात करून विजयी होतो, त्या ईश्वरा, तुझा जयजयकार असो.

आम्हास असे वरदान दे की, आमच्यातील कोणतीही गोष्ट तुझ्या कार्यात अडसर ठरू नये.

आम्हास असे वरदान दे की, कोणत्याही गोष्टीमुळे तुझ्या आविष्करणामध्ये विलंब होणार नाही.

आम्हास असे वरदान दे की, प्रत्येक क्षणी, सर्व गोष्टींमध्ये तुझीच इच्छा कार्यरत होईल.

तुझ्या मन:संकल्पाची परिपूर्ती आमच्यामध्ये होऊ दे, आमच्या प्रत्येक घटकामध्ये, आमच्या अस्तित्वाच्या प्रत्येक कृतीमध्ये, आमच्या सर्वोच्च उंचीपासून ते आमच्या देहाच्या अगदी सूक्ष्मतम अशा पेशींपर्यंत तुझीच इच्छा पूर्णत्वाला जाऊ दे, यासाठी आम्ही तुझ्यासमोर उभे आहोत.

आम्हास असे वरदान दे की, आम्ही तुझ्याप्रत कायमच पूर्णपणे एकनिष्ठ राहू.

आम्हास असे वरदान दे की, इतर कोणताही प्रभाव वगळून, आम्ही पूर्णत: तुझ्याच प्रभावाला खुले राहू.

आम्हास असे वरदान दे की, आम्ही तुझ्याप्रत एक गहन आणि उत्कट कृतज्ञता बाळगण्यास कधीही विसरणार नाही.

आम्हास असे वरदान दे की, तुझ्याकडून प्रसादरूपाने, हरघडी मिळणाऱ्या अद्भुत गोष्टींचा आमच्याकडून कधीही अपव्यय होणार नाही.

आम्हास असे वरदान दे की, आमच्यामधील सर्व गोष्टी तुझ्या कार्यात सहभागी होतील आणि तुझ्या साक्षात्कारासाठी सज्ज होतील.

सर्व साक्षात्कारांच्या परमोच्च स्वामी असणाऱ्या हे ईश्वरा, तुझा जयजयकार असो. आम्हाला तुझ्या विजयाबद्दलची सक्रिय आणि उत्कट, परिपूर्ण आणि अविचल अशी श्रद्धा प्रदान कर.

– श्रीमाताजी
(CWM 01 : 382)

ज्याला तुझी सेवा करण्यासाठी पात्र बनायचे आहे त्याने कशालाच चिकटून राहता कामा नये, अगदी ज्या कामकाजामुळे त्याला तुझ्याशी अधिकाधिक जाणीवपूर्वकतेने संपर्क साधता येतो अशा कामकाजाची देखील त्याने आसक्ती बाळगता कामा नये.

आणि समग्र परिस्थितीचा परिणाम म्हणून, जर त्याच्या जीवनातील बरीचशी जागा ही नेहमीपेक्षाही अधिक भौतिक गोष्टींनी व्यापली जात असेल, तर त्यामध्ये त्याने गुंतून कसे पडू नये आणि त्याच्या हृदयाच्या अंतर-हृदयामध्ये त्याने तुझ्या अस्तित्वाची स्पष्ट जाण कशी बाळगावी आणि कशानेही विचलित होऊ शकणार नाही अशा त्या प्रगाढ शांतीमध्ये सतत कसे राहावे, हे त्याला माहीत असले पाहिजे.

हे प्रभो, सर्व गोष्टींमध्ये, तसेच सर्वत्र तुझेच दर्शन घेत कार्य करणे आणि अशा पद्धतीने कृती केली जात असल्यामुळे – एरवी बंदिवान म्हणून आपल्याला पृथ्वीशी जखडून ठेवणाऱ्या बेड्या न पडता – त्या कृतीच्या कितीतरी वर जाऊन झेपावणे…

हे प्रभो, मी जे तुला माझ्या अस्तित्वाचे अर्पण करत आहे ते अधिकाधिक परिणामकारक आणि समग्र ठरावे, असा आशीर्वाद दे.

हे अनिर्वचनीय सारतत्त्वा, अकल्पनीय सत्यरूपा, अनाम एकमेवाद्वितीया, अत्यंत आदराने आणि प्रेमपूर्ण भक्तीने मी, तुझ्यासमोर नतमस्तक होत आहे.

