समाजजीवनात धर्माची आवश्यकता असते, कारण सामूहिक अहंकारावर उपाय म्हणून धर्माचा उपयोग होतो, या नियंत्रणाविना हा सामूहिक अहंकार प्रमाणाबाहेर वाढू शकतो.

व्यक्तीच्या चेतनेच्या पातळीपेक्षा सामूहिक चेतनेची पातळी नेहमीच निम्न असते, हे लक्षात येण्याजोगे आहे. उदा. जेव्हा माणसं मोठ्या संख्येने एखाद्या गटात एकत्रित येतात तेव्हा त्यांच्या चेतनेची पातळी खूप घसरते. जमावाची चेतना ही व्यक्ती-चेतनेपेक्षा खालच्या स्तरावरची असते आणि समाजाची सामूहिक चेतना ही, ज्या व्यक्तींनी तो समाज बनलेला आहे त्या व्यक्तींच्या चेतनेपेक्षा खचितच खालच्या पातळीवरची असते. त्यासाठी धर्माची आवश्यकता आहे. सामान्य जीवनात, व्यक्तीला त्याची जाणीव असो वा नसो, तिला नेहमीच एक धर्म असतो, कधीकधी ह्या धर्माचे उद्दिष्ट अगदी कनिष्ठ प्रकारचे देखील असू शकते….

ती व्यक्ती ज्या देवाची पूजा करते ती यशाची देवता असेल, पैशाची देवता असेल, सत्तेची देवता असेल, किंवा अगदी कुलदेवता असेल, मुलाबाळांची देवता, कुटुंबाची किंवा कुळाची देवता, पूर्वजांची देवता असू शकेल.

धर्म हा नेहमीच अस्तित्वात असतो. प्रत्येक व्यक्तीगणिक त्या धर्माचा दर्जा वेगवेगळा असेल, पण अस्तित्वाचा केंद्रबिंदू असणाऱ्या कोणत्याही मूलभूत आदर्शाविना नुसतेच जीवन जगत राहणे हे माणसाला कठीण असते. बऱ्याचदा त्याला त्याच्या आदर्शाची जाणही नसते आणि जर त्याला विचारले की, तुझा आदर्श काय तर तो शब्दांतदेखील सांगू शकणार नाही, पण त्याचा काही एक धर्म असतो, भले तो अस्पष्ट, धूसर असेल, पण त्याच्या जीवनाच्या दृष्टीने ती खूप मोलाची गोष्ट असते.

बहुतांशी लोकांसाठी ते एक प्रकारचे संरक्षण असते. व्यक्तीला त्यामुळे जगण्यासाठी सुरक्षित वाटेल अशी परिस्थिती प्राप्त होते. त्याच्या दृष्टीने ते फार मोठे ध्येय असते. मानवी प्रयत्नांमागची ती एक मोठी प्रेरणा असते असेही म्हणता येईल. काही लोकांसाठी समाधान ही मोठी गोष्ट असते, तर काही जणांसाठी मौजमजा, चैन ही गोष्ट मोठी असते.

ह्या गोष्टी खरंतर खूप निम्न स्तरावरच्या आहेत आणि त्याला एका ध्येयाचे नाव देण्याची इच्छाही होत नाही, पण त्या गोष्टी धर्माची रूपे आहेत; त्या गोष्टी म्हणजे असे काहीतरी होय की ज्यासाठी व्यक्तीला आपले संपूर्ण जीवन खर्ची घालावे असे वाटू शकते…. आधार म्हणून अशा गोष्टींचा वापर करून, अनेक गोष्टी मानवावर आपला प्रभाव टाकण्याची धडपड करीत असतात. माणसांमधील असुरक्षिततेची भावना, अनिश्चिततेची भावना ह्याच गोष्टींचा वापर करून, राजकीय किंवा धार्मिक समूह त्यांच्यावर प्रभाव टाकू पाहतात. ते या भावनांशी खेळू पाहतात. प्रत्येक राजकीय वा सामाजिक संकल्पना ही एखाद्या धर्माच्या मूलभूत आदर्शाची भ्रष्ट अशी अभिव्यक्ती असते. व्यक्तीमध्ये एकदा का विचाराची शक्ती आली की, तेथे ताबडतोब क्षणोक्षणीच्या ह्या अगदी पशुवत अशा दैनंदिन जीवनापेक्षा, काहीतरी उच्चतर अशी आकांक्षा अपरिहार्यपणे त्याच्यामध्ये उदय पावते; आणि त्यातूनच त्याला जगण्याची उमेद आणि ऊर्जा प्राप्त होते. पण फारच थोडी माणसं स्वतंत्रपणे विचार करू शकतात, अशा वेळी त्यांनी स्वत:साठी स्वत:चाच एखादा वेगळा पंथ काढण्यापेक्षा, कोणत्यातरी धर्माचा स्वीकार करणे, त्यामध्ये सहभागी होणे, आणि त्या धार्मिक सामूहिकतेचा एक भाग बनणे हे अधिक सुकर असते. त्यामुळे वरवर पाहता, एखादी व्यक्ती ह्या धर्माची वा त्या धर्माची असते, पण हे फक्त वरवरचे भेद असतात.

– श्रीमाताजी
(CWM 09 : 354-356)

सामान्य जीवनामध्ये बुद्धीचे क्षेत्र ज्या परिघापर्यंत आहे तेथवर तर्कबुद्धी मूल्यमापन करू शकते. आणि श्रीअरविंदांनी जसे म्हटले आहे त्याप्रमाणे, सामान्य मानवी जीवनात प्राणिक आणि मानसिक कृतींवर नियंत्रण ठेवणे, त्यांचे नियमन करणे हेच तर्कबुद्धीचे खरेखुरे कार्य होय.

