श्रीमाताजी : सच्चा ऑरोविलवासी होण्यासाठी व्यक्तीने कसे असले पाहिजे ? असाच प्रश्न विचारला आहेस ना तू ? (‘अ’ला उद्देशून) त्याविषयी तुझ्या काही कल्पना आहेत का?

अ : खऱ्या अर्थाने ऑरोविलवासी (Aurovilian) होण्यासाठी माझ्या कल्पनेप्रमाणे पहिली गोष्ट महत्त्वाची आहे ती म्हणजे – भगवंताला पूर्णपणे आत्मार्पण करण्याचा दृढसंकल्प असणे.

श्रीमाताजी : छान, चांगलेच आहे; पण असे लोक फार थोडे असतात. मी हे पहिल्या क्रमांकावर लिहिणार आहे… आता आपण क्रमांक दोनचा विचार करू.

वर्तणुकीच्या दृष्टिकोनातून पाहता, अगदी नित्याच्या व्यवहारातील गोष्टी, उदाहरणार्थ : आपल्याला सर्व नैतिक आणि सामाजिक रूढी, संकेतांपासून मुक्त व्हायचे आहे. पण अगदी ह्याच बाबतीत आपल्याला अत्यंत सावधगिरीने राहिले पाहिजे ! व्यक्तीने जणू परवानाच मिळाल्याच्या थाटात, वासनांधपणे भोग घेत, त्यांच्या गर्ततेत जात, नैतिक-सामाजिक बंधनांतून मुक्तता मिळविता कामा नये; तर मुक्तता मिळवावयास हवी ती या रूढीपरंपरांच्या अतीत होऊन ! वासनांचे निर्मूलन करून, उच्चाटन करून, आणि नीतिनियमांच्या जागी परमेश्वराच्या आज्ञेची प्रस्थापना करून !

…आपल्याला देह देण्यात आलेला आहे तो त्यास नाकारण्यासाठी नव्हे तर त्याचे अधिक चांगल्या गोष्टीत रूपांतर करण्यासाठी. आणि निश्चितपणे ऑरोविलच्या ध्येयांपैकी हे एक ध्येय आहे. मानवी देहात सुधारणा केलीच पाहिजे, तो निर्दोष व परिपूर्ण बनविलाच पाहिजे जेणेकरून तो माणसापेक्षाही उच्चतर जीवयोनीच्या अभिव्यक्तीसाठी सक्षम असणारा असा अतिमानवी देह बनेल. आणि आपण ह्या गोष्टीकडे दुर्लक्ष केले तर ते तसे घडणार नाही हे निश्चित ! ज्ञानसंपन्न शारीरिक संस्कृतीच्या पायावर, शारीरिक क्रियाप्रक्रियांचा उपयोग करून घेत, योग, आसनांद्वारे, व्यायामाद्वारे, देहाला सक्षम बनवले पाहिजे. लहानशा व्यक्तिगत अशा गरजा व त्यांच्या पूर्ततेसाठी नव्हे तर, उच्चतर सौंदर्य व चेतना अभिव्यक्त करण्यासाठी देह सक्षम बनविणे आवश्यक आहे. आणि यासाठी शारीरिक शिक्षणाला त्याचे महत्त्वाचे असे योग्य ते स्थान दिले पाहिजे…..

आणि अशा प्रकारची शरीराची जोपासना व त्यावरील संस्कार हे जाणीवपूर्वक, जागरूकपणे केले पाहिजेत. काहीतरी अतिरेकी टोकाच्या किंवा अदभुत् गोष्टी करण्यासाठी नव्हे तर, उच्चतर चेतनेच्या अभिव्यक्तीसाठी देह सशक्त आणि लवचीक बनण्याची क्षमता त्या देहात यावी म्हणून ही शरीरोपासना केली पाहिजे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा असा की : “ऑरोविलवासी हा स्वत:च्या इच्छावासनांचा गुलाम बनू इच्छित नाही.” हा महत्त्वाचा ठराव आहे.

– श्रीमाताजी
(CWM 13 : 335)

ऑरोविलवासी होण्यासाठीच्या मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून पुढील अटी आवश्यक आहेत.

मानवजातीच्या अनिवार्य अशा एकतेविषयी खात्री पटलेली असणे आणि ती एकता भौतिकामध्ये प्रत्यक्षात उतरावी म्हणून सहकार्य करावयाची इच्छा असणे.