– श्रीमाताजी
(CWM 01 : 84)

(सौजन्य : @AbhipsaMarathiMasik – अभीप्सा मराठी मासिक)

हे ईश्वरा, मला तुझा प्रकाश प्रदान कर. हे प्रभो, माझ्या हातून कधीही चूक घडू नये असे मला वरदान दे. माझ्यामध्ये तुझ्याविषयी जो परम आदर आहे, तुझ्याविषयीची जी परमभक्ती आहे, तुझ्याविषयी माझ्या मनात जे उत्कट आणि गभीर प्रेम आहे ते प्रेम, ती भक्ती, तो आदर दीप्तीमान होत, विश्वास उत्पन्न करणारा होत, सहवासामुळे इतरांमध्येही प्रसृत होत, सर्वांच्या हृदयामध्ये उदित होऊ दे.

हे प्रभो, शाश्वत स्वामी, तूच आहेस माझा प्रकाश आणि माझी शांती ! माझा मार्गदर्शक हो, तूच माझे डोळे उघड, माझे हृदय उजळवून टाक आणि जो थेट तुझ्याकडेच घेऊन जाईल असा मार्ग मला दाखव.

हे ईश्वरा, तुझ्या इच्छेव्यतिरिक्त माझी कोणतीही अन्य इच्छा असता कामा नये आणि माझ्या कृती या तुझ्या दिव्य कायद्याची अभिव्यक्ती असतील, असे वरदान दे.

तुझ्या दिव्य प्रकाशाचा ओघ माझे संपूर्ण अस्तित्व व्यापून टाकत आहे आणि मला आता तुझ्या व्यतिरिक्त अन्य कशाचेही भान नाही, केवळ तुझीच…..

शांती, शांती, शांती, या पृथ्वीवर शांती.

– श्रीमाताजी
(CWM 01 : 39)

हे ईश्वरा, जरी एखाद्याने नीरव एकांतवासामध्ये, पूर्ण समाधी अवस्था प्राप्त करून घेतली तरी ती अवस्था त्याने स्वत:च्या शरीरापासून स्वत:स विलग करून, शरीराची उपेक्षा करून मिळविलेली असते आणि त्यामुळे ज्या घटकांनी देह बनलेला असतो ते घटक तसेच अशुद्ध, आधीइतकेच अपूर्ण राहून जातात, कारण त्याने त्यांना तसेच सोडून दिलेले असते. आणि गूढवादाची शिकवण चुकीच्या रीतीने आकलन झाल्यामुळे, अतिभौतिकाच्या वैभवाने मोहित होऊन, स्वतःच्या वैयक्तिक समाधानासाठी जेव्हा तुझ्याशी एकत्व पावण्याची अहंभावी इच्छा तो बाळगतो, तेव्हा त्याने त्याच्या पार्थिव अस्तित्वाच्या मूळ कारणाकडेच पाठ फिरविलेली असण्याची शक्यता असते. ‘जडभौतिकाचे शुद्धीकरण आणि त्याचा उद्धार’ हे त्याचे खरे जीवितकार्य पूर्ण करण्यास, त्याने एखाद्या भित्र्या माणसाप्रमाणे नकार दिलेला असू शकतो. आपल्या अस्तित्वातील एखादा भाग हा संपूर्णत: शुद्ध झाला आहे हे जाणणे, त्या शुद्धतेशी संबंध प्रस्थापित करणे, त्याच्याशी एकत्व पावणे हे सारे तेव्हाच उपयुक्त ठरू शकते, जेव्हा हे ज्ञान या पृथ्वीचे रूपांतरण करण्याच्या प्रक्रियेमध्ये त्वरा करण्यासाठी, म्हणजेच तुझे उदात्त कार्य पूर्ण करण्यासाठी उपयोगात आणले जाते.

– श्रीमाताजी
(CWM 01 : 20)

माझ्या सगळ्या भौतिक जबाबदाऱ्या संपल्या रे संपल्या की, त्याबाबतचे सर्व विचार माझ्या मनातून पार नाहीसे होतात आणि मग मी केवळ आणि समग्रतया तुझ्या विचारांनी व्याप्त होते, तुझ्या सेवेमध्ये निमग्न होते. आणि मग एका गभीर शांतीमध्ये आणि प्रसन्नतेमध्ये, माझी इच्छा तुझ्या इच्छेशी एकरूप करते आणि त्या परिपूर्ण शांतीमध्ये मी तुझे सत्य ऐकते, त्या सत्याची अभिव्यक्ती ऐकते. तुझ्या इच्छेविषयी जागृत होण्याने आणि आपली इच्छा त्याच्या इच्छेशी एकरूप करण्यामध्येच खऱ्याखुऱ्या स्वतंत्रतेचे आणि सर्वशक्तिमानतेचे रहस्य सापडते; शक्तीच्या पुनरुज्जीवनाचे आणि जीवाच्या रूपांतरणाचे रहस्यही त्यामध्येच सापडते.

तुझ्याशी सदोदित व समग्रतया एकत्व पावलेले असण्यामध्येच – आम्ही आतील आणि बाहेरील, सर्व अडथळ्यांवर मात करू शकतो, सर्व संकटांवर विजय मिळवू शकतो – ह्याची खात्री सामावलेली आहे.