उदाहरणार्थ, जर कोणा व्यक्तीमध्ये प्राणिक असमतोल असेल, विकार असतील, आवेग, वासना आणि तत्सम इतर गोष्टी असतील आणि अशा वेळी जर त्या व्यक्तीने तर्कबुद्धीचा आश्रय घेतला आणि त्या तर्कबुद्धीचा वापर करून त्या दृष्टीने या गोष्टींकडे पाहावयाचा प्रयत्न केला तर, ती व्यक्ती या सर्व गोष्टी परत सुव्यव्यस्थित करू शकते. प्राण आणि मन यांच्या सर्व हालचाली संघटित करणे आणि नियमित करणे हे तर्कबुद्धीचे खरे कार्य होय.

उदाहरण द्यायचे झाले तर, दोन संकल्पना एकमेकींशी मिळत्याजुळत्या आहेत की, त्या एकमेकींच्या विरोधी आहेत; आपल्या मानसिक संरचनेमध्ये दोन सिद्धान्त एकमेकांना पूरक आहेत की, ते सिद्धान्त एकमेकांना मारक आहेत हे पाहण्यासाठी आपण तर्कबुद्धीचा आश्रय घेऊ शकतो. सर्व गोष्टी पारखणे आणि त्यांची सुव्यवस्था लावणे आणि त्यापेक्षा देखील अमुक एखादा आवेग हा उचित म्हणजे तर्कसंगत आहे की अनुचित आहे, त्यातून काही अरिष्ट तर उद्भवणार नाही ना हे पाहणे किंवा ज्यामुळे आयुष्यामध्ये फारसे काही बिघडणार नाही, तो आवेग चालवून देण्याजोगा आहे का, हे पाहण्याचे काम तर्कबुद्धीचे आहे. हे तर्कबुद्धीचे खरे कार्यक्षेत्र आहे, हा श्रीअरविंदांच्या म्हणण्याचा अर्थ आहे.

– श्रीमाताजी
(CWM 07 : 166-167)

बाळाची संकल्पपूर्वक गर्भधारणा ही अतिशय दुर्मीळ अशी बाब आहे. अगणित पालकांमधील अगदी थोडेच पालक असे असतात की ज्यांना बाळ कसे असावे याची थोडीतरी पर्वा असते, अनेकांना हे देखील माहीत नसते की ते जसे आहेत त्यावर बाळ कसे असणार हे अवलंबून आहे. काही थोड्या अभिजनांनाच हे माहीत असते. बऱ्याचदा गोष्टी जशा घडू शकतात तशा घडतात, काहीही होऊ शकते आणि काय घडत आहे ह्याची लोकांना जाणीवच नसते. तेव्हा अशा परिस्थितीत तुम्हाला साहाय्यक ठरेल अशा तऱ्हेचा पुरेसा विशुद्ध असा प्राणिक जीव जन्माला येईल अशी अपेक्षा तुम्ही कशी बाळगू शकता? व्यक्ती जन्माला येताना मृत त्वचा घेऊनच जन्माला आलेली असते, ती स्वच्छ केल्याशिवाय तिला जगण्याची सुरुवातच करता येत नाही.

एकदा का तुम्ही आंतरिक रुपांतरणाच्या दृष्टीने चांगला प्रारंभ केला आणि जर तुम्ही जीवाच्या मुळाशी अवचेतनेपर्यंत प्रवास केला तर – जे तुमच्यामध्ये तुमच्या पालकांकडून, अनुवंशिकतेतून आलेले असते – ते तुम्हाला दिसू लागते. बहुतांशी या सर्वच अडचणी तेथे आधीपासूनच असतात, जन्मानंतरच्या पहिल्या काही वर्षांमध्ये ज्यांची भर पडते अशा गोष्टी फारच थोड्या असतात. आणि अशा गोष्टी कोणत्याही आकस्मिक क्षणीदेखील घडू शकतात; जर तुम्ही वाईट संगतीमध्ये राहिलात, वाईट पुस्तके वाचलीत, तर ते विष तुमच्यामध्ये शिरेल; अशावेळी या गोष्टींचे अवचेतनामध्ये खोलवर उमटलेले ठसे आणि तुमच्या वाईट सवयी यांच्या विरुद्ध तुम्हाला झगडावे लागते.

उदाहरणार्थ, असे काही लोक असतात की ज्यांना खोटे बोलल्याशिवाय तोंडच उघडता येत नाही; ते नेहमीच तसे जाणीवपूर्वक करतात असेही नाही (ते जास्तच घातक आहे.) किंवा असे काही लोक असतात की जे इतरांच्या संपर्कात आले की भांडल्याशिवाय राहूच शकत नाहीत, अशा गोष्टी त्यांच्या अवचेतनेमध्ये खोलवर रुजलेल्या असतात.

जेव्हा तुम्ही चांगली इच्छा बाळगता, तेव्हा बाह्यत: तुम्ही या सर्व गोष्टी टाळण्याचा, शक्य असेल तर त्या दुरुस्त करण्याचा हरप्रकारे प्रयत्न करता, त्यावर तुम्ही काम करता, त्यांच्याशी मुकाबला करता; आणि मग तुम्हाला अशी जाणीव होते की या गोष्टी सारख्या सारख्या वर येत आहेत, जो भाग तुमच्या नियंत्रणावाचून सुटलेला आहे अशा भागातून त्या वर येत आहेत.