भावी काळात प्रत्यक्षात उतरणाऱ्या शक्यतांना चालना देणाऱ्या सर्व गोष्टींमध्ये सहयोगी होण्याचा संकल्प बाळगणे. जसजसे हे कार्य प्रत्यक्षात येईल, प्रगत होईल तसतशी भौतिक परिस्थितीची आखणी केली जाईल.

*

भविष्याच्या दिशेने झोकून देणे म्हणजे भविष्यकाळ आपणास जे प्रदान करू शकतो ते प्राप्त करून घेण्यासाठी, स्वत:च्या सर्व लौकिक व नैतिक संपदेचा परित्याग करावयास सिद्ध असणे. अशी तयारी असणारे लोक मात्र अत्यल्प असतात.

भविष्य जे काही घेऊन येणार आहे ते हवे; मात्र ही नवी संपदा प्राप्त करून घेण्यासाठी, स्वत:पाशी असलेल्या गोष्टींचा त्याग करण्यास मात्र तयार नाहीत, असेच बहुतेक लोक असतात.

*

प्रश्न : ऑरोविलची उभारणी माणसाच्या आध्यात्मिकतेच्या स्वीकृतीवरती कशाप्रकारे अवलंबून आहे?

श्रीमाताजी : आध्यात्मिकता आणि भौतिक जीवन ह्यांच्यातील विरोध, ह्या दोहोंमधली विभागणी माझ्यासाठी निरर्थक आहे, कारण सत्याच्या अंतरी, जीवन आणि चैतन्य एकच असतात आणि भौतिक-शारीरिक कर्मामध्ये व कर्माद्वारे सर्वोच्च चैतन्याची अभिव्यक्ती झाली पाहिजे.

*

दिव्य कार्याच्या सेवेतच खरीखुरी आध्यात्मिकता सामावलेली आहे.

समष्टीसाठी काम करावयास नकार देणे म्हणजे केवळ स्वार्थीपणाचे लक्षण आहे आणि त्याला कोणतेही आध्यात्मिक मूल्य नाही.

ऑरोविलमध्ये जीवन व्यतीत करण्यासाठी स्वत:ला सक्षम बनवावयाचे असेल तर पहिली गोष्ट करणे आवश्यक आहे, ती म्हणजे स्वत:च्या अहंकारापासून स्वत:ला मुक्त करण्याविषयी स्वत:ला संमती देणे.

– श्रीमाताजी
(CWM 13 : 192), (CWM 13 : 197), (CWM 13 : 197), (CWM 13 : 210)

आपण इथे आहोत ते सर्व इच्छा-वासनांना टाकून देत भगवंताकडे वळण्यासाठी आणि ईश्वराविषयी जागरूक होण्यासाठी! ज्या ईश्वराच्या प्राप्तीची आपण इच्छा करतो तो कोणी दूरस्थ आणि अप्राप्य नाही. तो आपल्या स्वत:च्या सृष्ट विश्वाच्या अंतस्थ गाभ्यात विद्यमान आहे आणि आपल्याकडून ज्या कृतीची त्याला अपेक्षा आहे ती कृती म्हणजे ‘त्या’चा शोध. तसेच आपल्या व्यक्तिगत रूपांतरणाच्या साह्याने ‘त्याला’ जाणण्यास, ‘त्याच्या’शी एकत्व पावण्यास, आणि अखेरीस जाणीवपूर्वक ‘त्याला’ अभिव्यक्त करण्यास समर्थ बनणे ही होय. ह्याच गोष्टीसाठी आपण स्वत:ला समर्पित केले पाहिजे, हेच आपल्या अस्तित्वाचे खरे प्रयोजन आहे. आणि या श्रेष्ठ साक्षात्काराच्या दिशेने पडणारे आपले पहिले पाऊल म्हणजे अतिमानसिक चैतन्याचे आविष्करण.

– श्रीमाताजी

(CWM 13 : 347)

…..जगातील कोणत्याही समूहांच्या तुलनेत, ऑरोविलसारख्या एखाद्या नगरीची निर्मिती ही पृथ्वीच्या इतिहासातील अत्यंत महत्त्वपूर्ण घटना आहे असे जेव्हा मी लोकांना सांगते, तेव्हा ते माझ्यावर विश्वास ठेवत नाहीत. त्यांच्यादृष्टीने ती अगदी नगण्य अशी भाकडकथा आहे.