हे ईश्वरा, माझे हृदय असीम आनंदाने भरून गेले आहे, माझ्या मस्तकामध्ये आनंदगानाच्या अद्भुत लाटाच जणु उसळत आहेत आणि तुझ्या निश्चित विजयाच्या पूर्ण खात्रीमध्येच मला सार्वभौम शांती आणि अजेय शक्ती अनुभवास येत आहे. तू माझ्या सर्व अस्तित्वामध्ये भरून गेला आहेस, तूच त्यामध्ये संजीवन आणतोस, माझ्या अस्तित्वामधील दडलेले झरे तूच प्रवाहित करतोस, तू माझ्या आकलनास उजाळा देतोस, तू माझे जीवन उत्कट बनवितोस, तू माझ्यामधील प्रेमाची दसपटीने वृद्धी करतोस, आणि आता मला हे उमगत नाही की, हे ब्रह्मांड म्हणजे मी आहे की, मी हे ब्रह्मांड आहे. मला हे उमगत नाही की, तू माझ्यामध्ये आहेस की, मी तुझ्यामध्ये आहे; आता केवळ तूच आहेस; सारे काही तूच आहेस आणि तुझ्या अनंत कृपेच्या प्रवाहाने हे विश्व भरून, ओसंडून वाहत आहे.

भूमींनो, गान करा. लोकांनो, गान करा. मानवांनो, गान करा. तिथे दिव्य सुसंवाद अस्तित्वात आहे.

– श्रीमाताजी
(CWM 01 : 19)

शांतपणे तेवणाऱ्या एखाद्या ज्योतीप्रमाणे, कोणतीही वेडीवाकडी वळणे न घेता, सरळ वर जाणाऱ्या सुगंधाप्रमाणे, माझे प्रेम सरळ तुझ्याप्रत जात आहे आणि एखाद्या बालकाप्रमाणे, कोणत्याही तार्किकतेविना, किंवा कोणत्याही काळजीविना, मी तुझ्याप्रत असा विश्वास बाळगत आहे की, तुझा मानस प्रत्यक्षात उतरेल, तुझा प्रकाश उजळून येईल, तुझी शांती सर्वत्र प्रसृत होईल. आणि तुझे प्रेम विश्वावर पांघरले जाईल. जेव्हा तुझी इच्छा असेल की, मी तुझ्यामध्ये असावे, मी तूच व्हावे तेव्हा मग आपल्यामध्ये कोणताही भेद उरलेला नसेल. त्या कृपांकित क्षणांची मी कोणत्याही अधीरतेविना वाट पाहत आहे; एखादा शांतपणे वाहणारा झरा जसा असीम सागराकडे प्रवाहित होत असतो, तशीच मी स्वत:ला त्या क्षणांप्रत अप्रतिहतपणे जाऊ देत आहे.

तुझी शांती माझ्यामध्ये आहे आणि त्या शांतीमध्ये मी हे पाहत आहे की, या अवघ्या चराचरात एकमेव तूच विद्यमान आहेस, तू सर्वत्र चिरकालाच्या स्थिरतेनिशी निवास करत आहेस.

– श्रीमाताजी
(CWM 01 : 11)

जेव्हा तुम्ही योगमार्गाकडे वळता तेव्हा, तुमच्या सर्व मानसिक रचना आणि तुमचे सर्व प्राणिक मनोरे कोलमडून पडले तरी चालतील, अशी स्वत:ची तयारी ठेवली पाहिजे. तुमच्या श्रद्धेखेरीज तुम्हाला इतर कोणत्याही गोष्टीचा आधार नाही, अशा निराधार अवस्थेत हवेत लटकत राहण्याची तुमची तयारी असली पाहिजे. तुम्ही तुमचा भूतकालीन ‘स्व’ आणि त्याला चिकटून असलेले सर्व काही पूर्णांशाने विसरले पाहिजे, तुमच्या चेतनेमधून त्या उपटून फेकून दिल्या पाहिजेत आणि सर्व प्रकारच्या बंधनांपासून मुक्त अशा स्थितीत नव्याने जन्माला आले पाहिजे. तुम्ही काय होतात ह्याचा विचार करू नका, पण तुम्हाला काय व्हायचे आहे, त्याच अभीप्सेचा विचार करा; जे तुम्ही प्रत्यक्षात उतरवू पाहत आहात त्याच्यामध्येच तुम्ही असले पाहिजे. तुमच्या मृत भूतकाळाकडे पाठ फिरवा आणि भविष्याकडे पाहा. ईश्वर हाच तुमचा धर्म, ईश्वर हाच तुमचा देश, ईश्वर हेच तुमचे कुटुंब.

– श्रीमाताजी
(CWM 03 : 82-84)