पण जर का तुम्ही तुमच्या अवचेतनेमध्ये प्रवेश केलात, तुमच्या चेतनेला त्यामध्ये प्रवेश करू दिलात आणि काळजीपूर्वक पाहू लागलात तर मग तुम्हाला हळूहळू तुमच्या अडचणींचे मूळ, उगम कोठे आहे त्याचा शोध लागतो; तुमचे आईवडील, आजी आजोबा कसे होते हे तुम्हाला कळू लागते आणि एखाद्या विशिष्ट घडीला तुम्ही स्वत:वर ताबा मिळवू शकत नाही तेव्हा तुम्हाला कळते, ”मी असा आहे कारण ते तसे होते.”

तुमच्या कडे लक्ष ठेवून असणारा, तुमची मार्गावर तयारी करून घेणारा असा पुरेसा जागृत चैत्य पुरुष जर तुमच्यामध्ये असेल तर तो तुमच्याकडे तुम्हाला साहाय्यक ठरतील अशा गोष्टी, माणसे, पुस्तके, परिस्थिती खेचून आणू शकतो. कोणा परोपकारी, कृपाळू इच्छेमुळेच जणू घडले असावेत असे छोटे छोटे योगायोग घडून येतात आणि तुम्हाला काही सूचना, काही मदत, निर्णय घेण्यासाठी काही आधार पुरविण्यात येतात आणि तुम्ही योग्य दिशेला वळवितात.

पण एकदा का तुम्ही निर्णय घेतला, तुमच्या जीवाचे सत्य शोधून काढायचे एकदा का तुम्ही ठरविलेत, तुम्ही त्या मार्गावरून प्रामाणिकपणे वाटचाल करावयास सुरुवात केली तर, तुमच्या प्रगतीसाठी मदत व्हावी म्हणून जणू कोणीतरी संगनमताने सारे घडवीत आहे असे वाटू लागते.

आणि जर तुम्ही काळजीपूर्वक निरीक्षण केलेत तर हळूहळू तुम्हाला तुमच्या अडचणींचे मूळ दिसू लागते : “ओह! हा दोष माझ्या वडिलांमध्ये होता तर, अरेच्चा, ही तर माझ्या आईची सवय आहे; खरंच, माझी आजी अशी होती, माझे आजोबाही असे होते.” असे तुम्हाला जाणवू लागते. किंवा मग तुम्ही लहान असताना जिने तुमची काळजी घेतली होती अशी कोणी तुमची आया असेल, किंवा तुम्ही ज्यांच्याबरोबर खेळलात, बागडलात ती तुमची बहीणभावंडे असतील, तुमचे मित्रमैत्रिणी असतील, यांच्यात किंवा त्यांच्यात काहीतरी असलेले तुम्हाला तुमच्यामध्ये सापडेल.

पण जर तुम्ही प्रामाणिक राहिलात तर या सगळ्या गोष्टी तुम्ही शांतपणे पार करू शकाल, असे तुम्हाला आढळून येईल. आणि कालांतराने ज्या बंधांनिशी तुम्ही जन्माला आला होतात ते सारे बंध, त्या साऱ्या साखळ्या तुम्ही तोडाल आणि तुमच्या मार्गावर अगदी मुक्तपणे पुढे जाल.

जर तुम्हाला तुमचे व्यक्तिमत्त्व बदलायचे असेल तर तुम्ही हे केलेच पाहिजे. नेहमीच असे सांगितले जाते की एखाद्याची प्रकृती बदलणे अशक्य आहे; सर्व तत्त्वज्ञानाची पुस्तके, अगदी योग सुद्धा असेच सांगतो, तुम्हाला असेच सांगितले जाते की “तुम्ही तुमची प्रकृती बदलू शकत नाही कारण तुमच्या जन्माबरोबरच ती आलेली असते, तुम्ही तसेच आहात.”

पण हे पूर्णपणे चुकीचे आहे, मी खात्रीपूर्वक सांगू शकते की हे खोटे आहे. पण तुमची प्रकृती, तुमचा स्वभाव बदलण्यासाठी खूप अवघड गोष्ट करावी लागते. तुम्हाला तुमची प्रकृती केवळ बदलावयाची नसते तर तुमच्या पूर्वजांची प्रकृती बदलावयची असते. तुम्ही त्यांच्यामध्ये बदल घडवून आणू शकत नाही कारण त्यांचा तसा कोणताही हेतू नसतो, पण तुम्हाला तुमच्यामध्ये ती बदलावयाची असते.

त्या गोष्टी ज्या त्यांनी तुम्हाला दिलेल्या असतात, तुमच्या जन्माबरोबर जणू या छोट्या भेटवस्तूच तुम्हाला मिळालेल्या असतात – त्या बदलावयाच्या असतात. या गोष्टींचा मूळ, खरा धागा मिळविण्यात जर का तुम्ही यशस्वी झालात, आणि जर तुम्ही त्यावर चिकाटीने आणि प्रामाणिकपणे काम केलेत तर एखाद्या अवचित क्षणी तुम्ही त्यापासून मुक्त व्हाल; ते सारे काही तुमच्यापासून गळून पडलेले असेल आणि तुम्ही कोणत्याही ओझ्याविना एका नवीन जीवनाची सुरुवात करण्यास सक्षम झालेले असाल.

तेव्हा तुम्ही कोणी एक नवीनच व्यक्ती असाल, एका नवीन स्वभावाने, नवीन प्रकृतीनिशी एक नवीन जीवन जगत असाल. आणि जर तुम्ही मागे वळून पाहिलेत तर तुम्ही म्हणाल, ”हे शक्य नाही, मी असा कधीच नव्हतो.”