मी एकदा श्रीअरविंदांना विचारले, (कारण तेव्हा ऑरोविल ही माझी एक ‘संकल्पना’ होती, संकल्पना नव्हे, तर ती एक गरज होती, जी तीसवर्षांपेक्षा अधिक वर्षांपूर्वी, नव्हे, चाळीस वर्षांपूर्वी व्यक्त झाली होती.) म्हणून मी त्यांना विचारले आणि त्यावर त्यांनी उत्तर दिले, “सर्वसाधारण असा संघर्ष टाळण्याची ही मानवजातीसाठी असलेली सर्वोत्तम संधी आहे.” म्हणून, जेव्हा त्यांनी असे सांगितले तेव्हापासून मी त्यावर मन:पूर्वकतेने काम करीत आले आहे. अर्थात, ते नुसते ‘सांगणे’ नव्हते तर ती ‘अनुभूती’ होती.

…त्याचा पाया…”विविधतेतून एकतेची उभारणी करण्याची कला” हा आहे. एकसारखेपणा नव्हे. तर व्यामिश्रतेमधील सुमेळ यामधून आलेली एकता, प्रत्येक गोष्ट तिच्या तिच्या योग्य स्थानी असणे…..

श्रीअरविंदांना म्हणावयाचे होते, साधारणपणे सर्व घडामोडी अरिष्टाच्या दिशेने जात होत्या आणि म्हणून ऑरोविलची निर्मिती म्हणजे शक्तिप्रवाह योग्य दिशेने वळविण्याची कृती होती.

(The Mother : Conversations with a disciple, Oct 25, 1967)

सर्व राष्ट्रांनी एकत्रित येऊन सहकार्याने काही निर्मिती करावी याविषयी मी बोलत आहे… सत्याच्या पायावर उभारल्या जाणाऱ्या निर्मितीतील राष्ट्रांच्या परस्परसहकार्याविषयी मी बोलत आहे…. सत्याच्या पायावर उभारल्या जाणाऱ्या एका निर्मितीबद्दल सर्वांमध्ये असलेल्या एकत्रित आस्थेविषयी मी बोलत आहे.

असत्यावर आधारित संहारक असे सामर्थ्य मिळविण्यासाठी त्यांनी आजवर संयुक्तपणे स्वारस्य दाखविले आहे. (अर्थातच, परस्परांमध्ये कोणतेही साधर्म्य नसताना सुद्धा.) ऑरोविल म्हणजे त्यातीलच काही शक्तीचे चांगल्या दिशेने वळविणे आहे. (जी संख्येने कमी आहे, मात्र गुणवत्ता, दर्जा या दृष्टीने अधिक चांगली आहे.) खरोखरच अशी आशा आहे, – या आशेच्या पायावरच ऑरोविलची उभारणी झाली आहे. असे काही घडविणे ही सुमेळाची सुरुवात असेल.

– श्रीमाताजी
(The Mother : Mother’s Agenda, September 21, 1966)

जर सर्व देशांमध्ये ऑरोविलच्या निर्मितीविषयी स्वारस्य जागृत होऊ शकले तर, त्यांनी आजवर जी चूक केली आहे, त्याचे परिमार्जन करण्याची ताकद त्यांच्यामध्ये हळू हळू येऊ लागेल. आणि स्वाभाविकपणेच, जेव्हा मला हे दाखविण्यात आले तेव्हा माझ्या लक्षात आले. ऑरोविलच्या निर्मितीचा परिणाम अदृश्यामध्ये काय व कसा झाला आहे, हे मला उमगले.

ही कृती भौतिकातील, बाह्यवर्ती अशी नव्हती. ती अदृश्यातील कृती होती. आणि तेव्हापासून, सर्व देशांना हे कळावे म्हणून मी प्रयत्नशील आहे. परंतु त्यांना असे वाटते की, ते हुशार आहेत, त्यांना कोणी काही शिकवावयाची गरज नाही. म्हणून मी जे प्रयत्न करीत आहे, ते बाह्य स्वरूपाचे नसून आंतरिक, अदृश्यातील प्रयत्न आहेत…

तुम्हाला सांगावयाचे झाले तर, विविध देश ऑरोविलच्या निर्मितीमध्ये सहयोगी झाले तर, त्यांच्या अगदी थोड्याशा सहभागाने देखील त्यांचे भले होईल. त्यांच्या कृतीच्या तुलनेत कितीतरी अधिक प्रमाणात त्यांचे भले होईल.

– श्रीमाताजी

(The Mother: Mother’s Agenda, September 21, 1966)

पृथ्वीवर आज जी खरोखर दुःखदायक आणि भयंकर परिस्थिती आली आहे त्या तिच्या परिस्थितीकडे, तसेच सर्व देश ज्या दयनीय स्थितीतून जात आहेत त्या त्यांच्या अवस्थेकडे मी काही कारणासाठी पाहत होते. तेव्हा सर्वांना कवेत घेईल असे एक दृश्य माझ्या अंत:दृष्टीला दिसले; विविध देश आजवर जसे वागले आहेत आणि अधिकाधिक प्रमाणात, ज्या चढत्यावाढत्या खोटेपणाने वागत आहेत ते सारे त्या दृष्टीला दिसले. अत्यंत भयप्रद अशी विध्वंसक साधने तयार करण्यासाठी ते कशा रीतीने त्यांची सर्व सृजनशक्ती पणाला लावीत होते तेही दिसले. त्यापाठीमागे त्यांची अशी एक बालीश कल्पना होती की, ही संहारक साधने इतकी भयंकर असतील की त्याचा कोणी वापर करू धजावणार नाहीत. पण त्यांना हे कळत नाही की वस्तूंना देखील एक चेतना असते आणि त्यांच्यामध्ये आविष्करणाची शक्ती असते, ही सर्व विनाशाची साधनेच जणुकाही त्यांचा वापर व्हावा म्हणून दबाव टाकतात; आणि जरी माणसांना त्या साधनांचा वापर करावयाचा नसेल तरी त्यांच्यापेक्षाही अधिक बलवान अशी एक शक्ती त्यांना त्याचा वापर करण्यास प्रवृत्त करेल.

नंतर, हे संभाव्य अरिष्ट पाहून, ती चूक किमान निष्प्रभ करणारे असे काहीतरी खाली अवतरावे म्हणून मनातून एक प्रकारची याचना वा अभीप्सा निर्माण झाली. आणि एक उत्तर आले… मी ते माझ्या कानांनी ऐकले असे मी म्हणू शकत नाही, पण ते इतके सुस्पष्ट, इतके ठाशीव, इतके नेमके होते की जणू ते निर्विवाद होते. मला ते शब्दांत सांगणेच भाग आहे; मी जर ते शब्दांत व्यक्त करावयाचे ठरविले तर मी असे म्हणेन, “म्हणून तर तू ऑरोविलची निर्मिती केली आहेस.”

आणि असे सुस्पष्टपणे दिसले आहे की, ऑरोविल हे शक्तीचे व निर्मितीचे केंद्र होते, त्यामध्ये सत्याचे बीज होते आणि जर ते अंकुरित झाले, वाढू शकले, तर ज्या क्षणी ते विकसित पावेल तो क्षण म्हणजे ह्या युद्धसामग्री-सुसज्जतेच्या चुकीच्या भयावह परिणामाविरूद्ध दिलेली प्रतिक्रिया असेल.

– श्रीमाताजी

(Mother’s Agenda, Septermber 21, 1966)

न संपणाऱ्या युद्धांचा दीर्घ इतिहास असतानासुद्धा मानवजातीने आजवर खोल अंतरंगात एका आनंदमय, शांतीपूर्ण आणि सुसंवादी अशा सामूहिक जीवनाची अभीप्सा जोपासलेली आहे. मानवाच्या धार्मिक आणि धर्मनिरपेक्ष विचारांमध्ये या अभीप्सेने वेगवेगळी रूपे धारण केली आहेत. पण आजवर आपण फक्त तिच्या जवळपास जाईल अशी तात्पुरती एकता संपादन करण्यात यशस्वी झालो आहोत, खरी एकता मिळविण्यात नाही. कदाचित खराखुरा पायाच गवसलेला नाही. ह्या वेळेला मात्र, अतिमानस चेतनेने सुसज्ज होत, मूर्तिमंत स्वयमेव भगवत्शक्तीच्या पुढाकाराने, ह्या प्रयत्नाला पुनश्च सुरुवात झाली असल्याचे आपण पाहत आहोत. अधिक तेजोमय, सुसंवादपूर्ण आणि सुंदर जीवनासाठी असलेली ही अभीप्साच ‘ऑरोविल’च्या मूलस्थानी आहे हे आपल्याला दिसत आहे; हा एक असा ईश्वरी प्रकल्प आहे की, ज्याचा प्रारंभ भगवत्शक्तीने केला आहे, ज्याला मार्गदर्शन व साहाय्य देखील भगवत्शक्तीनेच केले आहे. हा मानवजातीसाठी स्वप्नवत वाटावा असा प्रकल्प आहे यात शंकाच नाही, परंतु हे स्वप्न आहे खुद्द परमेश्वराचे !