– श्रीमाताजी
(CWM 04 : 260-262)

साधारणपणे शंभर वर्षे किंवा त्याहूनही अधिक काळ समस्त मानवजात एका आजाराने ग्रासली आहे आणि तो आजार दिवसेंदिवस अधिक पसरत चाललेला दिसत आहे आणि आता तर आपल्या काळात त्याने उग्र रूप धारण केले आहे; त्याला आपण ‘उपयुक्ततावाद’ म्हणतो. माणसे आणि वस्तू, परिस्थिती आणि कृती, उपक्रम या गोष्टी जणूकाही केवळ त्याच दृष्टिकोनातून बघितल्या जातात आणि जोखल्या जातात असे वाटते. जर एखादी गोष्ट उपयुक्त नसेल तर तिला काही मोलच नसते. जे अजिबात उपयुक्त नाही त्यापेक्षा काहीतरी जे उपयुक्त आहे ते निश्चितच अधिक चांगले आहे. पण यासाठी उपयुक्त म्हणजे काय यावर आधी आपले एकमत व्हावे लागेल – उपयुक्त कोणासाठी, उपयुक्त काय आणि कशासाठी ? ह्याची व्याख्या करावी लागेल.

जे मानववंश स्वत:ला सुसंस्कृत समजतात त्यांची अशी समजूत असते की, जे जे काही पैशाला आकर्षित करून घेऊ शकते, पैसा मिळवू शकते, पैसा उत्पन्न करू शकते ते ते उपयुक्त होय. प्रत्येक गोष्टीचा निर्णय व मूल्यमापन आर्थिक दृष्टिकोनातूनच केले जाते. ह्यालाच मी ‘उपयुक्ततावाद’ म्हणते.

आणि हा आजार खूपच संसर्गजन्य आहे कारण या रोगापासून अगदी लहान मुलांचासुद्धा बचाव होऊ शकलेला नाही. ज्या वयात मुलांनी सौंदर्य, महानता, पूर्णत्व यांची स्वप्ने पाहावयास हवीत, त्या वयात आजची मुले केवळ पैशाची स्वप्ने पाहू लागली आहेत आणि त्यांना चिंता आहे ती हा पैसा मिळवायचा कसा ह्याची.

म्हणून जेव्हा ती मुले अभ्यासाचा विचार करीत असतात, तेव्हा सर्वात जास्त ती ह्याच गोष्टीचा विचार करीत असतात की त्यांना काय उपयोगी पडू शकेल. काय केले असता, मोठे झाल्यावर त्यांना त्यातून भरपूर पैसा कमावता येतील. त्यांच्यालेखी एकच गोष्टी सर्वाधिक महत्त्वाची ठरते ती म्हणजे परीक्षेत यशस्वीरित्या उत्तीर्ण होण्यासाठी स्वत:ची तयारी करणे; कारण पदविका, प्रमाणपत्र, विविध पदव्या यांच्या साहाय्यानेच केवळ त्यांना चांगले हुद्दे प्राप्त होऊ शकतील आणि ते त्यातूनच भरपूर पैसा कमावू शकतील. त्यांच्यालेखी अभ्यासाचा इतर कोणताच हेतू नसतो, त्याव्यतिरिक्त त्यांना अभ्यासात काही स्वारस्यही नसते.

ज्ञानासाठी ज्ञान मिळविणे, प्रकृती आणि जीवनाचे रहस्य जाणून घेण्यासाठी अभ्यास करणे, जाणिवेचा विकास घडविण्यासाठी स्वतः शिकणे, स्वत:च स्वत:चा स्वामी बनण्यासाठी स्वयंशिस्त लावणे, स्वत:च्या दुर्बलता, अक्षमता व अज्ञान यांवर मात करणे, अधिक उदात्त व विशाल, अधिक उदार व अधिक सच्च्या अशा ध्येयाच्या दिशेने मार्गप्रवण होणे…. या साऱ्याचा आजची मुले क्वचितच विचार करतात आणि या साऱ्या गोष्टींना ते फार आदर्शवादी, कल्पनारम्य असे मानतात. व्यावहारिक बनणे, पैसा कसा कमवावयाचा हे शिकणे आणि त्यासाठी स्वत:ला तयार करणे फक्त ह्याच गोष्टी त्यांच्या लेखी महत्त्वाच्या असतात.

जे अधिक उन्नत आणि चांगल्या जीवनाची आकांक्षा बाळगतात, जे ज्ञान व पूर्णत्वासाठी तहानलेले असतात, येणाऱ्या अधिक पूर्ण सत्य अशा भविष्यकाळाची जे आतुरतेने वाट पाहतात केवळ अशीच मुले येथे आम्हाला हवी आहेत. इतरांसाठी बाहेरील जगामध्ये भरपूर जागा आहे.

– श्रीमाताजी

शिक्षक : एखाद्या प्रौढ व्यक्तीप्रमाणे लहान मूलदेखील त्याच्या आंतरिक सत्याविषयी सजग होऊ शकते का?

श्रीमाताजी : लहान मुलांमध्ये ही जाणीव अगदी सुस्पष्ट असते, कारण ते सत्य त्यांना कोणत्याही विचारांच्या वा शब्दांच्या गुंतागुंतीविना थेट संवेद्य होते – हे तेच असते ज्यामुळे त्याला अगदी स्वस्थ वाटते किंवा ज्यामुळे त्याला अस्वस्थ वाटते. ….आणि हे सगळे प्रौढ माणसांपेक्षा लहान मुलामध्ये अधिक सुस्पष्ट असते कारण प्रौढ व्यक्तीमध्ये ह्या आंतरिक सत्याविषयीची संवेदना मनाच्या कार्यामुळे झाकोळली जाते.

लहान मुलाला वेगवेगळे सिद्धान्त सांगणे अगदीच निरूपयोगी आहे कारण जेव्हा त्याचे मन जागृत होईल तेव्हा त्या सिद्धान्ताच्या विरोधी हजारो कारणे त्याला सापडतील.

मुलांमध्ये एक छोटेसे सत्य दडलेले असते ते म्हणजे त्यांच्या अंतरात्म्यामध्ये असणारी दिव्यत्वाची उपस्थिती. वनस्पती व प्राण्यांमध्येदेखील हे अस्तित्व असते. वनस्पतींमध्ये हे अस्तित्व जागृत नसते, प्राण्यांमध्ये ते जागृत व्हायला सुरुवात झालेली असते आणि लहान मुलांमध्ये ते खूपच जागृत असते. मला अशी मुले माहीत आहेत की, जी त्यांच्या वयाच्या पाचव्या वर्षी त्यांच्या वयाच्या चौदाव्या वर्षीपेक्षा आणि चौदाव्या वर्षी पंचविसाव्या वर्षापेक्षा या आंतरात्मिक अस्तित्वाविषयी, चैत्यपुरुषाविषयी (Psychic being) अधिक जागृत होती.

आणि आश्चर्य म्हणजे, ज्या क्षणापासून ती शाळेत जायला सुरुवात करतात, जेथे अस्तित्वाच्या बौद्धिक भागाकडे त्यांचे लक्ष वेधून घेईल असे गहन मानसिक शिक्षण ती घेतात, तेव्हापासून या चैत्यपुरुषाबरोबरचा असलेला त्यांचा संपर्क बहुधा ती नेहमीच व जवळजवळ पूर्णपणे हरवून बसतात.

जर तुम्ही अनुभवी निरीक्षक असाल, तर तुम्ही व्यक्तीच्या डोळ्यांत पाहूनच त्या व्यक्तीच्या आंतमध्ये काय चालू आहे ह्याविषयी सांगू शकाल. …डोळे हा आत्म्याचा आरसा असतो असे म्हटले जाते. पण जर डोळ्यांमधून अंतरात्मा अभिव्यक्त होत नसेल, तर त्याचे कारण असे असते की, तो खूप मागे गेलेला असतो, बऱ्याच गोष्टींनी झाकला गेलेला असतो. काळजीपूर्वकपणे लहान मुलांच्या डोळ्यांत पाहा, तुम्हाला त्यांच्या डोळ्यांत एक प्रकारचा प्रकाश दिसेल – काही जण त्याला निरागसता असे म्हणतात – ते इतके खरे असतात, ते जगाकडे कुतूहलाने टुकूटुकू पाहत असतात. हा कुतूहलाचा भाव चैत्यपुरुषाचा असतो, तो सत्य पाहत असतो पण त्याला या जगाविषयी फारशी काही माहिती नसते; कारण तो त्याच्यापासून फार दूर असतो. लहान मुलांमध्ये हे सारे असते पण जसजशी ती अधिकाधिक शिकत जातात, अधिकाधिक बुद्धिमान, अधिक शिक्षित होतात, तसतसे हे सारे पुसले जाते; आणि मग तुम्हाला त्यांच्या डोळ्यांमध्ये विचार, इच्छा, आवेग, दुष्टपणा – सारे काही दिसू लागते पण ती छोटीशी ज्योत, अत्यंत पवित्र, शुद्ध अशी ज्योत मात्र हरवलेली असते. तेव्हा तुम्ही खात्रीने सांगू शकता की, तेथे मनाचा प्रवेश झाला आहे आणि अंतरात्मा दूर खूप दूर गेलेला आहे.

ज्याचा मेंदू अजून पुरेसा विकसित झालेला नाही अशा मुलाकडे तुम्ही संरक्षणाचे किंवा प्रेमाचे, किंवा तळमळीचे किंवा सांत्वनाचे स्पंदन संक्रमित केलेत तर ते त्याला प्रतिसाद देते असे तुम्हाला आढळेल. पण जर तुम्ही एखाद्या शाळेत जाणाऱ्या चौदा वर्षाच्या मुलाचे उदाहरण घेतलेत की, ज्याचे आईवडील सामान्य आहेत आणि ज्यांनी त्याला सामान्य पद्धतीने वाढविले आहे, अशा मुलाबाबत त्याचे मन हे खूपच वर, पृष्ठस्तरावर आलेले आढळते; काहीतरी कठीण असे त्याच्या ठिकाणी असते, अंतरात्मा खूप दूर निघून गेलेला असतो. अशी मुले त्या कोणत्याच स्पंदनांना प्रतिसाद देत नाहीत. जणू काही ती प्लास्टर वा लाकडी ओंडक्याची बनलेली असावीत.

– श्रीमाताजी
(CWM 04 : 26-27)

यानंतर आपण अगदी स्वाभाविकपणे चार मुक्तींकडे वळतो की ज्या ह्या सिद्धीची सघन अशी रूपे असतात. अतिमानसिक एकत्वाचा पूर्ण साक्षात्कार झाल्याने, भावनांची मुक्ती म्हणजे त्याच वेळी दुःखभोगापासूनही मुक्ती असेल.

मानसिक मुक्ती किंवा अज्ञानापासून मुक्तता झाली म्हणजे ज्योतिर्मन (Mind of light) किंवा विज्ञानमय चेतनेची (Gnostic consciousness) आपल्या अस्तित्वामध्ये प्रस्थापना होईल, जिच्या अभिव्यक्तीमध्ये शब्दाचे सृजनशील सामर्थ्य असेल.

प्राणिक मुक्ती किंवा वासनामुक्ती प्राप्त झाल्याने, व्यक्तीला स्वत:ची इच्छा दिव्य इच्छेमध्ये संपूर्णत: आणि जाणीवपूर्वक एकरूप करण्याची क्षमता येईल आणि त्यामुळे नित्य शांती, प्रसन्नता आणि त्यांच्यापासून निर्माण होणारी शक्ती यांची प्राप्ती होईल.