*

या भूतलावर असे एक स्थान असावे की, जेथे कोणतेच राष्ट्र मालकी हक्काचा दावा करणार नाही. जिथे प्रामाणिक अभीप्सा बाळगणारी, शुभसंकल्प असणारी सर्व माणसं, या विश्वाचे नागरिक म्हणून मुक्त मनाने जीवन जगू शकतील. ते सारे केवळ ‘एका’चीच, म्हणजेच त्या परम सत्याचीच आज्ञा पाळतील.

शांती, सलोखा, सुमेळ यांनी युक्त असे हे स्थान असेल जेथे, माणसांमधील संघर्षभावनेच्या सर्व प्रेरणा ह्या केवळ आणि केवळ दु:खभोग व चिंता यांच्या मूळ कारणांवर विजय मिळविण्यासाठीच उपयोगात आणल्या जातील; त्या प्रेरणा व्यक्तीची दुर्बलता आणि अज्ञान यांच्यावर मात करण्यासाठी उपयोगात आणल्या जातील, त्याच्या मर्यादा व अक्षमता यांना उल्लंघून जाण्यासाठी उपयोगात आणल्या जातील.

हे असे स्थान असेल की, जेथे इच्छावासनांच्या परिपूर्तीपेक्षा, तसेच सुखसुविधा, मौजमजा यांच्या मागे धावण्यापेक्षा, प्रगतीची तळमळ व आत्म्याची गरज या गोष्टींना अधिक प्राधान्य दिले जाईल.

या ठिकाणी, स्वत:च्या आंतरात्म्याशी फारकत न होता, लहान मुलं समग्रपणे, सर्वांगीण रीतीने मोठी होतील, विकसित होतील; शिक्षण हे केवळ परीक्षेत उत्तीर्ण होणे, पद वा पदवी मिळविणे यांच्यासाठी दिले जाणार नाही; तर विद्यार्थ्यांमध्ये अंगभूत असलेल्या क्षमतांच्या विकसनासाठी, तसेच सुप्त असलेल्या नवीन क्षमतांच्या प्रकटीकरणासाठी शिक्षण दिले जाईल.

या ठिकाणी, पद, नावलौकिक, प्रतिष्ठा यांची जागा सेवा करण्याची, सुव्यवस्था लावण्याची संधी घेईल. एखादी व्यक्ती बौद्धिक, नैतिक, आध्यात्मिक दृष्ट्या श्रेष्ठ असेल तर, त्या व्यक्तीचे श्रेष्ठत्व त्या संरचनेमध्ये जीवनातील वाढती सुखसमृद्धी व सत्ता यांच्याद्वारे अभिव्यक्त होणार नाही; तर त्या व्यक्तीवरील वाढत्या कर्तव्यांच्या आणि जबाबदाऱ्यांच्या रूपात ते श्रेष्ठत्व अभिव्यक्त होईल.

कलेच्या विविध रूपांमधून – चित्रकला, शिल्पकला, संगीत, साहित्य यांद्वारे – व्यक्त होणारे सौंदर्य सर्वांना सारख्याच प्रमाणात सुलभप्राप्य असेल; त्यामधून मिळणाऱ्या आनंदाचा आस्वाद घेण्याची क्षमता ही त्या व्यक्तीच्या सामाजिक वा आर्थिक स्थानावर अवलंबून असणार नाही; तर त्या त्या व्यक्तीच्या क्षमतांवर आधारित असेल. कारण या आदर्श अशा ठिकाणी, पैसा हा सर्वसत्ताधीश या स्वरूपात अस्तित्वात उरणार नाही; भौतिक संपत्ती आणि सामाजिक स्थान यांपेक्षा व्यक्तीच्या गुणवत्तेला कितीतरी अधिक महत्त्व असेल.

या ठिकाणी, कर्म हे व्यक्तीच्या उपजीविकेचे साधन नसेल तर, स्वत:ला अभिव्यक्त करण्याचा तो मार्ग असेल. सर्व समष्टीसाठी सेवारत असताना, कर्म हा स्वत:च्या क्षमता व शक्यतांना विकसित करण्याचा मार्ग असेल, परिणामतः ते व्यक्तीला उपजीविकादेखील पुरवेल आणि कार्यक्षेत्रही पुरवेल.