अखेरचे शिखर म्हणजे शारीरिक मुक्ती; म्हणजेच भौतिक जगामध्ये असणाऱ्या कार्यकारणभावाच्या नियमापासूनही मुक्ती. संपूर्ण आत्मप्रभुत्वाचा परिणाम म्हणून, व्यक्ती आता प्राकृतिक नियमांची दास बनून राहत नाही. माणसांना अवचेतन वा अर्धचेतन भावावेगांच्या द्वारा कृती करावयास भाग पाडणा-या आणि सामान्य जीवनाच्या चाकोरीत बांधून ठेवणाच्या प्राकृतिक नियमांच्या आधीन आता अशी व्यक्ती राहत नाही. या मुक्तीच्या साहाय्याने मग, व्यक्ती कोणता मार्ग निवडावयाचा, कोणते कार्य पूर्ण करावयाचे हे पूर्ण जाणीवेने ठरवू शकते. आणि अंध नियतीच्या सर्व पाशांमधून ती व्यक्ती स्वत:ला मोकळे करते; की ज्यायोगे, व्यक्तीच्या जीवनक्रमामध्ये उच्चतम संकल्पशक्ती, सर्वोच्च सत्यमय ज्ञान, अतिमानसिक जाणीव यांखेरीज दुसऱ्या कोणाचाही हस्तक्षेप करू दिला जात नाही.

 

– श्री माताजी
(CWM 12 : 71)

(आश्रमीय जीवनाच्या सुरुवातीच्या काळात, श्रीमाताजींनी धम्मपदातील वचनांचे विवेचन केले होते, त्यातील हे एक वचन.)

धम्मपद : सावधानता हा अमरत्वाकडे वा निर्वाणाकडे नेणारा मार्ग आहे, बेसावधपणा हा मृत्यूकडे नेणारा मार्ग आहे. सावध मनुष्य कधीही मृत्यू पावत नाही, बेसावध मनुष्य हा मृतवतच असतो.

श्रीमाताजी : सावधानता म्हणजे नित्य जागृत असणे, दक्ष असणे, प्रामाणिक असणे – कोणत्याच गोष्टीने आश्चर्याचा धक्का बसता कामा नये. जेव्हा तुम्हाला साधना करावयाची असते, तेव्हा जीवनात प्रत्येक क्षणाला तुम्हाला निवड करावयाची असते – ध्येयाप्रत जाणाऱ्या मार्गावर पाऊल टाकावयाचे की, गाढ झोपी जायचे, ‘आत्ताच नको, नंतर पाहू’ असे म्हणत, मार्गात मध्येच बसून राहावयाचे, यांपैकी एकाची हरक्षणी निवड करावयाची असते.

तुम्हाला खाली खेचणाऱ्या गोष्टींना प्रतिकार करावयाचा एवढाच सावधानतेचा अर्थ नाही, तर प्रगतीकडे घेऊन जाणारी कोणतीही संधी तुम्ही गमावणार नाही यासाठी जागरुक राहावयाचे हाही त्याचा अर्थ आहे. एखाद्या दुर्बलतेवर मात करण्याची संधी, प्रलोभनाला बळी पडण्यापासून रोखणे, काही नवीन शिकण्याची, काही दुरुस्त करण्याची, कशावर तरी प्रभुत्व मिळविण्याची संधी न गमावणे म्हणजे सावधानता होय.

तुम्ही जर का सावध असाल, जागरुक असाल तर तुम्हाला जे करावयास काही वर्षे लागली असती, ते तुम्ही काही दिवसांतच साध्य करून घेऊ शकता. तुम्ही जर सावध असाल, दक्ष असाल तर तुमच्या जीवनातील प्रत्येक परिस्थितीला, प्रत्येक कृतीला, प्रत्येक हालचालीला, तुमच्या ध्येयाप्रत घेऊन जाणाच्या संधीमध्ये तुम्ही बदलवून टाकू शकता.

सावधानता दोन प्रकारची असते, सक्रिय आणि निष्क्रिय. तुमच्या हातून एखादी चूक घडणार असेल, जर तुम्ही एखादा चुकीचा निर्णय घेणार असाल, जर तुम्ही दुबळे ठरण्याचा वा तुम्ही मोहात पडण्याचा क्षण असेल तर अशा वेळी सावधनता तुम्हाला धोक्याचा इशारा देते. तर प्रगतीच्या संधीच्या शोधात असणारी सक्रिय सावधानता ही प्रत्येक परिस्थितीचा उपयोग करून घेऊन, त्वरेने प्रगती करण्याची इच्छा बाळगते.

तुम्हाला पडण्यापासून वाचविणे आणि प्रगतिपथावरून वेगाने वाटचाल करणे या दोहोंमध्ये पुष्कळच फरक आहे. आणि या दोन्ही गोष्टी आवश्यकच आहेत.

जो सावध, दक्ष नाही तो जणू काही आधीच मरण पावलेला असतो. जीवनाच्या आणि अस्तित्वाच्या खऱ्या हेतूशी त्याचा असणारा संपर्क तो केव्हाच गमावून बसलेला असतो.

अशा रीतीने, घटिका जातात, वेळ, परिस्थिती निघून गेलेली असते, जीवन निरर्थकपणे सरून जाते, हाती काहीही गवसत नाही आणि मग तुम्ही कधीतरी झोपेतून, सुस्तीतून जागे होता आणि स्वत:ला अशा एका विवरात पाहता की, जेथून सुटका होणे हे अतिशय कठीण असते.

– श्रीमाताजी
(CWM 03 : 202-203)

(आश्रमीय जीवनाच्या सुरुवातीच्या काळात, श्रीमाताजींनी धम्मपदातील वचनांचे विवेचन केले होते, त्यातील हे एक वचन.)

धम्मपद : सत्कृत्य करण्याची त्वरा करा. सारे दुष्ट, अनिष्ट विचार मागे सारा. कारण सत्कृत्य करण्यामागे उत्साह नसेल तर, ते मन अनिष्ट गोष्टींमध्ये रममाण होऊ लागते.

श्रीमाताजी : तुम्हाला असे वाटते की, तुम्ही खूप चांगले आहात, दयाळू आहात, विरक्त आहात आणि नेहमीच सद्भावना बाळगता – असे तुम्ही स्वत:लाच आत्मसंतुष्टीने सांगत असता. पण जर तुम्ही विचार करत असताना, स्वत:कडे प्रामाणिकपणे बघितलेत तर, तुमच्या असे लक्षात येईल की, तुमच्या डोक्यामध्ये असंख्य विचारांचा कल्लोळ असतो आणि कधीकधी त्यामध्ये अत्यंत भयावह असे विचारही असतात आणि त्याची तुम्हाला अजिबात जाणीवदेखील नसते.

उदाहरणार्थ, काहीतरी तुमच्या मनासारखे जेव्हा घडत नाही, तेव्हाच्या तुमच्या प्रतिक्रिया पाहा : तुम्ही तुमचे मित्र, नातेवाईक, परिचित, कोणालाही सैतानाकडे पाठविण्यासाठी किती उतावीळ झालेले असता पाहा. तुम्ही त्यांच्याबद्दल किती नको नको ते विचार करता ते आठवून पाहा, आणि त्याची तुम्हाला जाणीवदेखील नसते. तेव्हा तुम्ही म्हणता, “त्यामुळे त्याला चांगलाच धडा मिळेल.” आणि जेव्हा तुम्ही टिका करता तेव्हा तुम्ही म्हणता, ”त्याला त्याच्या चुकांची जाणीव व्हायलाच हवी.” आणि जेव्हा कोणी तुमच्या कल्पनेनुसार वागत नाही तेव्हा तुम्ही म्हणता, ”त्याला त्याची फळे भोगावीच लागतील.” आणि असे बरेच काही….

तुम्हाला हे कळत नाही, कारण विचार चालू असताना, तुम्ही स्वत:कडे पाहत नाही. जेव्हा तो विचार खूप प्रबळ झालेला असतो तेव्हा तुम्हाला त्याची कधीतरी जाणीव होतेही. पण जेव्हा ती गोष्ट निघून जाते, तेव्हा तुम्ही तिची क्वचितच दखल घेता. – तो विचार येतो, तुमच्यामध्ये प्रवेश करतो आणि निघून जातो. तेव्हा तुमच्या लक्षात येते की, जर तुम्हाला खरोखर शुद्ध आणि सत्याच्या पूर्ण बाजूचे बनायचे असेल तर, त्यासाठी सावधानता, प्रामाणिकता, आत्मनिरीक्षण, आणि स्वयंनियंत्रण या गोष्टी आवश्यक असतात, की ज्या सर्वसाधारणपणे आढळत नाहीत. तुम्हाला मग तेव्हा समजायला लागते की, खरोखरीच प्रामाणिक असणे ही अत्यंत अवघड गोष्ट आहे.

– श्रीमाताजी
(CWM 03 : 231)

(आश्रमीय जीवनाच्या सुरुवातीच्या काळात, श्रीमाताजींनी धम्मपदातील वचनांचे विवेचन केले होते, त्यातील हे एक वचन.)

धम्मपद : आपण अशा साधुपुरुषाच्या सहवासाची इच्छा बाळगली पाहिजे की, जो आपल्याला आपले दोष दाखवून देतो. तो जणू काही आपला गुप्त खजिनाच आपल्याला दाखवून देतो. अशा व्यक्तीबरोबर चांगले संबंध प्रस्थापित करावयास हवेत कारण, तो आपल्याला कोणतीही इजा पोहोचवित नाही. तो आपल्यासाठी हितकारकच ठरतो.

श्रीमाताजी : मानवी प्रगतीसाठी उपयुक्त असणाऱ्या सर्वच धर्मग्रंथांमध्ये नेहमीच असे सांगितलेले आढळते की, जो तुम्हाला तुमचे दोष दाखवून देतो, त्याविषयी तुम्ही कृतज्ञ असले पाहिजे आणि त्याच्या सहवासाची इच्छा बाळगली पाहिजे. पण येथे तीच गोष्ट मोठ्या समर्पकपणे सांगितलेली आहे : एखादा दोष तुम्हाला दाखविण्यात आला तर, जणू काही तुम्हाला खजिनाच दाखविण्यात आला आहे असे समजा. म्हणजेच ह्याचा अर्थ असा की, जेव्हा जेव्हा तुम्हाला तुमच्यामध्ये एखादा दोष, अक्षमता, आकलनक्षमतेचा अभाव, दुर्बलता, अप्रामाणिकता, तुम्हाला प्रगतीपासून रोखणारे असे जे काही सापडेल तेव्हा, ते म्हणजे जणू काही तुम्हाला अद्भुत खजिना लाभल्यासारखेच वाटेल.

“अरे देवा, अजून एक दोष !” असे म्हणत न बसता किंवा त्याविषयी खंत बाळगत न बसता, उलट तुम्हाला जणूकाही एखादी अद्भुत उपलब्धी झाली असल्याप्रमाणे आनंद झाला पाहिजे. कारण जी गोष्ट तुम्हाला प्रगत होण्यापासून रोखत होती ती गोष्ट आता तुमच्या पकडीत आली आहे. आणि एकदा का तुमच्या ती गोष्ट पकडीत आली की, तिला खेचून बाहेर काढा. कारण असे मानले जाते की, अमुक एक गोष्ट करण्याजोगी नाही असे योगसाधकाला ज्या क्षणी समजते, त्याच क्षणी, ती दूर सारण्यासाठी, बाद करण्यासाठी आणि नष्ट करण्यासाठी लागणारी शक्तिही त्याच्या ठायी असते.