थोडक्यात म्हणजे, हे असे एक स्थान असेल की जेथे, सर्वसाधारणत: जे मानवी नातेसंबंध स्पर्धासंघर्षांवर आधारित असतात; त्यांची जागा खराखुरा बंधुभाव, सहकार्य, काही चांगले करण्याची, त्याचे अनुसरण करण्याची तळमळ ह्या गोष्टींनी घेतली जाईल.

हा आदर्श प्रत्यक्षात, वास्तवात उतरविण्यासाठी, अजून तरी पृथ्वीची तयारी नक्कीच झालेली नाही, हे स्वप्न समजून घेण्यासाठी आणि आत्मसात करण्यासाठी आवश्यक असणारे पुरेसे ज्ञान अजून पर्यंत मानवजातीकडे नाही, तसेच ह्या आदर्शाची प्रत्यक्षात अंमलबजावणी करण्यासाठी अगदी अनिवार्य असणारी चेतनाशक्ती देखील मानववंशाकडे आजमितीस नाही, म्हणूनच मी ह्यास ‘स्वप्न’ असे म्हणते.

– श्रीमाताजी
(CWM 12 : 93-94)

‘ऑरोविल’ ही नगरी म्हणजे असे विशाल स्वप्न साकारण्याचा प्रयत्न आहे. ह्या नगरीच्या प्रकल्पाचे उद्घाटन दि. २८ फेब्रुवारी १९६८ रोजी झाले.

एखाद्याकडे संपूर्ण पारदर्शी प्रामाणिकता हवी. प्रामाणिकपणाचा अभाव हेच आज आपणाला भेडसावत असणाऱ्या सर्व अडचणींचे मूळ आहे. सर्व माणसांमध्ये अप्रामाणिकपणा आहे. या पृथ्वीवर केवळ शंभर माणसं अशी असतील की, जी संपूर्णपणे प्रामाणिक आहेत. माणसाची मूळ प्रकृतीच त्याला अप्रामाणिक बनविते – ती खूप जटिल आहे, कारण तो सातत्याने स्वत:ला फसवत असतो, स्वत:पासून सत्य लपवत असतो, स्वत:साठी सबबी सांगत असतो.

योग हा अस्तित्वाच्या सर्व अंगांनिशी प्रामाणिक बनण्याचा मार्ग आहे.

संपूर्णत: प्रामाणिक असणे अवघड आहे पण एखादा किमान मानसिकरीत्या तरी प्रामाणिक बनू शकतो; किमान ह्याची तरी आपण ऑरोविलवासीयांकडून अपेक्षा ठेवू शकतो. दिव्य शक्ती आहे, पूर्वी कधीही नव्हती अशा रीतीने ती उपस्थित आहे; पण माणसांच्या अप्रामाणिकपणामुळे ती येथे अवतरीत होण्यापासून रोखली जात आहे, त्यामुळे तिची अनुभूती येऊ शकत नाही.

सर्व जगच खोटेपणामध्ये, असत्यामध्ये जगत आहे, आतापर्यंतचे माणसांमाणसांतील सर्व नातेसंबंध हे खोटेपणा व फसवणुकीवर आधारलेले आहेत. राष्ट्राराष्ट्रातील राजनैतिक संबंधही खोटेपणावर आधारलेले आहेत. त्यांना शांती हवी आहे असा ते एकीकडे दावा करतात, आणि त्याचवेळी ते स्वत:ला शस्त्रास्त्रांनी सुसज्ज करीत आहेत. परिवर्तित जगामध्ये माणसामाणसांमधील व राष्ट्रांमधील केवळ पारदर्शी प्रामाणिकतेलाच थारा असेल.

‘ऑरोविल’ हा या प्रयोगातील पहिला प्रयत्न आहे.

– श्री माताजी
(CWM 13 : 268)

केंद्रस्थानी असलेला बिंदू ऐक्याचे प्रतीक आहे, परमश्रेष्ठाचे प्रतीक आहे; आतील वर्तुळ हे निर्मितीचे, नगरीच्या संकल्पनेचे प्रतिनिधित्व करते; बाहेरील पाकळ्या त्या संकल्पनेच्या अभिव्यक्तीचे, मूर्तरूपाचे सामर्थ्य दर्शवितात.

*

शुभ संकल्प बाळगणाऱ्या सर्वांना ‘ऑरोविल’तर्फे शुभेच्छा ! ज्यांना प्रगतीची आस आहे आणि जे उच्चतर व अधिक सत्यमय जीवनाची अभीप्सा बाळगतात त्या सर्वांना ऑरोविल निमंत्रित करीत आहे.

– श्री माताजी

(CWM 13 : 212), (CWM 13 : 193)