दोषाचा शोध लागणे ही एक प्राप्ती आहे, उपलब्धी आहे. जणू काही आत्ताच बाहेर घालवून दिलेल्या धूसतेच्या छोट्या कणाची जागा घेण्यासाठी प्रकाशाचा पूर आत शिरला आहे.

जर तुम्ही योगसाधना करीत असाल, तर तुम्ही दुर्बलता, नीचता, इच्छाशक्तिचा अभाव ह्या गोष्टींचा स्वीकार करता कामा नये. कारण तसे करणे ह्याचा अर्थ ‘ज्ञान झाले पण त्यापाठोपाठ सामर्थ्य आले नाही’ असा होतो. एखादी गोष्ट असता कामा नये ह्याची जाणीव होणे आणि तरीदेखील ती तशीच चालू ठेवणे हे दुर्बलतेचे लक्षण आहे; ही दुर्बलता कोणत्याही गंभीर अशा योगसाधनेत स्वीकारली जात नाही, अशा संकल्पशक्तिचा अभाव हा व्यक्तीला अप्रामाणिकतेच्या उंबरठ्यावर आणून सोडतो. तुम्हाला कळते की अमुक एक गोष्ट असता कामा नये, तुम्हाला हे ज्या क्षणी कळते, तेव्हा ती गोष्ट राहता कामा नये, हे ठरविणारे तुम्हीच असता.

कारण ज्ञान आणि सामर्थ्य ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. म्हणजे असे म्हणता येईल, तुमच्या अस्तित्वाच्या कोणत्याही भागात तुम्ही तुमच्या प्रगतीच्या मध्यवर्ती संकल्पशक्तिला विरोधी असणाऱ्या, वाईट इच्छेच्या छायेला थारा देता कामा नये; कारण तसे केल्याने ज्या अनिष्टाचा तुम्ही नायनाट केला पाहिजे त्याच अनिष्टासमोर तुमची प्रगतीची संकल्पशक्ती पौरुषहीन, दुबळी, धैर्यहीन, सामर्थ्यहीन ठरते.

अज्ञानातून घडलेले पाप हे पाप नसते; तो या जगतातील सर्वसाधारण अशा अनिष्टाचा एक भाग असतो; पण तुम्हाला माहीत असूनदेखील, तुम्ही जेव्हा पाप करता तेव्हा ते अधिक गंभीर असते. ह्याचा अर्थ असा की, फळामध्ये ज्याप्रमाणे एखादा कृमी दडून बसलेला असतो तसा दुरिच्छेचा एखादा घटक तुमच्यामध्ये दडून बसलेला आहे, कसेही करून, त्याला शोधून नष्ट केले पाहिजे, कारण बरेचदा अशा वेळी दाखविलेली दुर्बलता ही पुढे जाऊन, कधीच दुरुस्त न होऊ शकणाऱ्या अडचणींचे कारण बनते.

– श्रीमाताजी
(CWM 03 : 221)

एक गोष्ट महत्त्वाची आहे; ती अशी की, असे एक म्हातारपण आहे की, जे नुसत्या वाढत जाणाऱ्या वयापेक्षादेखील जास्त भयानक आणि जास्त खरे आहे ते म्हणजे : विकसित होण्याची व प्रगती करण्याची अक्षमता.

ज्या क्षणी तुम्ही वाटचाल करणे थांबविता, ज्या क्षणी तुम्ही प्रगत होणे थांबविता, ज्या क्षणी तुम्ही स्वत:ला अधिक चांगले बनविणे थांबविता, ज्या क्षणी तुम्ही शिकणे वा वाढणे थांबविता, ज्या क्षणी तुम्ही तुमच्यामध्ये रुपांतर घडविणे थांबविता, तेव्हा तुम्ही खरोखरच वृद्ध बनता म्हणजे असे म्हणता येईल, की विघटनाच्या दिशेने तुमचा प्रवास सुरु होतो.

अशी काही तरुण माणसे असतात, की जी वृद्ध असतात आणि असे काही वृद्ध असतात की, जे तरुण असतात. जर तुम्ही तुमच्यामध्ये प्रगतीची आणि रूपांतरणाची ज्वाला सोबत बाळगलीत, जर तुम्ही जागरुकपणे पुढे वाटचाल करण्यासाठी म्हणून, तुम्हाकडे असलेल्या सर्वाचा त्याग करण्याची तयारी ठेवलीत, जर तुम्ही नवीन प्रगतीसाठी, नवीन सुधारणेसाठी, नवीन रुपांतरणासाठी नेहमीच खुले असाल, तर तुम्ही चिरंतन तरुण आहात. पण तुम्ही आजवर जे काही मिळविलेले आहे, त्यामध्ये समाधानी होऊन आरामशीर बसलात तर; आपण ध्येयाप्रत जाऊन पोहोचलो आहोत आणि आता करण्यासारखे काहीही उरले नाही, आता फक्त केलेल्या प्रयत्नांची, कष्टांची फळे चाखावयाची अशी तुमची भावना झाली असेल तर… तर तुमच्या निम्म्याहून अधिक गोवऱ्या स्मशानात जाऊन पोहोचल्या आहेत असे समजावे. खरेतर, हीच आहे जर्जरता आणि हाच आहे मृत्यू.

जे करावयाचे शिल्लक राहिले आहे त्याच्या तुलनेत आजवर जे केले आहे, ते नेहमीच अपुरे असते. मागे पाहू नका. पुढे, नेहमीच पुढे पाहा आणि नेहमीच पुढे चालत राहा.

– श्रीमाताजी
(CWM 03 : 238)